अनुताई वाघ : ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ मागे वळून पाहताना…

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा आज जन्मदिन. वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य येऊनसुद्धा तत्कालीन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले. शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाच, त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी बोर्डी येथे आदिवासींसाठी तब्बल 47 वर्षे निरपेक्ष वृत्तीने ग्रामशिक्षणाचे कार्य चालवले.

  • डॉ. वृषाली देहाडराय

ज्यावेळी सिल्विया न्यूझीलंडमध्ये माओरी मुलांना सहज शिक्षणाचे धडे देत होती त्याचवेळी महाराष्ट्रात कोसबाडच्या टेकडीवर अनुताई वाघ आपल्या गुरू ताराबाई मोडकांच्या मार्गदर्शनाखाली वारली मुलांना शाळेत ‘येती’ आणि ‘शिकती’ करण्यासाठी धडपडत होत्या. जात्याच हुशार असलेल्या अनुताई अनेक अडथळ्यांना तोंड देत 1927 मध्ये व्हर्नाक्युलर फायनल झाल्या. त्या परीक्षेत त्या नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम आल्या. पुढे त्यांनी प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र हा कोर्स पुण्याला केला. या परीक्षेतही त्या पुणे विभागात पहिल्या आल्या. 1929 मध्ये त्या नाशिक लोकल बोर्डाच्या प्राथमिक शाळेत रुजू झाल्या आणि तिथून सुरु झाले त्यांचे शिक्षणविषयक प्रयोग. पुढे 1933 ते 1944 या कालावधीत त्या पुण्याला हुजूरपागा शाळेमध्ये प्राथमिक शिक्षिका होत्या.

तिथे शिकवत असतानाच त्या रात्रशाळेतून मॅट्रिक झाल्या. प्रापंचिक जवाबदाऱ्यांमुळे त्यांना तीव्र ईच्छा असूनही 1942 च्या चलेजाव आंदोलनामध्ये भाग घेता आला नाही. त्यांची ही खंत कमी करणारी संधी त्यांच्याकडे लवकरच चालून आली. कस्तुरबा राष्ट्रीय स्मारक निधीमार्फत खेडेगावात महिला आणि बालसेवेची कामे सुरू व्हायची होती. त्याची पूर्वतयारी म्हणून 1945 च्या मार्चमध्ये बोरीवली येथे एक शिबिर भरवले गेले. हुजूरपागेतील पूर्णवेळ नोकरी सोडून अनुताई या शिबिरात सहभागी झाल्या. तिथे त्याची भेट ताराबाई मोडक यांच्याशी पडली आणि अनुताईंच्याच शब्दांत सांगायचे झाले तर, ‘जीवनाच्या नव्या पर्वाची नांदी बोरिवली शिबीर प्रवेशाने झाली.’

ताराबाईंनी बालशिक्षणाचे धडे भारतातील बालशिक्षण चळवळीचे अर्ध्वयू गिजुभाई बधेका यांच्या हाताखाली गिरवले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याची धुरा ताराबाईंच्या खांद्यावर आली. गिजुभाईंनी स्थापन केलेल्या नूतन बालशिक्षण संघातर्फे ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे ग्राम बाल शिक्षा केंद्र काढायचे ठरले व अनुताईंची नेमणूक त्या कामावर झाली. या भागातील बहुसंख्य लोक गुजराती भाषिक होते. “मला गुजराती भाषा येत नाही. तेव्हा एखादे पूर्ण मराठी भाषक गाव द्यावे.” ही विनंती धुडकावून लावत अडचण आली तरी पाय घट्ट रोवून तिथेच कसे उभे राहायचे याचा पहिला धडाच या निमित्ताने ताराबाईंनी अनुताईंना घालून दिला. ज्या काळात शहरांमध्येसुद्धा बालवाडीचे महत्व फारसे माहित नव्हते तिथे ग्रामीण भागात बालशिक्षणाबाबत जागृती निर्माण करणे हे महाकठीण काम होते.

अनुताई वाघ - baimanus

इतर सहकाऱ्यांच्या मदतीने अनुताईंनी बालवाडीसाठी मुळे गोळा करायला सुरुवात केली. बालशाळा सुरु तर झाली पण काही दिवसातच मुलांची संख्या रोडावली. त्याचे मुख्य कारण होते भारतीय समाज जीवनाला सुरुवातीपासून लागलेली कीड म्हणजे जातीभेद. दलितांची मुले येत होती म्हणून सवर्ण मुले बालवाडीत यायची बंद झाली. यावर गाव बदलणे हा अनुताईंनी सुचवलेला सोपा उपाय पुन्हा एकदा ताराबाईंनी नाकारून त्यांना मळलेल्या पायवाटेने जाण्यापेक्षा नवीन पायवाट पाडायला उद्युक्त केले. बारा वर्षे अनुताई बोर्डीमध्ये होत्या. तिथे त्या ताराबाईंचा पाठींबा आणि प्रोत्साहनामुळे अनेक गोष्टी शिकल्या.

संबंधित वृत्त :

गिजुभाईंनी बालकेंद्रांना बालमंदिर हे नाव रूढ केले होते. बोर्डीच्या आसपास चिकू पपनसाच्या वाड्या म्हणजे बागा होत्या. तेव्हा एक स्नेही जुगताराम भाई यांनी या केंद्राला बालांची वाडी म्हणजे बालवाडी हे नाव दिले जे महाराष्ट्रात आजतागायत रूढ आहे. या बालवाडीची सुरुवात व्हायची ती मुलांना स्वच्छ् करण्याच्या कार्यक्रमापासून. मुलांच्या अंघोळी, त्यांचे कपडे धुणे, केस विंचरणे, उवा काढणे, उवांवर व खरजेवर औषध लावणे ही कामेही बालवाडीत करावी लागत. हळूहळू पालकांचा विश्वास वाढत गेला व मुलांची संख्या वाढत गेली.

ही बालवाडी मॉंटेसरीच्या तत्वांप्रमाणे पण गांधीजींच्या त्रिसुत्रीप्रमाणे चालत असे. ही त्रिसूत्री म्हणजे –

1. बालवाडीतील सर्व साधने गावातील कारागीरांनीच तयार करावीत.

2. करता येतील तेवधी साधने शिक्षकांनी बनवावीत.

3. आजुबाजूच्या परिसरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधूनच शक्यतो साधने बनवावीत.

या त्रिसूत्रीप्रमाणे सभोवतालच्या वस्तू वापरून साहित्य करणे सुरु झाले. पिसांच्या रंगजोड्या, बांगड्यांना दोरे गुंडाळून त्यांच्या रंगजोड्या असे अनेक प्रयोग अनुताई आणि त्यांचे सहकारी करून बघायला लागले. त्याचप्रमाणे या मुलांना साजेशी गाणी आणि गोष्टी रचायला सुरुवात झाली. फुटके शंख, दगड, काड्या, पाने, बिया, रेती, अगदी विटांचे तुकडे आणि शेणाच्या गोवऱ्यांचा उपयोगसुद्धा साधने तयार करण्यासाठी होऊ लागला. मुळाक्षरे शिकवण्यासाठी मुलांच्या परिसरातले शब्द निवडण्यात आले., बांबूच्या टोपल्या, रंगकामासाठी बांबूचे फळे, केळीच्या सोपटांचे शिवणकाम , खजुरीच्या पानांच्या डब्या अशी माँटेसरीची सगळी साधने स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून तयार झाली. स्पर्शज्ञान देण्यासाठी रंगारी किंवा सुतार वापरतात तो पॉलिश पेपर वापरणे ही सर्वसामान्य रीत. पण अनुताईंनी मुद्दाम होडीतून लांबवर जाऊन काळी रेती आणून, सरस वापरून रेतीकागद तयार केला. एकदा एखादी गोष्ट ठरवली की मग मागे सारायचे नाही या अनुताईच्या स्वभावामुळे त्यांच्या हातून अनेक भव्य कार्ये घडली.

सवर्ण आणि दलित मुले शाळेत यायला लागली तरी काही अंतरावर असणाऱ्या आदिवासींची मुले मात्र बालवाडीत येत नव्हती. जर मुले शाळेत येत नसतील तर शाळेने मुलांकडे जायला हवे असा विचार करून ही मंडळी या आदिवासींच्या अंगणात जाऊन थडकली आणि निर्माण झाली ‘अंगणवाडी’. पुढे भारत सरकारने ग्रामीण, आदिवासी आणि शहरी झोपडपट्टी भागात काढलेल्या बालशिक्षण केंद्रांसाठी अंगणवाडी हेच नाव अधिकृतरीत्या स्वीकारले. आदिवासींच्या वस्तीमध्ये एखादे झाड शोधायचे, तिथली जागा स्वच्छ करायची आणि तिथेच मुले जमवून गाणी, गोष्ट, खेळ, रंगकाम सुरु व्हायचे. मुलांना स्वच्छ करणे हे काम इथेही करावे लागायचे. या मुलांचे आईवडील कामासाठी बाहेर जायचे. त्यामुळे या मुलांना त्यांच्या लहान भावंडांनादेखील सांभाळावे लागायचे.

ही मुले शिकती व्हायची तर त्यांच्या कडेवरच्या भावंडांची सोय व्हायला हवी होती. त्यामुळे एकीकडे यांच्या धाकट्या भावंडाना सांभाळत अंगणवाडी चालायची. पुढे चालू केलेल्या या विकासवाडी या संकल्पनेची बीजे या प्रयोगात रोवली गेली. या आदिवासी मुलांबरोबर अनुताई मुलांत मूल होऊन रमल्या. त्यांच्याबरोबर जंगलात गेल्या, चिंचा खाल्ल्या, भात लावणी केली. या मुलांना रंगकाम करणे फार आवडे. शेणामातीने सारवलेले अंगण, झोपड्यांच्या भिंती, झाडांचे बुंधे यावर चित्रकला चालायची. परिसरातील पानेफुले, दगड, बिया वापरून सुशोभन केले जायचे. अशा 15 अंगणवाड्या बोर्डी परिसरात सुरू झाल्या. या अंगणवाड्यांमुळे अनुताईंना आदिवासींच्या जीवनाची खूप जवळून ओळख झाली.

आदिवासींच्या मुलांसाठी नेहमीची बालवाडी चालणार नाही हे ताराबाईंनी ताडले. ही मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यायला हवी असतील तर त्यांच्या गरजा पुरवणारी शाळा असायला हवी हे लक्षात घेउन तान्ह्या मुलांसाठी पाळणाघर, 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी बालवाडी आणि 8 ते 10 वर्षे वयाच्या मुलासाठी इयत्ता पहिले अशी तिपेडी व्यवस्था असणारी शाळा आवश्यक होती. या कल्पनेतून ‘विकासवाडी’ या संकल्पनेचा जन्म झाला. हा विकासवाडी प्रकल्प कोसबाडला राबवायचे ठरले आणि अनुताई 1956 मध्ये कोसबाडच्या दुर्गम भागात रवाना झाल्या. तिथेही मुले गोळा करणे, स्वच्छ करणे, त्याना गाणी, गोष्टी खेळ दाखवून ऐका ठिकाणी बसायला लावणे सुरु झाले.

अनुताई वाघ - baimanus

कोसबाडला लोकल बोर्डाची प्राथमिक शाळा सुरु करण्यात आली. जी मुले तिथे होती त्यापैकी कोणालाच अक्षर ओळख नव्हती. मग अनुताईंनी पूर्वप्राथमिक पद्धतीनेच अक्षर ओळख व अंकज्ञान देणे सुरू केले. परिचयाच्या वस्तू, ध्वनी यावरून शब्द ओळखणे सुरू झाले. मुलांना गोष्टी सांगायच्या व त्याचे त्यांच्याकडून नाटक करून घ्यायचे. त्यांच्या आयुष्याशी संबंधीत गाणे रचायची.

आये कुठे गेली? डोंगरीला.

कशाला? फाटी आणायला.

फाटी कशाला ? धान रांधायला.

धान कशाला? खायला.

धान रांधला चट, चट, चट.

खाउन टाकला मट , मट, मट.

अशा गाण्यांमुळे मुलांना शाळेत येणे आवडू लागले. आपल्या पाड्यांच्या बाहेर क्वचितच गेलेल्या मुलांना भूगोल शिकवणे हे एक आव्हान होते. त्यासाठी त्यांनी आजूबाजूच्या परिसरात सहली काढल्या. शाळेत उठावाचे नकाशे करून घेतले. आदिवासींच्या व्यवहारात मुळातच फारसे गणित नसायचे. बरेचसे व्यवहार वस्तूविनिमयाने व्हायचे. ठराविक सण सोडले तर वार तारखांशीही संबंध यायचा नाही. त्यामुळे पिसे, बिया अशा नेहमीच्या वस्तू मोजणे, कडब्याचे, पानांचे दशक, शतक, हजार प्रत्यक्ष तयार करणे, भाताची पोती प्रत्यक्ष मोजणे अशा कृतींतून त्यांना गणित शिकवले. झाडाच्या बुंध्याची उंची, झोपड्यांचे कुंपण, मैदान यांचे मोजमाप करायला लावून या मुलांमध्ये त्यांनी गणिताचे गोडी निर्माण केली.

कोसबाडला गरजेप्रमाणे वेगवेगळ्या उपक्रमांची भर पडत गेली. सार्वजिक बारशी, सकस आहाराचे प्रदर्शन आणि प्रशिक्षण वर्ग, मुलींसाठी वाचनालय, शिवण वर्ग असे अनेक उपक्रम सुरू होत गेले. इथे त्यांनी प्रौढ शिक्षण वर्ग, विकासवाडी अध्यापक विद्यालय, प्रायोगिक एक शिक्षकी शाळा, ग्राम बाल सेविका विद्यालय, वैद्यकीय तपासणी केंद्रे, अंगणवाडी कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग सुरु केले. अंगणवाड्या आणि विकासवाड्या सुरू करूनही सगळी मुले शाळेत येत नसत. कित्येक मुले गुरे राखायला जात. या मुलांकरता त्यांनी गुरेचराईच्या रानांमधेच कुरणशाळा सुरू केली. मोकळ्या वातावरणात परिचित वस्तूंच्या माध्यमातून मुले चटचट शिकत असत. प्रशिक्षण वर्गांच्या विद्यार्थ्यांना त्या इथेच पाठ घ्यायला सांगत असत. अनेक मुलांना दिवसा वेळ नसे. त्यांनी अनुताईंना सांगितले की तुम्ही रात्रीची शाळा सुरु केली तर आम्ही येऊ आणि मग 20-25 मुलांना घेउन सुरु झाली रात्रीची स्वयंभू शाळा किंवा किसान शाळा. या शाळेला ना वेळेचे बंधन होते ना वयाचे. गाणी, गोष्टी नंतर त्यांचा तारपा नाच अशा शाळेत मुले रंगून जायची. एके दिवशी आश्चर्य घडले. मुलांनी स्वत:हूनच ‘एकुचा’ धडा मागितला. त्यांच्याकडूनच मागणी आल्यामुळे पुढे वाचन, लेखनाचे पाठ सुरू झाले.

अनुताई वाघ - baimanus

हे सगळे उपक्रम करताना अनुताईंची बालसाहित्याची निर्मिती सुरूच होती – गाणी, गोष्टी, वाचनपाठ इ. हे सगळे उपक्रम करताना स्वत: तयार केलेले साहित्य स्वत:च प्रकाशित करावे या विचाराने कोसबाडला छापखाना सुरू केला. त्यांनी नूतन बालशिक्षण संघातर्फे काढल्या जाणाऱ्या शिक्षणपत्रिका या नियतकालिकामध्ये लेखन, ताराबाईंच्या गुजराती लेखांचे मराठी भाषांतर आणि पुढे संपादनही केले. परिसरातील वस्तू गोळा करून वस्तू संग्रहालय निर्माण करण्यात आले. प्राथमिक शाळेस पूरक म्हणून बाल उद्योगालय सुरू झाले. मुले मजुरीसाठी काम करत व शाळेत येत नसत. तेव्हा त्यांना पैसे मिळावेत या दृष्टीनेही काही प्रयत्न करण्यात आले. शैक्षणिक साधनांच्या निर्मितीसाठी शबरी उद्योगालाय सुरू झाले. हे सगळे करताना अनुताई मुलांच्या जीवनाशी अगदी एकरूप झाल्या होत्या. त्या स्वत:हून त्यांच्या घरी जायच्या. आदिवासी महिलांना माहेरपणाला बोलवायच्या.

कोणताही नवा प्रकल्प आखताना त्याचे स्वरूप लवचिक असेल याची काळजी ताराबाई आणि अनुताई घेत असत. कार्यक्रम सुरू झाल्यावर ज्या अडचणी येत असत त्यानुसार त्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलले जाई. अनुताईंचा अनुभव बघून त्यांना एन. सी. ई. आर. टी., नॅशनल काऊन्सील फॉर चाईल्ड वेल्फेअर यासारख्या संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. बालशिक्षणाशी संबंधीत अनेक परिषदांमध्ये त्यानी भाग घेतला. शिक्षण आणि श्रम यांची सांगड घालणारा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला आणि राबवला. त्यातून शाळागळतीचे प्रमाण शून्यावर आले. त्यांच्या काही योजना महाराष्ट्र शासनाने स्वीकारून त्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्यात आले.

अनुताई वाघ - baimanus

एकावर एक कामे ताराबाई अनुताईंवर टाकत गेल्या आणि अनुताई त्यांचा विश्वास सार्थ ठरवत गेल्या. ताराबाई अनुताई यांच्यातले नाते बहुपेडी होते- गुरुशिष्य, मैत्रीणी, मायलेक असे अनेक पदर त्या नात्याला होते. त्यांच्याच प्रेरणेने दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाले असताना अनुताई वयाच्या एक्कावन्नाव्या वर्षी बी.ए. झाल्या. ताराबाईंनी अनेक भव्य स्वप्ने बघितली आणि त्याला मूर्त स्वरूप देण्याचे काम केले अनुताईंच्या अथक परिश्रमांनी. या उपक्रमांमध्ये साथ देणारे अनेक आदिवासी कार्यकर्ते त्यांनी तयार केले. आयुष्याच्या उत्तरार्धातही त्यांचा नवीन उपक्रम सुरू करण्याचा उत्साह अखंडपणे टिकून होता. रमेश पानसेंसारख्या तरूण मंडळींच्या सहाय्याने त्यांनी 1982 मध्ये म्हणजे वयाच्या बहात्तराव्या वर्षी ग्राम मंगल संस्थेची स्थापना केली.

आजही एखाद्या व्यक्तीला जर दुर्गम ग्रामीण किंवा आदिवासी भागात शैक्षणिक कार्य करायचे असेल तर तिच्याकरता ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हे पुस्तक हे दीपगृहासारखे मार्गदर्शक ठरू शकते.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here