- सुरेखा मोंडकर
एक साधारण व्यक्तिमत्वाची, सर्वसाधारण शरीरयष्टीची.. खरं म्हणजे वाळकुडीच… मराठी माध्यमातून शिकलेली मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन मुलगी. तिला आपल्या दिसण्याबद्दल न्यूनगंड होता. हिंदी, इंग्लिश बोलण्यात सफाईदारपणा येणार नाही, त्यावर मराठी झाक असणार अशी तिची खात्रीच होती. फारशी महत्त्वाकांक्षी नव्हती ती. पण आपला आर्थिक बोजा आपल्या आई वडिलांवर पडू नये म्हणून लवकरात लवकर ती आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊ इच्छित होती. त्या दृष्टीने प्रयत्न करत होती. पर्स पुरेशी भरली की करिअरकडे संपूर्ण दुर्लक्ष करून आरामात मन चाहेल ते करण्यात गुंग होऊन जात होती. अत्यंत अनप्रोफेशनल म्हणून ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात गाजत होती. तिच्या दिग्गज पित्याच्या अलौकिक प्रतिभेचा, प्रसिद्धीचा, लेखन सामर्थ्याचा तिच्यावर जबरदस्त प्रभाव होता. आपण त्यांच्या पासंगालाही पुरू शकत नाही, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही, त्यांच्या नखाचीही सर आपल्याला नाही ह्याची तिला खंत होती. खरं म्हणजे तिच्या प्रतिभावान जगप्रसिद्ध पित्याची ती अत्यंत लाडकी होती. कोणत्याही अपेक्षा तिच्यावर लादल्या जात नव्हत्या. पण ही वेडी, प्रचंड उर्जेने भारलेली, सतत काहीतरी वेगळं करू पाहणारी, नवे नवे अनुभव गाठी मारू पाहणारी, वादळी मुलगी उगीचच मागेमागे राहात होती.
रजनी का अंत कभी नही होगा…
परंतू पाणीदार मोती, झळाळणारा हिरा किती काळ लपून राहणार! संधी तिच्या लोळण घेत होती. अजिबात आवड नसताना, रोजच्या शुटींगच्या बांधिलकीचा आळस असतानाही केवळ बासू चटर्जींच्या शब्दाला मान देण्यासाठी तिने टीव्हीवरील ‘रजनी’ स्वीकारली आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. सिद्धहस्त लेखक विजय तेंडुलकर यांची कन्या प्रिया तेंडुलकर जगप्रसिद्ध झाली. प्रिया ही तिची ओळख पुसली जाऊन ती रजनी म्हणून ओळखली जाऊ लागली. तेरा भागात गुंडाळली जाईल असं वाटत असणारी ही मालिका दीड वर्षं धो धो चालली. लोकप्रियतेच्या शिखरावर राहिली. ह्या एका मालिकेने प्रियाला नाव, स्वतःची ओळख, प्रसिद्धी, पैसा, आयुष्यभराची शान दिली. रजनीचा शेवटचा भाग झाला, “हर अच्छी और बुरी चीज का अंत होता है!… लेकीन रजनी का अंत कभी नही होगा…” अशा प्रकारची शेवटची भावूक डायलॉगबाजी करून प्रिया बाहेर पडली ती थेट एका ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पोचली. आपले लांबसडक, घनदाट केस तिने मानेच्याही वर पर्यंत कापून टाकले. रजनीच्या भानामतीमधून बाहेर पडून तिला पुन्हा ‘प्रिया’ बनायचं होतं. रजनीला छोट्या पडद्यावर बहाल केलेलं व्यक्तिमत्व तिला नाकारायचं होतं. पण ते इतकं सोपं नव्हतं. रजनी संपल्यानंतरही ‘रजनी’ चा करिश्मा अनेक वर्षं कायम होता.

रजनी टीवीवर अवतीर्ण झाली 1985 मध्ये. अशी काही खास कथा नव्हती. आजच्या गाजलेल्या मालिकांच्या तुलनेने तर अगदी सरधोपट कथा होती. स्वतः बासुदांच्या मनातही रजनी आधीपासून पूर्ण साकारलेली नव्हती. हळूहळू तिचा पेहराव, केशभूषा, दिसणं, बोलण्याचा लहेजा ठरत गेला आणि कोणत्यातरी एका मुक्कामी तो पक्का झाला. रजनीचं एक इमेज नकळत घडत गेलं. बाजारात रजनी साड्या मिळू लागल्या. रजनी ‘लुक’ रस्तोरस्ती दिसू लागला. शर्मिला, मौशमी, पद्मिनी असं करत करत नाईलाजानेच बासुदा प्रिया पर्यंत पोचले होते. काही भाग पद्मिनी कोल्हापुरेवर शूटही झाले होते. पण प्रियाला त्यातील काहीच, मालिका स्वीकारण्याच्या आधी माहिती नव्हतं. मालिका स्त्री प्रधान आहे, त्यात इतर कोणालाच फारसा वाव नाही, नायिका पाच वर्षाच्या अपत्याची आई आहे, मध्यमवर्गीय आहे त्यामुळे पेहराव साधा, साड्या वगैरे असणा ..टीवी मालिका असल्याने शृंगारिक, धाडसी दृश्ये नसणार, कथानक पाहता ही मालिका फारशी चालणार नाही; रजनी स्वीकारायला प्रियाला एवढं पुरेसं होतं.
First Lady Of Indian TV!
दर आठवड्याला समाजातील एक समस्या घेऊन त्यावर हल्ला चढवलेला असे. अन्याय, भ्रष्टाचार सहन न करणारी लढाऊ बाण्याची, धीट, घाबरून माघार न घेणारी स्त्री भारतीय प्रेक्षकांना आकर्षक वाटली. प्रत्येकाच्या मनात लपलेली एक ‘रजनी’. त्यांनी प्रत्यक्ष छोट्या पडद्यावर पाहिली, तिला भरभरून दाद दिली. डोक्यावर घेतली. प्रिया झाली पहिली टीवी स्टार! First Lady Of Indian TV! बी . बी. सी. ने तिची टेलीफोन वरून मुलाखत घेतली. अमेरिका, जपान, स्वित्झर्लंड, न्युझीलंड, फ्रान्स अशा अनेक देशातून.. आणि अर्थातच भारतातून अनेक पत्रकार तिच्या मुलाखती घ्यायला धडपडू लागले. पापाराझ्झी तिचा वैताग येईपर्यंत पाठलाग करू लागले. एक प्रकारचा मास हिस्टेरिया तिने अनुभवला. अनेक वृत्तपत्र, मासिकं यांतून तिच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या. रजनी आणि ‘किस्से मियाँ बीवीके’ मधील तिच्या पतीची भूमिका करणारा कलाकार करण राजदान खऱ्या आयुष्यात पण तिचा जीवनसाथी बनला. 1988 मध्ये त्यांचा विवाह झाला. करण स्वतः अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आहे. रजनीचे काही भाग त्याने लिहिले होते आणि दिग्दर्शितही केले होते. सारख्याच आवडी निवडी व कलाक्षेत्रातील असूनही हा विवाह यशस्वी झाला नाही. 1995 मध्ये दोघे अत्यंत अदबशीरपणे, कसलेही आरोप प्रत्यारोप न करता विभक्त झाले.
मी स्वतः रजनीचे सर्व भाग पाहिलेले नाहीत. प्रिया स्वतः म्हणते त्या प्रमाणे, “सतत आपलं याच्याशी भांड, त्याच्याशी वाद घाल आणि शेवटी या कानापासून त्या कानापर्यंत आडव्या केळ्यासारखं तोंड पसरून हास!” असंच स्वरूप होतं त्या मालिकेचं. प्रियासारख्या बुद्धिमान स्त्रीला आणि बासुदांना पण हळूहळू कंटाळा येऊ लागला. मालिका संपली तेव्हां प्रियाला सुटल्यासारखा आनंद झाला. यशाची अवीट गोडी तिने चाखली. Nothing succeeds like success ह्याचा पुरेपूर प्रत्यय तिला आला.


खरंच यश हे एक अजब रसायन आहे. जादूचा मंतर आहे. सावन भादोमध्ये दिसणं, रंग, आकारमान, अभिनय या सर्वांवर तोंडसुख घेतली गेलेली रेखा आज सिनेसृष्टीची अनभिषिक्त महाराणी आहे. पदार्पणालाच ‘मोरी घासायच्या ब्रश सारखा दिसतो!’ असा अभिप्राय मिळालेला राजेश खन्ना, पहिला सुपरस्टार बनतो! लाखों दिलोंकी धडकन होतो. सुयोग्य आवाज नसल्यामुळे आकाशवाणीवर नाकारला गेलेला, दुधी भोपळ्यासारखं नाक असणारा, फक्त ढेंगाच ढेंगा असणारा अमिताभ Star of the Millennium होतो; त्याच्या आवाजासाठीच विश्व विख्यात होतो. प्रियाचं पण असंच झालं. शाळेत असल्यापासूनच ती मॉडेलिंग करीत होती. बऱ्याच जाहिराती तिने केल्या. तिच्या उमेदवारीच्या दिवसांत जाहिरात कंपनीच्या माणसांना, फोटोग्राफर्सनां तिच्या चेहऱ्यात असंख्य उणीवा दिसायच्या. ‘तुझ्या चेहऱ्याला कोन खूप आहेत, ओठाला कमानच नाही, मान फारच उंच आहे’ अशा प्रतिक्रिया तिला मिळायच्या. एकाने तर तिला नाकाची प्लास्टिक सर्जरी करून घ्यायचा सल्ला दिला होता. तीच सामान्य चेहऱ्याची, किडकिडीत प्रिया ‘रजनी ‘ झाल्यावर मात्र तिच्यावर जाहिरातींच्या ऑफर्सचा वर्षाव व्हायला लागला.
प्रसन्न, बिनधास्त, सडेतोड आणि लढाऊ वृत्ती
आयुष्यात सर्व प्रकारचे अनुभव घ्यायची मोकळीक तिला होती. कोणतंही बंधन, दबाव तिच्यावर नव्हता. आकाशपाताळ एक करून तिने J J School Of Art सारख्या नामवंत कॉलेजात प्रवेश मिळवला. तिच्या चित्रांचं कौतुकही होत होतं, पण तिसऱ्या वर्षी तिने कोर्स सोडून दिला. एअर लाईन्समध्ये नोकरी केली, पंचतारांकित हॉटेल मध्ये नोकरी केली. समाजकार्य तर तिच्या रक्तातच होतं, त्या निमित्ताने ती फोरास रोडला फिरली. जमेल तेवढं समाजकार्य केलं. पंचतारांकित हॉटेल मध्ये काम करीत असताना, आवाज उठवून, रात्री अपरात्री एकट्या घरी जाणाऱ्या मुलींच्या बरोबर सिक्युरिटी गार्ड द्यायचा कायदा तिने पास करून घेतला. एका रात्रीत ती हॉटेलभर प्रसिद्ध झाली. पेंटींग, ड्रेस डिझाईनिंग.. आवडणाऱ्या प्रत्येक क्षेत्राचा तिने अनुभव घेतला आणि कशातही आपल्या नावाची मोहर न उमटवता.. केवळ कंटाळा आला म्हणून किंवा रस उरला नाही म्हणून तिने ते सोडूनही दिलं. शाळेत असतानाच गिरीश कर्नाड लिखीत हयवदन ह्या नाटकात तिने काम केलं. पिग्मेलीयन, अंजी, कमला, कन्यादान, सखाराम बाईंडर, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी अशा नाटकांतून नामवंत संस्थेच्या, प्रतिभावान कलाकारांबरोबर तिने काम केलं. टीवीवर स्वयंसिद्ध, हम पांच मधली फोटो फ्रेम मधून बोलणाऱ्या पत्नीची भूमिका अशा काही मालिका तिने केल्या. साहसी, मोकळा स्वभाव आणि समाजातील विविधांगांचा पुरेपूर अनुभव; ह्या मुळे तिचे “द प्रिया तेंडुलकर शो’; “जिम्मेदार कौन’ हे कार्यक्रम पण खूप लोकप्रिय झाले. तिच्या प्रसन्न, बिनधास्त, सडेतोड, लढाऊ वृत्तीमुळे आणि अर्थातच प्रचंड लोकप्रियतेमुळे अनेक राजकीय पक्षांनी तिला आमंत्रण दिलं. पण राजकारण हा तिचा पिंड नव्हता.
मराठी, हिंदी, गुजराथी, कन्नड अशा अनेक चित्रपटातून तिने भूमिका केल्या. देवता, माहेरची माणसे, कालचक्र असे बरेच चित्रपट तिचे आहेत. पण तिच्याच भाषेत सांगायचं तर सर्व ‘टुकार’ होते किंवा तिच्या वाट्याला आलेली भूमिका ‘टुकार’ होती. त्यातला फक्त ‘गोंधळात गोंधळ’ आणि ‘मुंबईचा फौजदार’ मी पाहिलाय. पण त्यातही लक्षात राहावा, उठून दिसावा, असा तिचा अभिनय नव्हता. गुजराथी चित्रपट ‘पुजाना फुल’ मात्र खूप लोकप्रिय झाला होता. गुजराथमध्ये, काही काळ ती लोकप्रिय अभिनेत्री होती. खरं म्हणजे 1974 मध्ये तिला श्याम बेनेगलांचा अंकुर मिळाला होता. अनंत नाग सारखा सहकलाकार होता. पण ती फारसा प्रभाव टाकू शकली नाही. विशेष म्हणजे त्याच चित्रपटात शबाना आझमी पण होत्या.

प्रियाला अनेक गोष्टी करून बघायच्या होत्या, अनुभवायच्या होत्या, पण एकदा का ती गोष्ट मिळाली, हासिल झाली की त्यातील तिचा रस संपायचा. महत्वाकांक्षा, विशिष्ट ध्येय, तिथे पोचण्यासाठी अपार कष्ट करणं, तीव्र इच्छा, वेड… नव्हतंच तिच्यात. दिगंत कीर्तीच्या लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांची मुलाखत घ्यायचं भाग्य तिला लाभलं होतं. पण त्यातही ती रंगत आणू शकली नाही. बहुतेक तिला कळलं होतं की तिच्याकडे वेळ कमी होता; हाताशी असलेल्या थोड्या वेळात तिला बरंच काही करायचं होतं. ह्या बाबतीत मला तिची तुलना स्मिता पाटील यांच्याशी करावीशी वाटते. अभिनयाच्या दर्जा बद्दल नाही पण अल्पायुष्यात प्रियाने अनेक क्षेत्रात थोडं थोडं का होईना, पण नाव घेण्यासारखं बरंच काही करून दाखवलं. अनेक बक्षिसं मिळवली. जगप्रसिद्ध झाली.. 19 ऑक्टोबर 1954 मध्ये जन्मलेल्या प्रियाने 19 सप्टेंबर 2002 मध्ये जगाचा निरोप घेतला. त्या वेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही तिच्या मृत्यूची अत्यंत भावूक होऊन दखल घेतली ते म्हणतात , “रजनी के रुपमें उनकी जिहादी भूमिका ने अनेक सामाजिक मुद्दोंको मुखरित किया|”
नवकथांतही अत्याधुनिकता आणणारी लेखिका
स्मिता, शबाना, नुतन, मुक्ता यांच्यासाठी मी सिनेमा, मालिका, नाटकं पाहिली आहेत पण केवळ प्रियासाठी म्हणून मी काहीही पाहिलेलं नाही. मग प्रिया मला इतकी प्रिय कां? माणूस म्हणून ती अत्यंत अकृत्रिम होती. दिगंत कीर्ती मिळवूनही तिचे पाय कधी जमिनीवरून सुटले नाहीत. इतरांपेक्षा वेगळं जगुनही तिने कधीही स्वतःला वेगळं मानलं नाही. कधीही हस्तिदंती मनोऱ्यात जाऊन राहिली नाही. अत्यंत पारदर्शी, संयत, समाजाभिमुख, संवेदनशील, सतत नवीन अनुभव घ्यायला उत्सुक अशी होती ती! मला ती लेखिका म्हणून अत्यंत आवडते. इतक्या वर्षांत तिची पुस्तकं मी पुन्हा पुन्हा वाचली आहेत. अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, पु . भा. भावे यांना नवकथेचे प्रणेते मानलं जातं. त्या नवकथांतही अत्याधुनिकता आणणारे जे काही लेखक आहेत त्यांत प्रियाला मानाचं पान आहे. गौरी देशपांडेप्रमाणे तिचेही अनुभव अत्यंत वेगळे आहेत, त्याकडे बघायचा दृष्टीकोन निडर, आधुनिक, निखळ, मानवतावादी आहे. गौरीचं लेखन कधीकधी अगदी पुरोगामी विचारसरणी असणाऱ्यांची पण दांडी उडवतं, धक्का देतं; तसं तिचं लिखाण कड्याच्या टोकावर उभं करणारं, दरीत भिरकावून देणारं नाही. तुमच्या आमच्या आयुष्याशी नातं सांगणारं आहे. अनेक अस्पर्शित, सामान्य माणसाला भेटणे कठीण असे अनुभव अत्यंत नाविन्यपूर्ण, घाटात, शैलीत तिने मांडले आहेत. नेहमीचे परिचित अनुभव देखील अनपेक्षित वाटांनी, नव तंत्राने अकल्पनीय मुक्कामी नेऊन पोचवले आहेत.
तिच्या पंचतारांकित, ज्याचा त्याचा प्रश्न, जन्मलेल्या प्रत्येकाला ह्या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळाला आहे. जावे तिच्या वंशा ह्या कथा संग्रहातील प्रत्येक कथेत आपलं किंवा आपल्या परिचितांचं प्रतिबिंब दिसतं. फर्स्ट पर्सन ह्या वृत्तपत्रीय स्तंभ लेखनाचं ललिता ताम्हाणे यांनी उत्कृष्ट मराठी भाषांतर केलेलं आहे. श्री दा पानवलकर हे तें चे परम मित्र. त्यांच्या आजारपणात प्रियाने केलेली धडपड आणि नंतर पानवलकर काकांवर तिने लिहिलेला लेख तिचा कौटुंबिक, गृहस्थिक जिव्हाळा, आपुलकी आणि तिच्यात लपलेली हळवी छोटुकली व्यक्त करतो.
आपल्या लेकीबद्दल विजय तेंडुलकर लिहितात…
विजय तेंडुलकर तिच्या बद्दल म्हणतात, “इतरांची आत्मसंतुष्टता आणि अल्पसंतुष्टता लेखकाला भेटू शकत नाही. इतरांसारखे मनस्वास्थ्य त्याच्या वाट्याला असत नाही. अज्ञानात जर सुख असेल तर लेखक बहुतेक आयुष्य दु:खात आणि तापात काढतो. प्रिया दु:खे शोधत जाते. तिचे आता पर्यंतचे छोटे आयुष्य म्हणजेच दु:खांच्या शोधातला एक प्रयोग किंवा अनेक प्रयोगांची एक मालिका आहे. शब्द देता येतात. लिहिण्याची हौसही देता येईल. शैली तर दिली घेतली जातच असते. पण जगण्याचा आशय देता येत नाही. हा आशय ज्याचा त्याने कमवावा लागतो. तो कमवण्याची इर्षा मुळातच असावी लागते. या अर्थाने प्रिया तेंडुलकर हीचे लेखन कर्तुत्व तिचे स्वतःचे स्वकमाईचे आहे.”

रजनीच्या दिवसांत प्रिया म्हणायची, “अजून पन्नास वर्षांनी जरी मी मेले तरी लोक म्हणणार: रजनी मेली, प्रिया नाही.” प्रियाला पन्नास वर्षं सुद्धा जगायला मिळाली नाहीत; पण तिचं अर्धं वाक्य मात्र एका निराळ्याच अर्थाने खरं झालं. कधीना कधीतरी रजनी मरेल पण प्रिया नाही! प्रिया तिच्या मॉडेलिंगच्या व्यवसायाबद्दल म्हणते, “मी ऐशी वर्षांची जर्जर म्हातारी होईन तेव्हांही एखाद्या केशतेलाच्या नाहीतर पाचकाच्या जाहिरातीत तोंडाचं बोळकं सावरत कवळीच्या दातांनी फिस्सकन खोटी हसेन.. असं मला अनेकदा स्पष्ट दिसतं!” कसं असतं ना.. अंतर्बाह्य सच्ची, खरी असणाऱ्या प्रियाला नियती मात्र खोटी चित्रं दाखवत होती. प्रियाला कधी कवळी लावावीच लागली नाही; ती कधी ऐशी वर्षांची झालीच नाही. पण माझ्यासारख्या अनेक रसिकांच्या मनात मात्र ती चिरायू झाली आहे. तुमही बसीं हो प्रिया मनमें हमारे!
(संदर्भ : प्रिया तेंडुलकर यांची ‘पंचतारांकित’ आणि इतर पुस्तकं ‘महाजाल’ आणि ‘माझ्या आठवणी’)