- प्रतिक पुरी
‘लव्ह फिक्शन’ या कोरियन चित्रपटांत एक प्रसंग आहे. त्यातली नायिका काही कारणानं नायकावर चिडते आणि तो तथाकथित समजूतदार पुरुषाप्रमाणे, तिची मासिक पाळी चालू आहे, त्यामुळे ही चिडचीड होत आहे असं तिला समजावतो. त्यावर ती भडकते आणि म्हणते, “तुम्हा पुरुषांना काय वाटतं की आमचा मेंदू आमच्या अंडाशयात असतो? आमच्या चिडण्यामागे दुसरं काही कारणच नसतं का?” तो स्वतःला समजूतदार समजणारा नायक या प्रश्नानं निरुत्तर होतो. आपल्यातील जवळपास सर्वंच तथाकथित स्त्रीवादी व समजूतदार पुरुषांनाही नेमकं असंच वाटत असतं. स्त्रियांना समजून घेण्यासाठी काही पुरुष आता पुढे सरसावत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे पण त्याचवेळी त्यांच्या तसेच अन्य अज्ञानी अहंकारी मनांतील या व अन्य काही मिथ्स दूर होणंही तितकंच गरजेचं आहे. केवळ त्यांच्याच मनातील नाही तर स्त्रियांच्या मनातीलही.
जगभरात सर्वत्रच मासिक पाळी हा, ज्याविषयी बोलू नये असा विषय मानला जातो. मासिक पाळीमुळे स्त्रिया अपवित्र होतात, म्हणून स्त्रिया पापी असतात, त्यांना त्या काळात सगळ्यांपासून दूर ठेवावं, या संदर्भातल्या अनेक गोष्टी सर्वंच धर्मांत सर्वंच देशांत फार प्राचीन काळापासून प्रचलीत आहेत. मासिक पाळीच्या संदर्भात हिंदू संस्कृतीत जी दंतकथा येते तिचा संबंध आहे इंद्रानं केलेल्या वृत्रासुराच्या वधाशी. वृत्रासूर हा ब्राह्मण असल्याने इंद्राला ब्रह्महत्येचं पाप लागलं. त्यांतून वाचण्यासाठी त्यानं ते पाप अनेकांना वाटून दिलं. त्यासाठी त्यानं कोणाला काय लालूच दिली त्याची कल्पना नाही पण या वाटेकऱ्यांमध्ये स्त्रीचाही समावेश होता. परिणामी तिला मासिक पाळी सुरू झाली. हे पाप असल्यानं ती स्त्रीही पापी ठरली आणि नंतरच्या काळात तिच्यावर शेकडो बंधनं घालण्यात येऊन तिचं व्यवस्थितपणे खच्चीकरण करण्यात आलं. वध केला इंद्रानं, जीव गेला वृत्रासुराचा आणि त्यापायी स्त्रिया मात्र हजारो वर्षांपासून अवहेलना झेलत जगत आहेत.

मासिक पाळीच्या संदर्भातही याच मिथकामुळे नंतरच्या काळात पुरुषांनी कायमच स्त्रियांना आपल्या वर्चस्वाखाली ठेवलं. त्यासाठी त्यांनी नवनवीन कारणं शोधून काढली आणि स्त्रियांच्या मनावर पक्की बिंबवली. नंतरच्या काळात पुरुषांनीही कोणतीही चिकित्सा किंवा खऱ्याखोट्याची शहानिशा न करता त्या परंपरा चालू ठेवल्या. त्याचा अभिमान बाळगला. त्यासाठी स्त्रियांचा बळी दिला. एका निव्वळ नैसर्गिक घटनेसाठी, मासिक पाळीसाठी. मासिक पाळीच्या संदर्भातील या मिथ्स जगभर एकसारख्याच आहेत. मासिक पाळीत स्त्री अपवित्र होते, त्यामुळे तिनं पुजा करू नये, मंदिरात जाऊ नये, नद्यातलावांमध्ये आंघोळ करू नये, स्वयंपाक करू नये, जेवणाला स्पर्श करू नये, तिथं आसपासही असू नये कारण त्यामुळे अन्न विषारी बनतं, तिनं एकांतवास करावा, इत्यादी इत्यादी. या धार्मिक समजूतींच्या सोबतीलाच सामाजिक समजूतीही आहेत.
संबंधित वृत्त :
मासिक पाळीत केस धुवू नयेत, गरम पाण्यानं आंघोळ करू नये, मासिक पाळीतील रक्त अशुद्ध असतं, तिनं आंबट काही खाऊ नये त्यामुळे मासिक पाळी बिघडते इत्यादी. या रक्तामुळे दुष्ट आत्मे आकृष्ट होतात, या रक्ताचा उपयोग करून स्त्रिया पुरुषांना वश करतात अशाही समजूती अगदी आजही कायम आहेत. पण त्या खऱ्या आहेत का याचा विचार मात्र कधी केला गेला नाही. आता तो केला जात असला तरी एकूणच आपले मंदबुद्धी पुरुष आणि मासिक पाळीपायी भोगावी लागणारी लज्जा यांमुळे खचलेल्या स्त्रीया या दोघांनाही आपल्या या समजूती बदलणं अजूनही कठीणच जात आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांच्याच मनात मासिक पाळीविषयीच्या इतक्या चुकीच्या कल्पना असतात आणि त्यावरील समजूतींवर त्यांचा इतका गाढ विश्वास असतो की त्याच ही परंपरा आपल्या मुलींच्या बाबतीतही तशीच चालू ठेवतात. यातील सर्वांत ठाम समजूत असते मासिक पाळीमुळे स्त्री अपवित्र होते ही.
विज्ञान असं सांगतं की, स्त्री वयात आली की दर महिन्याला तिच्या अंडाशयात एक प्रजननक्षम स्त्रीअंडं विकसीत होत असतं. संभाव्य गर्भाच्या रक्षणासाठी त्याच्याभोवती गर्भाशय अस्तरही तयार होतं. पुढच्या महिनाभरांत जर त्याचं फलन झालं नाही तर ते अंडं नष्ट होतं आणि त्यासोबतच गर्भाशय अस्तरही. ही सारी मासिक पाळीच्या चार दिवसांत रक्तावाटे वाहून जातात. त्याच्या जागी पुन्हा नवं गर्भाशय अस्तर तयार होऊ लागतं. जर मूळात शरीरातील ही तथाकथित अशुद्धी बाहेर पडत असेल तर शरीर शुद्धच होणार ते अशुद्ध कसं राहणार हा पहिला प्रश्न आहे. त्यामुळे स्त्री या काळांत अपवित्र होते ही समजूतच चूकीची आहे. हे रक्त शुद्धच असतं. फक्त त्यात गर्भाशयाचं अस्तरही मिळालेलं असल्यानं त्याचा रंग काळपट दिसतो.

दुसरं कारण असं की या काळात महिला, मुली आत्यंतिक लज्जेपायी आंघोळही करत नाही किंवा त्यांना ती करूही दिली जात नाही. त्यामुळे आपल्या जननेंद्रियांची स्वच्छता करणं त्यांना शक्य नसतं. त्यामुळे या रक्ताला एरव्हीच्या घामाचा व मूत्राचा वास लागून तसेच जंतूसंसर्ग होऊन दूर्गंधी सुटण्याची शक्यता वाढते. स्त्रिया एरव्हीही आपल्या जननेंद्रियांच्या स्वच्छतेबाबत संकोच करत असतात. पण त्याचे परिणाम त्यांना हे असे भोगावे लागतात. मासिक स्त्रावाच्या अशुद्धीमागचं खरं कारण हे आहे आणि त्याचा फायदा उठवत पुरुषांनी या स्त्रियांना कायमच अपवित्र म्हणून घोषित करून टाकलं. मासिक पाळीत मंदिरात जाऊ नये, पुजा करू नये, एकांतवासात राहावं, कोणाला किंवा कशालाही स्पर्श करु नये असं म्हणणारे लोक, ज्यात स्त्रीपुरुष दोघेही असतात, यासाठी या अशुद्धीचं कारण देतात. पण दिवसभरात आपण संडासला गेलेलो असतो, लघवीला तर येता जाता जातो, अंगातून सारखा घाम वाहत असतो, नाक शिंकरलं जात असतं या देखिल शारिरीक अशुद्धीच आहेत जितकी की मासिक पाळीतील रक्तस्त्राव आणि तसं जर असेल तर स्त्रियांनाच मासिक पाळीत वेगळी वागणूक का दिली जाते याचा विचार आता आपण सर्वांनी करायची गरज आहे. मुख्य म्हणजे विर्यस्खलन करणाऱ्या पुरुषांना स्त्रियाच तेवढ्या अशुद्ध अपवित्र असतात असं म्हणायचा अधिकारच काय आहे?
मासिक पाळीचा मुद्दा इतका का महत्त्वाचा आहे असा काहींना प्रश्न पडू शकेल. त्याचं उत्तर शोधायला गेलं तर भयानक परिस्थिती लक्षात येते. मासिक पाळीशी संबंधीत समजुती, त्याविषयीची लज्जा, मुलांकडून नकळत होणारी अवहेलना, यामुळे वयात येणाऱ्या जवळपास 25 टक्के मुली शाळा सोडून देतात. कामाच्या ठिकाणी वेगळी व पुरेशी चांगली स्वच्छतागृहं नसणं, सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध नसणं, यामुळे कामकरी स्त्रियांना व शिकणाऱ्या मुलींना प्रचंड गैरसोयींना सामोरं जावं लागतं. मासिक पाळी दरम्यान स्वच्छता कशी राखावी याचं अपूरं ज्ञान तसेच पैशांअभावी तब्बल 70 टक्क्यांहून जास्त मुली-महिला जुन्या कपड्यांचा वापर करतात. जे पुन्हा पुन्हा वापरले जातात. काही हे रक्त शोषलं जावं म्हणून राख, वर्तमानपत्रांचे कागद, वाळकी पानं इत्यादिंचा उपयोग करतात. शिवाय या काळात आंघोळही केली जात नाही. परिणामी जंतू संसर्गाचा धोकाही वाढतो. तसेच रक्ताला घाण वासही येतो ज्यामुळे पुन्हा त्यांच्या समजूती बळकट होतात. यामुळे जसे शारिरिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात तसेच मानसिक तणाव जो वाढतो तो पुढे वाढतच राहतो. या परिस्थीतीमुळे किती मुली अकालीच आपल्या प्रगती करण्यावाचून मुकल्या जात असतील याचा विचार करण्याची आता गरज आहे. कारण ही आपली अर्धी लोकसंख्या आहे. त्यांच्यावरच पुढची पिढी जन्माला घालायची जबाबदारी असते. तिच जर अशी अकाली खच्ची होत असेल तर त्यांतून सुप्रजा निर्माण होण्याची शक्यता कमीच असते. ज्यात पुरुषांचाही समावेश असतो. त्यामुळे आपल्या स्वार्थासाठी का होईना हे मंदबुद्धी पुरुष आपल्या धारणा बदलतील अशी आशा आहे.
ही परिस्थिती बदलायची असेल तर मोठ्या प्रमाणावर सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याची सुरुवात घरातून व्हायला हवी. आईनं मूर्खपणाच्या समजूतींचे दाखले देण्यापेक्षा काय आहे ते स्पष्टपणे आपल्या मुलींना सांगायला हवं. बापानंही याची जबाबदारी उचलायला हवी. मुख्य म्हणजे घरातील मुलांनाही याची माहिती द्यायला हवी. यात कोणतीही लाज बाळगण्याची गरज नाही. या लज्जेपायी या मुलींना पुढे जे काही भोगावं लागतं त्यापुढे ही लाज काहीच नाही. शाळांमधूनही याची माहिती दिली जायला हवी. केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही आणि तीही स्पष्टपणे. उगाच मोघम भाषेत, फालतू उदाहरणं देत, लैंगिक अवयवांची थेट नावं घेण्याचं टाळत बोलण्यानं फायदा कमी आणि नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते. हा बाष्कळपणा आता तरी संपावा. चांगली व पुरेशा प्रमाणात स्वतंत्र स्वच्छतागृहं मिळणं हा स्त्रियांचा मूलभूत अधिकार मानण्यात यावा. मुलांना, पुरुषांनाही मासिक पाळीची माहिती देऊन त्यांच्याशी सन्मानानं वागण्याची शिकवण देण्याची गरज आहे. या विषयावर जितक्या मोकळेपणानं मुलामुलींमध्ये चर्चा होईल तितका त्यातील संकोच गळून पडेल. त्या मागच्या थिल्लर समजूती, बिनबुडाच्या धार्मिक परंपरा आणि अशास्त्रीय अपसमजांना आळा बसेल.