बलात्काराची मानसिकता बदलायलाच हवी…

आपल्या समाजात ज्या गोष्टींविषयी उघडपणे बोललं जात नाही त्यातील एक विषय म्हणजे बलात्कार. आपण या विषयावरच बोलणार आहोत. तेही अगदी थेट उघडपणे. कारण यात जितकी लपवाछपवी असेल, कुजबूज असेल, संकोच असेल तितकं आपलंच नुकसान होणार आहे. ते होऊ नये यासाठी हा प्रयत्न.

  • प्रतिक पुरी

आपल्या समाजात ज्या गोष्टींविषयी उघडपणे बोललं जात नाही त्यातील एक विषय म्हणजे बलात्कार. आपण या विषयावरच बोलणार आहोत. तेही अगदी थेट उघडपणे. कारण यात जितकी लपवाछपवी असेल, कुजबूज असेल, संकोच असेल तितकं आपलंच नुकसान होणार आहे. ते होऊ नये यासाठी हा प्रयत्न. जगात ज्या वाईट गोष्टी घडत असतात त्या आपल्या किंवा आपल्या कुटुंबाबत कधीच घडणार नाही असा एक ठाम गैरसमज आपल्यामध्ये असतो. याला आशावादी वृत्तीही म्हणता येणार नाही. कारण यातून आपण परिस्थितीपासून वास्तवापासून पळ काढतोय असा अर्थ निघतो. या अवांछित वास्तवाचा सामना करायचा असेल तर त्याच्याशी थेट भिडणंच सोयिस्कर ठरतं. असं म्हणतात, की चांगल्याची अपेक्षा करावी पण तयारी वाईटाचीच ठेवावी व त्यासाठी स्वतःलाही तयार ठेवावं. आपल्यावर बलात्कार होणार नाही, आपल्या कुटुंबातील सदस्यावर बलात्कार होणार नाही अशी आशा आपण नक्कीच करावी पण तसं झालंच तर काय करायचं याचा किंवा ते होणं टाळायचं असेल तर काय करावं याचाही विचार आपण करायलाच हवा.

बलात्कार म्हणजे बळाचा वापर करून केलेले कोणतेही शारिरीक अथवा मानसिक कृत्य. पण या शब्दाला आता फक्त लैंगिक अत्याचाराचाच अर्थ मिळाला आहे. आपणही त्याच संदर्भातून याचा विचार करणार आहोत. बलात्कारासंबंधीच्या काही गोष्टी आपण आधी लक्षात ठेवायला हव्यात. या विषयांवर आपण आपल्या घरातील लोकांशी मित्रांशी मोकळेपणानं बोलायला हवं. बलात्कार केवळ शारीरिक नसतात तर मानसिकही असतात. अनोळखी माणसांपेक्षा ओळखीचे लोक, बाहेरच्या लोकांपेक्षा घरातले, शेजारपाजारचे लोक बलात्कार करण्यात पुढे असतात. बलात्कार करताना अत्याचारीत व्यक्तीचं वय हा महत्त्वाचा मुद्दा आता राहिला नाही. त्याचं दिसणं हाही मुद्दा यात नसतो. बऱ्याचदा लैंगिक भूकेपेक्षा जरब बसवण्यासाठीही बलात्कार केले जातात. बलात्काराची जितकी प्रकरणं उघड होतात त्याच्या दसपट कधीच उघड होत नाहीत. कपडे हे बलात्काराचं कारण नसतं. बलात्कार हे स्त्रियांवर, पुरुषांवरही होतात, लहान मुली आणि लहान मुलांवरही होतात. तरुणांवर होतात आणि म्हाता-यांवरही होतात. घराची अब्रू जाऊ नये म्हणून बरीच प्रकरणं दडपली जातात. समाज अजूनही याबाबतीत असंवेदनशील आहे.

बलात्कार - baimanus

आता वरील सर्व गोष्टींचा विचार करता आपल्याला काय करता येईल याचा विचार आधी करूयात. आधी म्हटलं तसं आपल्याबाबतीत हे घडणार नाही हा समज मनातून काढून टाका आणि हे घडू शकतं या मानसिकतेतून याचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करा. घरातील लहान मुलांना याची जाणीव करून द्या, त्यांना माहिती द्या. त्यांना बऱ्या-वाईट स्पर्शांची, नजरांची माहिती द्या. अखंड सावध राहा, तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. लोकांवर विश्वास ठेवण्याआधी त्यांना पारखून घ्या आणि त्यांनतरही त्यांच्यावर पूर्ण विश्वास कधीच ठेवू नका. असले प्रकार घडणार नाहीत यासाठी कायम काळजी घ्या. तुमचे मित्र कसे आहेत मैत्रिणी कशा आहेत कार्यालयीन सहकारी कसे आहेत तुमच्या संपर्कात येणारे अन्य कोणतेही लोक कसे आहेत याची माहिती घ्या. अकारण धाडस करू नका. नशा करून कधी स्वतःवरचं नियंत्रण गमवू नका. कोणी तुमच्याशी जर चुकीचं वागत असेल तुमची इच्छा नसताना तुमच्याशी असह्य अशी शारिरीक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला वेळीच अटकाव करा. समोरच्याला कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रोत्साहन देऊ नका. तुमचं मौन तुमचं काहीच न करणं याचा अर्थ तुमची या संबंधांना संमती आहे असाच घेतला जात असतो. ते कधीही होऊ देऊ नका. आपल्या घरच्यांपासून मित्रांपासून अशा गोष्टी लपवून ठेवू नका. यात तुमची चूक नाही त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका किंवा लाजही बाळगू नका. उघडपणे विरोध करा.

संबंधित वृत्त :

बलात्कार का होतात, पुरुष असे का वागतात याला अनेक कारणं आहेत. त्याला अनेकदा पुरुषही जबाबदार नसतात. त्यांचाही दोष नसतो. पण यानं वास्तव बदलत नाही. आणि वास्तव हे आहे की पुरुष स्त्रियांवर बलात्कार करत आले आहेत, करत आहेत आणि यापुढेही करतच राहतील. केवळ कठोर शिक्षा देऊन हा प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न कायमच असणार आहे. आपल्याला याचं उत्तर बदलावं लागणार आहे. बलात्काराकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आपल्याला बदलावा लागणार आहे. आपली मानसिकता बदलावी लागणार आहे. स्त्रीचं चारित्र्य तिच्या योनीत असतं ही मूर्खपणाची समजूत बदलावी लागणार आहे. तिच्यावर बलात्कार होणं हा तिचाच दोष आहे, त्यामुळे तिची आणि घराचीही अब्रू मातीस मिळते ही धारणा बदलावी लागणार आहे. स्त्रीवर बलात्कार झाला म्हणजे ती भ्रष्ट झाली, तिचं आयुष्य धूळीस मिळालं हा गैरसमज बदलावा लागणार आहे. बलात्कारीत स्त्रीला कमी लेखणं, तिची लाज बाळगणं, तिचा अपमान करणं, तिला दोषी माणणं हे बदलावं लागणार आहे. स्त्रीच्या चारित्र्याशी निगडीत आपली हीन सामाजिक मानसिकता बदलावी लागणार आहे. बलात्कार होणं म्हणजे आभाळ कोसळणं, स्त्रीला कायमचा कलंक लागणं असं मानणं बदलावं लागणार आहे. हे बदल जेव्हा घडून येतील तेव्हा आपण अधिक परिणामकारकपणे या अत्याचाराच विरोध करू शकतो.

समाज हा स्वतःहून कधीच बदलत नसतो. बदलतात ती माणसं. तीही वैयक्तिक पातळीवर. बलात्काराच्या बाबतीत तर व्यक्तीच्या व समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणनं ही खूप अवघड गोष्ट आहे पण अशक्य मात्र नक्कीच नाही. त्यासाठी थोडं धाडस दाखवावं लागेल, स्त्रियांना जास्त धाडस दाखवावं लागेल, पुरुषांना त्याच्या सोबत उभं राहावं लागेल. तरच या समस्येचा आपण सामना करू शकतो. एकाचवेळी विविध आघाड्यांवर आपल्याला हे करावं लागणार आहे. यात स्त्री, पुरुष आणि समाज या प्रत्येकाची भूमिका आहे. या व अन्य गोष्टींबाबत पुढील लेखांत चर्चा करूयात.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here