“चंद रोज़ और मेरी जान…” बनज्योत्स्नाने उमर खालिदला लिहिलेले पत्र व्हायरल

गेल्या तीन वर्षांपासून UAPA च्या आरोपाखाली तुरुंगात असणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ता उमर खालिदसाठी त्याची प्रेयसी आणि पत्रकार बनज्योत्स्ना लाहिरीने लिहिलेले हे पत्र…

  • टीम बाईमाणूस

“मागच्या तीन वर्षांपासून आपण दोघे एकाच शहरात राहूनही ‘लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप’मध्ये आहोत. नाही म्हणायला आठवड्यातून एकदा तिहारच्या तुरुंगात असणाऱ्या काचेच्या तावदानाआडून आपली भेट होत असते आणि तिथे असणाऱ्या इंटरकॉममधून तुझा आवाजही मला ऐकू येतो. त्या भेटीत आपण नेहमी खळखळून हसतो, विनोद करतो, सिरीयस, दुःख देणाऱ्या विषयांवर आपण बोलायचे टाळतो. त्या भेटीनंतर जेव्हा तिथून मी एकटी बाहेर पडते तेव्हा मात्र मला प्रचंड वेदना होतात. तुरुंगातून तो मला कधी कधी कॉलही करतो आणि आम्ही कोर्टात ‘डेट’वरही जातो. न्यायालयात आम्ही ‘इशारो इशारो में’ एकमेकांशी गप्पाही मारतो. कालच मी त्याला सांगितलं की तुझी हेअरस्टाईल बावळट दिसतेय. त्यावर तो इशारा करूनच म्हणाला की “तुझ्या मेस्सीची पण स्टाईल अशीच आहे. ‘मीही मग त्याला म्हणाले “स्वतःची जागा ओळखून राहा.” म्हणजे बघा ना या पठ्ठ्याला फुटबॉलमधलं काहीच कळत नाही त्यामुळे या विषयावर आम्ही न बोललेलंच बरंय. तो आयपीएल बघतो आणि काल तर त्याने मला विचारलेही मी कोणत्या संघाच्या बाजूने आहे म्हणून. मी अजिबात क्रिकेटची फॅन नाहीये आणि आयपीएल म्हणजे क्रिकेट थोडीच आहे?

2008 ला माझी आणि उमरची भेट झाली. त्यावेळी तो दिल्ली विद्यापीठात बीए करत होता आणि मी जेएनयुमध्ये माझ्या एमफीलचा अभ्यास करत होते. बाटला हाऊस एन्काउंटर नंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सोबत उभे राहण्यासाठी आम्ही दोघेही तिथे गेलो होतो. आमची तिथे भेट झाली, वर्षांमागून वर्षे गेली लिंग आणि जात या विषयावर डाव्यांचे विचार आम्हाला पटले नाहीत म्हणून आम्ही हळूहळू त्या विचारांपासून दूर होत गेलो. आम्हाला एकत्र आणणाऱ्या एका न्याय्य आणि समतामूलक समाजाची कल्पना करण्याच्या आमच्या प्रवासाने आम्हा दोघांना एकत्र आणले. आम्ही 2013 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरु केलं. 2016 मध्ये एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर चाललेल्या चर्चेमध्ये आम्हाला लक्ष्य केले गेले, विशेषतः उमरवर प्रचंड टीका करण्यात आली.

Umar Khalid - baimanus

त्या क्षणापासून रोजच्या आयुष्यात सरकारी दडपशाही आणि माध्यमांनी केलेल्या आरोपांसोबत आम्हाला लढावं लागतंय. या दोन्ही गोष्टींची एक टांगती तलवार नेहमी आमच्या डोक्यावर आहे. 2018 मध्ये कुणीतरी उमरची हत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी त्याच्या बाजूलाच उभी होते. मी त्या हल्लेखोराला बंदूक काढताना पाहिले होते. पोलीस म्हणाले की तुम्ही नशीबवान आहात कारण त्याची बंदूक जाम झाली होती. या अशा प्रसंगांना सामोरे गेल्यावर कदाचित तुम्ही एकमेकांना अजून जास्त ओळखू लागता, तुमचे नाते आणखीन मजबूत होते.

आमच्या खेळांच्या निवडी वेगवेगळ्या असल्या तरी पुस्तके मात्र एकसारखीच आवडतात. तो तुरुंगात असताना त्याने वाचलेल्या पुस्तकांचे जतन करण्यासाठी मी नवीन आलमारी बनवायला घेतलीय. माझ्या आई वडिलांना माझ्यापेक्षा कितीतरी जास्त त्याचा अभिमान आहे. त्याच्या पालकांचंही माझ्यावर प्रचंड प्रेम आहे.

‘त्यांनी’ उमरचे स्वातंत्र्य आमच्यापासून हिरावून घेतले असले तरी त्याच्या आनंदासाठी मात्र आम्ही अजूनही लढत आहोत. आम्हाला एकमेकांपासून दूर व्हायला भाग पाडले गेल्यापासून आम्ही एकमेकांच्या अधिक जास्त जवळ आलो आहोत असं मला वाटतं. “

हे पत्र सध्या व्हायरल होत असलं तरी मागच्या वर्षी जानेवारी 2022 मध्ये बनज्योत्स्नाने आऊटलूकला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आणि उमरच्या आठवणी सांगितल्या होत्या. उमर खालिदला अटक झाली त्या क्षणाबद्दल बोलताना ती म्हणाली की, “त्या दिवशी उमर माझ्या घरी आला होता आम्ही दोघांनी एकमेकांसोबत नाश्ता केला आणि त्यानंतर 13 सप्टेंबरच्या मध्यरात्री त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. आम्हाला हे घडणार आहे याची कल्पना होती.”

Umar Khalid

लाहिरी म्हणते की, “प्रत्येकाने उमरलाच त्या दंगलीचा प्रमुख दोषी ठरवले होते. महाराष्ट्राच्या अमरावतीमध्ये उमरने केलेल्या एका प्रदीर्घ भाषणाबाबत अमित मालवीय यांनी केलेल्या ट्विटनंतर मला आमच्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल लागली होती आणि यावेळी हे संकट अधिक मोठं असणार आहे हेही आम्हाला वाटत होतं.”

उमर खालिदला अटक झाली तेव्हापासून लाहिरीसह त्याच्याजवळ असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला एका चिंतेने, भीतीने ग्रासलेले आहे. “आठवड्यातून एकदा आम्हाला कॉलवर 15 मिनिटे बोलायला मिळते आणि त्या 15 मिनिटांची वाट बघण्यातच आमचा आठवडा कधी निघून जातो हे आम्हाला कळत नाही. आमच्याकडे एकमेकांना सांगायला कित्येक गोष्टींचा खजाना असतो पण वेळ आमचा वैरी होतो आणि आम्हाला मनातलं एकमेकांशी बोलू देत नाही.”

“आमचा कॉल सुरु होतो तेव्हा आम्हाला एकमेकांना सांगायला खूप काही असतं पण काही क्षणातच तो म्हणतो की “चला चला आता आपला वेळ संपत आलाय,” आम्ही बोलत असतो तेव्हा नेहमी त्याच्या मागे पोलीस घुटमळत असतात.” त्यामुळे एवढ्या कमी वेळात बोलण्याची तयारी करूनच त्याचे मित्र उमरला कॉल करू शकतात. वेळच एवढा कमी असतो की काय बोलायचं हे आधीच ठरवावं लागतं. आता या सगळ्याची उमरच्या मित्रांना सवय झालीय. बोलायची पाच मिनिटे संपली की कॉल आपोआप कट होतो.

लाहिरी म्हणते की, “तो पाच मिनिटे मला कधीच पुरत नाहीत. आम्ही काहीतरी बोलत असतो आणि कॉल कट होतो त्या क्षणाला जे काही वाटतं ते तुम्हाला मोडून टाकणारं असतं.” 2021 मध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उमर तुरुंगात आजारी असल्याचे कळले आणि बनज्योत्स्नाला काय करावे काहीच सुचले नाही. “त्या क्षणाला मला प्रचंड असहाय्य वाटत होते. विचार करा तो तिकडे तुरुंगात आडवा पडून होता आणि मी काहीच करू शकत नव्हते.”

मात्र उमर हा प्रचंड धीराचा माणूस आहे, तो निग्रही आहे आणि म्हणूनच आम्हाला लढण्याची प्रेरणा सतत मिळत असते असे बनज्योत्स्ना म्हणते. “मी 2008 पासून उमरला ओळखते आणि मला त्याची बलस्थानं माहिती आहेत. एका आदर्श लोकशाहीची त्याची कल्पना त्याला नेहमी प्रेरित करत असे. त्याकाळी मी ते सगळं पाहिलंय.” “मला माहितीय की हे कधीतरी संपेल. ही संविधानाची लढाई आहे आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे, ही लढाई कठीण असेल याचीही मला कल्पना आहे. पण आता आम्हाला हे कळले आहे,” बनज्योत्स्ना सांगत होती.

Umar Khalid - baimanus

उमरच्या आठवणी त्रास देऊ लागतात, एकमेकांना भेटायची इच्छा तीव्र होते आणि या सगळ्या भावनांचा कल्लोळ माजतो त्यावेळी ती म्हणते की “मी उमर तुरुंगातून सुटला आहे आणि आम्ही दोघे मिळून शिकागो 7 नावाचा चित्रपट पाहत आहोत अशी कल्पना करते आणि काही काळ सुखावून जाते.”

अर्थात फैज अहमद फैजच्या या कवितेने या प्रवासात तिची नेहमी मदत केलीय :

“चंद रोज़ और मेरी जान फ़क़त चंद ही रोज़

ज़ुल्म की छाँव में दम लेने पे मजबूर हैं हम

और कुछ देर सितम सह लें तड़प लें रो लें

अपने अज्दाद की मीरास है माज़ूर हैं हम

चंद रोज़ और मेरी जान….”

(आणखी फक्त काही दिवस माझ्या प्रिये फक्त काही दिवस, अन्यायाच्या सावलीत जगण्यासाठी आपण मजबूर आहोत
आणखी काही काळ अन्याय सहन कर, आक्रोश कर, मनमोकळी रड, आपल्या भूतकाळाचा हा वारसा सहन करण्यासाठीचे आपले हे प्रारब्ध आहे… आणखी फक्त काही दिवस प्रिये… बस्स)

(दिल्ली दंगलीप्रकरणी कट रचल्याचा आरोपाखाली सप्टेंबर 2020 मध्ये दिल्ली पोलिसांनी उमर खालिदला अटक केली होती. त्याने केलेल्या कथित ‘प्रक्षोभक भाषणांबद्दल’ यूएपीए अंतर्गत देखील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता सप्टेंबर 2020 पासून उमर तुरुंगात आहे.)

अनुवाद : आशय बबिता दिलीप येडगे

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here