स्त्री ही पुरुषांची मालमत्ता आहे का?

स्त्री ही पुरुषांची मालमत्ता आहे ही मानसिकता जुनी आहे. त्याला ऐतिहासिक कारणं आहेत. सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय-आर्थिक-लैंगिक असे कित्येक पदर याला आहेत. त्यांतून स्त्रीची स्वतंत्र व्यक्ती म्हणून असलेली ओळख नष्ट होत आहे.

  • प्रतिक पुरी

मातृसत्ताक पद्धती संपत असतानाच स्त्रीचं वैयक्तिक आणि सामाजिक स्थान व महत्त्वही धोक्यात येण्याची प्रक्रिया सुरू झाली. स्त्रीची व्यक्ति म्हणून असलेली ओळख संपली आणि तिच्या वस्तूकरणाला सुरूवात झाली. एखाद्या वस्तूची किंमत जशी त्याच्या उपयोगावरून, बाह्य स्वरुपावरून, त्याच्या टिकावूपणावरून ठरवली जाते त्याचप्रमाणे स्त्रीचं मूल्यमापण करण्यात येऊ लागलं. जास्त मुलांना जन्म देणारी स्त्री बहुप्रसवा माता म्हणून गौरवली जाऊ लागली. घरकामात व शेतकामात वाकबगार असणाऱ्या स्त्रियांना गुलाम व दासी म्हणून मागणी वाढली. तर सुंदर स्त्रिया या राजकीय, सामाजिक संघर्षाच्या केंद्रस्थानी आल्या. एकंदरीत पाहता त्यांचं व्यक्ति म्हणून असलेलं स्थान धोक्यात आलं आणि वस्तू म्हणूनच त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन पुरुषांनी अवलंबला. स्त्री ही पुरुषांची मालमत्ता होण्यास या गोष्टी कारणीभूत ठरल्या.

पुरुषांचे मानापमान, त्याचं राजकीय व सामाजिक वर्चस्व, त्याचं वैयक्तिक पौरूषत्व या सर्व गोष्टींचं मूल्यमापण करण्याचं माप स्त्री ठरली. ज्याच्याकडे जास्त स्त्रिया, तो जास्त बलवान ठरला. त्यांतूनच आपल्या शत्रूची नाचक्की करायची असेल तर त्याच्या स्त्रिया पळवायच्या किंवा त्यांच्यावर बलात्कार करायचे हे प्रकारही सुरू झाले. जो आपल्या स्त्रियांचं रक्षण करू शकत नाही तो नपुंसक पुरुष ठरला गेला. रामायण हे या मानसिकतेचं उत्तम उदाहरण आहे. शूर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रावणानं सीताहरण केलं. एका स्त्रीचा सन्मान राखण्यासाठी त्यानं दुसऱ्या स्त्रीचा सन्मान धोक्यात टाकला. रामानंही सीतेसाठी नाहीतर आपलं पुरुषत्त्व सिद्ध करण्यासाठी रावणाशी युद्ध केलं. महाभारतातही द्युत खेळले ते कौरव-पांडव आणि त्याची शिक्षा मात्र द्रौपदीला भोगावी लागील. सीतेमुळे रामायण घडलं आणि द्रौपदीमुळे महाभारत घडलं असं म्हणत या दोन्ही युद्धांची जबाबदारी लोक यांच्यावरच ढकलतात.

ही मानसिकता आज पुरुषांच्याच नव्हे तर स्त्रियांच्या मनातही खोलवर रुतली गेली आहे. बदलत्या काळासोबत त्याची रुपं तेवढी बदलत गेली. त्यापैकी काही गोष्टींचा इथे विचार करूयात. स्त्री ही आजही पुरुषाच्या अधीन असलेली मालमत्ता मानली जाते. तिच्यावर कुटुंबाची अब्रू अवलंबून आहे असं तिच्या मनावर ठसवलं जातं. तिला काही झालं तर ही अब्रू धूळीस मिळते. मुख्य म्हणजे त्याचे सारे वाईट परिणाम हे त्या स्त्रीलाच भोगावे लागतात. त्यांतून पुरुषांची सहसा सुटकाच होते. बरं ही अब्रू धूळीस मिळण्याचा जो प्रसंग असतो त्यासाठी ती स्त्री किती जबाबदार आहे हे जाणून घेण्याची तयारी कोणीही दाखवत नाही. पुरुष तर नाहीच पण घरातील अन्य स्त्रियाही नाही. ‘मुलगी म्हणजे परक्याचं धन ही दुसरी मानसिकता‘. अगदी लहानपणापासूनच तिच्यावर तू परकी आहेस हे सतत बिंबवलं जातं. तिचा जन्म म्हणजे कर्जाची सुरूवात. पोरीचा बाप म्हणजे डोक्याला कायमचा ताप या गोष्टी याच मानसिकतेतून जन्माला येतात. मग अशा मुलींवर खर्च कशाला करायचा, फारतर ती नाकीडोळी निट राहील हे पाहिलं की झालं.

लग्न जमवताना तिचं उत्तम सादरीकरण करायचं, जोडीला हुंडा द्यायचा आणि काहीही करून हा माल खपवायचा इतक्या हीन पातळीची ही मानसिकता आहे. त्यामागे स्त्री ही केवळ एक वस्तू आहे हीच भावना असते. स्त्रीचं दिसणं हे आणखी याच मानसिकतेचं लक्षण आहे. घरातल्या बाईनं परपुरुषांसमोर येऊ नये, तिनं घुंघट घालावा, तिनं फार बोलू नये, तिनं नवऱ्यासमोर नेहमी नटून थटून राहावं, तो म्हणेल तेव्हा त्याची शारिरीक भूक भागवायची या गोष्टी म्हणजे आपल्या घरातली एक मौल्यवान गोष्ट बाहेरच्यांना दिसू न देण्याचा जो लोकांचा अट्टहास असतो किंवा आपल्या मालकीच्या वस्तूचा हवा तसा हवा तेव्हा उपभोग घेण्याचा जो प्रकार असतो तसाच आहे. किंवा मग त्या संपत्तीच्या प्रदर्शनाचा. त्यांतूनच मग मुलगा कसाही असला तरी पोरगी गोरीच हवी, सुंदरच हवी, चष्मा नकोच, कमी वयाचीच हवी, कुमारीकाच हवी, सुशील शांत स्वभावाचीच हवी या अपेक्षा जन्माला आल्यात.

ज्या आजही कमी झालेल्या नाहीत. तिथं मुलीचं व्यक्तिमत्त्व काय आहे त्याला महत्त्व नाही, तिचं शिक्षण महत्त्वाचं नाही, तिचं चारित्र्य महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे ते तिचं दिसणं. जोडीला आता ती कमावती असेल तर बरंच. आपली बायको नावाची वस्तू सुंदर असावी आणि चारचौघात मिरवता यावी हा छूपा उद्देश इथं असतो. यात पुरुष स्वतःला मात्र हेच नियम लावायला कधीच तयार नसतो. त्यामागे मालकीहक्काचीच भावना वरचढ असते. स्त्रीला प्रत्येक बाबतीत गृहीत धरणं, तिच्यावतीनं सारे निर्णय आपण घेणं, हा देखिल मालकीहक्काचाच प्रकार आहे. महिला सरपंच हे त्याचं एक कुख्यात उदाहरण आहे. घरच्या बाईची इच्छा न विचारताच तिला निवडणूकीत उभं करणं, ती निवडूण आल्यानंतर तिला काम करू देण्याऐवजी स्वतःच काम करणं आणि मिरवणं हे प्रकार सगळीकडे सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्याला विरोध करण्याचा एखाद्या बाईनं प्रयत्न केलाच तर तिला घरून-बाहेरून दोन्हीकडून विरोध केला जातो. बाईनं बाईसारखं वागावं ही अपेक्षा त्यातनं व्यक्त केली जाते. तिला स्वतंत्र अस्तित्व नाही, तिला तिच्या पुरुषाच्या सावलीत, त्याच्या मर्जीनंच राहता येईल हा या बाई असण्याचा अर्थ असतो.

हे चित्र बदलायचं असेल तर केवळ स्त्रीलाच नव्हे तर पुरुषांनाही सक्षमतेचे धडे देण्याची गरज आहे. खरं तर पुरुषांनाच याची जास्त गरज आहे. स्त्री-पुरुषांना व्यक्ति म्हणून वागवणं, वागणं हा त्याचा पाया असेल. माझं शरीर कोणाच्या मानापमानाचं कारण बनणार नाही हे स्त्रीनं ठरवायला हवं आणि पुरुषांनीही ते मान्य करायला हवं. स्त्रीचं शरीर हे स्त्रीच्या मालकीचं आहे आणि त्याचं काय करायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार तिचा आहे हे देखिल मान्य करायला हवं. याचा अर्थ असा नाही की ती आपल्या शरीराचा वाट्टेल तसा उपयोग करायला स्वतंत्र आहे. कारण तसं कोणीही सहसा करत नाही, स्त्रीच नाही तर पुरुषही. आणि असं काही झालं तरी एक व्यक्ति म्हणून त्याची जबाबदारीही त्या स्त्रीवरच असेल. स्त्रीला स्वतंत्र असण्याची जाणीव करून देणेच नव्हे तर तिच्या कृत्यांची जबाबदारीही तिच्यावर टाकणे हे स्त्रीला व्यक्ति म्हणून पाहण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल ठरतं.

जबाबदारी ही माणसाला अंतर्मूख करते, सजग करते, संवेदनशील करते. जबाबदारीच्या भावनेमुळेच अंगातील सूप्त शक्ति जागृत होत असतात. आपली खरी ओळख पटते व समाजात आपलं स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करण्यासाठीची प्रेरणाही त्यांतूनच मिळते. स्त्री सक्षमीकरणाचा मार्ग हा तिच्या व्यक्तिकरणातून जात असतो. आणि या प्रक्रियेत पुरुषांचाही सहभाग असावा लागतो. केवळ स्त्रियांनाच हे सांगून उपयोग नाही. सक्षमीकरणाची व्यक्तिकरणाची गरज ही पुरुषांनाही आहे. फक्त ते मनाचं सक्षमीकरण असावं. ज्यामुळे त्यांच्या मनातील स्त्री विषयक रोगट, जुनाट, सनातनी, अशास्त्रीय, अमानवी भावना व विचार नष्ट होण्यास मदत होईल.

ही मानसिकता बदलण्यासाठी सध्याचा काळ अत्यंत उपयुक्त आहे. स्त्री-पुरुषांमधील नात्याला मैत्रीचा पाया असणं ही यासाठी पोषक बाब ठरेल. मैत्री ही नितळ असते, मोकळी असते, स्पर्धाहीन असते. त्यात तुम्ही एकमेकांचा स्त्री किंवा पुरुष म्हणून नाही तर केवळ मित्र म्हणून विचार करता. माणूस म्हणून स्वतःची वाढ होण्यासाठी नकळत एकमेकांच्या मदतीला जाता. लिंगभेद नाहीसा करण्याचं सामर्थ्य मैत्रीच्या नात्यात आहे. प्रश्न असा आहे की या नात्यावर आपण रक्ताची किंवा लग्नामुळे निर्माण झालेली नाती आरूढ होऊ देणार का? जर तसं झालं तर मात्र आपला प्रवास पुन्हा मागच्या दिशेनेच होईल. दोन मित्रांमध्ये लग्न झाल्यानंतर नवरा बायकोचं नातं प्रभावी ठरू लागलं तर नात्यांमध्ये अडचणी निर्माण व्हायला वेळ लागत नाही. पण हे नातं कायम ठेवूनही आधी आपण मित्र आहोत ही जर भावना मनात असेल आणि त्यानूसार जर वागणं असेल तर बरेच प्रश्न मूळात निर्माणच होणार नाहीत. जर या पिढीत याची सुरूवात झाली तरच येणाऱ्या पिढींमध्ये स्त्री-पुरुष हे केवळ व्यक्ति म्हणून ओळखले जातील अशी आशा आपण करू शकतो. आपण सर्वांनीच यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here