आनंद हरवलेला भारत…

World Happiness Day अर्थात 20 मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या World Happiness Index नुसार भारताचं स्थान जागतिक यादीत काहीसं सुधारलं असलं, तरी आपला क्रमांक अजूनही शेवटून मोजण्याची परिस्थिती कायम असल्याचं दिसून येत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्ककडून ही यादी जाहीर केली जाते. ही यादी तयार करताना वेगवेगळ्या निकषांचा वापर केला जातो. त्याआधारे जगभरातल्या देशांमधल्या परिस्थितीचं मूल्यांकन करून त्यानुसार यादीतील स्थान निश्चित केलं जातं.

  • लक्ष्मी यादव

प्रत्येक व्यक्तीला आनंदी राहायला आवडते. आनंद मोजता येतो का या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक आहे. जगात दरवर्षी आनंद मोजला जातो. संयुक्त राष्ट्र सतत विकास समाधान नेटवर्क ‘जागतिक आनंद अहवाल’ तयार करते. जगभरातील जवळजवळ 158 देशांची मुख्यत: सहा घटकांवर आधारित पाहणी करून ‘सर्वात सुखी देश’ अहवाल सादर केला जातो. या घटकांमध्ये सकल देशांतर्गत उत्त्पन्न, सामाजिक समर्थन, वैयक्तिक स्वातंत्र्य, देशातील भ्रष्टाचाराची पातळी, यासारख्या घटकांचा समावेश असतो. यात मिळकत आणि रोजगार, शिक्षण आणि विवाह संस्था, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, गुन्हेगारी, मुलांचं संगोपन आणि संपन्न बालपण, व्यावसायिक आणि खाजगी जीवनातला ताळमेळ, रोजगाराची उपलब्धता आणि समानता, सामाजिक आरोग्य, सामाजिक विश्वास आणि सामाजिक सुरक्षितता हेही मुद्दे येतात. यात व्यक्ती स्वत:ला किती आनंदी, समाधानी मानते हा मुख्य विषय आहे.

मानव विकास अहवालापेक्षा हा अहवाल वेगळा असतो ज्यात फक्त आरोग्यदायी जीवन, जगण्याचा दर्जा आणि ज्ञान या तीन घटकांचाच समावेश असतो. यात 15 व त्यापुढील वयोगटातील लोकांचे अनुभव जाणून घेतले जातात. जगभरात 160 देशांमध्ये हे सर्वेक्षण केले जाते. शहरी आणि ग्रामीण मिळून आतापर्यंत जगाच्या लोकसंख्येच्या 99% लोकांना यात समाविष्ट करून घेतले गेले आहे. फिनलंड या देशाने आतापर्यंत एकदा किंवा दोनदा नव्हे तर पाच वेळा हा बहुमान पटकावला आहे. 20 मार्च हा दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो.

सकारात्मक परिणाम जाणून घेण्यासाठी व्यक्तीला मौजेचा अनुभव आला का किंवा व्यक्तीने स्मितहास्य केले किंवा ती जोराने हसली का या मुद्द्यांचा समावेश होता. नकारात्मक प्रभाव जाणून घेण्यासाठी व्यक्तीला दु:ख, काळजी आणि राग या भावनांचा सतत अनुभव येतो का अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो.

आनंद मोजणे गरजेचे?

सुखी माणसाचा सदरा शोधूनही सापडत नाही असे म्हटले तरी माणूस हा अनंत काळापासून या सदर्‍याच्या शोधात आहे. तो सतत वेगवेगळया पातळ्यांवर आनंद शोधत असते. मास्लोच्या सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित, आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्याची कामना असते आणि त्या व्यक्तीची सगळी धडपड त्या दिशेने सुरू असते. आनंदाकडे सामाजिक मूल्य म्हणून पाहिले जाते. अनेक तत्वज्ञांनी आणि साधू संतांनी माणसाला आनंदी, सुखी राहायला हवं याबद्दल लिहून ठेवलं आहे, उपदेशही केले आहेत. अरिस्टोटल पासून ते गौतम बुद्धांपर्यंत सगळे आनंदाबद्दल बोलतात. गौतम बुद्ध मानसिक शांतीत आनंद शोधतात. बर्नार्ड रसेल ‘द क्वानक्वेस्ट ऑफ हॅपीनेस’ (ज्याचा मराठी अनुवाद करुणा गोखले यांनी ‘सुखी माणसाचा सदरा’ या पुस्तकात केला आहे), या पुस्तकात प्रामुख्याने माणूस कोणत्या गोष्टींनी दु:खी का होतो आणि तो त्यातल्या त्यात कोणत्या मार्गानी सुखी होऊ शकतो याचे वर्णन केले आहे.

आजकाल तर ‘आनंदी कसे राहाल,’ या विषयावरचे अनेक विडिओ उपलब्ध आहेत. थोडक्यात काय तर माणूस प्राणी आनंदाच्या शोधत आहे. अनेक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाची सुरुवात डान्सने केली जाते, कर्मचारी आनंदी रहावेत यासाठी वेगवेगळी सत्रे आयोजित केली जातात, कारण व्यक्ती आनंदी, तर ती काम जास्त करणार, म्हणजे उत्पादन जास्त. शिवाय व्यक्ती आनंदी तर कुटुंब, समाज, पर्यायाने देश आनंदी हे साधे चक्र. म्हणजे व्यक्तीने आनंदी राहावे हे वैयक्तिक तर आहेच पण ते सामाजिकही आहे. त्यामुळे व्यक्ती आनंदी आहे की नाही हे मोजणे अत्यावश्यक आहे. व्यक्ती सदान कदा आनंदी राहू शकत नाही हे खरे असले तरी सर्वसाधारपणे तो आनंदी आहे की नाही हे तपासता येतं.

जागतिक आनंद अहवाल आणि भारत

2011 साली 111 असणारी भारताची क्रमवारी गेल्या काही वर्षात ती घसरून सतत 130 च्या पुढे गेलेली दिसते. ‘अच्छे दिन आलेत’ म्हणणे किती पोकळ आहे यातून दिसून येते. आनंदात दरवर्षी दु:खी करणार्‍या घटकात भर टाकणार्‍या राजकीय व्यवस्थेत बदल होणे अत्यावश्यक असताना जनता वर्षानुवर्षे त्याच पर्यायाला निवडते आहे हा विरोधाभास आहे. देशासमोर, लोकांच्या रोजच्या जगण्यात असंख्य संकटे असतानाही लोकांनाच बजावलं जातं, “क्यों अच्छे दिन आ गये ना?” शाश्वत विकासावर हर देण्यापेक्षा विविध ‘इवेंट्स’ साजरे करण्यावर भर दिला जातोय.’ सदरचे शासन ‘फसव्या विकासाचे प्रारूप’ जनतेसमोर मांडते. उदा. भारताचा जीडीपी वाढतो, म्हणजे देशाचा विकास होतोय आणि देश सुखी आहे असा भ्रम निर्माण केला जातो.

एखाद्या देशाचा जीडीपी जास्त असेल तर तो देश आनंदी असे म्हणता येत नाही. अर्थतज्ञ संजीव चांदोरकरांच्या मते, हॅपीनेस इंडेक्स समजून घेताना झिरपा सिद्धांत महत्त्वाचा आहे. “जीडीपी वाढतो, तेव्हा अर्थव्यवस्था वाढते हे खरंच आहे. बजेटही वाढतं. लोकांना वस्तू आणि सेवांचा उपभोगही घेता येतो. पण जीडीपी मोजताना यासाठी सरकारने किती रुपयांची तरतूद केली आहे आणि किती रुपयांचा प्रत्यक्ष खर्च झाला, याचीच माहिती मिळते. हा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचा फायदा लोकांना झाला की नाही, हे कळत नाही. जसं शिक्षणासाठी सरकारने किती तरतूद केली हे कळतं. पण किती मुलांनी शिक्षण घेतलं, त्यांना काय दर्जाचं शिक्षण मिळालं, याची पडताळणी होत नाही. खर्च शेवटपर्यंत झिरपला आहे की नाही हे समजण्यासाठी झिरपा सिद्धांत वापरला जातो,” असं ते पुढे सांगतात. म्हणून भारताचा जीडीपी 2018 साली चीनपेक्षा जास्त असूनही भारत 156 देशांच्या यादीत 133 व्या स्थानावर होता आणि चीन 87 व्या.

उत्तम प्रशासनाचा नागरिकांच्या आनंदाशी संबंध

सुधारित प्रशासन आणि आनंद यांचा संबंध तपासणार्‍या अनेक अभ्यासातून समोर आले आहे की चांगले प्रशासन असणार्‍या देशातील लोक अधिक समाधानी आणि आनंदी आहेत. आपले स्थान वर्षानुवर्षे भारतात मात्र जात आणि धर्मावर आधारित निवडून येणारे राज्यकर्ते खर्‍या विकासाऐवजी जातधर्मावर समाजात दुफळीचे, द्वेषाचे राजकारण करत आहेत. अस्मितेचे प्रश्न समोर करून लोकांना त्यांच्या दैनंदिन प्रश्नांपासून दूर केले जात आहे. वंचित, स्त्रिया आणि आवाज उठवणार्‍यांना प्रशासनात सामावून घेतले जात नाही. नोकरशाही, न्याय व्यवस्था आणि कायदेमंडळ या संसदीय लोकशाहीचे स्तंभ आता स्वतंत्रपणे काम न करता यात सत्ताधारींचे राजकारण घुसले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाही हा असा प्रकार आहे की ज्यात शांततामय आणि कायदेशीर मार्गाने सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन होते ती शासनप्रणाली. मात्र मागील काही वर्षांपासून हिंसात्मक आणि बेकायशीरपणे चालणारे प्रशासन हे नागरिकांच्या भयचे आणि चिंतेचे कारण बनले आहे.

भारतात नियोजन, कायदे यावर मेहनत घेतली जाते पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित सुरू आहे की नाही याचे मूल्यांकन शिवाय प्रकल्पांची देखभाल दुरूस्ती यावर लक्ष दिले जात नाही. कामाच्या ठिकाणचे वातावरण. भारतात सरकारी असो की खाजगी, प्रत्येक ठिकाणी सत्तेची उतरंड, सत्तेचा गैरवापर, प्रस्थापितपणा, स्त्री, पुरुष, तृतीय पंथी व बालक भेद, प्रसूतीविषयक अधिनियम यासारखे कायदे न पाळणे, वेतन कापणे, अपुरा पगार असे असंख्य प्रकार होतात ज्यामुळे कामाच्या संबधित मिळणारे समाधान भारतीयांना मिळत नाही. कामाच्या ठिकाणात सगळ्या आस्थापनांसोबत मानसिक आरोग्यावर काम करणार्‍या संस्था आणि सामाजिक संस्था, आरोग्य आस्थापना ही ठिकाणेही प्रदूषित वातावरणात येतात.

भारत आणि इतर आनंदी देश

2021 साली 149 देशांच्या यादीत भारत 139 व्या स्थानावर होता, ज्या पाकिस्तान देशातील सगळे लोक दु:खी असतील आणि त्याचा नंबर एकदम तळाशी असेल असा सर्वसामान्य लोकांचा अंदाज असेल त्यांना धक्का बसेल जेव्हा कळेल की पाकिस्तान 105 व्या स्थानी होता. बांग्लादेश 101 व्या स्थानी तर चीन 84 व्या स्थानी होता. आपल्या शेजारचे देश ज्यांना आपण छोटे देश समजतो ते नेपाळ (87), भूतान, म्यानमार(126) देश भारतापेक्षा जास्त आनंदी आहेत. फिनलँडनंतर डेन्मार्क, स्वित्झर्लंड, आइसलँड, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वीडन, लक्समबर्ग, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रिया या देशांचा पहिल्या दहा देशांच्या यादीत समावेश होता. 2022 साली 146 देशांच्या यादीत भारत 136 व्या स्थानी होता तर पाकिस्तान 103, इराक 109, युक्रेन 108, नेपाळ 85, जपान 55 तर फिनलंड हा सलग पाचव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. रोजगार, वेतन, उत्कृष्ट सेवा, अपरिमित निसर्ग, त्याचा आस्वाद घेण्याच्या सुविधा आणि त्याचे जतन, कमी प्रमाणातील गरीबी, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचे कमी प्रमाण, जगण्याकडे आणि नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्त्री पुरुष, तृतीयपंथी समता, विकेंद्रित व्यवस्था इ. बाबीमुळे इतर देश भारतापेक्षा जात आनंदी आहेत. 2011 नंतर भारताचे जागतिक आनंद अहवालातील स्थान घसरत गेल्याचे दिसते कारण त्यानंतर झालेली मानवी मूल्यांची, मूलभूत हक्कांची पायमल्ली हेही कारण आहे. जात आणि धर्माच्या नावावर होणार्‍या हिंसा, वाढती बेरोजगारी आणि महागाई, पर्यावरणाचा बेसुर वापर ही त्यामागील करणे आहेत.

2021 व 2022 साली सर्वात दु:खी देशांच्या यादीत युद्धप्रवण अफगाणिस्तान सगळ्यात खालच्या स्थानावर, तर अनुक्रमे झिंबाब्वे, रवांडा, बोस्टवाणा, लेसोटो खालच्या स्थानावर होते.

स्त्रिया, अल्पसंख्यांक, मुले आणि आनंद

मानसशास्त्र असे सांगते की माणूस आनंदाला कवटाळतो आणि दु:खाला किंवा वेदनेला टाळतो. खरं तर हे नैसर्गिक आहे आणि याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र भारतात ‘चांगल्या स्त्रीच्या’ व्याख्येत त्याग करणारी, स्वत: आनंद न घेता मुलं, नवरा, कुटुंब आणि समाजास आनंद देणारी स्त्री चांगली समजली जाते आणि स्वत:च्या आनंदाचा विचार करणार्‍या स्त्रीला ‘स्वार्थी, स्वकेंद्री’ म्हटले जाते. काही संशोधनांमधून ही माहिती समोर आली आहे की 70% स्त्रिया अनेमिक/कुपोषित असतात. स्त्रियांनी स्वत:वर लक्ष द्यायचे नाही हा समज स्त्री आणि पुरुष दोघातही किती खोलवर रूजला आहे की तो आहार, आरोग्य व इतर निर्णयात तिची भागीदारी नसते यातून दिसून येते. आहार आणि मानसिक आरोग्य यांचे एकमेकांशी नाते आहे. साहजिक आहे की कुपोषित स्त्री स्वत:ही आनंदी राहू शकणार नाही आणि ती सुढृढ बाळाला कसं जन्म देणार? शिवाय तीच आनंदी नसे तर इतरांना कसं आनंद देणार? आणि जन्माला आलेलं बाळ कसं आनंदी राहणार? हे न संपणारं चक्र आहे. शिवाय पारंपारिकरित्या येणार्‍या मुलांच्या, घरच्या, बाहेरील जबाबदार्‍या त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवतात. शिवाय स्त्रियांवरील होणारी शारीरिक आणि भावनिक हिंसा आणि त्यांचे मानसिक आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. अत्याचारग्रस्त स्त्रिया विविध प्रकारच्या मानसिक आजाराला बळी पडतात.

स्त्रियांप्रमाणेच अल्पसंख्यांकांवर देखील शारीरिक आणि मानसिक हिंसा केली जाते. मग ते धर्मावरुन होणारी हत्या (lynching) असो की जातीवरून होणारी हत्या आणि विद्वेष असो. 2011 नंतर भारताचे आनंदाच्या पातळीवर घसरलेले स्थान याचेच दर्शक आहे.भारतात प्रचंड प्रमाणातील बाल मजूरी, बाल लैंगिक शोषण, मुलांची तस्करी, मुलगी-मुलगा आसमान प्रमाण, कुपोषण, पुस्तकी अभ्यासावर आधारलेल्या व फक्त शैक्षणिक मूल्यांकन करणार्‍या शाळा, नष्ट होणारी मैदाने, आई वडिलांचा मिळणारा कमी दर्जेदार वेळ, सोशल मीडियाचा अति वापर अशा असंख्य चक्रव्यूहात मुलं अडकलेली आहेत. त्यामुळे 15 ते 18 वयोगटातील मुलांचे चिंता आणि दु:खी होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यांना आनंदी होण्यासाठीची कारणच उपलब्ध नाहीत. अभ्यासातून पुढे आले आहे की बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आसाम या राज्यात 10.8% मुले मेंदूच्या कमी विकासामुळे पीडित आहेत.

नैराश्य, आत्महत्या आणि भारत

राष्ट्रीय मानसिक आरोग्य पाहणी 2016 नुसार भारतात जगातील सर्वाधिक मानसिक आजारी असलेल्या देशांमधील एक देश आहे. या पाहणीत 5 करोड 60 लाख भारतीय नैराश्याने तर 3 करोड 80 लाख चिंतेने ग्रासलेले आढळले. भारतात दरवर्षी 2 लाख आत्महत्या होतात आणि 14% लोकांना तातडीच्या मानसिक उपचारांची गरज आहे.महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, आंध्रप्रदेश, मणिपूर, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये चिंतेचं प्रमाण जास्त आहे. ही आकडेवारी भारत देश आनंदी नाही हेच दर्शवते. अभ्यासानुसार तुलनेने महिला निराश आढळतात तर पुरुषत्वाच्या ओझ्याखाली दबलेला पुरुष आत्महत्येकडे जास्त वळतो. तणाव नियोजन आपल्या शिकण्यातला भाग असत नाही. समुपदेशक, मानसोपचार तज्ञासारख्या सुविधा अजूनही उच्च वर्गाच्याच आवाक्यात आहेत. तणावमुक्तीसाठी आणि आनंदी राहण्यासाठी मानसोपचाराचे सामान्यीकरण आणि सुविधांचे सहजपणे उपलब्धीकरण आवश्यक आहे.

जागतिकीकरण आणि आनंद

जागतिकीकरणाच्या रगाडयात आनंद शोधायला वेळच उरलेला नाही. सगळं आयुष्य जगण्यासाठी कमाई करण्याच्या भोवती गुंफलेले आहे. कामाच्या व्यापामुळे खुंटलेले सहवास, सोशल मीडियामुळे मौनात गेलेले संवाद, आर्थिक शोषण, राजकीय स्थित्यंतरं यामुळे जगणं अस्थिर झालय. अशात आनंदाचा विचार कधीतरी बाहेर जेवण्यापुरता किंवा पार्टी झोडण्यापुरता मर्यादित राहिला आहे. मूल्ये आणि नातेसंबंध यांचे बदलेले स्वरूप यामुळे स्वकेंद्री आणि एकलकोंडी माणसं आतून कमकुवत होऊन असमाधानी राहतात.

भावनिक विकास आणि आनंद

भारताचा विचार केल्यावर असे दिसते की आपण ब्रिटिशकालीन शिक्षणपद्धती स्वीकारली जी पद्धती प्रामुख्याने कारकुनी कामांसाठी आणि सरंजामी म्हणजेच इतरांवर वचक ठेवण्याच्या हेतूने तयार करण्यात आली होती. आपण त्यात काही बदल केले पण आपला शिक्षणाकडून मूळ हेतू शहाणं बनणं, ज्ञान प्राप्ती करणं हा राहिला नसून केवळ नोकरी मिळवणं हा राहिला आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांच्या शैक्षणिक वाढीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेऊन आहे, पण त्याच्या भावनिक वाढीकडे आपले लक्ष नाही. स्वत:च्या व इतरांच्या भावना समजून घेणं हा रोजच्या जगण्यातील भाग बनणं हा आनंदी जीवनाचा पाया आहे. भावनिक वाढ नसल्याने नात्यांमध्ये संवाद न झाल्याने दुरावा वाढतोय, त्यामुळे कौटुंबिक स्तरावर व्यक्ती आनंदी नाहीत. आपल्याला ‘तुझं ठीक चाललं आहे का?’ इथवर प्रश्न विचारला आहे, मात्र ‘तू आनंदी आहेस का, समाधानी आहेस का?’ असा प्रश्न विरळाच! कारण आनंदी राहणं हा आपल्या रोजच्या जगण्यातील जाणिवेचा हवा तेवढा भाग नाही. त्यामुळे त्याचे चित्र अहवालात उमटणारच.

आनंदाच्या जागा बंदिस्त: अभयारण्ये, उद्याने, मैदाने, प्रेक्षणीय स्थळे

जागतिक विकासात शहरांच्या विकासाच्या महत्वाला शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये 11, यात प्राधान्य देण्यात आलं आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतूक, मोकळया आणि हिरव्या जागांचा उपभोग अशा मुद्द्यानुसार व्यक्तीं जीवनात समाधानी आहे के हे तपासले जाते. भारतात फिरायला जाणे म्हणजे मौजमजा करणे असे पाहिले जाते; कधीकधी या गोष्टी करणे म्हणजे ‘रिकामटेकडेपणाचे उद्योग,’ ‘पैसेवाल्यांचे चोचले,’ ‘रिटायरमेंट प्लॅन’ असेही. बरेचदा या गोष्टींकडे ‘आवड’ या नजरेतूनदेखील पाहिले जाते. मात्र या गोष्टी ‘आनंद’ मिळवण्याकरिता करतात, केल्या जाऊ शकतात आणि करायला हव्यात असे पाहिले जात नाही. मध्यंतरी कोविडच्या काळात बाकी सगळं उघडलं गेलं तरी कित्येक दिवस बागा, मैदाने, प्रेक्षणीय स्थळे, व्यायामशाळा इ. गोष्टी बंद होत्या (बागांसाठी नियोजित वेळ असते. बागा दिवसरात्र खुल्या हव्यात). मुळात कोविड काळात लोक प्रचंड तणावाखाली होते. विशेषत: लहान मुले खेळू शकत नसल्याने त्यांच्यात स्थूलता, सांध्याचे आजार याबरोबरच मानसिक आजारही झाले, त्याची दखल कुणीही घेतली नाही. मुळात पालकांनाही मुलांनी खेळणे, मैदानात जाणे, बागेत जाणे अशा गोष्टी जेवढ्या गरजेच्या वाटायला हव्यात तेवढ्या वाटत नाही. निसर्ग हा उपचार आहे, निसर्गात माणूस हिरवा होऊन जातो. पण करोंना काळात आपणाकडे नियम पाळून दुकाने उघडली गेली पण नियम पाळून उद्याने, प्रेक्षणीय स्थळे उघडली गेली नाहीत; कारण मानसिक आरोग्य ही अत्यावश्यक गरज मानली जात नाही.

छंद जोपासणे

छंद जोपासण्याला भारतात हवे तेवढे महत्व नाही. पैसा मिळवणे आणि त्यासाठी नोकरी मिळवणे आणि त्या दिशेने शिक्षण घेणे हे चक्र इतके आखीव रेखीव केले गेले आहे की त्यात छंदाला जागाच ठेवली गेली नाही. आपणाकडील पौराणिक साहित्यात चौसष्ट कलांचा उल्लेख आहे ज्या पाक कलेपासून ते गायन कलेपर्यंत सर्व कलांचा समावेश आहे. आपणाकडे छंद जोपासणे ही चैन समजली जाते नाही तर भिकेचे डोहाळे लागण्याचे लक्षण. मात्र डायलेक्टिक बिहेवियर थेरपीसारख्या (डीबीटी) काही मानसशास्त्रीय सिद्धांतांमधील माइंडफुलनेससारख्या संकल्पनांमध्ये छंद जोपासण्याला शरीराने आणि मनाने आनंदी राहण्यासाठी अत्यावश्यक मानले गेले आहे.

लोकांच्या दृष्टीकोनावर काम करणे गरजेचे

भारतात जीवनाचा उद्देश पैसे मिळवणे हा दिसून येतो. पूर्वीच्या काळी ज्ञान प्राप्ती याला आयुष्याचा उद्देश समजले गेले होते. काही वेळा आहे त्या जनमातून मुक्ती मिळवणे व पुढील जन्म चांगला मिळावणे हा उद्देश मानला जातो. मात्र ‘आनंदी राहणे किंवा आनंद मिळवणे’ हा जीवांचा उद्देश मानला गेला नसल्याने आपल्या कोणत्याच कृती या आनंद मिळवण्याच्या हेतूने केलेल्या किंवा त्या दिशेने रचलेल्या नसतात. उदा. आपण शिक्षण आनंद मिळवण्यासाठी घेत नाही, त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम, शिकवण्याच्या पद्धती म्हणा किंवा अख्खी शिक्षणव्यवस्था ही ‘आनंदासाठी ज्ञानप्राप्ती’ किंवा ‘ज्ञानातून आनंदप्राप्ती’ अशी नाही. त्यामुळे अगदी प्राथमिक शिक्षण असो की महाविद्यालयीन, त्यातून आनंद मिळण्याच्या संधी कमीच आहेत.

‘इकिगाई’ या हेक्टर गार्सीया आणि फ्रान्सेस्क मिरालेस लिखित पुस्तकात म्हटल्याप्रमाणे ‘जीवनाचा अर्थ शोधणं आणि सतत व्यस्त राहणं’ हा आनंदी आणि दीर्घायुषी राहण्याची जपानी विचारसारणी सांगितली आहे. या पुस्तकात कधीही निवृत्त न होता सतत कार्यमग्न राहणं, हलका व्यायाम, सकस आहार, एकमेकांना घट्ट जोडून ठेवणारं समुदाय जीवन ही जपानी जीवनपद्धती तेथील लोकांच्या दीर्घायुष्याचे आणि आनंदी जीवनाचे रहस्य सांगितले आहे. भारतात मात्र आनंदी राहण्याला स्वार्थी होणं समजलं जातं तर वयानुसार निवृत्ती स्वीकारावी अशीही सामाजिक तशीच शासकीय रचना आहे. एकदा का पन्नाशीच्या पुढे वय गेलेलं की आता ‘आराम करायला हवा,’ अशी विचारसारणी समाजात आहे. त्यापुढे काम करणे हे कमीपणाचेही समजले जाते. मात्र शरीराच्या व मनाच्या सुदृढतेसाठी काम करत राहायला हवं ही विचारसारणी अजून रुजलेली नाही. त्या मानाने ग्रामीण भागात साठीच्या पुढचे काही लोक अजून काम करताना दिसतात. पण इथेही ‘आता मी तुम्हाला सांभाळायला खंबीर आहे. तुम्ही काम केलं तर लोक काय बोलतील की म्हातार्‍या आई बापाला सांभाळू शकत नाही का?’ असं पोरगा म्हणताना दिसतो. त्यामुळेच ग्रामीण भागातील सुदृढ म्हातार्‍या पिढ्यांमध्ये रक्तदाब, डायबेटीस, सांध्याचे आजार आणि त्यासोबतीने रिकामेपण बळकावताना दिसतात.

बर्‍याचदा लोकंही हिंसा, भ्रष्टाचार, जाती धर्म भेद, अंधश्रद्धा, सरंजामशाही अशा गोष्टींना साथ देतात. त्यामुळे समाजाच्या आणि देशातील राज्यकर्त्यांच्या पातळीवर अनागोंदी, अन्याय सुरू राहायला मदत होते. स्वकेंद्री मूल्ये संपूर्ण देशाचे, मानवतेचे नुकसान होते हे त्यांच्या ध्यानीमनी येत नाही. ही विचारसारणी बदलून औदार्य, शांती, क्षमा, सह अनुभूति, बांधिलकी, न्याय, आनंद, जिव्हाळ्याचे अंतर्गत नातेसंबंध, ही मूल्ये रुजण्याची गरज आहे.

भारताला आनंदी बनवण्यासाठी काय करू शकतो?

मुळात जनतेला आनंदी बनवणे हा भारतातील आणि अनेक जागतिक स्तरावरील नेत्यांचा उद्देशच नाही. भारतात तर ‘अनेक वर्षे लोक दु:खी राहिले तर आपल्याला मतं देतील’ या विचारसरणीने विकास लटकवत ठेवला जातो. आनंदासाठी सामाजिक पाठबळ, भावनिक विकास, सरकारचा प्रामाणिकपणा या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. राज्यकर्त्यांचा सामाजिक दमनाचा दृष्टिकोन बदलण्याची प्रचंड गरज आहे. आनंद अहवालाला गंभीरपणे घेण्याची अत्यंत गरज आहे.

भारताला आनंदी बनवणे हे दीर्घकालीन ध्येय आहे कारण भारत 130 च्या पुढील स्थानावर आहे. त्यासाठी वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक अशा सर्व स्तरांवर काम करावे लागेल. शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षण सर्व स्तरापर्यंत पोहोचवणे, ‘आनंदाचा आणि हॅपिनेस इंडेक्स’ यांचा समावेश सर्व स्तरावरील पाठ्यपुस्तकात करणे, स्त्री पुरुष आणि तृतीय पंथीय यांच्यात खर्‍या अर्थाने समता प्रस्थापित होईल हे पाहणे, शेती, उद्योग, रोजगार यासंबंधित अभ्यासू धोरण निर्मिती आणि अंमलबजावणी करणे, माध्यम स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. टी. लक्ष्मणस्वामी आणि के. माया यांनी म्हटल्याप्रमाणे कमाईतील दरी कमी करणे आणि विश्वास, सामाजिक एकोपा, यांनी सुखी असण्यातील दरी कमी होईल आणि आनंदाची पातळी वाढेल. गौतम बुद्धानी सांगितलेला मार्ग; ‘भौतिक सुखापेक्षा मानसिक शांतीवर’ लोकांचे लक्ष केंद्रीत करावे लागेल. स्वत:चा आनंद शोधावा लागेल.

हॅपिनेस इंडेक्स ही संकल्पना सर्वोतुमुखी व्हायला हवी, जेणे करून शासनाच्या आणि समजाच्या पातळीवर आपणास त्या दृष्टीने पाऊले उचलता येतील. लुनाना: अ याक इन द क्लासरुम हा 2019 मध्ये बनलेला अतिशय सुंदर सिनेमा पाहिला. त्यात भूतान देशातील सरकार आणि लोक हॅपिनेस इंडेक्स वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा उल्लेख आढळतो. या देशाचे संविधान भारतात अजूनही हॅपिनेस इंडेक्स हा शब्द अतिशय तुरळक लोकांना माहित आहे. जेव्हा ‘तू आनंदी आहेस का?’ हा प्रश्न सामान्यपणे विचारला जाईल आणि त्यापुढे जाऊन “आम्ही आनंदी नाही,” हे देशाच्या राज्यकर्त्यांना आपण ठणकावून सांगेल तेव्हा तेव्हा आपण सगळे आनंदी होण्याच्या मार्गावर असेल.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here