उसतोड कामगार गावी परतताना

ऊसतोड कामगारांचे प्रश्न सर्व माध्यमातून मांडताना साखर कारखानदार म्हणजे खलनायक, बलात्कार, हिंसा, दारिद्र्य, मुलांची आबाळ असे चित्र उभे करण्यात आलेले आहे. विविध माध्यमातून येणारे वास्तव हे सत्य नसून अर्ध सत्य असते. याचे भान त्या माध्यमांद्वारे साखर कारखानदारीचे चित्र मनात निर्माण करणाऱ्या लोकांना नसते. त्यामुळे साखर कारखानदारी आणि त्याचे चालक यांना व्यवस्थित बदनाम करून अनेकांनी आपले स्वार्थ साधलेले दिसतात.

  • राहुल हांडे

काल-परवा आमच्या सहकारी साखर कारखान्याचा नवरात्रीच्या आसपास पेटलेला बॉयलर अखेर शांत झाला. आमच्या परिसरात बॉयलर शांत झाल्यावर एक वेगळीच लगबग पाहायला मिळते. कारखान्याच्या परिसरात राहणाऱ्या आमच्यासारख्यांना ही लगबग विशेष करून जाणवते. आजकाल ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्यांचा वापर 80 टक्के कमी झाला असल्यामुळे ट्रॅक्टरची गर्दी वाढलेली दिसते. आजकाल एका ट्रॅक्टरला जोडून जेव्हा अनेक बैलगाड्या कारखान्याकडे जाऊ लागतात तेव्हा दोन-तीन दिवसात कारखाना बंद होणार हे कळून चुकते.

तरीही काही जण आपल्या बैलांसोबत आपली गाडी कारखान्यात जमा करून येतात. परतताना गुलाल टाकलेली बैल जोडी आणि त्यांच्यासोबत काही चाललेला मालक पाहिला की हा कारखान्यात गाडी जमा करून आला हे लक्षात येते. बैलांवर ज्याप्रमाणे गुलाल टाकला जातो त्याप्रमाणे ट्रॅक्टरचे मालक रंगीबेरंगी रिबनिनांनी आपले ट्रॅक्टर कारखान्यावरील अखेरच्या फेरीच्या वेळेस सजवून आणतात. कारण त्यांना आपल्या ट्रॉलीत आपले कुटुंब परत आपल्या गावाकडे न्यायचे असते. बैलगाडीवाला असो की ट्रॅक्टरवाला प्रत्येक ऊसतोड कामगाराच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद यावेळी ओसांडून वाहताना दिसतो. हे उसतोड कामगार प्रामुख्याने बीड, जालना, औरंगाबाद आणि चाळीसगाव-नांदगाव या भागातून आलेले असतात.

कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होण्याच्या दरम्यान यातील अनेक जण मुकादमाकडून ॲडव्हान्स घेऊन बोकड पार्टी करून निघालेले असतात. गाळप हंगाम संपवून परततात तेव्हा गावांमध्ये जत्रा-यात्रा हंगाम सुरू झालेला असतो. आमच्या परिसरात कारखाना असल्यामुळे कारखान्याने आमच्यापासून जवळच काही लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली असते. म्हणजेच पाचटाचे खोपटं उभारायला जागा दिलेली असते. तेथे पाण्याची सोय असते. त्याला ऊसतोडीवाल्यांचा तळ किंवा ठेपा असे म्हटले जाते. कारखान्याच्या नियोजनुसार तालुक्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी असे तळ दिसून येतात. प्रत्येक तळासोबत ऊसतोड कामगारांच्या गावातील एखादा किराणा दुकानदार देखील आलेला असतो. त्याने तळावर पत्रापाचट बांबू यांच्या साह्याने दुकान उभारलेले असते. ऊसतोड कामगारांची आनंदी मुले खाऊ घेण्यासाठी या दुकानावर जाताना दिसतात. तेव्हा हे दुकान अधिक प्रकर्षाने लक्षात येते. आमच्या तालुक्यातील ह्या वर्षानुवर्षांची परंपरा आहे. त्यामुळे तळाच्या आसपासचे स्थानिक शेतकरी आणि दरवर्षी येणारे पाहुणे यांच्यात देखील ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत.

ऊसतोडीवाल्यांच्या तळावर जीवन कष्टमय असले तरी एकूण वातावरण आनंदी असते. ते फक्त काही मराठी चित्रपटांमध्ये, काही कथा कादंबऱ्यांमध्ये, छायाचित्रकारांच्या फोटोंमध्ये आणि ऊसतोड कामगारांची प्रचंड कणव दाखवणाऱ्या समाजसेवकांच्या लेख-मुलाखंतीमध्ये अत्यंत भयानक असते. ऊसतोड कामगारांचे प्रश्न या सर्व माध्यमातून मांडताना साखर कारखानदार म्हणजे खलनायक, बलात्कार, हिंसा, दारिद्र्य, मुलांची आबाळ असे चित्र उभे करण्यात आलेले आहे. आपला कोणताही प्रकार आमच्या भागात आम्ही तरी ऐकलेलं नाही किंवा पाहिलेला नाही. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. कुठे एखादी घटना घडते याचा अर्थ ती सार्वत्रिक मानवी असे देखील नाही.

मात्र ह्या अपवादांवरच राजकारण, समाजकारण छायाचित्रीकरण, वार्तांकन साहित्यकारण चालत असते. कारखाना सुरू झाल्यानंतर आमच्या तालुक्यातील वाहतूक कोंडी अथवा वाहतुकीची अडचण होते. त्याबद्दल अनेक जण बोंब मारत असतात; परंतु या कारखान्यावर आणि तो चांगला चालत असल्यामुळे आपल्या तालुक्याचे केवढे मोठे अर्थकारण उभे आहे. याचे भान अशा लोकांना नसते. या वाहतूक कोंडीमुळेच आपल्या तालुक्याच्या आर्थिक नसा मोकळ्या आणि प्रवाही झाल्या आहेत. हे अशा लोकांच्या लक्षात येत नाही. विविध माध्यमातून येणारे वास्तव हे सत्य नसून अर्ध सत्य असते. याचे भान त्या माध्यमांद्वारे साखर कारखानदारीचे चित्र मनात निर्माण करणाऱ्या लोकांना नसते. त्यामुळे साखर कारखानदारी आणि त्याचे चालक यांना व्यवस्थित बदनाम करून अनेकांनी आपले स्वार्थ साधलेले दिसतात.

महाराष्ट्रातल्या अत्यंत दुष्काळग्रस्त भागाला वर्षातील सहा सात महिने रोजगार देण्याचे काम ही साखर कारखानदारी करते. याचे भान कोणालाही नाही. साखर कारखानदारांनी ऊस तोडी कामगारांची कशी व्यवस्था करावी? त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची सोय कशी करावी? यावर आपापल्या दुकानाचा गल्ला भरणारे अनेक जण आहेत. भारतासारख्या खंडप्राय व विकसनशील देशात विकास भाषणांमधून आणि घोषणांमधून शक्य नाही. हे एव्हाना शहाण्यांच्या लक्षात आलेच असेल. यापेक्षा हे ऊसतोड कामगार ज्या भागातून येतात तेथील प्रश्न कसे सोडवावेत याच्यावर लक्ष केंद्रित करणे. हे अधिक सकारात्मक होऊ शकते. त्यांच्या भागात त्यांना रोजगार उपलब्ध झाला किंवा त्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध झाले,तर ते ऊस तोड करायला कशाला येतील. या भागातील लोक जगावे यासाठी साखर कारखाने ऊस तोडीचे यंत्र येऊन देखील त्याचा वापर करत नाही. हे साखर कारखानदारांचे चांगुलपण कोणाच्याही लक्षात येत नाही. याबद्दल सर्व थोर समाजसेवक विचार करत नाही किंवा बोलत देखील नाही किंवा सोयीस्करपणे टाळतात.

खरे पाहिले तर समाजसेवेत करिअर करण्यासाठी देखील साखर कारखानदारी रेडिमेड क्षेत्र म्हणून अनेकांसाठी उपयुक्त झालेले आहे. ऊसतोड कामगारांच्या तळावरील खोपट दाखवून त्यांच्या राहण्याच्या गैरसोयीबद्दल अनेक प्रवचन दिले जातात. मात्र त्यांच्या खोपटांना लावण्यासाठी कारखान्याने दिलेला प्लास्टिकचा कागद विकून हे लोक पार्टी करतात यावर बोलणे म्हणजे शोषित वर्गाच्या विरुद्ध बोलणे असे होऊन जाते. अशा प्रकारे आपला संपूर्ण देश अर्ध सत्यावर विश्वास ठेवतो आणि अर्धसत्त्यावरूनच आपल्या भावना देखील दुखावून घेतो. त्यामुळेच आपल्या लोकशाहीचे बारा वाजण्याची वेळ आलेली आहे. हल्ली गावोगावी शिक्षणाचे सोय झाल्यामुळे ऊसतोडी कामगारांची मुले देखील कमी प्रमाणात त्यांच्या सोबत असलेली दिसतात.

जवळपास 80 टक्के ऊसतोड कामगार त्यांना असलेल्या शासकीय योजनांमुळे ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा वापर करतात. उसतोड कामगारांमध्ये प्रामुख्याने मराठा ,बंजारा, वंजारी आणि मुस्लिम कामगार दिसून येतात. हल्ली बैलगाडीवरून ट्रॅक्टरवर आल्यापासून प्रत्येक जण आपल्या ट्रॅक्टरला आपल्या जातीचा झेंडा लावून ऊस वाहतूक करताना दिसतो. मात्र बैलगाड्यांना पूर्वी देखील झेंडे नव्हते आणि आत्ता देखील नाही. याचा अर्थ आर्थिक परिस्थिती सुधारल्याने ऊसतोड कामगारांमध्ये दोन वर्ग निर्माण झाले आहेत. ट्रॅक्टरवाल्यांच्या बाबतीत ऊस वाहतुकीचे कष्ट कमी झाल्यामुळे त्याची परिणीती जातीय अस्मिता टोकदार होण्यात झालेली दिसते.

काही समाजसेवकांचे दुकान ऊसतोड कामगार किंवा वीटभट्टी कामगार यांच्या मुलांच्या शिक्षणावर चालताना दिसते. गावोगावी शिक्षणाच्या सोयी झाल्यामुळे शिकणारी मुलं आपल्या आईबापां सोबत हल्ली ऊस तोडीला कमी येताना दिसतात. हे आपण आधीच नमूद केले आहे. खरा विचार केला तर शिक्षण घेऊनही कामगारच व्हायचे आहे ना! हल्ली तर वेठबिगारी करावी लागते. फरक एवढाच आहे की ऊसतोड कामगार शेतीत कष्ट करतो तर शिकलेला इंजीनियर एसीत करतो. एसीतला वेठबिगार आहे मात्र शेतीतला मुक्त आहे. हे देखील वास्तव आहे. या कामगारांची हुशार मुले आपल्या बुद्धिमत्तेवर पुढे गेल्याचे अनेक उदाहरणे देखील उपलब्ध आहेत.

अनेक जण मोठे पुढारी झाले प्रशासकीय अधिकारी झाले तरी त्यांनी ऊसतोड बांधवांसाठी काय केले हा प्रश्न कोणीच विचारतांना दिसत नाही. राहिला प्रश्न ऊसतोड कामगार असो की वीटभट्टी कामगार यांच्या फॅमिली एकदम हॅप्पी फॅमिली असलेल्या दिसतात. वर्तमान आनंदात जगण्याचे सूत्र जणू काही ह्या लोकांकडेच आहे. हे पाहून नकळतपणे आपल्या वाटून जाते. त्यांची मुले मुक्तपणे आनंदाने खेळताना बागडतांना दिसतात. फ्लॅट-बंगला यामध्ये राहणारे आणि कायम भविष्याच्या चिंतेने ग्रस्त झालेले आपण आणि आपली मुलं यावेळी डोळ्यासमोर आणणे गरजेचे आहे. ह्या कामगारांना मनःशांतीसाठी बाबा-बुवाची गरज नाही आणि सायकॉलॉजी बिघडली म्हणून मानसोपचार तज्ञाची गरज नाही. याचा अर्थ त्यांचे कष्टप्रद जीवन चांगले आहे असे देखील होत नाही. मात्र ज्याच्या क्षमता आहे तो ह्या जीवनातूनही उन्नत होण्याचे प्रयत्न करतच असतो. आपण देखील परिस्थिती सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहणे देखील आवश्यक आहे. कारण उसतोड कामगार गावी परतांना आमच्या ही मनाचा एक कोपरा अस्वस्थ होत असतो.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here