- टीम बाईमाणूस
बाबा के दरबार बा, ढहत घर-बार बा
माई-बेटी के आग में झोंकत यूपी सरकार बा…..
यूपी में का बा?
बाबा के डीएम त बड़ी रंगबाज बा
कानपुर देहात में आइल रामराज बा
बुलडोजर से रौंदत दीक्षित के घरवा आज बा
अरे एही बुलडोजरवा पे बाबा के नाज बा.
यूपी में का बा?
कलक्टर ठुमकेबाज बा, सटकल ओकर मिजाज बा,
अधिकारी भइले बेलगाम मनमानी के रिवाज बा……।
गरीबन के मडही फुंकवा दा, गुरबन के इलाज बा,
लोकतंत्र के नाम पर भइया भइल कोढ़ में खाज बा……।
यूपी में का बा? यूपी में का बा?
उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध लोकगायिका नेहा सिंह राठोडने हे गाणं गायलं काय आणि उत्तर प्रदेश सरकारला मिरच्या काय झोंबल्या की सरकारने थेट या गायिकेला नोटीसच बजावली आहे. आपल्या गाण्यातून नेहा सिंह राठोड यांनी सामाजिक भावना भडकविल्याचा आरोप करण्यात आला असल्याचे कानपूर पोलिसांचे म्हणणे आहे.
नेहा सिंग राठोडचे हे लोकगीत युपी सरकारला अडचणीचे का वाटत आहे यासाठी जरा पार्श्वभूमी समजावून घ्यावी लागेल. याच महिन्यात कानपूर देहाट जिल्ह्यात जमावाने एका 45 वर्षीय महिला आणि तिच्या 22 वर्षीय मुलीला जिंवत जाळले होते. या हत्याकांडाबाबत नेहा सिंह राठोड यांनी आपल्या गाण्यातून उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली आहे. गाण्यात तिने या घटनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. या हत्याकांडाबाबत नेहा सिंह राठोड यांनी आपल्या गाण्यातून उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली आहे. गाण्यात तिने या घटनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. 13 फेब्रुवारीला कानपूर ग्रामीण जिल्ह्यातील मैथा ब्लॉकच्या मदौली गावात अतिक्रमण हटवताना आई-मुलीचा जिवंत जळून मृत्यू झाला होता. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे बुलडोझरवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या घोटाळ्यानंतरच नेहा सिंह राठौरने ‘यूपी में का बा सीझन-2’ हे गाणे गायले होते. 1 मिनिट 9 सेकंदांच्या या गाण्यात त्यांनी सरकारच्या बुलडोझर धोरणाला धारेवर धरले. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले.

नेहा सिंहची लोकप्रियता
मूळच्या बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील असलेल्या नेहा सिंह या भोजपुरी लोकगायिका आहेत. याच जिल्ह्यातील जंदाह गावात बालपण गेलेल्या २५ वर्षीय नेहा सिंह या गेल्या पाच वर्षांपासून समाजमाध्यमांवर विविध चित्रफिती प्रसिद्ध करून उत्तर प्रदेश व बिहार सरकारवर टीकात्मक गाणी गात आहेत. आपल्या गाण्यांच्या माध्यमातून महागाई, भ्रष्टाचार, गरिबी, कायदा-सुव्यवस्था, नागरी समस्या यांवर प्रश्न विचारून व्यंगात्मक टीका करत आहेत. ‘अलाहाबाद विद्यापीठा’ वर एक लोकगीत बनवून त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यानंतर त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यानंतर त्यांनी शेकडो गाणी आणि व्यंगात्मक कविता तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या. यांमुळे अनेकदा वाद निर्माण झाले असून सरकारस्नेही नागरिकांनी त्यांच्यावर टीका केली आहे, तर सरकारविरोधी नागरिकांनी त्यांच्या गाण्यांची वाहवा केली आहे. मोबाइलवर चित्रित करणाऱ्या या गाण्यांचे समाजमाध्यमांवर लाखो फॉलोअर्स आहेत.
नेहा सिंह यांचे ‘रोजगार देबा कि करबा ड्रामा’ हे गाणे समाजमाध्यमांवर खूपच प्रसिद्ध झाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बेरोजगार तरुणांचे प्रश्न या गाण्यातून मांडण्यात आले होते. ‘यूपी में का बा?’ या गाण्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या. करोनाकाळातील व्यवस्था, हाथरस हत्याकांड आदी गंभीर मुद्दे त्यांनी या गाण्यातून मांडले. त्याशिवाय लखीमपुरीतील शेतकऱ्यांचा मृत्यू आणि करोनाकाळात गंगेत सापडलेले मृतदेह यांसारख्या अनेक गोष्टी आपल्या गाण्यांत मांडून त्यांनी भाग दोन आणि तीनही प्रसिद्ध केले. 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी ‘बिहार में का बा’ हे गाणे प्रसिद्ध केले. त्यात बिहारमधील समस्यांवर त्यांनी बोट ठेवले होते. त्यानंतर राठोड यांनी सुमारे 200 गाणी प्रसिद्ध केली असून ज्यात बेरोजगारी, भ्रष्टाचार, मजूर व शेतकऱ्यांचे प्रश्न, टाळेबंदीदरम्यान झालेले स्थलांतर यांवर भाष्य केले आहे.

नेहा सिंहवर पोलिसांची प्रश्नांची सरबत्ती
कानपूरच्या अकबरपूर पोलिसांनी नेहाला नोटीस पाठवली आहे. मंगळवारी पोलिसांनी नेहाला तिच्या दिल्लीच्या पत्त्यावर नोटीस दिली. या नोटीसमध्ये नेहाला 3 दिवसांत 7 प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगण्यात आले आहे. नेहाच्या गाण्यामुळे समाजातील वातावरण बिघडत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. अकबरपूर पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी पाठवलेल्या या नोटीसमध्ये पोलिसांनी लिहिले आहे – डिजिटलवर एक व्हिडिओ प्रसारित केला जात आहे, जो प्रथमदर्शनी तुमचा असल्याचे दिसत आहे. ज्याचे बोल खालीलप्रमाणे आहेत… ‘यूपी में का बा’ वरील प्रसारित व्हिडिओबाबत परिस्थिती स्पष्ट करा.
- व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः आहात की नाही.
- व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः असाल, तर स्पष्ट करा की हा व्हिडिओ तुम्ही नेहा सिंह राठौर या YouTube चॅनेलवर ‘UP में का बा सीझन 2’ शीर्षकासह आणि @nehafolksinger ट्विटर अकाऊंटवर तुमच्या स्वत:च्या ईमेल आयडीने अपलोड केला होता की नाही.
- नेहा सिंह राठौर चॅनल आणि ट्विटर अकाउंट @nehafolksinger तुमचे आहे की नाही. असल्यास, तुम्ही त्यांचा वापर करत आहात की नाही?
- व्हिडिओमध्ये वापरलेले गाण्याचे शब्द तुम्ही लिहिले आहेत की नाही.
- जर हे बोल तुम्ही स्वतः लिहिले असतील. तुम्ही ते प्रमाणित करता की नाही?
- जर हे गाणे दुसर्याने लिहिले असेल, तर तुम्ही लेखकाची पुष्टी केली आहे की नाही.
- वरील गाण्यातून निर्माण झालेल्या अर्थाचा समाजावर होणारा परिणाम तुम्हाला माहीत आहे की नाही?

मी यापुढेही गात राहीन – नेहा सिंह
मी साधी गायिका आहे. बड्या नेत्यांसमोर मी काहीच नाही. पण नोटिस पाठवणे ही असहिष्णुता आहे. त्यांच्या मताला धोका निर्माण करणाऱ्या असंतोषाच्या किंवा टीकेच्या प्रत्येक आवाजाला घाबरवण्याचा हा प्रयत्न असल्याचं नेहाने म्हटलं आहे.
नेहा म्हणाली की, मी या गाण्याच्या बाजूने उभी आहे आणि यापुढेही गात राहीन. मला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. मी अजिबात घाबरणार नाही. मी माझ्या वकिलांशी बोलणार आहे. राठोड म्हणाली की, पोलिसांनी आधी माझ्या पतीला फसवण्याचा प्रयत्न केला. मला नोटीस आणि अडकवण्यासाठी पोलिसांनी जी तत्परता दाखवली, तशी तत्परता इतर प्रकरणांमध्ये दाखवली तर राज्याची स्थिती चांगली होईल.