Remembering Titanic : क्षण एक पुरे प्रेमाचा, मग वर्षाव पडो मरणाचा…!

'टायटॅनिक' चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला यायला सज्ज झालाय. या चित्रपटाला 25 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुन्हा हा चित्रपट नव्या रूपात 3डी मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाची 25 वर्षं आणि व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने 10 फेब्रुवारीपासून हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्याचं जेम्स कॅमेरून यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यत्वे या 4 शहरांतील आयमॅक्स थिएटर्स, पीव्हीआर स्क्रीन्स आणि इतर काही मल्टीप्लेक्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 100 ते 150 रुपयांपासून आयमॅक्समध्ये 900 रुपयांपर्यंत तिकीटदर ठरवण्यात आला आहे. ज्यांनी तेव्हा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पहिला नाही त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

  • प्रदीप आवटे

…त्याला बुडालेल्या महाकाय जहाजांचे अवशेष पाहायला आवडायचं. म्हणजे, आजही आवडतं. जहाज म्हणजे, एक अख्खं गावच असतं. जहाजावरलं ते हरवलेलं, विस्मृतीत गाडलेलं गाव, जिवंत कसं करता येईल? पण, सागराच्या तळाशी चिरविश्रांती घेत असलेल्या त्या जहाजाच्या सांगाड्यात प्राण फुंकायची तंत्रसिद्धी त्याला अवगत झाली होती. म्हणून तर 1997 मध्ये त्याला 1992 मध्ये बुडालेल्या ‘टायटॅनिक’ नावाच्या महाकाय जहाजाच्या सांगाड्यात प्राण फुंकता आला. आणि कॅलेंडर 85 वर्षे मागं गेलं… साऊथम्प्टनच्या बंदरावर ते नितांत सुंदर ‘टायटॅनिक’ नावाचं तोवरच्या जगातलं सर्वात मोठं जहाज पुन्हा दिमाखात उभं राहिलं. ‘किनारा तुला पामराला’ म्हणणाऱ्या कोलंबसाच्या मानवी महत्त्वाकांक्षेचं मूर्तिमंत रुप होतं, अवाढव्य टायटॅनिक! उत्साहानं भारलेली, जगण्याचा आपापला प्याला ‘दिल से’ पिणारी माणसं टायटॅनिकमध्ये बसून न्यूयॉर्ककडं निघाली होती. समोर अथांग निळसर महासागर होता. पडद्यावर टायटॅनिकची ही जादू अवतरली, त्यालाही आता वीस वर्षं पूर्ण झाली. या टप्प्यावर ‘टायटॅनिक’ त्रिमितीय तंत्रात झळकला आणि सागर तळाच्या सांगाडयातील प्रत्येक श्वास पुन्हा जिवंत झाला…

पडदाभर पसरलेला अथांग निळाशार महासागर
आणि त्यावर तरंगणारे महाकाय टायटॅनिक…

एक छोटंसं गावच आपल्या पोटात घेऊन महासागराच्या लाटांना तोंड देत दोन किनारे जोडण्यासाठी निघालेलं हे जहाज म्हणजे, अवघ्या मानवी जीवनाचं प्रतीक! सागरी लाटांसोबतच मानवी आशा निराशेचा कल्लोळ पोटात घेऊन टायटॅनिक आपला प्रवास सुरु करतं आणि आपल्याला रोझ दिसते. पायघोळ झगा आणि डोईवर देखणी कॅप. पण तिच्या देखण्या आभाळात निराशेचे ढग दाटून आले आहेत. तिच्या पारदर्शक डोळ्यांत ती निराशा लपत नाही. रोझ उमराव घरची लेक आहे. वडील गेलेत, ते कर्जाचा डोंगर उरावर ठेवून… बडा घर पोकळ वासा अशा परिस्थितीत तिच्या आईनं तिचं लग्न कॅल हॉक्ले या उर्मट पण गर्भश्रीमंत माणसाशी ठरवलंय. या लग्नामुळे आपली गेलेली पत आपल्याला परत मिळेल, ही आईची अपेक्षा आहे, पण कॅलमधला स्त्रीला गौण मानणारा पारंपारिक पुरुष रोझला पसंत नाही, तिचा पदोपदी पाणउतारा करणारा कॅल तिला बिलकुल आवडत नाही. ‘आपण बाया आहोत गं, आपले निर्णय, निवडी सोप्या नसतात, पोरी,’ उच्चभ्रू राहणीमानाला लालचावलेली आई तिला समजावून सांगू पाहतेय, पण रोझला ते पटत नाही. तिचा होणारा नवराही तिच्यासोबत आहे. टायटॅनिकचा प्रवास दिमाखात सुरु आहे पण, रोझला आपला जीवनप्रवास थांबवावा वाटतो. एका अस्वस्थ रात्री ती जहाजाच्या डेकवरुन उडी मारुन आत्महत्या करायचा प्रयत्न करु पाहते. पण, त्याच जहाजातून प्रवास करणारा एक कफल्लक तरुण चित्रकार जॅक तिला पाहतो. त्या आधी फक्त एकदाच त्यानं तिला पाहिलेलं असतं, ती डेकवरुन फिरताना आणि तो तिच्यावर फिदा झालेला असतो. ती आत्महत्या करत आहे, हे पाहून तो अस्वस्थ होतो आणि या हट्टी पोरीला कसं समजवावं, हेच त्याला कळेनासं होतं. त्याला तिचं नावही माहीत नाही. पण त्याची गरज तरी कुठं असते?

remastered version of titanic- baimanus

कुठल्याही क्षणी महासागरात उडी मारण्याच्या बेतात असलेल्या रोझला तो एवढंच सांगतो, ‘तू उडी मारलीस तर तुझ्या पाठोपाठ मीही उडी मारेन, मिस! प्लीज गिव्ह मी युवर हँड!’ रोझला काय दिसतं, त्या पोराच्या डोळ्यांत कोण जाणे आणि त्याच्या हातात हात देत, रोझ मागं फिरते. पेटत्या सिगारेटचं थोटूक तो समुद्रात फेकतो, पण दोघांच्याही तनामनाला प्रेमाची एक आगळी वेगळी आग वेढून टाकते आणि टायटॅनिकचा अवघा प्रवास रोमँटिक होऊन जातो. त्या दोघांना सागरी उधाण येतं. त्या जहाजावर जणू त्या दोघांशिवाय कुणी उरतच नाही. त्या दोन तरुण देहातली नव्हाळीची रसायनं किनारे ओलांडून ओसंडू लागतात आणि टायटॅनिकचा वेग वाढू लागतो. एकेक सागरी मैल मागे पडू लागतो. कॅलला आपली बायको आपल्या हातातून निसटतेय याची दुखरी पुरुषी जाणीव पोखरू लागते, मारहाण करून, दमदाटी करून तो तिला रोखायचा प्रयत्न करतोय. पण रोझला जॅकमध्ये आणि जॅकला रोझमध्ये आपला जन्मोजन्मीचा जिवलग भेटलाय.

आपलं फर्स्ट क्लास कंपार्टमेंट मागं टाकून जॅकच्या थर्ड क्लासमध्ये रोझला जिंदनानीची खरीखुरी गात्रागात्रांत पसरणारी पार्टी अनुभवायला मिळते, ती देहभान हरपून नाचते, तिला पंख लगडल्यागत हलकं वाटू लागतं आणि आपल्या उच्चभ्रू यच्चयावत पाणचट पार्ट्या तिला नकोनकोशा होतात. तिला जॅकचा सर्जक कुंचला खुणावू लागतो. ‘माझ्या अनावृत्त देहावरून तू तुझा कुंचला फिरव. माझ्या देहावर फक्त एक अनमोल हिरा असेल – हार्ट ऑफ दि ओशियन,’ ती जॅकला विनवते आणि आपला कुंचला आपल्याच रक्तात बुडवत जॅक आपल्यासमोर अनावृत झोपलेल्या रोझचं चित्र रेखाटतो. दोघांच्या देहभर मोरपिसारे फुलतात. आई आणि कॅलला न जुमानता जहाजभर लपाछपीचा खेळ सुरू होतो. जहाजावरील बग्गीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला जॅक तिला लटकेच विचारतो, ‘व्हेअर टु मिस?’ आणि रोझ उत्तरते, ‘टू स्टार्स.’ चांदण्याकडे जाण्याचा प्रवास सुरु होतो. आणि जहाजावरील त्या बग्गीत रोझचा अवघा गंध जॅकच्या रक्तात मिसळून जातो. जॅकचे रंग घेऊन रोझ अजून उजळते. जहाजभर कॅल आणि इतर काही या दोघांना शोधताहेत. पण एकमेकांत हरवलेले ते दोघे, कसे सापडावेत कुणाला?

remastered version of titanic- baimanus

अवघ्या दोन-तीन दिवसांत हजारो सागरी मैल पार करून दोन जीव जवळ आलेत. जॅकला आपल्या भणंग जगण्यात असं काही घडू शकतं, यावरच विश्वास बसत नाहीये. पत्ते पिसून जुगारात चार पैसे मिळाले म्हणून नशीबानं त्याला टायटॅनिकच तिकिट मिळालं आणि आता काळीज पिसून बसलाय तो, त्याच्या आयुष्यात रोझ आलीय. आयुष्य येईल, तसं घेत जावं, असं म्हणणारा जॅक शब्दशः स्वप्नांच्या जहाजातून प्रवास करतोय. दोनच दिवसांत दोघांनी किती भरभरून जगून घेतलंय. आणि इकडे टायटॅनिकला मोठा आईसबर्ग आडवा आलाय म्हणून इशारा दिला जातोय. कॅप्टन एडवर्ड स्मिथ आणि त्याची टीम त्या महाकाय बर्फाच्या पर्वताला धडक बसू नये, म्हणून जीवाचा आटापीटा करताहेत पण वेळ हाताबाहेर निघून गेलीय. टायटॅनिक बर्फाच्या पर्वताला घासत पुढं निघते आणि पाण्याचा लोंढा जहाजाच्या एकेका कंपार्टमंटमध्ये घुसू लागतो. जिवाच्या आकांतानं लोक स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करु लागतात. जहाजावरील दोन हजार लोकांना पुरतील एवढ्या लाईफ बोटस नाहीत आणि कॅलने जॅकला खोट्या चोरीच्या आरोपाखाली तळाच्या खोलीत बंदिस्त केलंय. फुटलेल्या आणि बुडू लागलेल्या जहाजाचा विचार न करता रोझ जॅकला शोधतेय. स्वतःला लाइफ बोट मिळत असतानाही जहाजावर उभ्या असलेल्या जॅककडे झेपावतेय. दोघांनाही मृत्यूची जणू तमा नाही. क्षण एक पुरे प्रेमाचा, मग वर्षाव पडो मरणाचा…! माणसं समुद्रात पडताहेत, जहाजावर मृत्यूचं थैमान माजलंय आणि जहाजावरील बँड मास्टर वॅलेस आणि त्याचा चमू मनापासून ‘Nearer, my God to thee’ गातोय.

remastered version of titanic- baimanus

जहाज दुभंगलंय आता. रोझ आणि जॅक अटलांटिक महासागरात फेकले गेलेत. जॅकच्या हाताला एक फळकूट लागतं, त्या फळकूटावर दोघांना तरंगणं शक्य नाही. बर्फगार पाण्यानं थिजलेला जॅक रोझला कसंबसं त्या फळकुटावर ठेवतो. ‘जॅक, मला माझं शरीरच जाणवत नाही रे,’ रोझ विझू पाहणाऱ्या आवाजात बोलतेय, ‘नाही रोझ, अशी हिंमत हारू नकोस. खूप जग गं तू, अशी आता नकोस जाऊ. तुला मुलं, नातवंडं होतील आणि जख्ख म्हातारी होऊन उबदार बिछान्यात तू शेवटचा श्वास घेशील, रोझ! मला वचन दे, तू हिंमत नाहीस हरणार.’ त्या महासागरात जॅक शेवटचा श्वास घेतो आणि जॅकला दिलेलं वचन सांभाळत तरीही रोझ लाइफ बोटीकडे झेपावते. आसमंत गातोय –

Near, far, wherever you are
I believe that the heart does go on
Once more you open the door
And you’re here in my heart
And my heart will go on and on
We’ll stay, Forever this way
You are safe in my heart
And my heart will go on & on

आज म्हातारी झालीय रोझ, थकलीय पण तिच्या हृदयातला जॅक तसाच तरुण आहे. वेडा लोवेट टायटॅनिकच्या सांगाड्यात तो महागडा हिरा ‘हार्ट ऑफ दि ओशियन’ शोधतोय. त्याला कळत नाही, महासागराचं खरंखुरं हृदय या म्हाताऱ्या रोझच्या हृदयासोबत धडकतंय… वीस वर्षं काय घेऊन बसला आहेस लोवेट, जोवर माणूस नावाची प्राणीजात शिल्लक आहे तोवर ते असंच धडकत राहणार आहे. अनंतापर्यंत!

‘टायटॅनिक’ची थ्री डी आवृत्ती आलीय तिकडे अमेरिकेत आणि आता भारतातही. पण रक्तमांसातले रोझ आणि जॅक इथल्या रस्त्यावर रोज भेटताहेत, तुम्हांला आणि मला आणि पुन्हा पुन्हा सांगताहेत तुमच्या माझ्या जगण्याचा सारांश अवघ्या अडीच अक्षरांत…!

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here