वसुंधरेला पडलेलं निरागस स्वप्न : रानकवी यशवंत तांदळे

त्याचं शिक्षण शून्य. लौकिकार्थाने साहित्याचा संस्कारही शून्यच. तरीही त्यांच्या ठायी मातीशी नातं सांगणाऱ्या, रानावनात फुलणाऱ्या कवितेचं सज्जड भान होतं. उत्स्फूर्तपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण होता. याच गुणांच्या बळावर हा गावरान गडी रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. अशा या शीघ्ररानकवी असलेले यशवंत तांदळे यांचा आज स्मृतिदिवस त्यानिमित्ताने...

  • टीम बाईमाणूस

एक निरक्षर असणारा, गबाळा दिसणारा माणूस मेंढरामागून थेट साहित्यिकांच्या मेळात येतो. तसाच म्हणजे मळलेली कापडं, खांद्यावर घोंगडं घेतलेला एक मेंढका स्टेजवर “कुंडका” (कविता) म्हणून जेव्हा मैदान मारतो तेव्हा त्याचा रानकवी म्हणून महाराष्ट्रात गाजावाजा होतो. कराडला ते मैदान होतं 1957 च्या 51 वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं. तो कवी म्हणजे आपला रानकवी यशवंत तांदळे होय… रानकवींचा जन्म कडेगांव तालुक्यातील आसद (जि. सांगली) या गावी लखू तांदळे व हौसाबाई (काहींच्या मते मायाक्का हे नाव) या दाम्पत्याचा पोटी झाला.

शेळ्या-मेंढ्या राखता राखताचं गुणगुणायची सवय लागली. धनगरी ओव्या म्हणणं हे त्यांच्या जाणिवेनेणिवेत होतंच. त्यामुळे त्यांना ओव्या म्हणायचा छंद जडला. निसर्गाशी, पशुपक्षाची एकरूप होणं त्याच्याशी तादात्म्य पावणं हा मेंढपाळाचा धर्मच…

मेंढरू माझं मैतर गा मैतरं…
माणसापरास लई बरं व्हं, लई बरं…

रानकवींकडे गाण्यात (कवितेत) कोडं घालून ते कवितूनच सोडवणे याची हातोटी होती. नाळ तुटल्यापासून समृद्ध अश्या स्त्री गीतांच्या मौखिक वाङमयातून तयार झालेल्या मुसीमुळे ते आपल्या कवितेचं श्रेय आईलाच देतात…

आई हाय हो ज्ञानाचा मळा,
तिनं फुलविला माझा गळा,
तिच्या पायावर वाकवूया मान,
आई मला दे गं तुझं वरदान ..!

साधी सोपी परंतु नेमकं बोलणारी कविता लिहायचे. आता हेच बघा ना…

दारूबंदी केली देशाला
दारूबंदीचा कायदा आला
दिलं हाप्तं बांधून पोलिसाला
कसा इल कायदा आमलाला ?

माझी इनंती सरकाराला
ताकिद करा पोलिस खात्याला,
हाल आलं गोरगरीबाला
पैसा चालला दारू गुत्त्याला
नाही वेळंव चुल बघा पेटली
बायका पोरांना गरीबी भेटली ||

त्यांच्याकडे दुरदृष्टीही होती अगदी जग हातात आलेल्या आजच्या दिवसालाही लागू होणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या. बोलता बोलता तत्वज्ञानही कवितेतून सांगून जायचे. “नवं दिवस” या कवितेत म्हणतात,

नवं दिवस जनतेला दावणारं,
मिळलं स्वातंत्र्य टिकवून ठेवणारं,
महात्मा गांधीनं सांगितलं सारं,
जातीभेद सोडून द्यावा पारं !

आमी भरतो पाणी एका हिरीवरं,
एका जागी सगळीजणं जेवणारं,
नवं दिवस जनतेला दावणारं,
मिळलं स्वातंत्र्य टिकवून ठेवणारं ||

याच्याही पुढं जाऊन ते सर्व महापुरूषांचं कार्य व त्यांचा संदेश लिलया सांगतात…

रानकवी या निरक्षर माणसाच्या कवितेत अक्षरन् अक्षर हजरजबाबीपणे साक्षरता बोलत होती. त्यात अगदी बेरकीपणाने मार्मिकता व समाजातील व्यंगांचा मिस्किलपणा होता. जिथं सुचेल तिथंच बाळंत होतं होती त्यांची कविता. स्वतः निरक्षर असल्याने सुचलेली कविता पाचवी न पुजता तीथंच विरत होती. असे किती विरले कवितांचे ढग याची गिणतीच नाही. नुसत्या कविताच लिहिल्या नाहीत तर त्यांनी तत्कालीन घटनांवर पोवाडे ही रचले, पाळणा लिहिला. असा हा धुरंधर कवी माणूस. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची काही कवितांत “नाममुद्रा” असायची.

रानकवी यशवंत तांदळे यांच्या काही कविता गावातल्या एका शाळकरी मुलानं लिहून ठेवल्या होत्या. एक दिवस एक माणूस टॅक्सी घेऊन आला. आल्या आल्या त्यानं रानकवीच्या घरासमोर साष्टांग नमस्कार घातला. त्याचं ते प्रेम पाहून सगळेच भारावले. त्यानं कविता वाचायला मागितल्या. रानकवीच्या अडाणी बायकोनं ती वही त्याला दिली. मग पुस्तक छापायचं म्हणून ती वही घेऊन गेला, ते गेलाच. शेतमजुरी केल्याशिवाय हातातोंडाची गाठ पडणार नाही, असं दारिद्र्य तांदळे यांच्या घरात वस्तीला आलेलं. मग वही घेऊन गेलेल्या त्या माणसाचा शोध घेणं त्यांच्या बायकोला जमलं नाही. ते पुस्तक आजतागायत निघालेलं नाही. आता त्यांची बायकोही हयात नाही. त्यामुळे रानकवींच्या कवितेचं बाड घेऊन पळालेला ‘तो’ सापडणं मुश्कील आहे.

1975च्या साहित्य संमेलनानंतर सलग आठ वर्षं चर्चेत राहिलेल्या रानकवी तांदळे यांच्या आयुष्याची शोकांतिका झाली. त्यांच्या मुत्यूबाबत लोकांच्यात अनेक चर्चा आहेत. पोपट म्हणतो, ‘बापूंचं सगळीकडं नाव हुयाला लागलं, त्यांना पैसं मिळायला लागलं, ते पुढाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला लागलं, हे काहींना बघावलं न्हाय. बापूंना पान खायची सवय होती. त्यांना पानातून शेंदूर खायला दिला. त्यामुळं बापूंचा आवाज यायचा बंद झाला. आवाज बंद झाल्यावर त्यांचं कार्यक्रम बंद झालं. बापू खचलं. कोणीतरी वैऱ्यानं डाव साधला. पुन्हा बापू घरातच बसलं, त्यास्नी मधुमेह झाला. त्यातच बापू संपलं.’

शिवारातील कवितांची रानफुलं फुलवणारा प्रतिभावान/प्रतिभावंत हा रांगडा रानकवी व त्याची कविता कुठेच दिसत नाही किंवा कुणाकडे असेल तोही समोर येतं नाही हे महाराष्ट्राचं प्रामुख्यानं देशाचं मोठ्ठं दुदैवं आहे ‌…

(साभार : संतोष वाघमोडे)

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here