- प्रतिक पुरी
वेश्या व्यवसाय हा जगातील प्राचीन व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे ज्यात कधीच मंदी नसते. वेश्या व्यवसाय कोणी आपल्या इच्छेनं करत नाही असं म्हटलं जातं. बाईची फसवणूक करून तिला या व्यवसायात ढकललं जातं आणि मग आधी अनिच्छेनं आणि नंतर सवयीनं किंवा निरुपायानं ती या व्यवसायात राहते. काही जणी उघडपणे हा व्यवसाय करतात तर काही जणी छुप्या पद्धतीनं. पैसा मिळवणे हा उद्देशही अनेकींना यात जायला भाग पाडतो. त्यांना त्यांच्या घरच्यांसाठी हा पैसा कमवायचा असतो आणि तथाकथित सभ्य नोकऱ्या मिळणं त्यांना जेव्हा शक्य होत नाही तेव्हा शेवटचा उपाय म्हणून बाया या व्यवसायात येतात. फसवणूक असो, निरुपाय असो, या बाया हा व्यवसाय करतात हे सत्य आहे. प्रत्येक शहरांत गावांत त्यांच्या खास जागा असतात ज्याची माहिती बहुतेक सर्वंच पुरुषांना असते आणि नसली तरी बाकीचे उत्साही लोक ती करून देतात. या सर्वांकडे आपण एक अटळ अशी शोकांतिका किंवा पाप म्हणून पाहू शकतो. मी त्याला व्यवसाय म्हणून पाहतो.
तुम्हाला जर चांगले बदल करायचे असतील तर पहिली गोष्ट म्हणजे जगात काही वाईट गोष्टी आहेत याचा स्वीकार करणं. त्याहीपेक्षा, तुमचा दृष्टीकोन इतरांसारखाच असेल असं नाही ही गोष्ट मान्य करणं. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला वाईट वाटतात त्या इतरांना तशा वाटतीलच असं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जग बदलू शकत नाही हे मान्य करणं. तुम्ही फारतर तुम्हाला स्वतःला आणि झालंच तर मग आसपासच्या काही लोकांना बदलू शकता. काही प्रमाणात परिस्थितीही बदलू शकता. पण पूर्णपणे कधीच नाही. अशा ज्या काही अटळ परिस्थिती आहेत त्यापैकी वेश्या व्यवसाय एक आहे. तो माणसांच्या सुरूवातीपासून होता, आजही आहे आणि यापुढेही राहील जोवर माणसं आहेत. हे जगच नष्ट झालं किंवा स्त्रीपुरुष दोघांचीही लैंगिक वासनाच संपली तरच हा व्यवसाय संपुष्टात येईल अन्यथा नाही. एकदा हे मान्य केलं की मग आपण या गोष्टीकडे व्यावहारीक दृष्टीनं पाहू शकतो. इथं सामाजिक व मानवी दृष्टीकोन नंतर येतो. कारण हा शेवटी व्यवसाय आहे. आपण हे मान्य करायलाच हवं की यात पैशांची उलाढाल होते, यावर अनेकांची पोटं अवलंबून आहेत. यावर विरोधाचा स्वर येईलच की हा काही इतकाही मोठा व्यवसाय नाही की जो बंद केला तर फार नुकसान होईल. त्यांना अन्यत्र कामं देता येतील. त्यांचं पूनर्वसन करता येईल. नक्की करता येईल. पण मग विचार करा की हे आजवर का घडलं नाही. त्याचं कारण आपल्या सामाजिक धारणांमध्ये आणि माणसांच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या मैथुन या गरजेत दडलं आहे.
संबंधित लेख :

मैथुन ही स्त्रीपुरुषांची नैसर्गिक गरज आहे. पण आपल्या समाजात लैंगिक भावनांकडे मोकळेपणानं पाहणं आपण कधीच बंद केलंय. कधीकाळी या देशांत मुक्त लैंगिक व्यवस्था होती, स्त्रियांना आपल्या लैंगिक गरजांची पूर्ती करण्यावर बंधने नव्हती. पुरुषांनाही आपल्या इच्छा बोलून दाखवता येत असत. लैंगिकता ही हीन निषिद्ध गोष्ट नव्हती. त्याविषयी विपूल साहित्य उपलब्ध होतं. काळाच्या ओघांत लैंगिकता ही लज्जेची बाब मानली जाऊ लागली आणि तिच्यावर सामाजिक बंधनं टाकण्यात येऊ लागली. परिणामी लैंगिक भावनांचं दमन होऊ लागलं, त्यांच्या शमनाचे उपाय मग शोधण्यात येऊ लागले. त्यापैकी एक होता बळजबरीचा उपाय आणि दुसरा होता राजीखुशीचा व्यवहार. पैसे द्या आणि उपभोग घ्या. वेश्या व्यवसाय कसा जन्माला आला, त्यात सामाजिक हीनता किती आहे याची चर्चा आता करण्यांत अर्थ नाही. ते सारं करून झालं आहे. हा व्यवसाय नष्ट होणार नाही हे निश्चित, कारण आपली सामाजिक परिस्थिती ही मुक्त लैंगिकतेला बाधक आहे. ती ना पुरुषांच्या लैंगिक गरजेचा विचार करते ना स्त्रियांच्या. स्त्रियांची जी उपासमार होते त्याची कल्पनाही करता येत नाही. पुरुषांना निदान काही मार्ग तरी उपलब्ध आहेत. उद्या जर वेश्या व्यवसायही बंद झाले तर जो अनाचार माजेल तो भयानक असेल. हे टाळायचं असेल तर दोन मार्ग आहेत. पहिला आपल्या समाजाची व लोकांची लैंगिकतेविषयीची मानसिकता व धारणा बदलणे. ते अर्थात सहजसाध्य नाही. निदान सध्या तरी ते होईल असं वाटत नाही. याचा अर्थ आपण तसे प्रयत्न करणं सोडावेत असं काही नाही. पण ते करतानाच दुसरा जो मार्ग आहे आणि जो अधिक व्यवहारी आहे त्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. तो आहे वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्याचा.
वेश्या व्यवसाय कायदेशीर करून वेश्यांची सध्याची जी परिस्थिती आहे त्यात अधिक सुधारणा करणं याविषयी सध्या आपल्या इथे बरेच लोक, संस्था काम करत आहेत. या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून कोलकात्याची सोनागाछी ही वेश्या वसाहत जी आशिया खंडातील सर्वांत मोठी वेश्या वसाहत आहे, काही वर्षांपासून यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांचे मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. पहिला आणि मुख्य मुद्दा म्हणजे हा फक्त व्यवसाय आहे. ग्राहक पैसे देतात त्याबदल्यात त्यांना काही काळासाठी आमचं शरीर आम्ही देतो. त्यानंतर त्यांचा आमचा संबंध संपतो. ग्राहकाला पुन्हा गरज भासली तर तो पुन्हा येतो पैसा देतो व त्याला हवा तो शरीर नावाचा माल निवडतो. आम्हाला यात काही गैर वाटत नाही. ग्राहकांना गैर वाटत नाही. मग कायद्याला यात काय अडचण आहे? आमची यात भावनिक नाही तर व्यावहारीक गुंतवणूक असते. आमच्या शरीराचा वापर करून आम्ही पैसे कमावले तर त्यात वाईट काय? खेळाडू त्यांच्या शरीराचा वापर करीत नाही का? अभिनेते, मॉडेल्स त्यांच्या शरीराचा वापर करत नाही का? ही फक्त त्याच्या पुढची एक पायरी आहे जी दोघांच्याही संमतीने होते. या व्यवसायात प्रत्येकजण नाइलाजानंच येतो असं का वाटतं कोणाला? ती बाई तिच्या इच्छेनंही येऊ शकते. तिला इतर काही काम करता येत नसेल आणि तिला जर स्वतःचा व आपल्या लोकांचा सांभाळ करण्यासाठी पैसा कमवायचा असेल तर तिने हा व्यवसाय निवडला तर त्यात चूक काय? सरकारनं उद्या हा व्यवसाय बंद केला तर ते आमचं पुनर्वसन कसं करणार? समाज आमचा स्वीकार करणार का? आणि आम्हाला जर हाच व्यवसाय करायचा असेल तर त्यात तुमची आडकाठी का? आम्ही सज्ञान आहोत आणि आम्हाला घटनेनं हवं ते काम करण्याचा अधिकार दिला आहे तर कायदा आम्हाला का अडवतो? या प्रश्नांची उत्तरं सर्वांनीच शोधण्याची गरज आहे.

वेश्या व्यवसायाला कायदेशीर करणं याचा अर्थ त्याला व्यवसायाचे नियम लावणं असा होतो. तिथे मग काम करणाऱ्या कर्मचा-यांना त्यांचे कायदेशीर अधिकारही मिळतील. त्यांच्यावरच्या अत्याचारांविरोधात त्यांना न्यायालयांत दाद मागता येईल, त्यांना अन्य सुविधा मिळतील. हे कदाचित वाचायला एखाद्याला भीषण वाटू शकेल पण जरा विचार करा की आपल्या दांभीकतेमुळे यांचं जितकं नुकसान होतंय त्यापेक्षा कितीतरी जास्त फायदा त्यांना कायद्याचं संरक्षण देण्यानं होईल. तेव्हा मग अल्पवयीन मुलींना या व्यवसायात आणता येणार नाही. वेश्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल. त्यांना व्यवस्थित पगार देता येईल. किती काळ काम करावं यांचे नियम येतील. त्यांना अन्यायाविरोधात पोलिसांत तक्रार करता येईल. ग्राहकांना काही नियम बांधून देता येईल ज्याचं त्यांना पालन करावं लागेल. केवळ पैसा देत आहेत आणि त्या वेश्या आहेत म्हणजे त्या माणसं नाहीत या भावनेतून त्यांच्यावर जे अत्याचार केले जातात त्याला आळा बसेल. एक स्त्री म्हणून तिच्या सन्मानाचं रक्षण होईल. तिला तिच्या भावना व अधिकार यांची जागरुकता येईल. वेश्येवर बलात्कार कसा काय होऊ शकतो असले घृणास्पद आणि माणूसकीहीन प्रश्न विचारणा-यांना आळा बसेल. वेश्यांच्या मुलांना शिकण्याची संधी मिळेल. त्यांच्या मुलांना समाजात वावरता येईल. त्यांच्या मुलींना अधिक चांगलं जीवन जगण्याचा पर्याय मिळेल.
दुसरा भाग आहे त्यांना सामाजिक व मानवीय सन्मान देण्याचा. तुम्ही जर निखळ माणूसकी मानता असा जर तुमचा समज असेल, स्त्रियांचा तुम्ही सन्मान करता असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या वेश्यांना, अन्य व्यावसायिकांना देता तसाच मान द्याल, अन्य स्त्रियांना देता तसाच सन्मान त्यांनाही द्याल. ही तुमची कसोटी आहे. वेश्या, व्यवसाय करतात म्हणून त्या सर्वकाळ उपलब्ध असतात असं नाही हे समजून घ्यायला हवं. त्यांच्यात एक प्रेयसी दडलेली असते, त्यांनाही लग्न करायचं असतं, त्यांनाही आई व्हायचं असतं आणि त्यांच्या या भावना इतर सामान्य जगणं जगणाऱ्या स्त्रियांपेक्षा वेगळ्या किंवा कमी महत्त्वाच्या नसतात. परिस्थितीमुळे त्यांच्यात आपल्याला न सोसणारा स्वभाव तयार झाला असेल पण त्यांच्या आत एक माणूस दडलेला आहे याचा विसर पडता कामा नये. आपण आधी या गोष्टी मान्य करूयात आणि निदान त्यांची पुढची पिढी तरी यात येणार नाही यासाठी प्रयत्न करूयात.