औरंगाबादमधील MGM विद्यापीठ, महात्मा गांधी मिशन ट्रस्टने स्थापित केले आहे. जे मागील चार दशकांपासून शिक्षण, संशोधन आणि सेवेत अग्रगण्य आहे.
ओळख
महाराष्ट्रासारख्या विकसनशील राज्यात खास करून दुर्गम आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लाखो नागरिकांपर्यंत अजूनही माध्यमे पोहोचली नाहीत हे वास्तव आहे. विशेषतः दलित, आदिवासी, भटके विमुक्त आणि ग्रामीण भागातील लाखो शेतकरी-शेतमजूर असे अनेक समाजातील घटक सांगता येतील. याशिवाय अस्तित्वात असणाऱ्या बहुतांश माध्यमांचा सगळा व्यवहार हा पुरुषी आणि अभिजन असल्यासारखा आहे. पुरुषी चेहरा असलेल्या या माध्यमात विशिष्ट वर्गाच्या, जातीच्या आणि लिंगाच्याचं बातम्यांना स्थान दिलेले असते. नेहमीच बहुसंख्यांचा विचार करून बातम्यांची रचना केली जाते. यामुळेच पत्रकारांची प्रस्थापित असणारी व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या संवाद-माध्यमांच्या मदतीने राज्यातील सर्व घटकांतील महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्यांच्या रोजच्या जगण्यापासून ते त्यांच्या आजूबाजूचा पूर्ण अवकाश त्यांच्या भाषेत व्यक्त करता यावा यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठ कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन, औरंगाबाद तर्फे सुरू होत असलेला एक महत्वांकांक्षी आणि आगळावेगळा उपक्रम.
कोणतेही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा हा एक प्रयत्न आहे. baimanus.in या वेबसाईटचा उद्देश आपली माती आणि माणसांशी इमान राखणारी पत्रकारिता करण्याचा आहे. सामान्य माणूस केंद्रित पत्रकारिता करण्यावर भर देणारा आहे. 'बाईमाणूस'चा अजेंडा लोकानुनय करणारा नाही पण लोकांचे प्रश्न, मुद्दे आणि हित याला प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुखी पत्रकारितेचा आहे. माहितीचा महापूर सतत या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे. त्यामुळे अनेकदा आपली अवस्था भर कोलाहलाच्या मधोमध उभी असल्यासारखी होते. त्यामुळे या सर्वांकडे कसे पाहावे, त्यातून काय घ्यावे आणि काय नाही, याचा दृष्टिकोन देण्याचे काम 'बाईमाणूस' करत आहे.
भूमिका
आमच्याविषयी
प्रशांत पवार,
संपादक , बाईमाणूस.'बाईमाणूस' या मराठी वेबपोर्टलवर आणि इतर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आपले मनापासून स्वागत. 'बाईमाणूस' हे व्यासपीठ आवाज नसलेल्या समूहांचा माध्यमांमधील आवाज वाढवण्यासाठीचा या महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आहे. शहरीकरणासोबतच ग्रामीण भागाकडे प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज आहे. यासाठीच 'बाईमाणूस' हे व्यासपीठ आकारास आले आहे. "सोशल नेटवर्क" या शब्दाची ताकद आताशा जाणवू लागली आहे. आपले हे नवे माध्यम ख-या अर्थानं जनतेचे व्यासपीठ व्हावे, सामान्य शेतकरी आणि शोषण व्यवस्थेच्या विरोधातील संघर्षाचे माध्यम व्हावे, अशी आमची इच्छा आहे. 'बाईमाणूस' हे असे "नवे स्वप्नं" बघणा-या माध्यमांमध्ये वेगळी वाट धुंडाळणाऱ्या माणसांचे मोहोळ आहे. 'बाईमाणूस' ही सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींची ऑनलाइन आणि 'ग्रासरूट' चळवळ आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामीण आणि शहरी नागरिकाने सहभागी व्हावे. प्रशांत पवार यांनी दैनिक लोकसत्ता मध्ये सहाय्यक संपादक म्हणून सोळा वर्षे काम केले आहे त्याचबरोबर दैनिक दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीचे संपाद्क म्हणून १० वर्षे काम केले आहे. महाराष्ट्रातील वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या , महाराष्ट्राची परिघाबाहेरील सांस्कृतिक , साहित्यिक , सामाजिक चळवळीला रुजविणाऱ्या पत्रकारांपैकी प्रशांत पवार हे एक आहेत.
डॉ. रेखा शेळके
प्राचार्या,एमजीएम पत्रकारिता व जनसंवाद महाविद्यालय.मराठवाडा ही वैविध्यतेनं नटलेल्या संस्कृती, भौगोलिक पार्श्वभूमीची, संतांची भूमी. एका पत्रकारिता महाविद्यालयाची प्राचार्या म्हणून काम करत असताना या भागातील संस्कृती, साहित्य, येथील असंख्य घटना-घडामोडी अन् समस्या सातत्यानं अभ्यासता आल्या. पत्रकारितेच्या क्षेत्रात विशिष्ट ध्येय समोर ठेवून येणाऱ्या नवोदित पत्रकारांना पुस्तकी ज्ञानासोबतच वास्तववादी, अनुभवांवर आधारीत आणि प्रत्यक्ष ऑन फिल्ड जर्नालिझमचा साक्षात्कार व्हावा. स्पष्ट, निर्भिड, वास्तववादी आणि उपयोजित पत्रकारिता नेमकी कशी करावी, याची उकल शिकत असतानाच व्हावी, यासाठी 'बाईमाणूस'सारखा विलक्षण आणि अनोखा प्रयोग प्रत्यक्षात साकारणे मला महत्वाचे वाटते. मुख्य प्रवाहातील माध्यमांसाठी तसेच जनसामान्यांच्या भावभावनांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अशा प्रयोगांच्या माध्यमातून एक उत्तम, अभ्यासू आणि आसपासच्या परिस्थितीची जाण असलेला तसेच त्याविषयी लोकांना जागरुक करणारा पत्रकार घडावा, असा एमजीएम जनसंवाद आणि वृत्तपत्र महाविद्यालयाचा नेहमीच प्रयत्न असतो. 'बाईमाणूस' हा उपक्रमही याच प्रयत्नाचा एक भाग आहे. यात आपण सर्वांचे मन:पूर्वक स्वागत....