- टीम बाईमाणूस
सप्टेंबर महिना सुरू झालायं… त्या गावात आता पुन्हा एकदा प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडणार आहे. आता बाहेरच्या लोकांना गावात जायला बंदी घालण्यात येईल. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात गावात अतिशय विदारक चित्र पुन्हा दिसणार आहे. एक रहस्यमय घटना पुन्हा घडणार आहे. गेल्या 100 वर्षांपासूनचे हे चित्र पुन्हा एकदा जगभरातील संशोधकांना कोड्यात टाकणारं ठरणार आहे.
माणसाने आत्महत्या करणं ही तशी सामान्य गोष्ट… दररोज आपण अशा बातम्या वाचत असतो किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात पाहात असतो. परंतू जर पक्षी आत्महत्या करत असतील तर…? तुम्हाला हे वाचून थोडेसे विचित्र वाटले असेल की, पक्षी आत्महत्या कशी काय करू शकतात. परंतु ही गोष्ट केवळ तुम्हालाच चकित करणारी नसून येथे राहणाऱ्या प्रत्येकासाठी एक गूढ बनली आहे.
जगभरात अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत. या रहस्यमय ठिकाणांबद्दल अद्याप कोडी उलगडू शकली नाहीत. भारतात देखील अशी बरीच ठिकाणे आहेत ज्याबद्दलची गुपितं अजून देखील उलगडू शकली नाहीत. या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे आसाम मधील जतिंगा व्हॅली… आणि हेच ते जतिंगा ठिकाण आहे जिथे पक्षी मृत्यूला कवटाळतात.

जतिंगा व्हॅली म्हणजे पक्ष्यांचा सुसाईड पॉईंट
आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्याच्या खोऱ्यात वसलेले जतिंगा व्हॅली नैसर्गिक परिस्थितीमुळे एका वर्षातील सुमारे 9 महिने बाहेरील जगापासून विलग होते. बाहेरून हे गाव भारतातील इतर गावांसारखे दिसते. विशेष म्हणजे या गावात शतकानुशतके एक रहस्य दडलेले आहे, ते म्हणजे ‘मृत्यूचे रहस्य’. कोणताही शास्त्रज्ञ, कोणताही संशोधक आणि गावातील वडीलधारी मंडळीही हे गूढ उकलू शकलेले नाहीत. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात दररोज संध्याकाळी ६ ते रात्री साडेनऊ या वेळेत स्थलांतरित पक्ष्यांचा कळप येथे येतो. या खोऱ्यात सप्टेंबरनंतर रात्री कर्फ्यूची परिस्थिती आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात रात्री येथे एक विचित्र परिस्थिती आहे. या ठिकाणी संध्याकाळी ७ ते रात्री दहाच्या दरम्यान पक्षी, किटक आणि पतंग हे बेशुद्ध होऊन खाली पडतात. पक्ष्यांच्या मृतदेहाचे या ठिकाणी खच पडलेले असतात. दृश्य अत्यंत धक्कादायक असते.
पक्षी त्यांचे पंख फडकावण्याचे थांबवतात
बरं हे पक्षी एकट्यादुकट्याने आत्महत्या करत नाहीत तर सामुहिक आत्महत्या करतात. जतिंगा येथील कछार नावाच्या खोऱ्यात हे पक्षी स्वत:ला झोकून देऊन सामुहिक आत्महत्या करतात. या विलक्षण घटनेमुळे सबंध जगभर या गावाची चर्चा आहे. स्थलांतराच्या काळात अनेक पक्षी या गावात येतात खरे परंतू पुन्हा आपल्या मूळ घरट्यात यापैकी खुप कमी पक्ष परतात. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात विशेषत: अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 6 ते रात्री 9 या दरम्यान पक्ष्यांचा हा थवा उडायचा थांबतो. ते स्वत:चे पंख फडकावत नाहीत आणि स्वत:ला प्रकाशाच्या दिशेने खाली झोकून देतात. जणू ते स्वत:वरचा ताबा सोडून देतात आणि एखाद्या वस्तूला धडकून खाली पडून त्यांचा मृत्यू होतो.

असं कशामुळे होऊ शकतं…?
गेल्या 100 वर्षांपासून दरवर्षी ही घटना न चुकता घडते हे विशेष… या आत्महत्येमध्ये जवळपास 44 प्रजातींच्या चिमण्यांचा समावेश असतो. आसामच्या बोराईल डोंगरावर जतिंगा हे गाव आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो. जास्त उंचीमुळे आणि पर्वतांनी वेढल्यामुळे ढग आणि धुके आहेत. शास्त्रज्ञ सांगतात की, जोरदार पावसात पक्षी पूर्णपणे ओले झालेले असतात. त्यामुळे जेव्हा ते उड्डाण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची क्षमता संपलेली असते. अशा परिस्थितीमध्ये हे पक्षी गडद धुके आणि काळोखी रात्रीमध्ये उड्डाण करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे ते जंगलातील झाडांना आदळतात आणि यातील बहुतेक पक्षी मृत्यू पावतात. येथे मृत्यू होणाऱ्या पक्षांमध्ये स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांचा समावेश आहे.
या घटनेचा शोध लावण्यासाठी सरकारने प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सेन गुप्ता यांना पाचारण केले होते. त्यांच्या निष्कर्षानुसार जतिंगामध्ये जेंव्हा धुकं पडतं आणि हवा जोरात वाहते तेव्हा येथील प्रदेशाच्या चुंबकीय स्थितीमध्ये मोठा फरक पडतो. याच कारणामुळे पक्षी विचित्र वागतात आणि प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात. हे टाळण्यासाठी डॉ. सेन यांनी एक उपायही सुचवला आहे. या काळात आग आणि प्रकाश जर टाळले तर या आत्महत्या थांबतील असा त्यांचा निष्कर्ष आहे. डॉ. सेन यांच्या सल्ल्यानुसार सरकारने जेव्हा अशाप्रकारची कृती करायला सुरूवात केली तेव्हापासून पक्ष्यांच्या आत्महत्येमध्ये 40 टक्के घट दिसून आली आहे.