- टीम बाईमाणूस
आजच्या जमान्यात बिकिनी परिधान करणे ही एक सामान्य आणि फॅशनची बाब झाली आहे. सर्वसामान्य महिला असोत वा सेलिब्रिटी कधी ना कधी बिकिनी परिधान केलेल्या आपल्याला दिसत असतातच. आजवर सर्वाधिक चर्चेत राहिलेला कपड्यांचा कोणता फॅशन असेल तर तो म्हणजे ‘बिकिनी फॅशन’. सुरुवातीला बिकिनीला फार विरोध झाला पण आता मात्र सेलिब्रिटी असो वा सर्वसामान्य ‘बीच फॅशन’ म्हणून बिकिनीला सर्वाधिक पसंती दिली जाते. भारतीय संस्कृतीत अजूनही बिकिनीला खुलेपणाने स्विकारलं जात नाही. केवळ अंगप्रदर्शनासाठी बिकिनी वापरली जाते असा अनेकांचा समज आहे. ही बिकिनीची फॅशन कधी सुरू झाली, कोणी सुरू केली याबद्दल आजच्या आंतरराष्ट्रीय बिकिनी दिवसानिमित्त आपण जाणून घेणार आहोत.
बिकिनी तयार करणारी व्यक्ती
दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ होता. अमेरिकेने आपल्या न्युक्लियर मिसाईलच परिक्षण केलं होतं. ज्या ठिकाणी ही चाचणी झाली त्या ठिकाणाचं नाव होतं बिकिनी अटोल. त्याच काळात अमेरिकेत सन बाथची फॅशन आली होती. मात्र त्यावेळी महिलांना सन बाथ घेण्याची परवानगी होती पण ती गाऊन घालून. गळ्यापासून ते गुडघ्यांच्या खाली असणारा गाऊन. युद्धामुळे महागाई प्रचंड वाढली होती. जागतिक बाजारपेठेत कापडाचे भाव गगनाला भिडले. साहजिक सहभागी देशाकडून कपडे बचाव मोहिम हाती घेण्यात आली. या मोहिमेचा पहिला बळी ठरला तो सन बाथ साठी वापरण्यात येणारा गाऊन. सनबाथसाठी वापरला जाणारा गाऊन कमीत कमी कपड्यात तयार करण्यात यावा असा सरकारी आदेश निघाला.

त्यावर उपाय म्हणून फ्रेंच ऑटोमोबाइल इंजीनिअर आणि फॅशन डिझायनर लुइस रिअर्ड याने टू पीस अर्थात बिकनीचा शोध लावला. अमेरिकेने त्यावेळी बिकनी अटोलमध्ये न्युक्लिअर मिसाईलची यशस्वी चाचणी करुन क्रांती केलीच होती. रिअर्डला देखील आपला हा शोध क्रांती करेल यावर विश्वास होता. म्हणूनच त्याने आपल्या या अविष्काराचे नाव ठेवलं बिकनी.

लुइस रिअर्ड फक्त बिकिनी तयार करूनच थांबला नाही तर त्याने आक्रमक जाहिराती सुरू करण्याचा प्रयत्न केला. बिकनीच्या जाहिरातीसाठी त्याने वेगवेगळ्या मॉडेल्सना पाचारण केलं. पण बिकनी पाहून सर्वांनीच ती घालण्यास नकार दिला. त्यानंतर लुईसला त्याकाळची न्यूड आर्टिस्ट मॉडेल मिशलिनने हिरवा कंदील दाखवला. 5 जुलै 1946 रोजी पहिल्यांदाच मिशलिन बर्नर्डिनी या मॉडेलने ही बिकिनी घातली होती. मिशलिनने बिकनी घालून फोटोशुट केलं. बघता बघता बिकनी हिट झाली आणि मिशलिन देखील हिट झाली. असं म्हणतात की, त्या काळात मिशलिनला 50 हजारांहून अधिक पत्र आली होती.
फ्रेंच महिलांना बिकिनीची डिझाइन फार आवडली होती पण तिथल्या कॅथलिक चर्चने बिकिनीवर आक्षेप घेतला होता. इतकंच नाही तर तिथल्या प्रसारमाध्यमांनीही बिकिनीला तीव्र विरोध दर्शवला होता. 1951 मध्ये पहिल्यांदाच ‘मिस वर्ल्ड’ या सौंदर्यस्पर्धेत स्पर्धकांनी बिकिनी घातली होती. मात्र त्यानंतर अशा सौंदर्यस्पर्धेत बिकिनीवर बंदी घालण्यात आली होती.
बिकिनी अशी झाली प्रसिद्ध

1953 मध्ये पार पडलेल्या कान चित्रपट महोत्सवादरम्यान बीचवर बिकिनी घातल्याने अभिनेत्री ब्रिजेट बार्डो फार चर्चेत आली होती. त्यानंतर इतर बऱ्याच अभिनेत्रींनी बिकिनीचा वापर सुरू केला. तर 1960 मध्ये ‘प्लेबॉय’ आणि ‘स्पोर्ट्स इलुस्ट्रेटेड’ या प्रसिद्ध मासिकांच्या कव्हरपेजवर बिकिनीत मॉडेल झळकल्या होत्या.

मिनाक्षी शिरोडकर आणि शर्मिला टागोर पहिल्या बिकनी गर्ल

1938 मध्ये म्हणजे जवळपास 85 वर्षांपुर्वी एका दिग्गज अभिनेत्रीनं चित्रपटातून ऑनस्क्रिन स्विमसूट लूक परिधान केला होता. काळाच्या पुढे असणाऱ्या या अभिनेत्रीचे नावं होतं मिनाक्षी शिरोडकर. ‘ब्रम्हचारी’ या 1938 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात ‘यमुना जळी खेळू खेळ… ‘ या गाण्यातून मिनाक्षी यांनी स्विमसूट परिधान केला होता. हिंदी सिनेमामध्ये शर्मिला टागोर यांनी इन इव्हनिंग इन पॅरिस नावाच्या सिनेमात पहिल्यांदा बिकनी वापरली. त्यानंतरच्या काळात बिकनी परवीन बाबी, झिनत अमानने घातली, बॉबीत डिंपल कपाडीयाने घातली. अलीकडे दीपिका पदूकोनच्या बिकनीवरून देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता.
बिकिनी म्हणजे फॅशन स्टेटमेंट

सौंदर्य स्पर्धेनंतर स्पेन आणि इटलीसह अनेक देशांमध्ये बिकिनी घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतर हळूहळू बिकिनी समाजात स्वीकारली गेली. यानंतर महिलांमध्ये बिकिनी घालण्याचा ट्रेंड वाढत गेला आणि त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरही ती घालायला सुरुवात केली. बिकिनी हे आजच्या काळात महिलांचे सर्वात आवडते बीचवेअर बनले आहे. बदलत्या काळानुसार फॅशनसोबतच बिकिनी घालणे आवश्यक मानले जात होते.
आजच्या काळात तरुण पिढीसाठी बिकिनी हे फॅशन स्टेटमेंट बनले आहे. मॉडेल्सपासून अभिनेत्रींपर्यंत बिकिनी घालून हॉट फोटोशूट करतात. आजच्या काळात बिकिनी घालणे हा एक पुरावा आहे की तुम्ही केवळ फॅशनेबल नाही तर पूर्णपणे फिटही आहात.