AISF काय आहे?

'ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF)' ही भारतातील सर्वात जुनी अन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान असलेली विद्यार्थी संघटना आहे. AISF ची स्थापना १२ ऑगस्ट १९३६ रोजी लखनऊच्या 'गंगा प्रसाद मेमोरियल हॉल' मध्ये झाली

  • ॲड. शीतल श्यामराव चव्हाण

भारताचाच नाही तर जगाचा इतिहास हा तरुणांच्या त्याग, बलिदान अन संघर्षाने भरलेला आहे. जगातले सर्वाधिक महत्वपूर्ण बदल हे तरुणांच्या जिद्दी, लढाऊ वृत्तीमुळे घडून आले आहेत. भारताला तर विद्यार्थी व युवकांच्या लढायांचा प्रेरणादायी इतिहास आहे. विसाव्या शतकात स्थापन झालेल्या ‘ऑल इंडिया स्टुडेंट्स फेडरेशन (AISF)’ चे या संघर्षमय इतिहासात महत्वाचे स्थान आहे.

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF)’ ही भारतातील सर्वात जुनी अन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान असलेली विद्यार्थी संघटना आहे. AISF ची स्थापना १२ ऑगस्ट १९३६ रोजी लखनऊच्या ‘गंगा प्रसाद मेमोरियल हॉल‘ मध्ये झाली. AISF च्या निर्मितीआधीच भारतात विद्यार्थी जगत जागृत होवून संघटीत होवू लागले होते. इंग्रजांच्या भारतात येण्याने दळणवळण, संभाषणाची साधनं यांचा विकास झाला. इंग्रजांना त्यांची इथली वसाहत सुरळीत चालवण्यासाठी हे सगळं आवश्यक होतं. शिवाय त्यांना इथली यंत्रणा चालवण्यासाठी कामगार, कारकून हवे होते. या गरजेतून का होईना पण भारतीयांमध्ये एकोणिसाव्या शतकात शिक्षणाचे प्रमाण प्रचंड वाढले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अन शिक्षणाच्या वाढत्या प्रमाणामूळे नव्याने शिक्षित झालेली, शिकत असलेली तरुण मंडळी आपल्या अवतीभोवतीच्या घटनांचा अभ्यास करु लागली, त्याकडे गांभिर्याने अन प्रागतिक विचाराने बघू लागली. सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांमधून विज्ञानवादी, कर्मठ परंपरा अन अंध समजूतीला विरोध करण्याची प्रवृत्ती बळावू लागली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच साधारणत: 1828 साली कलकत्ता येथे ‘ॲकॅडेमीक असोसिएशन‘ची स्थापना झाली. या असोसिएशन मार्फत विद्यार्थी एकत्र येवून विविध विचारांवर चर्चा करु लागले. नवे बदल स्विकारुन जुन्या, घातक प्रथा, परंपरा नाकारु लागले. यातून विद्यार्थी संघटीत व्हायला, विद्यार्थ्यांच्या सामाजिक अभिव्यक्तीला प्रेरणा मिळण्यास मदत झाली. मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजातसुद्धा ‘स्टुडंट्स लिटररी ॲंड सायंटिफिक सोसायटीची‘ स्थापना झाली. दादाभाई नौरोजी यांनी या स्थापनेत पुढाकार घेतला. पुढे देशभर विविध ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अनेक संघटना स्थापन झाल्या. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नावर आंदोलने तर होवूच लागली याशिवाय विद्यार्थी वर्तुळात इंग्रजविरोधी वातावरण निर्माण होवून विद्यार्थी चळवळी राजकीय विषयांवर व्यक्त होवू लागल्या.

1917 ला रशियात ‘लाल क्रांती‘ झाली अन जगभरातले तरुण शास्त्रीय समाजवादाच्या विचाराने भारावून गेले. रशियाचा नेता ‘लेनिन‘ हा तत्कालिन तरुणांचा ‘हिरो‘ झाला. भारतातल्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांनाही मार्क्सवादाचे प्रचंड आकर्षण वाटू लागले. भारतातल्या विविध भागातल्या विद्यार्थी संघटनांनी एकत्र येवून देशपातळीवर एकच बळकट विद्यार्थी संघटन उभे करण्याच्या हेतून देशभरातील विद्यार्थ्यांचे ‘कॉन्फरंस‘ आयोजित केले. या कार्यक्रमाला पंडीत जवाहरलाल नेहरु हजर होते तर देशातील दिग्गज नेते महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, मोहम्मद अली जीना आदींच्या सदिच्छा होत्या. लागलीच विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेची घोषणा होवून संघटनेस ‘ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF)’ हे नाव देण्यात आले.

AISF ने स्थापनेपासूनच लोकशाही पद्धती स्विकारली. 1936 पासून AISF ची देशाभरातल्या विविध ठिकाणी अधिवेशने होतात अन संघटनेचा कृतीकार्यक्रम आखला जातो. आपले स्वतंत्र संविधान (Constitution) असणारे AISF हे देशातील पहिले विद्यार्थी संघटन आहे. सुरुवातीच्या काळात ‘स्वातंत्र्य, शांतता आणि प्रगती‘ हे AISF चे ब्रीद होते. भारताच्या स्वातंत्रलढ्यात AISF ने महत्वपूर्ण भुमिका बजावली. इंग्रजांच्या युद्धखोर अन साम्राज्यशाही धोरणाविरुद्ध AISF ने वेळोवेळी आवाज उठवला. 1942 च्या ‘चले जाव‘ आंदोलनात AISF उतरली. हेमू कलानी या AISF च्या नेत्याला इंग्रजांनी अटक केली आणि 1943 साली वयाच्या 19 व्या वर्षी हेमू देशासाठी शहीद झाला. गोव्याच्या मुक्तीपर्यंत AISF सक्रियपणे स्वातंत्र्य आंदोलनात आघाडीवर राहिली.

स्वातंत्र्यानंतर आपले ब्रीदवाक्य बदलवून AISF ने ‘शिक्षण आणि संघर्ष‘ हा नारा दिला. देशातल्या सर्व विद्यार्थ्यांना ‘के.जी‘ ते ‘पी.जी.‘ पर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे, शिक्षणाचे खाजगीकरण थांबावे यासाठी AISF ने अनेक आंदोलने केली. भारताच्या सर्व शैक्षणिक सुधारणांचा पाया समजला जाणाऱ्या कोठारी आयोगाच्या अहवालनिर्मितीत AISF ने महत्वाचे योगदान दिले. शिक्षण घेतल्यानंतर तरुणांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे नोकरीची हमी शासनाने दिली पाहिजे ही मागणी AISF ने लावून धरली. त्यासाठी ‘Bhagatsingh National Employment Guarantee Act‘ पास करावा अशी मागणी लावून धरली. शिक्षणाचे खाजगीकरण, कॅपिटेशन, डोनेशन इत्यादी पद्धतीविरुद्ध AISF ने अभूतपूर्व लढे उभारले.

विद्यार्थ्यांच्या न्याय्य-हक्कांच्या लढ्यांव्यतिरिक्त AISF ने ‘लोकशाही, समाजवाद अन धर्मनिरपेक्षता‘ या संविधानातील मूलभूत तत्वांना आधारभूत मानून विद्यार्थ्यांमध्ये जागृतीपर अनेक अभियान चालविले. साहित्य, अभिनय, नाट्य, गीत, भाषणे, सभा अशा अनेक माध्यमांचा प्रभावी वापर करुन AISF ने ‘स्वातंत्र्य, समता अन बंधूतेची‘ शिकवण भारतीय विद्यार्थ्यांमध्ये रुजवली. दिल्लीपासून गल्लीपर्यंत AISF ने विद्यार्थ्यांमधून एक जागरुक नागरीक तयार व्हावा अन सर्वप्रकारच्या विषमतेचा खात्मा व्हावा यासाठी प्रयत्न केले.

इतिहासातील घटनांचा अन महापुरुषांच्या विचारांचा विपर्यास करुन तरुणांमध्ये जातीय, धार्मिक तेढ वाढवणाऱ्या प्रवृत्तींविरोधात AISF कायम खंबीरपणे उभी आहे. वर्णभेद, लिंगभेद अन वर्गभेद अशा तिन्ही पातळ्यांवर AISF चा प्रदिर्घ संघर्ष राहिला आहे. देश स्वतंत्र झाला पण भांडवलदार, उद्योगपतींचे हस्तक झालेल्या राज्यकर्त्यांनी शिक्षणाचा धंदा केला, जनतेत जातीय-धार्मिक द्वेषाचे वातावरण पसरवून मूळ मुद्यावरुन लक्ष हटवले. बेरोजगारी, महागाई सारख्या समस्यांनी जनता होरपळून निघाली. अशा परिस्थितीत सर्व स्तरावरील विषमता नाकारत कष्टकऱ्यांच्या मुलांच्या न्याय्य-हक्कांसाठी AISF स्थापनेपासून ते आजपर्यंत लढत राहिली आहे.

हमे चाहिये आझादी‘ ही अलिकडच्या काळातील AISF ची घोषणा तरुणांचा प्राण झाली. या घोषणेने देशभर कष्टकऱ्यांच्या जगात सकारात्मक वातावरण अन उर्जा संचारली. कन्हैय्या कुमार हा AISF चा नेता देशभरातील तरुणांचा विषमताविरोधी लढाईतला आदर्श झाला. ‘ये आझादी झुटी है, देश की जनता भुखी है‘ या लोकशाहीर, साहित्यरत्न कॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या घोषणेला कायम करत आम्हाला भारतापासून नव्हे तर भारतातच सर्व प्रकारच्या शोषणापासून ‘आझादी‘ पाहिजे असे सांगत नव्या पर्वाला AISF ने सुरुवात केली आहे.

आपल्या जगण्याशी संबंधित सगळे प्रश्न राजकीय प्रक्रियेतूनच ठरवले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांनी राजकारणापासून दुर रहावे असे सांगणे ही विद्यार्थ्यांची दिशाभूल आहे. शिक्षण घेत-घेत राजकारण समजून घेणे अन त्यात सक्रीय हस्तक्षेप करीत शोषणाला पायबंद घालणे हे AISF चे ध्येय आहे. या ध्येयाशी प्रामाणिक राहून AISF ची ८५ वर्षांची प्रदिर्घ वाटचाल चालू आहे. याच विचाराने प्रभावित अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संघटनांशीही AISF समन्वय साधून आहे आणि “चाहे लाख तुफान आये, रहेंगे एक सब जहाँ के नौजवान” या ब्रिदाला जागत आशावाद बाळगून आहे.

——————————-

संपर्क : 9921657346

——————————-

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here