- स्वाती वर्तक
“मी जाणार म्हणजे जाणार म्हणजे जाणारच “ पाय आपटत थयथयाट करीत ती 9, 10 वर्षांची चिमुरडी आईशी वाद घालत होती. “एका कर्मठ मुस्लिम कुटुंबातील, आपले शरीर संपूर्ण काळ्या बुरख्याखाली दडवलेली तिची आई भयभीत झाली होती. हळू हळू समजविण्याचा प्रयत्न करीत होती. “बेटा, ते खालच्या जातीचे आहेत. त्यांच्याकडे तू जातेस, तिच्या ताटात जेवतेस हे जर अब्बूला कळले तर…? गहजब होईल. पण धिटुकली इस्मत हे मान्यच करायला तयार नव्हती की जातिभेद असतात, स्पृश्य अस्पृश्य असतात. स्त्रियांचा दर्जा समाजात दुय्यम असतो. हे काहीही तिला पटत नसे. तिच्या मनात येईल ते ती करणारच आणि हाच तिचा मूळ स्वभाव तिने शेवटपर्यंत जपला.
इस्मत चुगताई… तिच्या मनात आले, पटले तेच तिने लेखणीद्वारे समाजासमोर धाडसाने आणले. ती स्वतंत्र विचारांची होती. तिचे क्षितिज विस्तारलेले होते. तिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होती. तिच्या कक्षा रुंदावलेल्या होत्या. ती स्वाभिमानी होती पण दुराभिमानी नव्हती. तिला गर्व होता पण वृथा अहंकार नव्हता. कुठलाही विषय तिला त्याज्य नव्हता पण ती विसरली होती, तो काळ कोणता होता. ती काळाच्या खूप खूप पुढे निघाली होती म्हणून सर्वांनी तिचे कौतुक कमी आणि बंडखोर लेखिका म्हणूनच जास्त हिणवले. समाजाच्या प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे सामर्थ्य तिच्यात होते.

त्यासाठी तिच्याबद्दल सुप्रसिद्ध जावेद अख्तर म्हणतात, ”तलवारीने रक्त सांडले नसेल एवढी इस्मत आपाच्या लेखणीत ताकद होती. तिच्या कथा जेव्हा मासिकांमध्ये प्रसिद्ध होत असत तेव्हा तिची निर्भयता, तिचे परखड विचार मांडण्याची पद्धती या मुळे सर्व त्रस्त होत. रागाने पेटून उठत. स्वतंत्र विचारांची प्रगत लेखिका हीच तिची ओळख होय. मी तिच्या मांडीवर खेळलोय. मला तिचे मोठेपण जाणवलेय. तिचे मोठेपण अजून जगाला ओळखता आले नाहीये. जगाच्या पुढे असलेल्या व्यक्तीला तिच्या पात्रतेनुसार समजून घ्यायला खूप वेळ लागतो. धुतलेल्या तांदळासारखे लोक तिच्या कथेत कधीच सापडत नाहीत. त्या पात्रांवर तिचे प्रेमच नव्हते. तिच्या कथा रंगतात आप्पलपोट्टे, धूर्त, चाणाक्ष, लबाड, लोभी, विश्वासघातकी, कृतघ्न अश्याच पात्रांनी. ती जसे लिहायची तसेच बोलायची. ती म्हणायची… आणखी काय माझ्याकडे एक दृष्टिच तर आहे ना, मग मी इतरांच्या नजरेने जगाकडे का बघू? तिची नजर अतिशय तीक्ष्ण व गहिरी होती. “
“त्या काळात विधवेचे दुसरे प्रेम किंवा समलैंगिक विषयावर लिहिण्याचे धाडस फक्त इस्मतमध्येच होते“, असे उर्दूच्या साहित्यिक शबनम रिझवी म्हणतात. त्यांनी तिच्या अनेक पुस्तकांचे भाषांतर केले आहे. तसेच कोलंबिया आणि न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत उर्दू प्रोग्रॅमच्या सर्वेसर्वा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताहीरा नकवी देखील इस्मतचे कौतुक करताना थकत नाहीत. त्यांनीही चुगताईंच्या पुस्तकांचा अनुवाद केला आहे. त्यामुळे आपल्यासारख्या उर्दू न वाचणाऱ्यांसाठी मेजवानी मिळते.
अशा या निर्भीड शैलीच्या लेखिकेचा जन्म अफगाणिस्तानमधील बदायुं नगरीत 21 ऑगस्ट 1915 रोजी झाला आणि मृत्यू 24 ऑक्टोबर 1991 ला मुंबईत. ती उत्तर प्रदेशमध्येच राहिली, शिकली, मोठी झाली. लखनऊहून बी.ए.बी.एड केले.
बालपणीचे तिचे विचार ऐकून तिची भावंडे थक्क होत. ती नेहमी म्हणायची… ”मैं चूल्हा चक्की करने पैदा नहीं हुई..”
तिला मुलांचेच खेळ आवडत. लाठीकाठी चालवणे तिला आवडे. जर मी एक मुलगी म्हणून स्वतःचे रक्षण करू शकले नाही तर काय उपयोग? या सर्व बाहुल्या मी जाळून टाकेन. हे तिचे उद्गार ऐकून आईला कापरे भरे.
इस्मतला वाटे.. स्त्री हीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू आहे. तिला अन्याय मुळीच सहन होत नसे. आणि म्हणूनच बहुधा अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी तिने लेखणी हातात घेतली. स्त्रियांवरील अत्याचार, कुप्रथा, कुव्यवस्था यावर तिने अखंडपणे आसूड ओढले आहेत, ताशेरे झाडले आहेत.

70 वर्षांपूर्वी पुरूषविरोधी आवाज, स्त्रियांचे मुद्दे मांडणे, कधी विनोदी ढंगाने तर कधी गांभीर्याने प्रकट करण्याची जोखीम तिने उचलली. स्त्रीच्या अस्तित्वाचे लेणे हेच तिच्या कथांचे मुख्य बीज. ते बीज तिने अतिशय विचारपूर्वक फुलवले असल्याने त्यांची पात्रे आपल्याला अगदी जवळची आणि जीवनात ओळखीची वाटतात.
तिच्यावर तिचे उर्दूचे सुप्रसिद्ध लेखक, मोठे बंधू अजीम बेग चुगताई यांचा खूप पगडा होता. ते बरेच आजारी असत. आजाराचे निदान न कळल्यामुळे इतर भावंडांना त्यांच्या खोलीत जायला मज्जाव होता पण ही कोणाचे ऐकेल तर ना!
ती भावाला जाऊन म्हणे, ”आज हमने अल्लामियाँ से खूब लडाई की, अगर आप उन्हें ठीक नहीं कर सकते तो हम… ईसाई बन जायेंगे, “असे बेधडक बोलणारी व घरातील आज्ञा न जुमानता आपल्याला भेटायला येणारी बहीण बघून ते हेलावून गेले.
मी राणी आहे, चुका करणाऱ्या प्रत्येकाला मी शासन करतेय अशी तिची दिवास्वप्ने असत.
1941 मध्ये शाहिद लतीफ, सिनेमा क्षेत्रात अग्रगण्य असलेले, यांच्याशी तिचे लग्न झाले. 1967 ला लतीफ यांना देवाज्ञा झाली. त्या काळात त्यांनी केलेले, इस्मतने लिहिलेले अनेक चित्रपट गाजले. इस्मत आपा म्हणून ओळख असलेल्या या लेखिकेवर अनेक समर प्रसंगही आलेत तसेच अनेक पुरस्कारांने तिचा सन्मानही झाला.
तिच्या ‘लिहाफ’ या कथेवर लाहोर येथे कोर्ट केस करण्यात आली. त्याच वेळेस सुप्रसिद्ध लेखक मन्टो यांच्यावरही केस सुरू होती. दोघांचे छान सूर जुळले. ती, मन्टो आणि शाहिद लतीफ हे तिघे घट्ट मैत्रीच्या धाग्याने बांधले गेले. इस्मतने स्वतःच बाजू मांडली. ती जिंकली पण.. आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये तिने हे पुनः सांगितले की.. ’लिहाफ’मध्ये समलैंगिक हा विषय होताच.. जो सांकेतिक आहे, स्पष्ट अश्लीलता त्यात नाही असे सिद्ध करून मी ती केस जिंकले.
तिची ’गेंदा’. ही पहिली कथा त्या काळातील 1949 मध्ये “साकी” नावाच्या सर्वोत्कृष्ट पत्रिकेत प्रसिद्ध झाली होती.आणि पहिली कादंबरी.. जिद्दी 1941 मध्येच प्रसिद्ध झाली. तेव्हा उर्दू साहित्यातील अढळ स्थान तिला मिळाले होते. त्या काळी सादत हसन मन्टो, कृष्ण चंदर, राजेंद्रसिंह बेदी आणि इस्मत हे लेखक उर्दू साहित्यातील चार स्तंभ मानले जात. या लेखकांमुळे उर्दूला नवा चेहरा, नवे बळ मिळाले असे सर्व आवर्जून सांगतात. असे म्हणतात, उर्दू भाषा कशी वापरावी ही कला जेवढी तिला अवगत होती तेवढी मन्टो किंवा बेदीला देखील नव्हती.तिच्या कथांमध्ये एखादा कलात्मक चमत्कार दिसणार नाही, दिसेल तर फक्त जीवनाविषयी असलेले तिचे खरेखुरे प्रेम, तिच्या योग्य शब्दांची निवड तिच्या याच प्रेमाची ग्वाही देते.“ हे इतके भव्य किंचाळणारे, चित्कारणारे मुंबई शहर..” अशी ज्या कथेची सुरुवात असते तर वाचकाला एका या वाक्यातच मुंबईचे विदारक दृश्य समोर ठसठशीतपणे तरळून जाते आणि कथेचा गाभाही सहज लक्षात येतो. …आणखी काही वर्णन करण्याची गरजच भासत नाही. तिच्या एका वाक्यातसुद्धा संपूर्ण स्त्री जातीची विव्हळणारी वेदना, भळभळून वाहत वाचकांसमोर मांडण्याचे सामर्थ्य होते.

इस्मत यांना त्यांच्या ‘टेढी लकीर’ या पुस्तकासाठी गालिब अवॉर्ड मिळाले आणि साहित्य अकादमी पुरस्कार, इकबाल सम्मान, मखदूम अवॉर्ड, नेहरू अवॉर्ड असेही अनेक सम्मान झाले. 1976 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 21 ऑगस्ट 2018 रोजी गूगलने तिच्या 107 व्या जन्मतिथीनिमित्त डूडल देखील बनवून तिच्याविषयी आदर दर्शविला होता. सगळ्याच धर्माविषयी आदरभाव बाळगणारी आपा हिंदू धर्म विधीमध्ये आस्था असणारी होती; बहुधा तिची शेवटची इच्छा होती की आपली उत्तरक्रिया हिंदू रीतीरिवाजांप्रमाणे व्हावी म्हणून शेवटी तिला चंदनवाडी येथे अग्नी देण्यात आला. (तिच्या जन्मतारखेबद्दलही वाद आहेच. गूगलनुसार 1911 तर इतर पुस्तकात 1915 असे साल दिसते).
इस्मत चुगताई यांची ग्रंथसंपदा
कथासंग्रह – चोंटे, छुईमुई, एक बात, कलियाँ, एक रात, दो हाथ दोज़खी, शैतान
कादंबरी – टेढ़ी लक़ीर, जिद्दी, एक क़तरा ए खून, दिल की दुनियां, मासूमा, बहरूप नगर, सैदायी, जंगली कबूतर, अज़ीब आदमी, बांदी.
आत्मकथा- कागज़ी है पैराहन
अनेक सिनेमांसाठी तिने पटकथा लेखन केले. जुगनू, छेड़छाड़, गर्म हवा असे जवळ जवळ 13 चित्रपट तिच्या नावावर आहेत. ‘गर्म हवा’मध्ये तिने कामही केले होते आणि त्या चित्रपटाला पुरस्कारही मिळाले होते.