- जितेंद्र घाटगे
घटना पहिली – स्थळ – सेंट्रल टॉकीज, मालेगाव. शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021. लॉकडाउन अन त्यानंतर उद्भववलेल्या परिस्थितीमुळे सिनेमाचा व्यवसाय भारतभर मंदावला आहे. अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट मुंबईसारख्या शहरात सुद्धा गर्दी खेचायला असमर्थ ठरतायत. ‘सेंट्रल टॉकीज’ला शाहरुख-सलमान जोडीचा ‘करण अर्जुन’ प्रदर्शित केला जातो. तब्बल 26 वर्ष जुना. प्रेक्षकांची अलोट गर्दी उसळते. एकमेकांच्या अंगावर चढून जागा मिळवण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू होते. ज्याला आत आधी जागा मिळते तो खुर्चीवर जाऊन उभा राहतो अन दोन्ही हात लांबवून किमान 5-6 खुर्च्या ‘रिझर्व’ करतो. अजून 2 पोरं अशी असतात जी एखाद्या रांगेच्या दोन्ही कोपरातल्या खुर्च्यांवर उभी राहतात. त्यांच्या ग्रुपशिवाय तिथे कुणीही बसू शकत नाही. थोड्याच वेळात प्रेक्षागृह तुडुंब भरते. सेंसर सर्टिफिकेट पडद्यावर आले तरी प्रेक्षकांचा एवढा जल्लोष की एखाद्या नवख्या माणसाचे कान बधिर व्हावे.
हाच उत्साह प्रत्येक सीन नंतर वाढत जातो. तासाभरात शाहरुख़-काजोलचं ‘जाती हूँ मैं’ सुरू होतं अन प्रेक्षक आनंदाने अक्षरशः वेडे होतात. बाल्कनीतून सोडलेले असंख्य पेपरचे तुकडे थेटरभर उडू लागतात. काही अतिउत्साही मुलं खिशातून फटाके काढतात, अन तिथेच पडद्यासामोर पेटवून नाचायला लागतात. आग जास्त पसरण्याआधीच थेटरच्या कर्मचाऱ्यांकडून त्यावर नियंत्रण मिळवले जाते. शो बंद केला जातो. अज्ञात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. थेटर मालक सिनेमा बदलण्याचा निर्णय घेतात. दुसऱ्या दिवशी ‘करण अर्जुन’ उतरवून अजय देवगणचा ‘हलचल’ लावतात. तो देखील 26 वर्ष जुना चित्रपट. कडक बंदोबस्त केल्याने फटाके कुणी फोडत नाही, मात्र जल्लोष तोच. तेच वेड. कित्येक वेळा बघितलेला सिनेमा असून सुद्धा तीच उत्सुकता! त्याच टाळ्या शिट्या!
घटना दुसरी – स्थळ – मोहन टॉकीज, मालेगाव. शुक्रवार 19 मार्च 2021. ‘मुंबई सागा’चा फर्स्ट डे फर्स्ट शो. बाहेर कोरोना व्हायरसने थैमान मांडलेले असताना देखील सगळे नियम धाब्यावर बसवून प्रेक्षकांची तोबा गर्दी. काही अतिउत्साही मुलं एकमेकांच्या अंगावर पाय देऊन आत जाण्यासाठी चढाओढ करतात. जणू काही सिनेमा पाहणे म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो. कोरोनाचा उद्रेक आटोक्यात येत नाही तोपर्यंत अनिश्चित काळासाठी मोहन टॉकीज बंद करण्याचा निर्णय नाशिकचे जिल्हाधिकारी घेतात. इतरत्र नवीन चित्रपटांना प्रेक्षक मिळत नसल्याने शो कॅन्सल केले जातात. सोशल डिस्टनसिंग चे नियम तुडवत सिनेमाला गर्दी केली म्हणून मालेगाव मध्ये थेटर बंद केलं जातं!

मालेगाव आणि तिथलं चित्रपटप्रेम याबद्दल तुम्ही आधी कधीच ऐकलं-बघितलं नसेल तर वरच्या दोन्ही घटना तुम्हाला अतिशयोक्ति अन दुसऱ्या युनिव्हर्स मधल्या वाटू शकतात. मात्र तिथल्या फिल्म कल्चर बद्दल थोडं जरी ऐकून असाल तर हे दृश्य आणि झपाटलेपण याचं अजिबात अप्रूप वाटणार नाही.
इथल्या लोकांच्या अंगाला फिल्म टॉकीज अन् पॉवरलुमचा एकत्रित वास येतो…
ही कुठली लोकं आहेत जी असंख्य वेळा पाहिलेल्या सिनेमाला परत एकदा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. प्रत्येक शहराची एक विशिष्ट प्रतिमा जनमानसात ठसलेली असते. सकारात्मक असो वा नकारात्मक, त्या पलीकडे जाऊन शहराकडे क्वचित बघितले जाते. एखाद्या ‘आउटसायडर’ माणसासमोर मालेगावचं नाव उच्चारल की त्याच्या भुवया उंचवतात अन बॉम्बस्फोट आणि हिंदू-मुस्लिम दंगल डोळ्यासमोर आधी येते. (खरं तर गेल्या 22 वर्षांत मालेगावमध्ये एकही दंगल झालेली नाही.) त्यापाठोपाठ तिथला कपडा उद्योग अन पावर लुम. अन चित्रपटप्रेमी असाल तर काहीना आठवते तिथली ‘spoof फिल्म इंडस्ट्री’ म्हणजेच ‘मॉलीवूड’. फार कमी शहरं अशी असतात ज्यांना स्वतःचा गंध असतो. मालेगाव मधल्या लोकांच्या अंगाला फिल्म टॉकीज अन पावर लुमचा एकत्रित वास येतो.
भारतीय समाजजीवन एवढे क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे आहे की एका भारतात अनेक देश एकाच वेळी नांदत असतात, मानवी उत्क्रांतीचा इतिहास मोडीत निघेल असे अनेक घटक उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असतात. इतिहासाचा कालखंड जो आपण शाळेत शिकतोय, तो प्रत्यक्षात अजूनही जगणारे आपल्यापासून काही किलोमीटर अंतरावर असू शकतात. तर काहींच्या बाबतीत तो इतिहास देखील उगवलेला नाहीये. सामाजिक डार्विनवादात ‘survival of the fittest’ ही संकल्पना समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण यासंदर्भात वापरली जाते. डार्विनवादानुसार फक्त बलाढ्य आणि गुणसंपन्न व्यक्ती व व्यवसाय ह्याच मुक्त व्यवस्थेत तगून राहतील. मालेगाव कुठल्याच अर्थाने ‘fittest for survival’ नाहीये. तरी सुद्धा सिनेमासह जगणाऱ्यांच स्वयंपूर्ण युनिव्हर्स तिथे उभं राहिलय. त्यामुळे डार्विनच्या थियरीला आव्हान देणाऱ्या आणि तिथली चित्रपट संस्कृती अन पावर लुम यांच्या ‘ऑस्मोसिस’ प्रक्रियेतून निपजणाऱ्या सिनेमेटिक वासाचा शोध घेणे अपरिहार्य आहे.

मालेगावच्या इतिहासात डोकावताना…
मोसम आणि गिरणा नदीच्या संगमावर वसलेला मालेगाव हा मुस्लिमबहुल प्रदेश. 1740 पासून 1960 पर्यंत उत्तर भारत, वाराणसी, हैद्राबाद येथून वेळोवेळी आपल्या उपजीविकेसाठी स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांचं शहर. कमी गुंतवणुक आणि त्याहून कमी संसाधने असताना देखील अंगभूत कौशल्य आणि अंतःप्रेरनेच्या जोरावर तगुन असलेल शहर. शहरातल्या एकूण लोकसंख्येच्या 80 टक्क्याहून अधिक संख्या फक्त मुस्लिम समाजाची आहे. त्यातील 50 टक्के लोकं ही दारिद्र्यरेषेखालील असून त्याहून जास्त झोपडपट्टीसदृश्य वस्त्यांमध्ये राहते. शहरातल्या हिंदू-मुस्लिमांना भौगोलिकदृष्ट्या मोसम नदी विभागते. मोसम नदीच्या पूर्वेला मुस्लीम वस्ती तर पश्चिमेला हिंदू वस्ती.
मालेगाव महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाच केंद्र. 3 लाख पावरलुम्स मधून तयार होणार दररोजचा किमान 2 करोड मीटर कपडा हा इथल्या कष्टाचा द्योतक आहे. सरासरी 10 रुपये मीटर दराने गृहीत धरला तरी 20 करोड रुपयांची रोजची उलाढाल आहे. उल्लेखनीय म्हणजे हा संपूर्ण व्यवहार कम्प्युटर, आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर न करता होतोय. काही ठिकाणी हे व्यवहार तोंडी तर काही वेळा अक्षरशः विडी, सिगारेट्सच्या पाठीमागे लिहिलेल्या नोट्सच्या आधारावर चालतात. ह्या 3 लाख पारंपरिक कालबाह्य मशीन्स पैकी सेमी ऑटोमॅटिक मशीन्स अत्यंत कमी, तर शटललेस म्हणजेच स्वयंचलित पावरलुम्स चा टक्का अत्यल्प आहे.
एका अवहालानुसार मालेगावमधील 99% हून अधिक यंत्रमाग हे कालबाह्य झालेले आहेत. साहजिकच त्यांची उत्पादनक्षमता कमी अन देखभालीचा खर्च अधिक आहे. ह्या चक्राचा मायक्रोस्कॉपिक अभ्यास हा गुंगवून टाकणार विषय आहे. कारण सैद्धांतिक दृष्ट्या कागदावर ताळेबंद मांडला तर तो व्यवसाय कधीच मोडकळीस यायला हवा होता. परंतु ह्या मशीन्सचा ड्रायव्हिंग फ़ोर्स हा वीज अन तंत्रज्ञान नसून त्यामागे राबणारे 1 लाख कष्टकऱ्यांचे हात आहेत. यातील बहुसंख्य मुस्लिम कामगार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहतात. दाटीवाटीच्या, कोंदट, लिबलिबीत चिंचोळ्या गल्ल्या आणि तशा अनेक वस्त्या. ज्या ठिकाणी अहोरात्र काम केले जाते त्या जागा ‘आउटसायडर’ माणसाला क्लॉस्ट्रोफोबिया देऊ शकतात. खरं सांगायचं तर इथे राबणाऱ्याना ‘कामगार’ म्हणायला जीभ कचरते. कारण कामगार आणि मजूर हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. एक कामगार एकाच वेळी 8 ते 10 यंत्रमाग चालवतो. ह्या मशीन्स वर चालणारे काम कमालीचे एकसूरी,नीरस अन नियंत्रित स्वरूपाचे असते. मशीनची रचनात्मक आणि यांत्रिक लय कामगाराच्या अंगात भिणल्याशिवाय त्यांची वेव्हलेंथ जुळणे अन मशीनने तशी उत्पादकता दणे अशक्य आहे.

मालेगावच्या चित्रपट संस्कृतीचा ह्या लयीसोबत अतूट संबंध आहे. लुम मधल्या स्ट्रक्चर्ड यांत्रिकपणातून दोन घटका वेंट आउट होण्याचा मार्ग म्हणजे सिनेमा. आणि हाच सिनेमा पुनः नव्याने ताकद देतो लुममधला एकसूरीपणा अंगात भिनवून घेण्यासाठी. अभिसरण हा पदार्थ विज्ञानशास्त्र आणि रसायनशास्त्र यांतील विशिष्ट क्रियादर्शक शब्द आहे. ज्या दोन पदार्थांत संमिश्रण होत असतें त्या पदार्थांचें एकमेकांच्या प्रदेशांत गमन होतें; यालाच अभिसरण असें म्हणतात. मालेगावमध्ये पावर लुम आणि सिनेमा यांचे सतत अभिसरण होत असते. त्यामुळे एकातून दूसरा वेगळा काढून दाखवणे केवळ अशक्य. मालेगावी पावर लुमच्या कान बधिर करणाऱ्या आवाजात सिनेमाची स्वप्न बघितली जातात अन दिवसभर अंगात भिनलेला कोंदटपणा सिनेमागृहात उत्सर्जित केला जातो. यंत्रमागाचा ड्रायव्हिंग फ़ोर्स म्हणजे त्या कष्टकऱ्यांचे हात अन त्या हातांचा ड्रायव्हिंग फ़ोर्स म्हणजे सिनेमाने दिलेली स्वप्न.
कष्टकऱ्यांचे हात अन त्या हातांचा ड्रायव्हिंग फ़ोर्स म्हणजे सिनेमा
10 बाय 10च्या पत्र्याच्या खोलीत 10 लोक दाटीवाटीने राहतात; हे मालेगावी सर्रास दिसणारे दृश्य आहे. सतत पावरलूममध्ये काम केल्याने येथील कामगारांच्या छातीत अत्यंत छोटे कण, धागे, धूळ जाऊन श्वसनयंत्रणा कमजोर झालेली असते. पण वर उल्लेख केला तसा ह्या रैंडम पॅटर्नच्या धाग्यांचा खोलवर परिणाम सुप्तमनात देखील नकळत होत असतो. काम करताना दिवसातील 12 तास व्हायब्रेशनने भरलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घालवल्यावर डोळ्यांना सतत दिसणारे उभे-आडवे धागे अन वस्तीत ह्रिदम हरवलेल्या रेषा यांचा एकत्रित परिणाम न झाला तरच नवल. ह्या रैंडम पॅटर्नस ना तोलून धरणारी लय मालेगावकरांना फक्त सिनेमागृहात सापडते. संशोधक ‘निकोल टेसला’चं भौतिकशास्त्रात एक प्रसिद्ध विधान आहे. If you want to find the secrets of the universe, think in terms of energy, frequency and vibration. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेला विश्वाची रहस्ये शोधायला निघणार नाही. पण हे विधान मालेगावच्या बाबतीत तिरकसपणे लागू होतं. 10 ते 12 तास पावरलूममध्ये सलग काम करताना आजूबाजूला असलेल्या गोंगाटात तुम्ही काही ऐकू शकत नाही कि तुमचं बोललेलं समोरचा ऐकू शकत नाही. त्यामुळे एकाच वेळी 8-10 मशीन्स चालवणारे हात मनात फक्त विचार करू शकतात.
‘स्वतःशी संवाद’ वैगरे गोंडस नाव त्याला द्यायला नको. पूर्वी तो विचार सिनेमा बघण्याचा, पांढऱ्या पडद्याशी स्वतःला जुळवून घेण्याचा, ती स्वप्न प्रत्यक्ष जीवनात पाहण्याचा असायचा. गेल्या 20 वर्षात काही वेड्या लोकांचा हा प्रवास सिनेमा निर्मितीपर्यंत येऊन पोचला. निकोल टेसलाला अपेक्षित असेलेली energy, frequency आणि vibration त्यांना मिळतोय यंत्रमाग आणि सिनेमाच्या गाण्यामधून. मोठ्या पडद्यावर गाणी बघताना तीच energy, frequency आणि vibration मालेगावकर अनुभवतो तेव्हा भारावलेल्या त्या वातावरणात Harmonic Resonance (अनुनाद) उत्पन्न होतो. त्यामुळे 26 वर्ष जुन्या ‘करण अर्जुन’ मधल्या ‘जाती हूं मैं’ गाण्याच्या वेळी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतेलेलं थेटर बघून आश्चर्य वाटायला नको. भारतात सहकुटुंब सिनेमा पाहायला जाणे हा अनेकांसाठी सोहळा असतो. मात्र ज्या शहरात सिनेमात पाहायला जाणे ही आत्म्याची, शरीराची झीज भरून काढण्याची गरज असते, तिथे 10 महिन्यांहून जास्त काळ सिनेमागृह बंद राहिल्यास होणारे बरे-वाईट परिणाम फक्त मनोरंजन उद्योगावर झालेले नसून रूट लेव्हलवर झिरपलेले असतात. वेंट आउट होऊन, पुन्हा कामाला जुंपण्यासाठी त्यांच्याकडे मनोरंजनाचे इतर कुठेलही साधन नाहीये.

‘Expatistan’ ही जीवनावश्यक खर्चानुसार श्रेणी आणि किंमत निर्देशांक ठरवणारी प्रसिद्ध वेबसाईट आहे. त्यानुसार मालेगाव हे भारतातील सर्वात स्वस्त शहर आहे. पावरलुम मध्ये दर आठवड्याला मिळणाऱ्या 1200 ते 1600 रुपयांत संपूर्ण कुटुंबाची उपजीविका कशी केली जाऊ शकते हा आउटसायडर साठी संशोधनाचा विषय आहे. मात्र त्यात सुद्धा काही एक रक्कम चहा, बिडी अन सिनेमासाठी खर्च करायला तो कचरत नाही, कारण त्याच्यासाठी ते सगळं अन्नपाण्याइतकच महत्वाचं आहे. ज्याची केवळ तो कल्पनाच करू शकतो तसं स्वप्नवत जगणं फक्त चित्रपटात शक्य आहे. त्याच्या भावनांचा निचरा होण्याची एकमेव जागा म्हणजे चित्रपटगृह. मालेगावचा प्रेक्षक सिनेमाच्या बाबतीत भूतकाळात रमणारा आहे. मात्र यामागे केवळ नोस्टलजियाचे उमाळे नसून वर्तमान सुसह्य करण्यासाथी त्याने निवडलेला सुटकेचा मार्ग आहे. सिनेमाव्यतिरक्त थेटरभोवतीची अर्थव्यवस्था सुद्धा भूतकाळात अडकून आहे हे विशेष.
मल्टिप्लेक्समुळे जे जे संपलं ते ते मालेगावात आजही शिल्लक आहे…
मालेगावच एकमेव मल्टिप्लेक्स ‘संदेश सिनेमॅक्स’ वगळता तिकीट दर जास्तीत जास्त 40 रुपये आहे. ज्यांच्यासाठी हे सुद्धा जास्त आहे, ते व्हिडिओ पार्लरला केवळ 10 रुपयात सिनेमा बघू शकतात. (मालेगावमध्ये व्हिडिओ पार्लर/ व्हिडिओ हॉल ची संख्या एकेकाळी सिंगल स्क्रीन थेटरहून अधिक होती. 2006/2008 च्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर अनधिकृतपणे फिल्म्स दाखवणारे रडारवर आल्याने व्हिडिओ पार्लर संस्कृती हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.) तिथे काही थेटरच्या बाहेर कोल्ड्रिंक्सच्या बॉटल विकणारे असतात जे अजूनही फक्त 5 रुपयात मिळते. काही ठिकाणी गार पाण्याचे हातगाडे असतात जे 1 रुपयांत ग्लासभर थंड पाणी देतात. इतरत्र बंद झालेली लहान मुलांची पेप्सी(पेप्सीकोला) एक रुपयात मिळते. तर 3 रुपयात ताकाची पिशवी मिळते. बाहेरचे खाद्यविक्रेते गळ्यात मोठी टोकरी अडकवून नागलीचे, तांदळाचे तळलेले पापड विकतात. वडापाव, पाववडे 10 रुपयांत 3 नग. चहासोबत क्रीमरोल, डोनट, खारी, मोठ्या आकाराचे टोस्ट 1-2 रुपये प्रतीनग विकत मिळतात. मालेगाव शहराने जीवनावश्यक वस्तूंचा दर आपल्या आवकनुसार जुळवण्यासाठी काही बदल अंगिकारले आहेत. उदाहरणार्थ, – मालेगाव मध्ये अनेक कुटुंबात दाटीवाटीने राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एवढ्या लोकांना कपडे धुण्यासाठी लागणाऱ्या साबणाचा खर्च दुसऱ्या कुठल्याही शहरात बऱ्यापैकी जास्त असू शकतो.
मालेगावमध्ये विशिष्ट प्रकारचा काळा साबण बनवण्याचे डझनभर कारखाने असून महिन्याकाठी 120 टन एकूण साबणाचे उत्पन्न होते. यापैकी 100 टन साबण केवळ मालेगावात विकला जातो, ज्याचा दर आहे फक्त 17 रुपये प्रती किलो! उर्वरित 20 टन साबण भिवंडी, मालेगाव, धुळ्याच्या गरीब वर्गात विकला जातो. दुसरे उदाहरण सायकलचे. – मालेगावची सायकल संस्कृति प्रचलित आहे. इथे सायकल व्यायाम किंवा हौस म्हणून नाही तर रिक्शा, मोटरसायकलकचा खर्च परवडत नसल्याने वापरली जाते. रिक्षाला 10-20 रुपये देण्याऐवजी 4 रुपये प्रतीतासाने किंवा 20 रुपये प्रतिदिन दराने सायकल घेतली तर शहरात कुठेही फिरता येते. मुंबईसारख्या शहराची लाईफलाइन मेट्रो अन लोकल असते, मालेगावसाठी तेच महत्व सायकलचं आहे. थेटरच्या बाहेर खारी, टोस्ट, पाव विकायला अनेक जण फक्त सायकल वापरतात. लहान मुलांची खेळण्याची सायकल सुद्धा येथे 2 रुपये तासाने भाड्याने मिळते.

मालेगावमध्ये थेटर आणि पावरलुम व्यवसायाची परस्परसंबंध असलेली उतरंड आहे. नव्या शतकात मल्टिप्लेक्सच्या भारतात आगमनानंतर चित्रपट पाहण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. मल्टिप्लेक्स चेन ह्या स्वतः एक फूड इंडस्ट्री बनण्याच्या तयारीत आहेत. सिनेमा पाहण्याच्या पद्धतीत बदल होतोय तसं त्यावर अवलंबून असणारे अनेक व्यवसाय हळूहळू लुप्त होत आहेत. तसे व्यवसाय अजूनही जिवंत ठेवणाऱ्या मोजक्या शहरांपैकी मालेगाव एक आहे. सिंगल स्क्रीन टॉकीजवर अवलंबून असणारे आणि त्याबाहेर व्यवसाय करणारे लोकं हा प्रबंध होऊ शकेल इतका मोठा विषय वाटतो. हे फक्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांपुरते मर्यादित नाहीये. तिकीट विकणारे, प्रोजेक्टर चालवणारे, रीळ इकडून तिकडे पोचवणारे, पोस्टर रंगवणारे, प्रत्येक सिनेमासाठी वेगळ्या कॅलिग्राफीत नाव रंगवणारे, सायकल स्टँड सांभाळणारे, अंधाऱ्या हॉलमध्ये टॉर्च हातात घेऊन प्रेक्षकांना खुर्च्या दाखवणारे… हे सगळे प्रत्यक्ष अवलंबून असलेले…
तर तिकीट ब्लॅक करणारे, मोबाइल मेमरी कार्ड मध्ये गाणी भरून देणारे, बी – सी ग्रेड मुव्हीजच्या थेटरबाहेर घुटमळणारे सेक्स वैदू, वेश्या, सायकल पंक्चर काढणारी दुकानं, एक शिलाई मशीन घेऊन बसून जुने कपडे रफू करणारी जमात, टॉकीज भोवती असणारी गर्दी ओळखून तिथे जादूचे, सापाचे खेळ करणारे बहुरूपी, चर्मकार, तीन पत्ते किंवा तीन ग्लास घेऊन पैसे लुबाडणारे, मंजन, फिल्मचे पोस्ट कार्ड विकणारे, काळपट पेटी गळ्यात अडकवून कान साफ करणारे… हे सगळे अप्रत्यक्ष. मालेगावमध्ये फिल्म च्या प्रसिद्धीसाठी स्वतःच्या क्लुप्त्या आहेत. फिल्म साठी हाताने पोस्टर रंगवणारे पेंटर्स कालबाह्य होऊन डिजिटल प्रिंट्सने जागा घेतली आहे. तरी सुद्धा छोट्या बोर्ड-बॅनरवर स्थानिक पेंटरची विषयानुरूप उर्दू कॅलिग्राफी अन कल्पकतेने दिलेल्या टॅगलाईन चं वेगळं महत्व आहे. व्हिडीओ हॉल साठी ‘खास’ डिझाइन केलेले फिल्मचे फोटोशॉप पोस्टर्स तयार करणारे (ज्यात अनेक रँडम फिल्मच्या ऍक्शन फिगर्स, रक्तबंबाळ नायक, आणि तोडक्या कपड्यातील भरीव हिरोईन यांचं अतिरंजित संयोजन असे.) ह्या सगळ्यांचा त्यात समावेश आहे. अर्थात ह्यांना कला मानावे की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. वर्षानुवर्षे एकाच कामात लूप मध्ये अडकलेल्या ह्या लोकांच्या कौशल्याला ‘कारागिरी’चा दर्जा मिळाला तरी पुरे!
उद्योगाची अशीच साखळी यंत्रमाग व्यवसायात आहे. सायजिंग, गाठ प्रेस, सूत वाहणारे हमाल, वाहतुकीसाठीच्या तीनचाकी रिक्षा, कापड चेकर, गठणी चेकर, मुकादम, सायजर, वार्पर हे सर्व प्रत्यक्ष तर कारखान्यांच्या परिसरातील चहा, पान दुकाने, हातगाडे, छोटी मोठी हॉटेल्स हे अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे. पावरलुम मार्गे येणारा पैसा फिल्म बघण्यासाठी अन फिल्म बघितल्याने मिळालेली ऊर्जा पावरलुम चालवण्यासाठी. असं हे अजब चक्र आहे. वर्षानुवर्षे अविरतपणे चालणारे. एखादी फिल्म सिनेमागृहात न पाहता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघितली जाते, तेव्हा या अन्नसाखळीतील अनेक घटक आपोआप वगळले जातात. मालेगावच्या प्रेक्षकांच नातं आहे ते मोठ्या पडद्यासोबत. त्यामुळे ही अन्नसाखळी तोडले जाण्याची भीती त्यांना नाहीये. अर्थात कोरोनामुळे टॉकीजला मिळालेला ब्रेक त्याला अपवाद आहे. उद्भवलेली परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर ‘सिनेमासंस्कृती’ पूर्ववत होण्यास अजिबात वेळ लागणार नाही.
हिंदू असो की मुस्लिम एकाच सांस्कृतिक-सामाजिक पातळीवर
प्रेक्षकांना सिनेमा साक्षर करण्यासाठी मुंबईमध्ये प्रभात चित्र मंडळाची स्थापना करणाऱ्या सुधीर नांदगावकर यांच्या मते ‘सिनेमासंस्कृती’ म्हणजे उत्तमोत्तम अभिजात कलात्मक चित्रपट आणि त्यावरची तितकीच महत्वाची समीक्षा. त्यांना अभिप्रेत असलेली सिनेमासंस्कृती ही उत्तम चित्रपटनिर्मिती, उत्तम समीक्षालेखन आणि चित्रपट आस्वादाची जाण, यासोबत निगडीत आहे. अर्थात हा व्यापक विचार ‘सिनेसाक्षरता’ ह्या शब्दाभोवती फिरतो. मात्र भारतीय समाज म्हणजे अपार वैविध्य आणि टोकाच्या विरोधाभासांचे एक भल मोठ कडबोळ आहे. मुंबईपासून 5-6 तासांच्या अंतरावर असलेल्या मालेगावमध्ये मुळात निरक्षरता हीच एक समस्या असल्याने तिथली ‘सिनेमासंस्कृती’ ही जीवनशैलीसोबत निगडीत आहे. 10-12 तास काम करताना जिथे स्वतःचाही आवाज ऐकू येत नाही अशा ठिकाणाहून सुटका झाल्यानंतर सामूहिकपणे सिनेमा पाहणे ही मालेगावच्या प्रेक्षकाची गरज आहे. शेकडो, हजारो प्रेक्षक जेव्हा एकाच वेळी श्वास रोखणे, सुटकेचा निश्वास सोडणे ह्या क्रिया करतात तेव्हा भावनांचे झालेले amplification कमाल असते.

अमिताभ बच्चनला घेऊन एकापेक्षा एक सुपरहिट व्यावसायिक सिनेमे बनवणाऱ्या मनमोहन देसाईचा जुना इंटरव्यू मागे एकदा वाचण्यात आला. त्यात ते म्हणाले की ‘एखादा सिनेमा मुस्लिम प्रेक्षकाला नाही आवडला तर तो फ्लॉप होतो!’ वरवर पाहता हास्यास्पद वाटणाऱ्या या विधानात भारतीय वर्किंग क्लास, लुम्पेन क्लास च्या सामायिक आवडीचा गाळीव अर्क आहे. एखाद्या मोठ्या शहरात किंवा बहूसांस्कृतिक प्रदेशात सिनेमा प्रदर्शित होतो तेव्हा थेटरमध्ये शेजारी बसलेल्या 2 व्यक्तीच्या अभिरुचीत टोकाची तफावत असू शकते. मालेगाव सारख्या शहरात थेटरच्या छताखाली असलेले शेकडो-हजारो प्रेक्षक मग ते हिंदू असो की मुस्लिम एकाच सांस्कृतिक-सामाजिक पातळीवर असतात. त्यामुळे त्यांनी सिनेमाला दिलेला प्रतिसाद हा व्यावसायिक सिनेमासाठीची लिटमस टेस्ट असते.
‘बॉम्बस्फोटानंतर… मालेगाव’
2006 नंतर मालेगावकडे काहीजण ‘दंगलीचे शहर’ म्हणून बघायला लागले. मालेगावमध्ये पहिली दंगल 1921 साली झाल्याची नोंद सापडते. 1963, 1968, 1982, 1983, 1984, 1986, 1992 आणि 2001 या वर्षात अनेक छोट्या मोठ्या कारणवरुण हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण झाल्याच्या नोंदी आढळतात.
मालेगावात 8 सप्टेंबर 2006 मध्ये चार बॉम्बस्फोट झाले. ह्या घटनेनंतर तेथील माणसांचे जीवन, त्यांच्या कहाण्या आणि सामाजिक आर्थिक प्रश्नांचा वेध ‘बॉम्बस्फोटानंतर…मालेगाव’ या पुस्तकात निळू दामले यांनी घेतला आहे. त्यात दामले एके ठिकाणी नमूद करतात की, ‘हिंदू-मुस्लीम हे इथल्या तणावाचं कारण नाही, इथला सुविधांचा आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव, खिळखिळी आरोग्य व्यवस्था, गरिबी यामुळे इथे लोक प्रेशर कुकर झालेत. दुर्दैवाने यात मुस्लीम लोकांची संख्या जास्त आहे. काळाबरोबर न चालण्याचा तोटा त्यांना होतोय.’
सिनेमा पाहून लगेच कुणी धर्म निरपेक्ष होतं, असं नाहीये. पण रूट लेव्हल ला होणारे परिणाम चकित करणारे असतात. माझा या बाबतीत एक अनुभव सांगतो. 2008 चा सप्टेंबर महिना. थेटर ला ‘A Wednesday’ चालू होता. पिक्चर ला गर्दी नव्हती. क्लायमॅक्स ला नसिरुद्दीन टेररिस्ट ला त्याची ओळख विचारतो. टेररिस्ट काही शहरात बॉम्ब चे संदर्भ देतो. त्यात मालेगाव चं पण नाव घेतो. ‘2006 मालेगाव फक्र है!’ तो असं बोलायचा अवकाश, थेटरात जमलेल्या मोजक्या पब्लिककडून उत्स्फूर्तपणे शिव्या द्यायला सुरुवात झाली. “मारो *** को. घुसादे साले को.” मालेगावचं वाईट करायला निघालेल्यांच्या विरोधात सगळ्याच धर्माचे लोक सोबत आहे याचाच पुरावा. पिक्चर पाहून आलो त्याच रात्री मालेगावात पुन्हा एक बॉम्बस्फोट झाला होता. ज्यात 7 लोक गेल्याची बातमी दुसऱ्या दिवशी समजली.
बॉम्बस्फोट झाला त्या रात्री प्रचंड अफवा कानावर येत होत्या. रात्री दोन्ही धर्माचे लोक समोरासमोर येऊन सुद्धा गप्प बसले. पोलीस व्हॅन परिस्थिती शांत करण्यासाठी समजावून सांगायला आली तेव्हा मात्र पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. तर काहींची थेट अधिकाऱ्यांची गळे दाबण्यापर्यंत मजल गेली. मॉबने चूक केलं की बरोबर नाही सांगता येणार, एक नक्की. घुसमट कशा प्रकारे व्यक्त करावी याची समज नसेल पण व्यवस्थेवर राग काढावा कि व्यक्तींवर याची समज तेव्हा दोन्ही समाजाला होती. तिथल्या प्रेक्षकांनी जेवढं शाहरुख-सलमानला डोक्यावर घेतलय तेवढच मिथुन चक्रवर्ती, अजय देवगण यांना. ‘गदर’(2001) च्या वेळी कुणीतरी थेटर मध्ये जाळपोळ केली तेव्हा सनी देओलच्या मुस्लिम फॅन ग्रुपने त्याला फटकावतना मी बघितलं आहे.
सिनेमाच्या बाबतीत तिथला प्रेक्षक कितीही सेक्युलर असला तरी कधी कधी उफाळून येणारा अहं थंड करायचं काम सिनेमानेच केलय. मालेगावच सोशल फॅब्रिक ज्या पद्धतीने विणले गेले आहे, त्यात तणाव निर्माण करण्यास अनेक जण संधी शोधतात. सरकारकडून कायम दुर्लक्षित राहिल्याने तिथली समाजरचना कट्टरपंथीयाना पिळवणुकीसाठी पोषक वाटते. (स्वयंपूर्ण मुस्लिम अर्थव्यवस्था जिथे असते, तिथे असे तनाव कायम निर्माण केले जातात. उदाहरणार्थ, पावरलुमसाठी प्रसिद्ध असलेले भिवंडी, कुलूप कारखान्यासाथी नावजलेले अलिगढ, चर्म(लेदर) उद्योगाचे प्रमुख केंद्र कानपूर). मात्र मालेगावची अर्थव्यवस्था स्वयंपूर्णतेने हिंदू मुस्लिम एकतेची मोट बांधून ठेवण्यास मदत करते. कारण पावर लुम्सचे अनेक मालक हिंदू आणि विणकर-कामगार मुस्लिम आहेत.
अनेक ठिकाणी माल विकणारे मुस्लिम तर तो घेऊन पुढे व्यापार करणारे हिंदू आहेत. व्यवहाराच्या कुठल्याही लेखी नोंदनीशिवाय खरेदी, विक्री, उधारी हे चक्र निव्वळ विश्वासावर फिरत असतं. मुख्य नोंदी असतात त्या सुद्धा फक्त सिगरेट, बिडीच्या पॅकेट्स वर किंवा कागदाच्या छोट्याशा तुकड्यावर. एकमेकांबद्दल कमालीचा विश्वास असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे तनावाच्या परिस्थितीत राग एकमेकांवर नाही तर व्यवस्थेविरुद्ध काढावा लागेल हे त्यांना कळून चुकलय. व्यवस्थेबद्दलचा राग वेंट आउट करण्याचे काम सिनेमा तिथे कायम करत आलाय. गेल्या 22 वर्षात मालेगावमध्ये एकही दंगल झालेली नाहीये.

मालेगावचे मॉलिवूड… विस्मयकारक निर्मिती
मालेगाव मध्ये शेवटची दंगल 2001 साली झाली तेव्हाची गोष्ट. बाहेर तणाव असल्याने संचारबंदी, पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि शहरातील सर्व थेटर्स बंद. अशात लोकल केबल चालकानी टीव्ही वर एक सिनेमा दाखवायला सुरुवात केली. सगळ्या जातीधर्मातले लोक तणाव विसरून मनसोक्त हसत होते. बाहेर असलेली परिस्थिती काही प्रमाणात निवळण्याचं काम ह्या फिल्मने केलं. सिनेमा होता, ‘मालेगाव के शोले’! मॉलिवूडची निर्मिती होण्यास ह्या घटनेचा आणि फिल्मचा मोठा वाटा आहे. नासिर शेख ह्या व्हिडिओ पार्लर चालकाने 50000 रुपयांत तयार केलेल्या ह्या फिल्मने तब्बल अडीच लाख रुपयाचा गल्ला फक्त मालेगावच्या व्हिडिओ हॉल मध्ये मिळाला. स्थानिक कलाकार, आपल्या रोजच्या जगण्यातली बोलीभाषा, विनोदी पद्धतीने दाखवलेल्या स्थानिक समस्या – ही मालेगावच्या चित्रपटांची वैशिष्टे. सुरुवातीच्या काळात एखाद्या हिट सिनेमाचं लोकल स्पुफ व्हर्जन तयार करणाऱ्या मालेगावमध्ये आता स्वतंत्र चित्रपट निर्मिती करण्यावर भर दिला जातो.
सिनेमा निर्मितीचे कुठलेही प्राथमिक ज्ञान नसताना देखील कल्पकतेने ज्या पद्धतीने ह्या फिल्म तयार केल्या जातात त्याची तुलना फक्त भारतातल्या पहिल्या चित्रपटनिर्मिती सोबत होऊ शकते. (दादासाहेब फाळकेंचा राजा हरिश्चंद्र) जगाच्या नजरेत डावलले गेल्याने नायजेरियन फिल्म इंडस्ट्री(नॉलीवूड), मणीपुरी फिल्म इंडस्ट्री ह्या स्वतंत्रपणे विकसित होत गेल्या. पण त्यांच्याकडे किमान तंत्रज्ञानाचा बेसिक एक्सेस होता. मालेगाव ज्या टाइमलाइन मध्ये जगतोय तशी भारतात कुठेच अस्तित्वात नाहीये.
‘मालेगाव के शोले’ , ‘मालेगाव की शान’ बनवणाऱ्या नासिर शेखने हे सिनेमे ‘VCR to VCR’ एडिट केले आहेत. ही प्रोसेस; फिल्मचे रीळ कट करणे आणि जोडणे यापेक्षा कैक पटीने अवघड आणि क्लिष्ट आहे. खरं तर मालेगावमध्ये पहिल्यांदा सिनेमाची निर्मिती ‘अबू जफर’ यांनी 1987 साली केली आहे (रंगे हाथ). मात्र मालेगावची एखादी व्यक्ति फिल्म बनवू शकतो यावर त्याकाळात कुणीच विश्वास ठेवला नाही. नासिर शेख, फरोग जाफरी, अकरम खान, शकिल भारती यांनी बघितलेल्या स्वप्नामुळे मालेगावची ‘दंगलीचे शहर’ ही कटू आठवण पुसले जाऊन ‘मॉलिवूड’ नावाने ओळख निर्माण होतेय. 2010 मध्ये फैज़ा अहमद खान ने मालेगाव फिल्मच्या वेड्या निर्मिती प्रक्रियेबद्दल ‘सुपरमेन ऑफ मालेगाव’ हा माहितीपट बनवला. ह्या माहितीपटाने मालेगावचे नाव जगभर पोचवले. याआधी हे नाव फक्त बॉम्बस्फोटच्या निमित्ताने पोचले होते! पावरलुम्स मध्ये असंघटित असलेला कामगार फिल्म बघताना संघटित होतो. तिकडे धागे विणताना सिनेमा विणण्याची स्वप्न बघतोय अन ती पूर्ण देखील करतोय. इथे ओरिजनल करण अर्जुन इतकाच ‘मालेगाव के करण अर्जुन’ गर्दी खेचतो. ओरजिनल फिल्म फ्लॉप असताना देखील तिचा रिमेक हे ‘फिल्मवेडे सुपरमेन’ हीट करून दाखवू शकतात. (मालेगाव का अंदाज अपना अपना).

मालेगावच्या झपाटलेल्या फिल्ममेकिंगचं वेड संपूर्ण खांदेशचा भाग होऊ पाहतय. जैन्या (आसिफ अलबेला), डुबऱ्या यांनी सुद्धा आपली समांतर चित्रपटसृष्टी निर्माण केली आहे. अहिराणी, देहाती लोकगीते, भिलाऊ लोकगीते यांचे व्हिडिओ करण्यासाथी मोठ्या म्युझिक कंपनी खांदेश, मालेगाव मध्ये कुतूहल दाखवत आहे. ‘ससा न मागे भिल्या पारधी’, ‘खांदा वर पावडी हात मा टिकम’, ‘धीरे धीरे गाडी चालनी व बारडोलीला’ ही गाणी स्थानिक आणि स्थलांतरित समाज, त्यांच्या व्यथा व्हिडिओच्या मार्फत अधिक नेमकेपणाने समोर मांडत आहे (बारडोली हे गुजरात मधले छोटे शहर, उपजीविकेसाठी खांदेशातून अनेक जण तिथे स्थलांतरित झालेले आहेत).
हॉलीवूडमध्ये DCच्या सिनेमात बऱ्याचदा एखाद्या सुपरहीरोची आणि सुपरव्हिलनची बॅकस्टोरी सारख्याच अडचणींची असते. दोघांवर झालेले अत्याचार तितकेच तीव्र असतात. आयुष्याला कलाटणी देणारा क्षण दोघांच्याही आयुष्यात येतो. मात्र त्या परिस्थितीला natural instinct ने प्रतिसाद दिला की सुपर व्हिलन बनतो आणि ‘माझ्या भवतालच्या परिस्थितीला माझं भविष्य बदलू देणार नाही’, हे ठरवून निर्णय घेणारा सुपर हीरो बनतो. हा सुपरहीरो कामगार आणि फिल्ममेकर ह्या दुहेरी भूमिका जगतो आहे. मालेगावच्या अनेक मुशायऱ्यामध्ये प्रसिद्ध शायर डॉ. राहत इन्दोरी’ यांचा सहभाग असे. तिथल्या जनतेसोबत त्यांचं अतूट नातं होतं. भारतभर अनेक कार्यक्रमात त्यांनी स्वताहून सांगितले आहे की ‘डॉ. राहत इन्दोरी को डॉ. राहत इन्दोरी मालेगाव ने बनाया है.’ काही वर्षांपूर्वी मालेगावमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी सादर केलेला शेर असा होता –

तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो
मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर कर दरिया पार करो
सरकार कडून कुठल्याही फंडिंग, सबसिडीची अपेक्षा नसताना देखील मालेगावचे वेडे फिल्ममेकर तेच तर करत आहेत. ‘जॅक रॅन्सियर’ ह्या फ्रेंच तत्त्ववेत्ताने लिहिलेल्या ‘नाईट्स ऑफ लेबर’ पुस्तकात वर्किंग क्लासच्या सौन्दर्यविचारांची पुनर्मांडणी केली आहे. फ्रांस मध्ये 1830 साली झालेल्या ‘जुलै क्रांती’ (French Revolution of 1830) दरम्यान काही कामगार, मजूर यांनी दिवसा श्रमाची शरीर थकवणारी काम केली अन रात्री लेखन, संगीत, कविता अशा अनेक कलांमध्ये सर्जनशील कामात स्वतःलं मोकळं केलं. रॅन्सीयरने ‘नाईट्स ऑफ लेबर’ मध्ये अशा सर्व कहाण्या मांडून कामगार आणि विचारवंतांच्या पारंपारिक श्रेण्यांचे पद्धतशीरपणे विखण्डन केले आहे. रात्र पाळीत काम करणारा अन दिवसा सिनेमा बनवणारा मालेगावचा कामगार-फिल्ममेकर फ्रेंच क्रांतीच्या त्या कष्टकऱ्यांसोबत नाते सांगणारा आहे.
मालेगावच्या वाटेला आलेली फरफट कदाचित कधीच संपणार नाहीये. ती संपण्याची कुठलीच चिन्हे सध्या तरी दिसत नाहीये. आगामी काळात भारत एक महासत्ता बनण्याची अनेक जण भाकित वर्तवितात. मालेगाव तेव्हा देखील वगळले जाण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या समाजाचा विकास कसा मोजायचा याबद्दल विभिन्न मतप्रवाह आहेत. इथले दरडोई उत्पन्न पुढची 25 वर्ष देखील बदलू शकणार नाही. भुतान सारख्या गरीब देशाने विकासाचा मापदंड ठरवताना ‘human happiness index’ ही संकल्पना समोर ठेवली. मालेगावच्या बाबतीत तसा निर्देशांक काढणेदेखील शक्य नाही. मात्र हाऊसफूल भरलेल्या थेटरमध्ये तिथला प्रेक्षक पडद्यावर स्वतःला बघतो तेव्हा तो सुखात असतो हे मी ठामपणे सांगू शकतो. This is one and only place on the earth where they’ll get their cinematic justice.