- टीम बाईमाणूस
‘टीडीएम’ हा एक आगळावेगळा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे ‘अन पिंगळा गातो, राजा शिवरायांची गाथा’ हे एक लक्षणीय गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. या गाण्यातून प्रेक्षकांना एक पिंगळा पाहायला मिळणार आहे. रात्र सरताच आणि तांबडं फुटायच्या आत पिंगळा खांद्याला भिक्षेची झोळी, हातात कंदील आणि एका हातात कुरमुड घेऊन वाट सरू लागतो. पारंपरिक पद्धतीने आणि शुभचिंतन देणारा हा पिंगळा हल्ली नाहीसाच झाला आहे. सध्याच्या तरुणाईला तर हा ज्ञात नसेल वा ऐकण्यातही नसेल. याच पिंगळ्याचा नवाकोरा अंदाज ‘टीडीएम’ चित्रपटात पाहणं रंजक ठरणार आहे.
विशेष म्हणजे पिंगळ्यावर असणाऱ्या या गाण्यात पिंगळा खुद्द शिवरायांची कथा ऐकवतोय ते ऐकणं नक्कीच कानांना मंत्रमुग्ध करून सोडणारं आहे. ‘टीडीएम’ चित्रपटातील ‘पिंगळा’ या गाण्यात शिवबाची कथा आणि त्यांच्या मावळ्याचा पराक्रम पिंगळ्याच्या तोंडून ऐकायला मिळतोय. ‘अन पिंगळा गातो, राजा शिवरायांची गाथा’ असे बोल असणाऱ्या आणि दिवसाची सुरुवातच मोहक करणाऱ्या अशा या पिंगळ्याने केलेली राजाची स्तुती नक्कीच कौतुकास्पद आहे. या गाण्याच्या संगीताची आणि गायनाची बाजू गायक वैभव शिरोळे यांनी सांभाळली आहे, तर या गाण्याला दशरथ भाऊराव शिरोळे यांनी शब्दबद्ध केले आहे. ‘टीडीएम’ चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय ते या चित्रपटातून मांडण्यास सज्ज झाले आहेत.

पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी उर्फ पांगुळ
तांबडं फुटायला अंमळ अवकाश असतो. कोंबड्याच्या आरवण्याचाही मागमूस नसतो. रातकिड्यांची किर्रर्र किरकिर अजून सुरूच असते. अन् एवढ्यातच पिंगळ्यांच्या पालाला जाग येते. गावाकुसाबाहेर पडलेल्या पालातलं एवढुसं खोपटं. कंबरभर उंचीचं. त्यात कोण कुठे झोपलाय त्याचा ठावठिकाणा नसतो. पण चंद्र डावीकडे कलला की पिंगळ्यांच्या वस्तीवरल्या पुरुषाला आपोआप जाग येते. वर्षानुवर्षाची सवय. रात्रीच्या काळोखातच तो आपली धोपटी काढतो. धोपटीतला जामानिमा तपासतो. पिंजरीची डबी, भस्माची वडी, कपाळाच्या फेट्यावर बांधायचा चांद सगळं बाहेर काढतो. मग आधी कसून धोतर नेसतो. त्यावर बंडी घालतो. बंडीवर काळं जाकीट. डोक्याला 8 मीटर लांबीचा फेटा करकचून बांधतो. फेटा बांधून झाला की, त्याच्यावर देवदेवतांचे चांदीचे-पितळेचे मुखवटे, नाणी असलेली साखळी किंवा पट्टी (यालाच चांद म्हणतात) बांधतो. मग भस्माच्या वडीने कपाळावर आडवे फराटे ओढतो. भस्माने कपाळ पांढरशुभ्र झालं की त्यावर कुंकवाचं उभं बोट लावतो. मग खांद्याला भिक्षेची धोपटी लटकवतो. रात्रीच्या अंधारात दिसावं म्हणून एका हातात कंदील घेतो. तर दुसऱ्या हातात आपण आल्याची वर्दी लोकांना मिळावी म्हणून छोटा डमरू म्हणजे कुडमुडं घेतो आणि निघतो गावमागणीला…
पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामीण समाजव्यवस्था ही बलुते-अलुते आणि फिरस्ते अशा गावगाड्यावर आधारलेली होती. बलुतेदारीत वस्तुच्या मोबदल्यात वस्तू असा व्यवहार होता. उदाहरणार्थ कुंभाराने मडकी घडवून द्यावीत, सुताराने शेतीची लाकडी अवजारं बनवून द्यावीत, चर्मकारानं चामडी वस्तू बनवून द्याव्यात आणि त्याबदल्यात, शेतकऱ्याने त्यांना धान्य द्यावं. पण यापलीकडे अनेक अलुते आणि फिरस्ते असे होते, ज्यांचा शेतकऱ्याला प्रत्यक्ष उपयोग काही नव्हता. पण परंपरेने ते मागणारे म्हणजे ‘मागते’ होते आणि ते देव-धर्माच्या नावाने दान-भिक्षा मागायचे. आता-आतापर्यंतचा नीतीव्यवहार हा देवधर्मावर आधारित असल्यामुळे, आपल्या गाठीशी पुण्य जमा करण्यासाठी शेतकऱ्याला अशा मागत्यांची गरज लागायची. आपण या मागत्यांना दानधर्म केला, तर आपल्याला पुण्य लागेल, या भावनेतून शेतकरीवर्ग दान देत राहिला आणि त्यातूनच मागत्यांची परंपरा निर्माण झाली. ती जपली-जोपासलीही गेली. या मागत्यांच्याच नानाविध भेदांपैकी एक म्हणजे पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी उर्फ पांगुळ. खरंतर भटक्या-विमुक्तामंध्ये ‘जोशी’ नावाचा एक समाज आहे.

लोककला अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार मुकुंद कुळे यांनी या पिंगळ्यांवर विपुल संशोधन केले आहे. पिंगळ्यांच्या वस्तीवर राहून त्यांचे दैंनंदिन आयुष्य जवळून पाहिले आहे. मुकुंद कुळे म्हणतात की, वासुदेव-गोंधळी-नंदीबैलवाला आणि पांगुळ ऊर्फ कुडमुडे हे सारे वेगवेगळे व्यवसाय करणारे भटके कलावंतसमाज याच जोशी समाजाच्या अंतर्गत येतात. हे सगळे देवादिकांची गाणी म्हणून भिक्षा किंवा दान मागतात आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात. मात्र भिक्षा हेच उपजीविकेचं मुख्य साधन असल्यामुळे हे भटके समाज आजवर कधीच कुठेच स्थिर झाले नाहीत. ते महाराष्ट्राच्या गावोगावी भटकंती करत राहिले आणि आपल्या दात्यासाठी, त्याच्या भल्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिले. त्याचाच परिणाम म्हणून की काय दाते श्रीमंत झाले आणि भटका समाज मात्र कायम गरीबच राहिला. परंतु या मागत्या-भटक्या समाजांचा विशेष म्हणजे त्यांनी कधीच निव्वळ भिक्षा स्वीकारली नाही.
भिक्षेच्या-दानाच्या बदल्यात त्यांनी, दान देणाऱ्या दात्याची करमणूक केली किंवा मानसिकदृष्ट्या त्याला स्थिर, शांतचित्त करण्याचं काम केलं. अशा या मागत्यांमध्ये वासुदेव, नंदीबैलवाले, गोंधळी प्रसिद्ध आहेत. कारण ते दिवसाउजेडी येतात. पण पहाटेच्या काळोखात येऊन घरोघरच्या चिंताग्रस्तांना आश्वस्त करणारा पिंगळा मात्र तसा अजूनही उपेक्षितच. कारण तो येऊन कधी जातो, हेच कधी कुणाला कळत नाही. अगदी पहाटे उठणारी घरातली ज्येष्ठ मंडळी सोडली, तर त्याचा कुणालाच थांग लागत नाही. पण सर्वसामान्यांना त्याचा थांग लागला नाही, तरी सर्व भटक्या कलावंतांमध्ये पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी पहिल्या स्थानावर आहे. कारण परंपरेत एकप्रकारे तो मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका बजावत असतो. त्याच्याइतकी सूक्ष्मनिरीक्षण शक्ती क्वचितच कुणाकडे असेल. त्यामुळेच आज एकूणच मागत्यांचं प्रमाण कमी झालेलं असलं, तरी गावगाड्यात कधीतरी-कुठेतरी पहाटेच्या पारी कानावर पिंगळ्याचं गाणं पडतं –
पांगुळ आला वं माय
दान दे वं माय
शकुन जाणून घे वं माय
तुझं भलं व्हईल वं माय…
सोबत त्याच्या कुडमुड्याची, म्हणजे डमरुचीही लुडबुड ऐकू येते आणि एखाद्या घरातली सासुरवाशीण पसाभर तांदुळ किंवा डाळ घेऊन घराच्या उंबरठ्यात येते. कधी कधी दान देताना, शिधा देताना एखाद्या सासुरवाशीणीचा चेहरा चिंताक्रांत दिसतो. की मग पिंगळ्याचा होरा लगेच सुरू होतो –
त्रासलेली दिसतेस ग माय
काल रातच्याला भांडण झालं ग माय
मनाला लावून घेऊ नकोस ग माय
सुखाचा संसार करशील ग माय…
त्याने अंदाजाची चंची अशी सोडली की, आधीच सैरभैर झालेला महिलावर्ग लगेच विरघळतो आणि घळाघळा त्याला संसारकथा सांगायला सुरुवात करतो. मग तोही तोडपाण्याचे उपाय सांगतो आणि वर हक्काचे थोडे पैसे मिळवतो.
पिंगळा जात्याच हुशार. एखाद्या घरातली मायबाय शिधा आणायला गेली की, लगेच तो घरादारावर नजर टाकतो. घरादारातले सूक्ष्म बदल नजरेने टिपतो आणि घरातली महिला किंवा पुरुष काहीबाही द्यायला आला की सुरू करतो –
‘पिंगळ्याला दान कराया घेऊ नका हरकत
सोनपावलांनी तुमच्या घराला आलीया बरकत’
किंवा
‘नाव काय पाटीलबुवांचे, पुढील भविष्य सांगेन साचे
एका बायकोची संगत घडली, तेणे तुझी महिमा बुडाली…’
असे अंदाजपंचे काही ठोकताळे मांडले की त्यातलं काही ना काही लागू होतं. मग आपोआपच त्या घरातली महिला किंवा पुरुष पिंगळ्याच्या जाळ्यात अडकतो आणि पिंगळा आपला कार्यभाग साधतो. ही एकप्रकारे चलाखीच असते. कारण ‘त’ वरुन ताकभात ओळखण्याची कला पिंगळ्यांना अनुभवाने सिद्ध झालेली असते. पण अडचणीत असणारा माणूस पिंगळ्यावर भरवसा ठेवतो आणि त्याचं भविष्य खरो ठरो अथवा खोटं, त्या व्यक्तीच्या मनाला उभारी मिळते, हे मात्र मान्य करावंच लागतं.
पिंगळाचा अर्थ
किर्रऽऽ …रात्रींच्या वेगवेगळ्या प्रहरांवर गत पिढ्यांनी अनेक निशाचरांची नावे कोरली आहेत. पैकी, सूर्य उदयाला येण्याअगोदर काही वेळाचा जो प्रहर असतो त्या वेळेचे पूर्वजांनी ‘पिंगळ वेळ’ असे नामकरण करून ठेवले आहे. या नावातही एक अनोखी गूढता दडलीये. ‘पिंगळ’ म्हणजे घुबड पक्षी अन् ‘पिंगळ वेळ’ म्हणजे त्याच्या ‘किजबिजण्याची वेळ… त्यांच्या हातातल्या छोट्या डमरूचा ‘कुडमुड’ असा आवाज येतो, म्हणून ते कुडमुडे जोशी. ते भल्या पहाटे ज्या प्रहरी बाहेर पडतात, तो काळ पिंगळा (म्हणजेच घुबड) पक्षाच्या किजबिजण्याचा असतो. ते किजबिजणं म्हणजे बोलणं या समाजाला समजतं आणि त्यावरून ते शुभ-अशुभ शकुन सांगतात, म्हणून ते पिंगळा जोशी. यांनाच पांगुळ असंही म्हणतात. कारण ते ज्या प्रहरी दान मागायला बाहेर पडतात, तो काळ सूर्योदयापूर्वीचा असला, तरी त्या काळात सूर्याचा सारथी असलेल्या अरूणाचं आगमन झालेलं असतं. हा अरुण पायाने अधू असल्यामुळे त्याला पांगुळ असं लोकभाषेत म्हटलं जातं. साहजिकच त्यावरुन एवढ्या पहाटे बाहेर पडणार्या या समाजालाही ‘पांगुळ’ म्हणजे पांगळा हे नामाभिधान चिकटलं. एकप्रकारे पांगुळ हा अरुणाचा प्रतिनिधीच मानला जातो.

पिंगळा कलेचे आणखी एक अभ्यासक जितेंद्र तरटे यांनीही पिंगळा समाजावर लेखन केले आहे. तरटे म्हणतात की, गावकुसाबाहेनं पिंगळ्याला जसजशी गावाची वेस नजरेला पडू लागते तसतसा त्याच्या उजव्या हातातल्या कुडमुड्याचा (डमरूचा) चाळा आपोआप लयबध्द नाद करू लागतो. रानातनं गायी परतताना जशा त्यांच्या गळ्यातल्या घुंगूरमाळा दूरहून कानावर पडतात तितक्याच दूर अंतरावरन निद्रावस्थेतल्या गावकुसाच्या कानावर पिंगळ्याचं कुडमुडं (डमरू) लयबध्द नादाचं गारूड करू लागतं. अशा दूर अंतरावरून लयबध्दतेने ऐकू येणाऱ्या नादाला डिंडीबध्वनी म्हणतात. हा डिंडीब नकळत वेशीनजीकच्या एखाद्या अंगणात स्थिरावतो तेव्हा त्या घराची घरधनीण दाराच फळकुट जरास किलकिलं करून पसाभर धान्य घेऊन बाहेर डोकावते. मागत्याच्या पदरात दान टाकून पुण्य कमविण्याच्या परंपरा पूर्वजांनी घालून दिल्या असल्या तरीही संसारातल्या जुगारातला शकुन पडताळण्यासाठीच हा सारा पाप पुण्याचा खटाटोप आहे, हे चतुर पिंगळ्यांच्या नजरेतनं सुटत नव्हतं. मुठभर पुण्याच्या बदल्यात पसाभर स्वार्थ साधण्याची चतुराई विसरेल ती घरधनीण कसली? या समाजमनाच्या मानसशास्त्राची चांगलीच जाण पिंगळ्यांकडे वंशपरंपरेनेच आली असावी.
बलुते-अलुतेदारांच्या रचनेवर आधारलेल्या ग्रामसंस्कृतीने वासुदेवापासून तर भोप्यांपर्यंतच्या मागत्यांच्या पदरात भरभरून दान टाकलं. पण सूर्याच्याही अगोदर भल्या पहाटे लोकांची दारं पुजून शकून सांगणारा पिंगळा मात्र समाजमनानं एका अर्थाने उपेक्षितच ठेवला. पहाटेच्या प्रहरी चंद्र डाव्या बाजूला कलला की, पिंगळ्याची उलटगणती सुरू व्हायची अन् सूर्यनारायणाचा पहिला कोवळा किरण जन्म घेण्याच्या प्रहाराला पिंगळ्याची हातातल्या कुडमुड्याचा लयबध्द नाद करत जाणारी आकृती गावच्या वेशीवरनं पाठमोरी होत पुसट होत जायची. काही प्रतिमांच्या उगम अन् अंतालाही काळ्या सावलीचा शाप असतो. या प्रतिमा जन्मभर जनमाणसात ओझरत्या राहूनही त्या कधी उजेडात नसतात. त्यांची ही शोकांतिका जन्मजातच असते. पिंगळा या शोकांतिकेस अपवाद नाही.
असं म्हणतात की पिंगळा घुबडांची भाषा जाणतो अन् पहाटच्या नेमक्या त्याच प्रहरातं तो कंदिलाची वाट पेटवून त्यांच्या गप्पा ऐकत गावाची वेस ओलांडून माणसांची नशीबं पालटतो? कुणी म्हणतं त्याला कर्णपिशाच्च अवगत असतं, ते समोरच्या माणसाचा भूतकाळ त्याच्या कानात पुटपुटतं? हे सर्व खरंच असेल का?

‘लेकरांनो, भुतं-खेतं अन् भूत भविष्य ह्यो समदा माणसाच्या मनाचा खेळ हायं. आम्ही कुणाचं बी नशीब घडवत न्हाय. आम्ही फकस्त शकून सांगतो. चिंतेत गुरफटलेल्या माणसाला आशा दावतो. अडल्या नडल्याला आशा दावणं हे काय पाप हाय व्हयं? फकस्त माणसांमधीच विषमता पेरून माणूस स्वस्थ बसला न्हाई! तेनं गावकुसापासनं तुटलेल्या मणसवटीला वंगाळ ठरविलं…तेनं दाट जंगलातल्या चपट्या नाकाच्या घुबडाला बी वंगाळ ठरविलं..पर त्येंनीच आम्हाला थारा धिला तवा त्येच आमचं गावकुसं अन् त्येच आमचं सगंसोयरं’, असं पिंगळा सांगतो.
पिढ्यान् पिढ्या या पिंगळ्यानं महाराष्ट्रातली गावं पालथी घातली. जगण्याचा आशावाद दाखवून इथल्या समाज मनाचं औदासिन्य घालविण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्या रूबाबदार फेट्यावरचा चांद भिंतीवरच्या खुंटीवर स्थिरावू पाहतो आहे. त्याच्या पावलातल्या चामड्याच्या चपलांचा कर्रकर्राटही थंडावला आहे, त्याचं कुडमुडं आता थरथरत्या हातानं लय धरू शकत नाही. त्याच्या हातातल्या कंदीलाने आता काजळी पकडली आहे कारण, त्याला माणसाच्या जगातला शकुन सांगणाऱ्या झाडावरच्या पिंगळ्यांची म्हणजे घुबडांची वस्तीच आता अपशकुनी माणसाच्या कुऱ्हाडीची बळी ठरली आहे. त्यामुळे आता पहाटेचा प्रहर उजाडतो… गावकुस उठण्याअगोदर पिंगळा जागा झालेला असतो. प्रयत्नाने सारा पेहराव करतो. ‘शकुन ऐक वं मायं..!’ अशी हाळीही देतो पण् तो आता शकुन सांगू शकत नाही. कारण त्याच्या कानात शकुन सांगणारी घुबडांची किजबीज अप्पलपोट्या स्वार्थी माणसाने थांबविलेली असते.