‘सेक्स एज्युकेशन’मध्ये एकेकाळी भारत विश्वगुरू होता…!

भारतीय माणूस सेक्सविषयी दबक्या ओठांनीच बोलत असतो. सेक्सविषयी भारतीय समाजाची विचारसरणी अशी नव्हती आणि त्याचे अनेक पुरावे भारतीय इतिहासात मिळतात. लैंगिक शिक्षा हा भारतीय संस्कृतीचा भाग होता. कला आणि साहित्य यांच्या माध्यमातून लैंगिक शिक्षा देण्यात भारत अग्रेसर होता.

  • रिशू कुमारी

सेक्स… शूss हळू बोला! सामान्यतः भारतीय माणूस सेक्सविषयी दबक्या ओठांनीच बोलत असतो. सेक्सविषयी भारतीय समाजाची विचारसरणी अशी नव्हती आणि त्याचे अनेक पुरावे भारतीय इतिहासात मिळतात. लैंगिक शिक्षा हा भारतीय संस्कृतीचा भाग होता. कला आणि साहित्य यांच्या माध्यमातून लैंगिक शिक्षा देण्यात भारत अग्रेसर होता. कामसूत्र हे याचं प्रसिद्ध उदाहरण आहे. लैंगिक सुखाविषयी लोकांना शिक्षित करणं आणि जागृत करणं यात भारतीय संस्कृती आघाडीवर होती. भारतात लैंगिक शिक्षा मुक्तपणे दिली जायची याविषयी आपल्याकडे अनेक पौरोणिक प्रमाण आणि स्मारकं आहेत. प्राचीन भारतीय हिंदू मंदिरांमध्ये लैंगिक क्रियांची शिल्पं आढळून येतात. त्या काळात लैंगिकता हा अवाच्य विषय नव्हता याचं या मूर्ति जिवंत प्रमाण आहेत. आचार्य वात्स्यायन रचित ‘कामसूत्र’ हा भारतीय ज्ञान संपदेचा एक अद्भूत वारसा आहे ज्याची समकालिनता आणि उपयुक्तता आज कित्येक शतकांनंतरही टिकून आहे. स्त्रियांच्या लैंगिक शिक्षेविषयी तसेच त्यांच्या यौन स्वातंत्र्याविषयी त्यात एक उदार दृष्टिकोन स्वीकारलेला दिसून येतो.

sex education - baimanus

प्राचीन भारतीय वास्तुकलेत विशेषतः खजुराहो, कोणार्क, पुरी इत्यादी ठिकाणच्या भव्य मंदिरांवर रतीक्रीडेच्या असंख्य मूर्ती कोरलेल्या आहेत. यातून रतीक्रीडेतील विविध कामासनांची माहितीही दिली गेली आहे. इतकंच नाही तर तेव्हा लोक समुहाने लैंगिक खेळ खेळायचे. त्याचीही अनेक उदाहरणं इथं दिसून येतात. लैंगिकतेविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी हा एक महत्वाचा उद्देश या मूर्तींमागे होता. मंदिरांमध्ये या मूर्ती असल्यामुळे त्यांनाही लोक पवित्र समजायचे. या मूर्तींमधून तत्कालीन लोकांना सेक्सविषयी दृश्यज्ञानच मिळायचं. जसं सध्याच्या काळात सुरक्षित सेक्स, गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम, कुटुंब नियोजन याविषयी जाहिराती केल्या जातात आणि लोकांना माहिती दिली जाते. त्या काळी मूर्तीकला हे अशा प्रकारचं माध्यम होतं. केवळ मंदिरांमध्येच नाही तर नालंदा, तेल्हारा सारख्या प्राचीन विश्वविद्यालयांमध्येही अशी कामशिल्पे कोरलेली होती. त्यामागे लैंगिक शिक्षण हाच उद्देश होता.

‘कामसूत्र’ हे प्राचीन भारतातीलच नाही तर नंतरही लैंगिक शिक्षणाचा एक मौलिक ग्रंथ राहिलेला आहे. यात स्त्री-पुरुष दोघांनाही लैंगिक सुखाचा अधिकार समान असल्याचं म्हटलं गेलंय. त्यामुळे दोघांनीही यात पारंगत असावं असं लिहिलंय. हा एक उदार दृष्टीकोन होता. तेव्हाची भारतीय शिक्षा पद्धती किती उन्नत होती हे यातून दिसतं. लैंगिक शिक्षण हा भारतीय शिक्षण पद्धतीचाच भाग होता. स्त्रियांना औपचारिक शिक्षण नसलं तरी अशा ग्रंथांमधून ते मिळायचं. कामसूत्राचं वैशिष्ट्य म्हणजे सेक्सविषयी लोकांना काय माहिती हवी असायला पाहिजे आणि तो करताना काय करावे याची विस्तृत माहिती यात दिली गेली आहे. सेक्सचा आनंद कसा घ्यावा हे यात आहेच पण स्त्री-पुरुष यात समान असतात हा विचारही यात आहे जो आजही महत्वाचा आहे. हा एक सामाजिक ग्रंथ म्हणावा इतकी त्याची योग्यता आहे. यात इतर अनेक विषयांसोबतच समलैंगिकतेचा मुद्दाही चर्चिला गेला आहे. प्राचीन भारतात समलैंगिकता हा हेटाळणीचा विषय नव्हता. ती एक सामान्य बाब नसली तरीही लोकांनी त्या काळी समलैंगिक संबंधांचा अनुभव घेतला होता आणि ही त्यांना अनैसर्गिक गोष्ट वाटत नव्हती याचे भरपूर पुरावे आहेत. पूर्ण भारतीय उपखंडातच समलैंगिकता पसरलेली होती आणि ब्रिटीशांचं शासन येईपर्यंत त्याविषयी लोकांमध्ये हीन भावना नव्हती की ते बेकायदेशीरही ठरवण्यात आलं नव्हतं. पुराणात याचे उल्लेख आहेत. मुस्लीम शासकांच्या काळातही समलैंगिकता हा समाजजीवनाचा भाग होती.

प्राचीन भारतीय वास्तुकलेमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यावरून प्राचीन काळामध्ये शरीर संबंधांविषयी लोकांची विचारसरणी किती खुली होती हे दिसून येतं.ओडिशामधील कोणार्क येथील सूर्य मंदिरावर नग्न मूर्ती कोरण्यात आल्याचं पहायला मिळतं. याच प्रकारे बौद्ध धर्माशी निगडीत अंजिठा आणि वेरूळच्या लेण्यांमध्येही तरुणींच्या नग्न मूर्ती आढळतात. अजिंठ्याच्या लेण्यांमधलीही चित्रं ख्रिस्ताच्याही 200 वर्षं पूर्वी रेखाटण्यात आली होती. तर वेरुळच्या लेण्यांमधील कलाकृती या पाचव्या ते दहाव्या शतकादरम्यानच्या असल्याचं सांगितलं जातं. अशा प्रकारे सेक्सचं खुलं चित्रण मध्य प्रदेशातल्या खजुराहोच्या मंदिरांवरही आहे. ही मंदिरं किमान एक हजार वर्षं जुनी आहेत. चंडेल राजांनी ईसवीसन 950 ते 1050 दरम्यानच्या काळात या मंदिरांची बांधणी करून घेतली होती. अशी एकूण 85 मंदिरं बांधण्यात आली, पण त्यापैकी आता फक्त 22 शिल्लक आहेत. ही देवळं जागतिक वारसा असल्याचं युनेस्कोने 1986 मध्ये जाहीर केलं होतं. या देवळांवर हरतऱ्हेचे यौन संबंध पाहायला मिळतात. भिंतीवर प्रत्येक काम आसन चित्रित करण्यात आलेलं आहे. तीन व्यक्ती एकाच वेळी यौन संबंध करतानाही यात दिसतात. हा विरोधाभास म्हणायला हवा, कारण एकीकडे ज्या भारतात आतापर्यंत समलैंगिकतेला कायदेशीर अपराध मानलं जात असे त्याच देशातल्या प्राचीन मंदिरांमध्ये समलैंगिकता मूर्तींच्या मदतीने समजवण्यात आलेली आहे. 13व्या शतकात माऊंट अबूच्या जवळ उभारण्यात आलेल्या दिलवाडा मंदिरातही संगमरवरात अशाच मूर्ती साकारण्यात आलेल्या आहेत.

लैंगिक शिक्षणाचा उद्देश हा आपल्या संपूर्ण व्यवहारात परिवर्तन करण्याचा आहे. कामसूत्रानुसार सांगायचं तर वात्स्यायन असं म्हणतात की लैंगिक शिक्षा ही किशोरावस्थेच्या आधीच देण्यात यावी. ज्यामुळे त्यांना आपल्या शरीरातील होणारे बदल समजून घेता येतील, त्याविषयी त्यांच्या मनात हीन भावना अथवा भीती राहणार नाही. मुलांना त्यांच्या लैंगिकतेला सामोरं जाता येईल आणि मुलींना त्यांच्या मासिक पाळी इत्यादी बदलांना समजून घेता येईल. त्यामुळे त्यांच्या जगण्यात कोणताही तणाव निर्माण होणार नाही. सध्या जागतिक आरोग्य संघटनाही यावरच भर देत आहे. वयात येतांना शरीरातील हार्मोन्सच्या बदलांची तीव्रता अत्यधिक असल्यामुळे या वयात लैंगिक अनुभव घेण्याची इच्छा सर्वाधिक जास्त असते. पण याच काळात योग्य माहिती नसल्याने असुरक्षित लैंगिक संबंध केले जातात, ज्यामुळे अवांच्छित गर्भधारणा, लैंगिक रोग होण्याचं प्रमाणही सर्वाधिक असतं. त्यामुळे लैंगिक शिक्षण असेल योग्य माहिती असेल तर या गोष्टी टाळता येऊ शकतात.

sex education - baimanus

काम हा भारतीय संस्कृतीतील चार पुरुषार्थापैकी एक मानला जातो. निरामय आणि सुखी जीवनाची ती मूलभूत गरज आहे. १३ व्या शतकात मुस्लिम शासक उत्तर भारतात आले आणि दिल्लीत त्यांनी सत्ता स्थापन केली. भारतीय कामसंस्कृतीवर मुस्लिम शासकांचा मोठा प्रभाव आहे. बऱ्याच प्रमाणात तो प्रतिबंधात्मक आहे. ब्रिटीश आल्यानंतर तर त्यांनी सरळ सरळ भारतीय काम जीवनावर आघातच केले.

सेक्स आणि सेक्सुअलिटीच्या बाबतीत भारतात आजही आधुनिक युगात रुढीवादी विचारच वरचढ दिसतात. त्यामागे ब्रिटीश शासन तसेच मुस्लिम शासकांचा प्रभाव कारणीभूत आहे असंही म्हटलं जातं. पर्यायी लैंगिकता तसेच एलजीबीटीक्यू समूहाशी संबंधीत विचार आजही समाजमान्य नाहीत असंच सर्वसाधारण चित्र आहे. आमच्या समाजात खरंतर लैंगिक शिक्षणावर प्रतिबंध असण्याचं काहीही कारण नाही. त्यामुळे आपली भारतीय सांस्कृतिक मूल्ये नष्ट होण्याचा काहीही धोका नाही. लैंगिक शिक्षणामुळे लोक लैंगिक रोगांविषयी जागृत बनतील. लैंगिक गुन्हे कमी होण्यासही यामुळे मदत होऊ शकते. शिवाय सेक्सविषयी काही सांगणं म्हणजे केवळ सेक्स या क्रियेविषयी सांगणं नसतं तर एकूणच शरीरातील होणारे लैंगिक बदल, त्याच्याशी संबंधीत मानसिक ताण, कुतूहल यांचंही निराकरण यामुळे होतं. लैंगिक शिक्षणामुळे भावनात्मक बदल, शारिरीक बदल, त्याची कारणं आणि व्यावहारीकता यांची माहिती मिळते ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्व निर्माण होण्यासही मदत होते. लैंगिक शिक्षणामुळे लैंगिक भेदभाव समाप्त होण्यासही मदत मिळते.

अनुवाद – प्रतिक पुरी

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here