- प्रतिक पुरी
माकडांच्या टोळीत एक मुख्य नर असतो, टोळी प्रमुख. टोळीतील अन्य सर्व नर त्याच्या धाकात असतात. टोळीतील सर्व माद्या फक्त या मुख्य नराच्या असतात. त्यांच्यावर फक्त हा नरच अधिकार गाजवत असतो. ज्यात लैंगिक अधिकारही आलाच. जो या टोळीसाठी महत्त्वाचा असतो. मुख्य नराला टोळीतील कोणतीही मादी चालते. त्यांचे रक्ताचे संबंध कोणतेही असले तरी त्यानं काहीही फरक पडत नाही. तसेही हे संबंध माकडांमध्ये नसतातच. त्यामुळे मानवी नजरेतून पाहिलं तर हा टोळी प्रमुख आपल्या पाच-सहा बायका आणि त्याच्या मुलींसोबतही लैंगिक संबंध ठेवतो. त्याच्या बहिणी यातून सहसा सुटतात. त्याचं कारण मात्र वेगळं आहे. या टोळी प्रमुखाला टोळीतील अन्य वयात येणारे व लैंगिक सुखासाठी आसुसलेले नर आव्हान देत असतात. त्यांच्याशी मुख्य नराची येता जाता भांडणं होत असतात. त्यांतून अनेक धोकादायक नरांना टोळीतून हाकललं जातं, प्रसंगी मारलंही जातं. बाकीचे उरलेले नर याच्या धाकात राहतात. जे नर बाहेर पडतात ते संधीच्या शोधात असतात. योग्य वेळ येताच ते पुन्हा एखाद्या उतार वयाच्या नराशी झुंझतात त्याला हरवतात, मारतात आणि त्या टोळीचा कब्जा घेतात. टोळीतील सर्व माद्या त्याला लागू होतात. आधी म्हटलंय, की टोळी प्रमुखाच्या बहिणी त्याला सहसा भोगायला मिळत नाहीत कारण आधीच्या टोळीप्रमुखाकडून त्याची हकालपट्टी झालेली असते. तो त्याच्या सामर्थ्यानं नवी टोळी बनवतो तिथं या बहिणी नसतात. पण तसं झालं नाही तर तो त्यांनाही सोडत नाही.
हे सारं वाचायला कदाचित घृणास्पद वाटेल पण हे सत्य आहे. माकडांच्या अशाच टोळ्यांमधून माणसांचा जन्म झालेला आहे. त्याच्या लैंगिक वृत्ती या आजही तशाच आहेत. पण आपण माणसं आहोत त्यामुळे माकडांपेक्षा आपल्यांत वेगळेपणा निश्चितच आहे. वेगळेपणा आहे तो माणसांवर होणाऱ्या चांगल्या संस्कारांचा. माणसं केवळ शारिरीकदृष्ट्याच नाही तर मानसिकदृष्ट्याही विकसीत होत असतात. हजारो वर्षांपासून आपल्यावर चांगले वागण्याचे सामाजिक जीवनात योग्य पद्धतीने जगण्याचे संस्कार केले जात आहेत त्यामुळे आपली मानसिकता मोठ्या प्रमाणात बदलली आहे. त्यामुळेच माणूस हा निव्वळ प्राणी नसून तो एक सामाजिक, सांस्कृतिक, बुद्धिमान, समंजस प्राणी आहे. पण असं असलं तरी या सर्व थरांच्या आत त्याचं पाशवी रूप आजही टिकून आहे. त्याच्या आदिम भावना आजही अबाधित आहेत. यातली सर्वांत प्रबळ भावना आहे लैंगिकतेची. पुरुषांमध्ये ती आजही तितक्याच उत्कटतेने वास करत आहे.

निसर्गतः पुरुष हा कायम नर असतो आणि सर्व स्त्रिया त्याच्यासाठी केवळ माद्याच असतात. हे वाक्य थोडं तीव्र वाटेल पण तेच सत्य आहे. पुरुषाच्या दृष्टीनं सर्व स्त्रिया या उपभोगक्षम असतात. त्यामुळेच एका स्त्रीनं त्याचं कधीच समाधान होत नाही. मानसिक आणि शारीरिक पातळीवर त्याला कायम वेगवेगळ्या स्त्रियांचा सहवास हा हवा असतो. तो जोवर आदिम अवस्थेत होता तोवर त्याच्या या भावना तो उघडपणे व्यक्त करायचा. त्यासाठी लढायचा आणि जिंकल्यावर सर्व माद्या त्याला शरण जायच्या. आता तसं होत नाही. कारण या मधल्या काळात माकडांचं प्राण्यामधून एका संस्कारी विचारी माणसांत रुपांतर झालं आहे. त्यात जसा पुरुषांचा समावेश आहे तसाच स्त्रियांचाही समावेश आहे. पण काहीअंशी आतलं प्राणीपण अजूनही टिकून आहे. पुरुषांत ते जास्त प्रमाणात टिकून आहे कारण मादी मिळवण्याची त्याची आदिम लालसा, उपभोग घेण्याची त्याची तीव्र इच्छा ही अजून पूर्णपणे विझलेली नाही. माणसांच्या बाबतीत एक गोची अशीही आहे, की त्यांच्यात इतर प्राण्यांमध्ये असतो तसा संभोगाचा विशिष्ट काळ नसतो.
ते केवळ वंशवाढीसाठीही संभोग करत नाहीत. या दोन गोष्टींमुळे पुरुषांची अडचण झाली आहे. आणि अर्थातच स्त्रियांचीही. वर्षाच्या सर्व दिवसांत लैंगिक भावना जागृत असल्यामुळे आणि तिचा संबंध सुखाशी जोडला गेल्यामुळे हे सुख मिळवण्यासाठी सर्व वयात आलेले पुरुष उत्कंठीत असतात. आपण आता टोळ्यांमध्ये राहत नसल्याने हे सुख मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. लग्न किंवा हव्या त्या स्त्रीची पूर्वसंमती मिळणं या दोन मुख्य अटी आहेत. ज्यांना त्या पूर्ण करता येतात त्यांचं लैंगिक आयुष्य सुरू होतं. अर्थात एकाच स्त्रीनं त्यांचं समाधान होतं असं नाही. एकीसोबत राहत असतानाही अन्यांचा विचार त्यांच्या मनात असतोच आणि संधी मिळताच ते आपलं समाधान करूनही घेतात.
संबंधित वृत्त :
पण ज्यांना या संधी मिळत नाहीत, जे या अटी पूर्ण करू शकत नाहीत अशा पुरुषांचीही संख्या प्रचंड असते. ते मग यातनं वेगळे मार्ग शोधतात. वेश्यावृत्ती हा त्यातला एक महत्त्वाचा मार्ग. दुसरा आहे हस्तमैथुनाद्वारे स्वसमाधान करून घेणे. तिसरा आहे पुरुषांपासूनच स्वतःचं समाधान करून घेणे. ब्रह्मचर्य हाही एक मार्ग आहे. पण यातूनही अनेक पुरुष असमाधानीच राहतात जे मग जबरदस्तीनं हे सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात. आपली सध्याची सामाजिक आखणी याला प्रतिकूल आहे त्यामुळे हे जबरदस्तीचं सुख किंवा एकूणच लैंगिक सुख मिळवण्यात पुरुषांवर अनेक बंधनं लादली गेली आहेत. माणसांनी कौटुंबिक व्यवस्थेचा, लग्न संस्थेचा स्वीकार केल्यानंतर रक्तसंबंधातल्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवणं हे अनैतिक मानलं जाऊ लागलं. त्याचा परिणाम असा झाला, की पुरुषांना त्यांच्या कुटुंबातल्या हक्काच्या स्त्रियांवरचा अधिकार गमवावा लागला. लैंगिक संबंधांसाठी त्यांना बाहेरच्या स्त्रियांकडे वळावं लागलं. लग्नाला आधी शरीरसंबंध असं म्हटलं जायचं हे इथं लक्षात ठेवावं लागेल. याचा परिणाम असा झाला, की पुरुषांमध्ये स्त्रियांना मिळवण्याची स्पर्धा अधिक तीव्र झाली. मुक्त लैंगिक संबंधांना मान्यता नसल्यामुळे, या संबंधांना एकूणातच चोरटेपणा आला. त्याला पाप मानण्यात येऊ लागलं. स्त्री ही पुरुषांच्या, कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनली आणि यात अधिक भर पडली. स्त्रीचं स्वातंत्र्य पुरुषांच्या वर्चस्वाखाली नाहीसं झालं आणि तिची परवड सुरू झाली. यात लैंगिक स्वातंत्र्याचाही समावेश होता. तिच्या इच्छा-आकांक्षांना कोणतंचं मूल्य न उरल्यामुळे तिची तर परवड झालीच पण पुरुषांचीही झाली. स्त्रीला तिच्या इच्छेनुसार हवं ते लैंगिक सुख मिळवण्यावर कठोर मर्यादा आल्या. पुरुषांना त्यामुळे हवी ती स्त्री मिळवणं कठीण झालं. लैंगिक संबंधांना नैतिकतेच्या चारित्र्याच्या कसोट्या लावल्या गेल्यामुळे तर अधिकच वासलात लागली. एका नैसर्गिक भावनेचा माणसांनी पार चोळामोळा करून टाकला. त्याचे परिणाम आपण आता भोगत आहोत.

माणसांच्या माणूस होण्याच्या प्रक्रियेत स्त्री अधिकाधिक स्वतंत्र होत गेल्यामुळे तिच्या इच्छांना सर्वोच्च स्थान लाभलं. निदान तत्त्वतः तरी. दुसरीकडे पुरुषांची लैंगिक वृत्ती पूर्णपणे क्षमली नाही. यामुळे झालं काय की स्त्रिया प्रत्येक पुरुषाशी रत होण्यास नकार देऊ लागल्या आणि पुरुष त्यांना हव्या असलेल्या व हव्या तितक्या स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवता न आल्यामुळे लैंगिक संबंधात आग्रही व आक्रमक होऊ लागले. याची परिणती झाली बलात्कारांत. लैंगिकतेचे इतर सर्व पर्याय हाताळल्यानंतर पुरुष बलात्काराकडे वळू लागले हे ध्यानात ठेवावं लागेल. या लैंगिकतेचा संबंध प्रेमाशी, मालकी भावनेशी, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कारणांशी आल्यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागूंतीचं बनलं आहे. वयात आलेले सारे पुरुष, काही अपवाद वगळता, सर्व काळ पुरुषच असतात आणि त्यांच्या लैंगिक भावना जागृतच असतात. केवळ संयमापोटी, विचारीपणामुळे पुरुष हे आपल्या या भावनांना काबूत ठेवत असतात. ही कठीण गोष्ट आहे पण ती त्यांनी साध्य केली आहे. उघडपणे तरी ते तसं वागतात हे सत्य आहे. आत त्यांच्या मनांत काय विचार असतील हे सांगण्याची गरज नाही. ही त्यांची नैसर्गिक गोची आहे. ती स्त्रियांनी मान्य करायला हवी आणि त्यांच्याकडे सहानुभूतीनं पहायला हवं. पुरुषांच्या लैंगिक आक्रमकतेला आपल्या समाजानं ज्या चूकीच्या लैंगिक पद्धती अवलंबिल्या आहेत त्या अधिक जबाबदार आहेत. याचा अर्थ असा नाही की बलात्काराचं समर्थन केलं जावं. कारण आपण शेवटी माणसं आहोत. आपण स्त्री-पुरुषांना व्यक्ती मानतो, त्यांचं स्वातंत्र्य त्यांचे अधिकार आपण मान्य करतो. त्यात सर्वांत महत्त्वाचा अधिकार हा लैंगिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. स्त्रीच्या या लैंगिक स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा कोणताही अधिकार पुरुषांना नाही. त्यामुळे लैंगिक अत्याचाराचं समर्थन होऊ शकत नाही. पण याचा अर्थ आपण पुरुषांच्या लैंगिक कुचंबनेला दूर्लक्षिक करावं असाही होत नाही. स्त्रियादेखिल मोठ्या प्रमाणात या लैंगिक कुचंबनेला बळी पडतात. योग्य त्या वयात लैंगिक सुख न मिळाल्याचे भीषण शारिरीक व मानसिक परिणाम दोघांनाही भोगावे लागतात. सामान्य माणूस या परिणामांनी मोडून पडतो.
हे टाळायचं असेल तर आपल्या सामाजिक मानसिक लैंगिक धारणांमध्ये क्रांतिकारी बदल घडण्याची गरज आहे. मुक्त पण जबाबदार लैंगिक संबंधामुळे लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात टाळल्या जाऊ शकतात. पण काही घटना मात्र टाळल्या जाणार नाहीत कारण पुरुष हे केवळ लैंगिक सुखासाठीच बलात्कार करत नाहीत तर बऱ्याचदा त्यामागे त्या स्त्रीला किंवा तिच्या कुटुंबाला धडा शिकवण्याचाही उद्देश त्यामागे असतो. स्त्रीच्या कौमार्याचा संबंध तिच्या, तिच्या कुटुंबाच्या व तिच्या राष्ट्राच्या अब्रुशी जोडला गेल्यामुळेही तिच्यावर बळजबरी केली जाते. तिचं लैंगिक शोषण व्हायला आर्थिक राजकीय कारणंही जबाबदार असतात. याचा अर्थ दुर्देवानं हे प्रकार पूर्णपणे कधीच बंद होणार नाहीत. ते कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो, बलात्कारीत स्त्रियांचा अपमान न करता त्यांच्याशी समान पातळीवरच वागून आपण त्यांच्या या वेदना कमी करु शकतो, बलात्कार म्हणजे कलंक, अपमान, जगण्याचा शेवट या समजातून बाहेर येऊ शकतो, या सर्वांचा एकत्रित परिणाम चांगला असू शकेल. याकामी अर्थातच पुरुषांना पुढाकार घ्यावा लागेल. स्त्रियांनाही तो घ्यावा लागेल. समाजालाही स्वतःला बदलावं लागेल. तरंच याबाबतीत आपण काही करू शकतो.