- प्रतिक पुरी
आपलं शरीर आपल्या हक्काचं, आपल्या मालकीचं असतं ही साधी गोष्ट आहे. पण स्त्रियांच्या बाबतीत ही साधी गोष्टही खरी नसते. ती एक शोकांतिका होऊन बसते. स्त्रीचं शरीर म्हणजे तिच्या गुलामीचं आणि पुरुषांच्या वर्चस्वाचं चालतंबोलतं उदाहरण. स्त्रियांना आपल्या स्वतःच्या शरीरावरचा हक्कही सिद्ध करावा लागणं हा त्यांच्या व्यक्तिकरणातील एक प्रमुख अडथळा आहे. स्त्रियांकडे व्यक्ती म्हणून बघण्यापेक्षा त्यांच्याकडे एक देखणं उपभोगक्षम शरीर किंवा प्रजोत्पादन करण्याचं साधन म्हणून बघणं ही पुरुषी वर्चस्वाची लक्षणं असतात. पूर्वीच्या मातृसत्ताक व्यवस्थेला स्त्रियांच्या प्रजोत्पादन क्षमतेमुळे जन्म मिळाला होता. तिच्या शरीरातून एक नवा जीव जन्माला येतो ही अद्भूत घटना होती. त्यासाठी तिला दैवी स्थान मिळालं. पुढे मात्र या क्षमतेमुळेच तिचं मालमत्तेत रुपांतर झालं आणि पुरुषांनी तिच्यावर आपला हक्क सांगायला सुरूवात केली. तिच्या शरीरावरचा तिचा हक्क यथाकाल नाकारण्यात आला आणि ती कायमची पुरुषांची गुलाम झाली. तिच्या मनाला गुलाम करण्याची प्रक्रिया तथाकथित सभ्यतेच्या व संस्कृतीच्या सुवर्ण काळात सुरू झाली जेव्हा तिला देवीचं स्थान देण्यात आलं, तिच्यावर धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचं वहन व जतन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यासाठी तिला परोपरीनं गौरवण्यात आलं पण त्यामागे तिच्या मनाचं खच्चीकरण करण्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय योजण्यात येत होता. स्त्रीच्या मनाचं हे खच्चीकरण व शरीराचं वस्तूकरण आजतागायत सुरू आहे.
संबंधित वृत्त :
- स्त्री ही पुरुषांची मालमत्ता आहे का?
- स्त्री ही खरंच स्वतंत्र आहे का?
- जातीच्या दाखल्यावर आईचीही जात लावता येते
लग्नसंस्थेच्या माध्यमातून या खच्चीकरणाला व वस्तूकरणाला प्रारंभ होतो. तिला तिच्या नव्हे तर घरच्यांच्या आणि त्यातही वडील अथवा भावांच्या इच्छेनुसारच त्यांनीच शोधलेल्या मुलाशी लग्न करावं लागतं. ‘मी आईबापांच्या इच्छेनेच लग्न करेन’ असं म्हणणाऱ्या मुली किंवा ‘आमची मुलगी आमच्या इच्छेबाहेर नाही’ असं म्हणणारे आई-वडील, दोघेही यामागील दाहक सत्य मात्र विसरतात. मुलीला आपल्या स्वातंत्र्याची आठवण उरत नाही आणि आईवडीलांना आपल्या मुलीच्या अधिकारांची चिंता असत नाही. लग्नात तिच्या शरीराचा सौदा होऊन तिच्या वस्तूकरणाला पुढचं प्रमाण लाभतं. त्याची कसोटी लागते तिच्या बाळंतपणात. तिला मुल होणं, ही फक्त तिची जबाबदारी मानली जाते, त्यातही मुलगा होणं ही जास्तच. तसं नाहीच झालं तर तिच्या मनासोबत शरीराचीही विटंबना व्हायला वेळ लागत नाही. जी स्त्री नऊ महिने आपल्या गर्भाचं पालनपोषण करते व नंतरही जन्म दिल्यानंतर जिच्यामुळे ते अर्भक जगतं वाढतं त्या स्त्रीला इतिहासात कधीही आपल्या या मुलावर हक्क सांगता मात्र आला नाही. यांतूनच कुमारी माता नावाची भयानक शोकांतिका जन्माला आली आहे.
ज्या काळात वारस असणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होती त्या काळात स्त्रीच्या शरीराला एका प्रजोत्पादन यंत्रापेक्षा जास्त मान क्वचितच होता. केवळ वारस हवा म्हणून परपुरुषांशी नियोग साधायचा आणि पुत्रप्राप्ती करून घ्यायची अशी अनेक उदाहरणं महाभारतात आढळतात. भारतातील प्राचीन मुक्त लैंगिक स्वातंत्र्याचं उदाहरणं म्हणून ती अधनंमधनं वापरली जातात. पण त्यातील शोकांतिका मात्र दूर्लक्षितच राहते. कारण नियोग पद्धतीतही स्त्रीला पुरुष निवडीचं स्वातंत्र्य नव्हतं. तिला सांगितलं जाईल त्या पुरुषांशी तिला रत व्हावं लागायचं. वारस मिळवण्यासाठी तिच्या इच्छांची पर्वा न करता हा नियोग साधला जायचा. कुंतीला वरामुळे पुरुष निवडण्याचा अधिकार मिळाला तरी त्यांना हक्काचं स्थान तिच्या नावामुळे नाही तर पंडूच्या नावामुळे लाभलं. यातली खोच समजून घ्यायला हवी. अन्यथा कर्णाप्रमाणेच तिची बाकीची मुलंही अनाथ किंवा शुद्र म्हणून ओळखली गेली असती. मुलांना समाजात सन्मानाचं स्थान मिळणं न मिळणं हे त्यांना जन्म देणाऱ्या स्त्रियांवर नाही तर पुरुषांवर अवलंबून असतं.
ज्यांची लग्न झाली आहेत त्या स्त्रिया असोत किंवा ज्यांची लग्न झाली नाहीत अशा कुमारी माता असो त्यांना कधीही आपल्या अपत्यावर अधिकार सांगता आला नाही. तो अधिकार त्यांच्या मुलांना द्यायचा त्यांच्या नवऱ्याने किंवा ज्या पुरुषानं त्यांचा उपभोग घेतला आहे त्यानं. जर त्यांनी हे आपलं मुल नाही असं म्हटलं तर ती विवाहिता असेल तर तिची व्यभिचारीणी म्हणून गणना व्हायची आणि अविवाहित असेल तर कुमारी माता म्हणून. पुरुषांना आपला हक्क सांगून माताविहिन मुलांचं संगोपन करण्याची मुभा होती पण कुमारी मातांना मात्र तशी मुभा नव्हती. हे फक्त माझं मुल आहे, त्याच्या जन्मदात्यानं जरी त्याचा स्वीकार करण्यास नकार दिला तरी मी याला माझं मुल म्हणून वाढवू शकते हे म्हणण्याची वा त्याप्रमाणे वागण्याची तिला परवानगी नव्हती. ती आजही नाही आहे. मुलांना आईचं नाव नाही म्हणून ती अक्करमाशी क्वचितच समजलं जातात पण बापाचं नाव नसेल तर मात्र त्यांच्या नशिबी कायमचा तो अपमान येतो. आपल्या मुलांना कायदेशीर अधिकार मिळण्यासाठी, त्यांना समाजमान्यता मिळण्यासाठी किंवा त्यांच्यावर आपला अधिकार सांगण्यासाठीही कुमारी मातेला पुन्हा कोणत्या ना कोणत्या पुरुषाचीच गरज भासते. तिच्या देहाचा हवा तसा उपभोग घेऊन मुल होताच पलायन करणारे पुरुषच असतात आणि तिच्या मातृत्त्वासाठी केवळ तिलाच दोष देत तिचे व तिच्या मुलाचे सन्मानाने जगण्याचे सारे अधिकार व प्रसंगी जगण्याचेच अधिकार नाकारणारेही पुरुषच असतात. तिला यात आपलं कोणतंही म्हणणं मांडण्याची संधी नाकारलीच जाते. बलात्कारामुळे कुमारी माता होणं नशिबी आलेल्या स्त्रियांनाही यातून काहीच सुटका नाही की सहानुभूती मिळत नाही जिथे तिची काहीच चूक नसते.

कुमारी मातांच्या या विविध प्रश्नांकडे आपण आता अधिक जागरूकतेने आणि सहानुभूतीनं पाहण्याची वेळ आली आहे. जे पुरुष अशा मुलींना दोष देतात त्यांनी याचा नक्कीच विचार करावा की निसर्गाने त्यांच्यावर गर्भधारणेची जबाबदारी सोपवलेली नाही त्यामुळेच पुरुष बेदरकार पद्धतीने स्त्रियांचा उपभोग घेत असतात. गर्भधारणेची जबाबदारी दोघांवरही असती तर मात्र पुरुषांनी नक्कीच यात वेगळी भूमिका घेतली असती. स्त्रियांची गर्भधारणा ही त्यांच्या या खच्चीकरणाला कारणीभूत आहे. मानवांचा वंश चालावा म्हणून त्या ज्या सोसतात त्याची ही निव्वळ अवहेलना आहे विटंबणा आहे. त्यांच्या सर्जनाचा तो अपमान आहे. तरुण वयात लैंगिक सुखाच्या अनावर इच्छेला शरण जाणं यात कोणाला दोष देण्याची गरज नाही. गरज आहे त्यांना त्यांच्या जबाबदारीचं भान करून द्यायची. गरज आहे ती यातून गर्भधारणा झालीच तर त्याचा दोष फक्त त्या स्त्रीलाच देण्याची पुरुषी मानसिकता बदलण्याची. गरज आहे ती तिच्या मातृत्त्वाचा गौरव करण्याची व तिच्या मुलाला सर्व सामाजिक व कायदेशीर अधिकार देण्याची.
सर्वांत जास्त गरज आहे ती तिला आपल्या शरीराचं काय करायचं याचा अधिकार देण्याची. तिनं कोणाशी लैंगिक संबंध ठेवावेत हे तिलाच ठरवू देण्याची. तिच्या शरीरातील गर्भाचं काय करायचं याचा निर्णय घेण्याची. यात अपवाद नक्कीच असतील पण नियम हाच असायला हवा की स्त्रीला तिचं शरीर कोणाच्या स्वाधीन करायचं, मूल होऊ द्यायचं की नाही, गर्भ वाढवायचा की नाही, याचे अधिकार मिळायलाच हवे कारण तिच्याच वाटेला यांतून निर्माण होणारे तणाव पुरुषांपेक्षा जास्त येत असतात. कुमारी माता म्हणून तिची हेटाळणी करण्यापेक्षा तिच्याकडून घडलेली एक चूक यापेक्षा जास्त महत्त्व या गोष्टीला देण्याची गरज नाही. ती चूक कशी सुधारता येईल, सुसह्य करता येईल याचा विचार करण्याची आता गरज आहे. जर त्या स्त्रीला ते मूल हवं असेल तर तिला ते मूल तिचं स्वतःचं, तिच्या नावाचं म्हणून वाढवण्याचा हक्कही मिळायला हवा. कोणत्याही सामाजिक बहिष्काराशिवाय, कोणत्याही नीच हेटाळणीशिवाय आणि कोणत्याही कायदेशीर हक्कांची गळचेपी झाल्याशिवाय.
कुमारी मातांचा प्रश्न हा पुरुषी वर्चस्वाचा घृणास्पद नमुना आहे. समाजात जेव्हा सुसंवाद राहत नाही, लैंगिक सुखांना जेव्हा गलिच्छ मानलं जातं, व्यक्ती म्हणून जगण्याचे अधिकार नाकारले जातात तेव्हा स्त्रियाच नव्हे तर पुरुषांनाही त्याचे असह्य परिणाम भोगावे लागतात. हे टाळायचं असेल तर त्यासाठी एक सुरुवात म्हणून अशा कुमारी मातांना सहानुभूतीनं वागवण्याच्या दिशेनं आपण एक पाऊल टाकायला हवं. समाज बदलायचा तेव्हा बदलेल, पण व्यक्ती म्हणून आपण स्वतःला आधी बदलायला हवं. त्यातही एक पुरुष म्हणून मी माझी जबाबदारी स्वीकारणं, स्त्रियांच्या नैसर्गिक असहायतेचा गैरफायदा न घेणं, तिच्या मातृत्त्वाचा अपमान न करणं हे तर आपण निश्चित करू शकतो. लैंगिक इच्छांकडे निकोप नैसर्गिक इच्छा म्हणून बघता यायलं हवं. तरच कुमारी मातांच्या प्रश्नावर आपल्याला काही निश्चित उपाय शोधता येईल.