- शुभम सोळसकर
कुटुंबप्रमुख आणि कुटुंबातील एकमेव पुरुषाने जगाचा निरोप घेऊन आठवडाच सरला होता. पाच मुली आणि एकटी बाई कसा संसार सांभाळणार हा प्रश्नच होता. भविष्य असे अंधकारमय वाटू लागले असतानाच पदर खोचून दहा ते पंधरा किलोचा घन घेऊन पुन्हा दुकान सुरू केले. आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने खचून न जाता तप्त लोखंडाला आकार देत नवनिर्मितीस प्रारंभ केला. येणारी जाणारी माणसं टोकून बोलू लागली. आप्तस्वकीय देखील बोलू लागले, किमान दहावा, कार्य, महिना तरी होऊ द्यायचा. पण पालावर सगळाच खडखडाट असताना कष्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता. या जिद्दी महिलेची ही कहाणी आहे घिसाडी समाजातील लेखिका दीपा पवार यांच्या आईची. श्रमाला प्रथेचं बंधन नसते असे म्हणणारी व जुनाट प्रथांची जळमटं दूर करून अविरत कष्ट करणारी त्यांची आई आपल्याला पुस्तकरूपाने आणखी समजण्यास मदत होणार आहे. त्यांचे ‘राबून निर्मिती करणाऱ्या पोलादी बाया’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. घिसाडी समाजातील अत्यंत कष्टप्रद आयुष्य जगणाऱ्या आठ महिलांचा विस्तृत आढावा त्यांनी या पुस्तकात घेतला आहे. हरिती प्रकाशना द्वारे हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे, या पार्श्वभूमीवर लेखिका दीपा पवार यांनी बाईमाणूसशी संवाद साधला.
मुंबईच्या शिवडीत छोट्याश्या पालावर, प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत, पिढीजात लोहारकामाचा व्यवसाय करीत त्यांचे बालपण गेले. पाच बहिणी आणि आई अश्या कुटुंबात वाढलेल्या दीपा पवारांच्या वडिलांचे लवकरच निधन झाले. अंगावर एकही सोन्याचा दागिना नसलेल्या त्यांच्या आईने पायातील जोडवी अनेकदा गहाण ठेवून आम्हा बहिणींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांच्या आईच्या याच प्रयत्नांनी दीपा पवार यांना लेखनास उद्युक्त केले असे त्या सांगतात. शिवडी कोळीवाड्याच्या महानगर पालिकेच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर सोशल सर्व्हिस लीगच्या कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या शाळेत त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ऐन सतराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर देखील आईच्या प्रेरणेने शिक्षण सुरू ठेवत मास्टर्स पूर्ण केले. संशोधक, लेखक आणि कृतिशील कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जातात.

या पुस्तकाच्या निर्मिती मागची कथा सांगताना लेखिका म्हणतात, “या पुस्तकाच्या निर्मितीची प्रेरणा ही माझी आई आहे. माझ्या आईसारख्याच आमच्या घिसाडी समाजातील अनेक महिला, खरंतर पोलादी महिला, यांच्या रोजच्या संघर्षाचे डॉक्युमेंटेशन व्हावे असे मला सारखे वाटत होते. परंतु त्यासाठी लागणारे आर्थिक, सामाजिक भांडवल अपुरे होते. त्याचवेळी टाटा स्टील फाउंडेशनच्या संवाद फेलोशिपसाठी माझी निवड झाली. देशातून केवळ सहाच जणांची निवड यासाठी करण्यात आली होती. त्यात काही आदिवासी प्रतिनिधी होते. तर मी भटक्या विमुक्त समाजातून निवडले गेले. तिथे मी या पुस्तकाची कल्पना मांडली आणि त्यांना देखील ही कल्पना आवडली. त्यांनी केलेल्या मदतीच्या जोरावर हे पुस्तक मी पूर्ण केले. “सततचे स्थलांतर, शहरांतील पालिकेचे नियम यांमुळे घिसाडी समाजात शिक्षण, सुयोग्य राहणीमान यांचा अभाव असल्याचे त्या सांगतात. औद्योगिकीकरणाच्या रेट्यात मशिनीच्या पोटातून लोखंडी अवजारांची निर्मिती होते असल्याने आमच्या पोटाला चिमटा बसणारच ना? हा समाजापुढे भेडसावत असलेला प्रमुख प्रश्न त्या उपस्थित करतात. लेखिका दीपा पवारांनी समाजातील विविधांगी प्रश्नांना कृतिशील उत्तर देण्यासाठी अनुभूती नावाची संस्था स्थापन केली आहे.
या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. शाळकरी मुलांसाठी उपक्रम आयोजित करणे, मानसिक आरोग्य व आरोग्य योजना यांच्या प्रसारासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे, भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभूती ही. संस्था अतिशय उल्लेखनीय कार्य करीत आहे. महाराष्ट्रातील बारा ते पंधरा जिल्ह्यांतील घिसाडी समाजातील पंचवीसेक पोलादी महिलांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. त्यातून ज्यांनी लेखन स्वरूपात आणण्यासाठी ज्यांनी अनुमती दिली अशा आठ महिलांचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे. जातपंचायतीच्या पुढाऱ्यांना विचारून, नातेवाईकांची मदत घेऊन, कधी त्याच महिलांच्या पालावर मुक्काम करून आणि सतत पाठपुरावा केल्यानंतर त्यांचे हे पुस्तक पूर्ण झाले. आणि विशेष म्हणजे या महिला कोणा पुरुषाच्यावर अवलंबून नाहीत तर त्यांच्या स्वतःच्या मालकीचे दुकान आहे. त्या स्वतः अवजारे तयार करतात.आठवडी बाजारात विकतात. यात्रा, उरूस या ठिकाणी जाऊन स्वतः सगळा व्यवहार करतात अशा खऱ्या अर्थाने सक्षम पोलादी महिलांची कहाणी या पुस्तकात मांडली आहे.
भटक्या आदिवासी जमातींना गुन्हेगार ठरवणारा, गुन्हेगारी जमाती कायदा ब्रिटिशांनी 1871 साली तयार केला. स्वातंत्र्याच्या नंतर पाच वर्षानंतर, 31 ऑगस्ट 1952 ला भारत सरकारने हा कायदा रद्द केला. परंतु कायद्याने झालेली भटक्यांची मुक्तता व्यवस्थेने मात्र अजूनही केली नाही. भटक्यांना अजूनही आपण पालावरच संसार थाटलेल्या अवस्थेत पाहतो. त्यामुळे अक्षरओळखीचा अभाव देखील ओघानेच येतो. अशा परिस्थितीत मराठी साहित्य विश्वात उपरा, उचल्या, तांडा, कोल्हाट्याचं पोर यांसारख्या साहित्यकृती आकारास आल्या. त्यांनी आपले अनुभव समृध्द केलेच पण भटक्यांच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष देण्यास भाग पाडले. आत्तापर्यंतच्या प्रकाशित साहित्यकृतीपैकी बहुतांश या पुरुषांच्या नजरेतून अथवा पुरुषांनी लिहिलेल्या अशाच स्वरूपाच्या आहेत. हे पुरुषी स्वरूप भेदण्याचे काम दीपा पवार यांचे लेखन करणार आहे. भटक्या विमुक्त जमातींमधील घिसाडी समाजातील स्त्रियांचे मराठी साहित्यात अवतरण होते आहे आणि तेही त्याच समाजातल्या,तसेच अनुभव असलेल्या तरुण लेखिकेच्या माध्यमातून. अनुभवातून आलेला हा अस्सलपणा निश्चितच या पुस्तकात आपणास पानोपानी वाचायला मिळेल असा विश्वास वाटतो.

दीपा पवार यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, “या पुस्तकातील जमिनी भटक्या विमुक्त महिलांचा जीवन प्रवास अनुभव अभिव्यक्त करत असताना समाजमनाचे अनेकांगी कंगोरे विचार करण्यास भाग पाडतील. मी स्वतः घिसाडी समूहातून आहे. भटक्या विमुक्त महिलांच्या अनुभव मांडणीतून साहित्याच्या क्षेत्रातील आमची थेंबभर का होईना जागा क्लेम करत आहे. लेखन, साहित्य या वाटा थोड्या अवजडच आहेत. प्रयत्न करत आहे.”
आधी सांगितल्याप्रमाणे दीपा पवार या कृतिशील कार्यकर्त्या आहेत. मागच्या काही दिवसांत त्यांच्या आईचे निधन झाले. त्यावेळी नातेवाईक, जातपंचायतीचे पुढारी यांच्या विरोधाला न जुमानता आईच्या पार्थिवाला सगळ्या बहिणींनी खांदा दिला. पहिल्यांदा विरोध करणाऱ्या घिसाडी जातीतील लोकांनी देखील नंतर सौम्य भूमिका घेत अनुमती दिली. आणि विशेष म्हणजे, आयुष्यभर, लोकांकडून ‘एक तरी पोरगा पाहिजे होता.’ असे ऐकाव्या लागणाऱ्या दीपा यांच्या आईनेच त्यांच्या हयातीत तशी इच्छा व्यक्त केली होती असे त्या सांगतात. आपल्या मुलींनीच आपल्या पार्थिवाला खांदा द्यावा अशी इच्छा असणाऱ्या आईमुळेच दीपा व त्यांच्या बहिणी ही कृती करू शकल्या.
तेव्हा ऐरणीच्या देवापुढे,
“सुख थोडं,दुःख भारी
दुनिया ही भली बुरी
घाव बसंल घावावरी
सोसायाला झुंजायाला
अंगी बळ येऊ दे!”
असे साकडे घालणारी महिला ही गीतात तर आहेच पण प्रत्यक्षात ती अंगी बळ असलेली, घिसाड्यांच्या पालावरील गरिबीचं लेणं! दूर करण्यासाठी राबणारी पोलादी बाई आहे हेच या आगामी पुस्तकातून दीपा पवार यांनी मांडले आहे.
Nice
Where from buy this book ?
पुस्तकाचे नाव: *राबून निर्मिती घडवणाऱ्या पोलादी बाया*
==========================
▪️ लेखक: दिपा पवार
▪️ प्रकाशक : हरिती प्रकाशन, पुणे
▪️ मुखपृष्ठ : मालविका राज, पटणा
▪️ मुद्रित शोधन : डॉ. सायली आचार्य, अखिलेश आयलाने
▪️प्रस्तावना व ब्लरब : दिपा पवार
▪️ पेपर बाऊंड | पृष्ठे-192 | मूल्य : 300₹
▪️ प्रकाशनपूर्व मूल्य – 200
▪️ सवलत दर फक्त 30 ऑक्टोंबर 2023 पर्यंत.
▪️ *संपर्क*: Rahul -73855 21336
▪️ हरिती बुक गॅलरी, लातूर
Bank of Maharashtra
A/c.N.:- 60398200612
IFSC code :- MAHB0000038 ▪️Phone Pay/Google Pay :- 7385521336 ,
Thanks
I m always respect ladies who’s are very hardworking.
We are five children when our father died.we are homeless no way to asked anyone’s for held up anything else.
Education, Widow scheme money for mother but some people help us and guide us.