‘मिसळ झाली मुंबई रं दादा’ असं शाहीर आत्माराम पाटील त्यावेळी का म्हणाले?

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेचा हुंकार होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही एकमेव अशी चळवळ आहे जिथे सारे पक्ष एकत्र येऊन आपले मतभेद विसरून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकजुटीने लढले. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात विचारवंतांबरोबर शाहीरही सहभागी झाले होते. किंबहुना सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सामावून घेण्याचं महत्त्वाचं कार्य शाहिरांच्या पोवाड्यांनी केलं. अशा या शाहिरांच्या पंक्तीतीतल एक मोठे शाहीर म्हणजे शाहीर आत्माराम पाटील… आजपासून (9 नोव्हेंबर शाहीर आत्माराम पाटील यांची जन्मशताब्दी सुरू होतेय, त्यानिमित्ताने…

  • मिलिंद केशव

मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी अस्मिता… याच प्रश्नांवर महाराष्ट्रातल्या भूमिपुत्र पेटून उठला होता. जीवाचा कोट करून लढला होता. 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तेव्हा कुठे स्वतंत्र महाराष्ट्राचा मंगलकलश या भूमीत आला. पण आज इतक्या वर्षांनी तेच प्रश्न फडा काढून उभे राहिले आहेत. मराठी भाषा टिकेल काय? मराठी माणूस राहिल काय? मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव पुन्हा तर खेळला जाणार नाही ?…

शाहिर आत्माराम पाटील हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक नाव. मराठी माणूस हा शाहिरांच्या आस्थेचा विषय. काय वाटतं त्यांना या प्रश्नांविषयी? का आजही पणाला लावावा लागतोय मराठीपणा ?.

मराठी भाषेत झालीया मिसळ
कर्ता कर्म सारं इंग्रजी दिसंल
क्रियापदापुरती मराठी असंल
इस्टॉप-बंद बेटा पब्लिक हसंल
हसंल तो सूं थयुं ?
धिस इस ए बॉम्बे
सब मिक्चर बन गयी
मिसळ झाली मुंबई रं दादा मिसळ झाली मुंबई’

असं त्यांनी 1966 मध्येच लिहून ठेवलंय. आजही त्यात काही बदल झाल्याचं दिसत नाही. किंबहुना ही मिसळ वाढतच चालली आहे. मुंबईत फिरताना मराठीचं अस्तित्व कमी होत चालल्याचं जाणवतं. सारे हिंदी वा इंग्रजीतच बोलताना दिसतात. मुंबईतून मराठी संपली की काय, अशी शंका येते. पण ती शंका आज नव्हे, तर तेव्हाही त्यांना येत होती. केवळ भाषेबद्दलच नव्हे, तर येणाऱ्या लोंढ्यांविषयीही त्यांनी 1959 मध्ये ‘लाखाची बात’ नावाची लावणी लिहून चिंता व्यक्त केली होती. पुढे पुन्हा 1965 मध्ये त्यांनी ‘उपऱ्यांनी येथं केली सारी मिरासदारी’ नावाचं गीत लिहिलं. त्यात ते म्हणतात :

ह्या मुंबईत अमुच्या झालो आम्ही भिकारी उप-यांनी येथ केली सारी मिरासदारी ।।

सवतासुभा अम्हाला गिरणीत मावळ्यांना बगळे धनिक देती शिरकाव कावळ्यांना भरतीत गुप्त चाले स्वार्थी हरामखोरी ।।

भूगोल हा मराठी, इतिहासही मराठी घडवीत मुंबईला श्रमले इथे मराठी आली सुगी भरात टोळांची धाड आली ।।

घरचे धनी जहालो अपुल्या घरी हमाल घुसले भणंग त्यांनी बळकावला महाल आम्ही कमाई केली चोरा दिली तिजोरी ह्या मुंबईत अमुच्या झालो आम्ही भिकारी ।।

हे सारं लिहिलं आहे शाहीर आत्माराम पाटील यांनी. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर, शाहीर अमर शेख, शाहीर नानिवडेकर यांच्या काळात शाहीर आत्माराम पाटील हे नाव झळाळत होतं, ते त्यांच्या शाहिरी लिखाणाने. स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन असो की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन असो की चीन वा पाकिस्तानबरोबरचं युद्ध प्रत्येक विषयावर शाहीर आत्माराम पाटील यांनी पोवाडे, लावण्या, समरगीतं, समूहगीतं, स्मरणगीतं अशा स्वरूपाचं विपुल लिखाण केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्याविषयीची जशी त्यांची गीतं आहेत, तशीच इंदिरा गांधी यांच्याविषयीही आणि त्यांच्या आणीबाणीतल्या 20 कलमी कार्यक्रमाविषयीही. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तर शाहिरी ऐन भरात होती. शाहिरी कलापथकांचे कार्यक्रम शहरांपासून खेड्यांपर्यंत सर्वत्र व्हायचे. राजकीय, सामाजिक प्रश्नांवरची गीतं, प्रहसनं, विडंबनं ही मंडळी सादर करायची. या सर्व शाहिरांमध्ये आत्माराम पाटील यांचं लिखाण भलतंच धारदार आणि ओजस्वी असायचं. आताच्या पिढीला ना हे शाहीर माहीत आहेत ना त्यांचं लिखाण. कलापथकंही कमी होत गेली आणि असलेल्या कलापथकांचे कार्यक्रमही हल्ली फार होत नाही.

शाहिरांसोबत झालेली भेट…

डिलाईल रोड म्हणजे आताचा ना. म. जोशी मार्ग. परळ रेल्वे वर्कशॉपच्या दरवाजासमोर एक हनुमानाचं आणि साईबाबांचं मंदिर आहे. तिथल्या कवळी कंपाऊंडमधल्या एकमजली चाळीत पहिल्या मजल्यावरच्या पहिल्याच घरात शाहीर आत्माराम पाटील राहायचे. ही चाळ दीडशे वर्षं जुनी आहे. तिथे पन्नासेक वर्षांपूर्वी त्यांनी हे घर 800 रुपयांना घेतलं होतं. आणीबाणीच्या काळात वसंतदादा पाटील यांनी शाहीर आत्माराम पाटील यांना 20 कलमी कार्यक्रमावर आधारित गीतं लिहायला सांगितली. दादा स्वत: शाहिरांच्या घरी आले, तेव्हा तिथे वीजही नव्हती. दादांनी ते चित्र पाहून तुम्हाला घर देतो, असं त्यांना सांगितलं. इंदिरा गांधींच्या पुरोगामी धोरणांवर शाहीर खुश होते. त्यामुळे त्यांनी पोवाडा लिहून दिला खरा, पण सरकारकडून घर वा कोणतीच मदत घ्यायला नकार दिला.

शाहिरांसोबत झालेली भेट आजही मला आठवते… त्याच कवळी कंपाऊंडमधल्या छोट्याशा घरात संध्याकाळी शाहीर आत्माराम पाटील शिवरायांचं चरित्र वाचत बसले होते. ते टीव्ही फारसा पाहत नाहीत. टीव्हीवर फारतर बातम्या पाहतात. सिनेमा, नाटकंही नाही, मग सीरिअल्स तर सोडूनच द्या. वि. वा. शिरवाडकरांची नाटकं पाहिली असल्याचं त्यांना आठवतं. अनेक जण लेखक असतात, कवी असतात. पण आत्माराम पाटील यांच्यात शाहिरीची प्रेरणा कशी आली, हा प्रश्न मनाशी असतो.

ते सांगू लागतात : आमचं गाव सफाळ्याच्या जवळ. जन्म 1924 चा. लहान होतो, तेव्हा स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन सुरू होतं. प्रभातफेऱ्या निघायच्या. प्रभातफेरी, स्वातंत्र्य हे फारसं काही कळायचं नाही. पण त्यात जायचो. त्यातून काही गोष्टी कळायला लागल्या. पारतंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्य कशासाठी हे कळू लागलं. शिक्षण पूर्ण झालं फायनलपर्यंत, म्हणजे आताची सातवी इयत्ता. चळवळ चालूच होती. पुढे 1945 च्या सुमारास पोटापाण्यासाठी मुंबईला यायचं ठरवलं. मी आणि राजा पाटील (म्हणजे राजा-राणी ट्रॅव्हल्सचे) साधारण एकाच काळात आलो. इथे घर नव्हतं. कॅडल रोडला बहिणीकडे राहायचो आणि महालक्ष्मीच्या पुलाखालच्या ओरिएंटल मेटल प्रोसेसिंग र्वक्समध्ये कामाला लागलो. ही कंपनी दादोबा ठाकूर यांची. दादोबा म्हणजे काँग्रेसच्या माजी आमदार शरयू ठाकूर यांचे सासरे. आमच्या गावातल्या विहिरींना वर्षाचे बारा महिने पाणी असायचं. त्यामुळे शेजारच्या दातिवरे गावातले शेतकरी आमच्या गावी येऊन वांगी पिकवायचे आणि मुंबईला पाठवायचे. गावी असताना व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना येणाऱ्या गुजरातीत लिहिलेल्या पट्ट्या (हिशेबाच्या पावत्या) मी वाचून दाखवायचो.

मग मुंबईत नोकरी करताना आपणही मुंबईत भाजी आणून का विकू नये , असा मनात विचार आला. गावातल्या शेतकऱ्यांनी त्यासाठी खूप मदत केली. रघू गोविंद चौधरी आणि काही शेतकरी होते. गावातला मुलगा काही करतोय , हे पाहून त्यांनी पैशाचा विचार न करता भाजी पाठवायला सुरुवात केली. ती भाजी विरारला यायची. ती मी दादरला आणायचो. तिथल्या मंडईत (आताची सावरकर मंडई) एक गाळा भाड्याने घेतला. तिथे वांगी विकायचो, तसंच भुलेश्वर व इतर ठिकाणच्या व्यापा-यांकडे ती पाठवायचो. हळूहळू व्यापार वाढवायचं ठरवलं. मग गुजराथच्या अन्य शहरांतूनही भाजी येऊ लागली. पुढे भायखळा माकेर्टमध्येही स्वत:चा गाळा विकत घेतला. आजही आहे तो. नातेवाईक पाहतात तो व्यवसाय. भाज्या विकणारा हा व्यापारी. तो शाहीर कसा बनला, हा प्रश्न तर अधिकच जाणवू लागला.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ… | 😍 स्वप्नांच्या दुनियेत 😍

मग त्यांनीच सांगायला सुरुवात केली : लिखाणाची आवड तर होतीच. शिवाय गावात असताना जागरूक झालेल्या राजकीय आणि सामाजिक जाणिवाही कायम होत्या. भाजी विकून झाल्यावर इतर व्यापाऱ्यांकडून पट्ट्या गोळा करण्यासाठीही फिरावं लागायचं. तेव्हा मी पायजमा, झब्बा आणि त्यावर व्यापाऱ्यांप्रमाणे कोट घालायचो. कोटाच्या एका खिशात हिशेब, त्याच्या पट्ट्या वगैरे असायचं आणि दुसऱ्या खिशात छोटी डायरी. काम आटोपलं की मी राणीच्या बागेत जाऊन बसायचो आणि तिथे पोवाडे, गाणी वगैरे लिहायचो. ही गाणी व्यापारी , भांडवलदार यांच्या विरोधात असायची. हे माझ्यासोबतच्या व्यापाऱ्यांना कळलं , तर अडचणीत येऊ, या विचाराने मी आधी ‘ धरतीनंदन ‘ या नावाने लिहिलं. त्यांची ही व्यापाराची गाडी आपोआपच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाकडे आली. त्या काळात त्यांनी एक गोंधळ लिहिला… ‘

… आणि या पोवाड्यामुळे शाहीर प्रकाशझोतात आले

संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा,
खुशाल कोंबडं झाकून धरा द्विभाषिकाचा दुतोंडी कावा
उडतोय माझा डोळा डावा
साडेतीन कोट सिंहाचा छावा
पकडाय मांडलाय पिंजरा नवा
वळीखलाय आम्ही जवाच्या तवा
शाहिरी साद गेली गावोगावा बेल्हारी,
बेळगाव, पंढरी पारगाव, बोरी उंबरगाव,
राहुरी जळगाव, सिन्नरी ठाणगाव, परभणी नांदगाव, व-हाडी वडगाव, सिरोचा-बरतार-भंडारा-चांदा, सातारा सांगली कारवार डांग अन् मुंबई माऊली जागृत केलाय दख्खन पुरा खुशाल कोंबडं झाकून धरा’

गोंधळ त्या काळात भलताच गाजला. पहिल्यांदा शाहीर आत्माराम पाटील यांनी शिवाजी पार्कवरच्या सभेत हा गोंधळ सादर केला. त्यानंतर शाहीर सिकंदर शेख यांनी आपल्या पल्लेदार आवाजात तो ठिकठिकाणी गाऊन लोकप्रिय केला आणि मग जवळपास सर्व कलापथकांनी गावागावांमध्ये हा गोंधळ सादर करून लोकजागृती केली. संयुक्त महाराष्ट्रासाठी एवढं मोठं आंदोलन झालं. 105 हुतात्मे झाले. शाहिरांचाही आंदोलनात मोठा सहभाग होता. त्या संदर्भात त्यांना काँग्रेसच्या भूमिकेविषयी विचारता त्यांनी काँग्रेस आता त्या तोलामोलाचा पक्ष राहिला नाही, ही खंत बोलून दाखवली. संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला , असं म्हणतात. पण ते खरं नाही. त्यांनी कसला कलश आणला ? संयुक्त महाराष्ट्र झाला तो 105 हुतात्म्यांमुळे. त्यांना खरंतर 105 संवत्सर म्हणायला हवं… ते बोलत होते.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही मागणी होती. पण आता मुंबई केंदशासित प्रदेश करण्याची चर्चा चालली आहे. मुंबईचं शांघाय करण्याचं घाटतंय. मुंबई हे आता कॉस्मोपोलिटन शहर बनलं आहे. महाराष्ट्राच्या या राजधानीमध्ये मराठी बोलणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. इथला मराठी माणूस मुंबईबाहेर चालला आहे. त्या जागी परप्रांतीय येत आहेत. शाहीर आत्माराम पाटील यांच्या 1965 मधल्या भाषेतच बोलायचं , तर इथे अमराठी लोकांचे लोंढे येत आहेत. संयुक्त महाराष्ट्र झाला, मग या शाहिराचं संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झालं, असं त्याला वाटतं का? असे अनेक सवाल डोक्यात होते. पण शाहिरांची प्रत्येक प्रश्नाची उत्तरं स्पष्ट होती. एकूणच त्यांची भूमिका स्पष्ट होती. कुठेही मनात गोंधळ नव्हता: आधी भाषावार प्रांतरचनेनुसार अकरा राज्यं झाली होती. केवळ महाराष्ट्राचं घोडं अडवून ठेवलं होतं. पण आंदोलनामुळे संयुक्त महाराष्ट्र झालाच. पण तो स्थापन व्हायला 1960 उजाडलं.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” : प्रत्येक नागरिकाने वाचावीच अशी  महाराष्ट्राची जन्मकथा – InMarathi

आता मुंबई कधीच महाराष्ट्रापासून तुटणार नाही. कारण मुंबई म्हणजे भुलेश्वरची महाअंबाबाई. ती या बेटावरची. तिचं आणि महाराष्ट्राचं नातं अतूट आहे. संबंध थेट आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची माती एक आहे. ती तोडण्याचा प्रयत्न तेव्हाच हाणून पाडण्यात आला. त्यामुळे आता तसा प्रयत्न कोणी करणार नाही आणि कोणी तशी हिंमत वा विचार केलाच, तरी तो यशस्वी होणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस तो यशस्वी होऊ देणार नाही. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती महाराष्ट्रात ठेवण्यासाठी, टिकवण्यासाठी केवळ मुंबईतलाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस उठून उभा राहील. तो मुंबईला कधीच वेगळं होऊ देणार नाही.

मुंबईत मराठी टक्का कमी होत चालला आहे. अमराठी लोकांची संख्या वाढत चाली आहे. परप्रांतीयांचं प्रमाण साठ टक्क्यांच्या वर गेलं आहे. मराठी भाषा बोलणाऱ्यांचं प्रमाण कमी होत चाललं आहे. मराठी माणसंही आता एकमेकांशी मराठीऐवजी हिंदीतूनच बोलताना दिसतात. मराठी बोलायची मराठी माणसालाच लाज वाटते की काय, अशी शंका येऊ लागली आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणून मराठी संस्कृतीही टिकेल की नाही, अशी भीती बोलली जात आहे. मराठी अस्मिताच जर टिकली नाही, तर हे सारं कसं शिल्लक राहील ? शिवाय मराठी माणसाची लढाऊ वृत्ती कमी होत चालली आहे, तो आता पूवीर्सारखा चिडून उठत नाही… असे अनेक प्रश्न मनात येत होते.

शाहीर आत्माराम पाटील यांच्याकडे या प्रश्नाची उत्तरं आहेत का, ती काय असतील..? आत्माराम पाटील यांची या प्रश्नांवरची उत्तरंही स्पष्ट होती. त्यांच्या मनात अशी कोणतीच भीती नव्हती. त्यांना मराठी भाषा, संस्कृती, अस्मिता या साऱ्यांविषयी आत्मविश्वास होता. मुंबईतून मराठी संपणार नाही. आता राजकीय नेतेच आपल्या मुलांना इंग्रजी शाळांत घालायला लागले आहेत, शिक्षणासाठी परदेशांत पाठवायला लागले आहेत. तेच काय मध्यमवगीर्य आणि गरीब मंडळीही मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालतात. स्पर्धेच्या युगामध्ये हे सारं होणारच. ते थांबवता येणार नाही. पण त्यामुळे मराठी मरणार नाही. अन्य राज्यांमधले लोकही मुलांना इंग्रजी शाळांत पाठवतातच की. पण ते आपली भाषा टिकवतात. ती विसरत नाहीत. तेवढं आपणही केलं तरी पुरेसं आहे. शिवाय राज्याचा कारभार मराठीतून चालला की मग लोकांना ती बोलावीच लागते. आता अनेक अमराठी लोकही या राज्याची भाषा शिकू लागले आहेत. महाराष्ट्रातले लोक जोपर्यंत आपली भाषा बोलत आहेत, तोपर्यंत मुंबईतही मराठी राहणारच… ते सांगत होते.

पण मराठी माणसाची लढाऊ वृत्तीच कमी होत चालली आहे ? या प्रश्नावर ते सांगतात. मराठी माणूस सहनशील आहे. याचा अर्थ तो लेचापेचा नाही. त्यात लढाऊ वृत्ती जन्मत:च येते. जेव्हा कोणी हल्ल्याची भाषा करतो , तेव्हा तो तुटून उठतो. मग ते एक रूपक सांगू लागतात:

घरात तीन भाकऱ्या होत्या.

नवरा म्हणाला : तू एक खा, मी दोन भाकऱ्या खाईन.

बायको उत्तरली, मी दिवसभर घरात काम करत होते. मला खूप भूक लागली आहे. त्यामुळे तुम्ही एक भाकरी खा, मी दोन भाकऱ्या खाणार.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ… | 😍 स्वप्नांच्या दुनियेत 😍

दोघांत भांडण सुरू होतं. शेवटी असं ठरतं की दोघांनी आता झोपायचं. दोघांपैकी जे कोणी लवकर उठेल, त्याला एक भाकरी, दुसऱ्याला दोन भाकऱ्या. पोटात कावळे कोकलत असूनही दोघं झोपले. दोघांनाही झोप लागत नव्हती. पण आपण आधी उठलो, तर आपल्याला एकच भाकरी मिळेल, या भीतीने कोणीच उठत नव्हतं. रात्र संपली, दिवस उजाडला, दुपार झाली, संध्याकाळ होऊ लागली. शेजारचे लोक घाबरले. ते घरात शिरले. हाका मारू लागते. पण तरीही हे उठेनात. शेवटी ते मेले असावेत, असं समजून त्यांनी तिरडी बांधली. एकाच तिरडीवरून दोघांना न्यायचं ठरवलं. नेणारेही तिघंच होते. दोन जण पुढे आणि एक मागे. तिरडी स्मशानात नेली. लाकडं रचली. त्यावर हे देह ठेवले. लाकडं पेटवली. त्याची धग लागताच नवरा ओरडला : अगं , उठ. तू दोन खा, मी एक खातो. हे एकताच आपल्या तिघांना ही दोन भूतं खातील, असं वाटून तिघं पळत सुटले.

तात्पर्य काय, तर मराठी माणूस लवकर पेटून उठत नाही आणि पेटला तर कोणाला ऐकत नाही.

हे रूपक खरंच चांगलं होतं. पण तसं खरंच घडू शकतं? शाहिरांना ती खात्री आहे. शाहिरांचा काँग्रेसशी संबंध, कम्युनिस्टांशी संबंध, समाजवाद्यांशी संबंध. हे असं कसं?

ते म्हणतात : काँग्रेससाठी मी अनेक गाणी लिहिली, मनापासून. त्यांचे जे काही चांगले कार्यक्रम होते, त्याच्या प्रचारासाठी ती होती. पण मी त्यांचा सदस्य झालो नाही. शिवाय आताची काँग्रेस त्या तोलामोलाची राहिलेली नाही. कम्युनिस्टांशी संबंध आला संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे. पण त्यांचं सारं लक्ष सोविएट युनियनकडे असायचं. ते मला मान्य नव्हतं. समाजवादी मंडळी समाजाचा कायम विचार करत, पण प्रत्यक्षात ते समाजापासून तुटलेले असत. मला ते आवडत नसे. मराठीच्या प्रश्नावर शिवसेना सतत लढत आली आहे. त्याविषयी शाहिरांना काय वाटतं? उत्तर भारतीयांच्या विरोधातल्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविषयी काय वाटतं? ते या प्रश्नांवर बोलायला उत्सुक दिसले नाहीत. या मंडळींची दृष्टी व्यापक नाही, एवढंच त्यांनी बोलून दाखवलं. इथले बौद्ध मराठी आहेत, अनेक ख्रिश्चन आणि मुस्लिमही मराठी आहेत. धर्मांतरामुळे त्यांची भाषा बदललेली नाही. पण या वेगळ्या धर्मातल्या मराठी माणसांसाठी हे कोणीच लढले नाहीत वा लढत नाहीत, असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. म्हणजे हा शाहीर खरोखर जाति-धर्म आणि पक्षनिरपेक्ष माणूस आहे तर! त्यांचा सानेगुरुजींशी संबंध आला होता. राज्यातल्या सर्व राजकीय नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. एसेम, डांगे, अत्रे, वसंतदादा… किती तरी नावं. पण त्यांनी स्वत:ला कोणत्याही पक्षाला बांधून घेतलं नाही. जात आणि धर्माविषयीची त्यांची मतं स्पष्ट व परखड. त्यांनी जातींची उतरंड, अस्पृश्यता, वेगळ्या पंगती या साऱ्याच्या निमित्ताने ज्ञातिविसर्जनाची लावणीही लिहिली आहे.

‘एका धरतीच्या पोटी। नाना प्राणी जन्म घेती। त्यात माणसावाणी खोटी। जात मिळायची न्हाय।

बाप आभाळ आई धरती। एका रक्ताची कारटी । पण जातिभेद कोटी। नोंद मिळायची न्हाय।

धर्मासाठी जो तो मेला। येशू , रसुलल्ला। आम्ही करतो हल्लागुल्ला। त्यांच्या नावांवरती….’

असं करत या लावणीमध्ये शंभरावर जातींची नावं येतात. हे सारं कुठून आलं ? ते सानेगुरुजींचा प्रभाव मान्य करतात. शाहिरी परंपरा संपली असं अनेकांना वाटतं. या बड्या शाहिराला काय वाटतं, हे समजून घेणं आवश्यकच असतं.

ते म्हणतात : शाहिरी परंपरा संपलेली नाही. जेव्हा मोठं वादळ येतं, जेव्हा हल्ला होतो, जेव्हा युद्धं होतात, आक्रमणं होतात, तेव्हा शाहिरीला बहर येतो. आत्तापर्यंत अशाच काळात शाहिरीने समाजाला साथ दिली आहे, मार्गदर्शन केलं आहे, लढण्याचं रस्त्यावर येण्याचं आवाहन केलं आहे. जेव्हा सारं शांत असतं, तेव्हा शाहीर आणि त्याची शाहिरीही शांत असते. त्या काळात फारतर लोकगीतं जन्माला येतात. मग त्यांना अचानक त्यांचं एक गाणं आठवतं… रानात रान बाई डांगाचं लांब बांब डांगरी रांगांचं उंच उंच टिगो-या सागांचं गं रहाणं मराठी वाघाचं. हे गाणं तर महाराष्ट्रातल्या सर्व मराठी शाळांमध्ये गायलं गेलं असेल. त्यावर नृत्यं झाली असतील. या शाहीर आत्माराम पाटील यांनी पोवाडे, लोकगीतं, अभंग, समरगीतं, लावण्या, प्रहसनं, विडंबनं, आरती या साऱ्या प्रकारांचा वापर लोकजागृतीसाठी केला.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here