- आशिष निनगुरकर
‘दूरदर्शन’वर एका कलाकाराची मुलाखत काल पाहिल्यासारखी डोळ्यापुढे तरळून गेली. त्या मुलाखतीत एक ज्येष्ठ प्रतिभावंत अभिनेते धाय मोकलून रडत होते अन् मुलाखतकर्ते निवेदक स्तब्ध होऊन गेले होते. त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर त्या अभिनेत्याच्या भावना अनावर झाल्या अन् अश्रूंचा बांध फुटला. इतकेच त्या घटनेचे महत्त्व नव्हते, तर अभिनयाची तपस्या व्यक्तिगत आयुष्याची वीण कशी उसवत गेली अन् एका कलाकाराची जिंदगी कशी उद्धवस्त होत गेली, याचे ते टोकदार उदाहरण होते. ती घटनाच तशी होती. मुलाखतीत ते रडत होते. त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगावर ते बोलत होते. “या माणसाला मुलगी कशी काय असू शकते? शक्यच नाही! आमच्या अकलेचे दिवाळे निघालेय का, जे आम्ही यांची मुलगी करू? यांच्या घरचीच तिकडून काही तरी भानगड असणार! आम्हाला काय माहिती नाही का मुलीचे वडील ‘हे’ आहेत म्हणून! यांना चालत असेल, पण समाजात आम्हाला तोंड दाखवायचे आहे! आम्हाला नाव आहे, अब्रू आहे, पत आहे अन् यांच्यातच जगायचे आहे. आमचे काय यांच्यासारखे ‘टाळी’ वाजवून थोडेच भागणार आहे का?
लोक असंच काहीबाही बोलत राहायचे आणि लोकांच्या या प्रत्येक टोमण्यामागे माझ्या पत्नीचा भावनांचा बांध तुटत होता. ती कोलमडून गेली होती. मुलांच्या लग्नाच्या वेळेस देखील हाच अनुभव आला होता. समाजाने फार वाईट वागणूक दिली. माझ्या अभिनयाची शिक्षा बायको आणि पोरांना भोगावी लागली. ते सगळीकडे चेष्टेचा विषय झाले होते.” इतके बोलून ते कलावंत पुन्हा धाय मोकलून रडू लागले. ‘आत्ता गं बया!’ हे इतकेच शब्द या कलाकाराची थोरवी सांगण्यास पुरेसे आहेत. तमाशाप्रधान चित्रपट मराठीत अमाप आले. त्यात ‘नाच्या’चे काम करणारी बरीच कलाकार मंडळी होऊन गेली. पण, या मनस्वी कलाकाराच्या नावाशी कुणाचीही तुलना होऊच शकत नाही, इतका तो ‘नाच्या’ त्यांनी आपल्या अभिनयाने जीवंत केला. बोलणं, दिसणं आणि नाचणं अशा तिहेरी अंगांनी त्यांचा सहजसुंदर अभिनय नटलेला. ‘झाले बहू, होतिलही बहू, परंतु या सम हा!’ फक्त आणि फक्त एकच तो कलावंत म्हणजेच ‘अभिनयसम्राट गणपत पाटील.’

संबंधित वृत्त :
गणपत पाटलांचा जन्म 20 ऑगस्ट 1920 कोल्हापुरात एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरिता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्याकाळी चालणार्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बर्याचदा सीतेची भूमिका वठवली. दरम्यान राजा गोसावी यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या ‘शालिनी सिनेटोन’मध्ये ‘प्रफुल्ल पिक्चर्स’मार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहाय्यकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले. त्या सुमारास पाटलांना राजा परांजपे यांच्या ‘बलिदान’ व राम गबाल्यांच्या ‘वंदे मातरम्’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय कारकिर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ‘मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली.
चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ‘ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची म्हणजेच ‘नाच्या’ची आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ‘जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी ‘सोंगाड्या’चीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या ‘नाच्या’च्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन, कृष्णा पाटलांनी ‘वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे ‘नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील’ हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले. बायकी किरट्या आवाजात ओरडत बोलताना उजव्या हाताची तर्जनी हनुवटीवर ठेवून अन् डावा हात कमरेवर ठेवून बोलणारे अंगाला लचके द्यायचे अन् अगदी ठसक्यात खुमासदार पद्धतीने तो ‘नाच्या’ साकारायचे. खरे तर त्यांच्या वाट्याला आलेली अगदी नगण्य असणारी जेमतेम फुटेज असणारी ही भूमिका ते जगायचे अन् ती भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसायची. प्रेक्षकदेखील त्यांना मनापासून दाद द्यायचे. जयश्री गडकर, माया गांधी, सीमा ते उषा नाईक, उषा चव्हाणांपर्यंत कोणाचेही तमाशाप्रधान चित्रपट पाहिले, तर त्या सर्वांचा एकच समान धागा होता, तो म्हणजे गणपत पाटील.

गणपत पाटलांनी साकारलेला कोणताही सिनेमा घ्या, त्यात त्यांची भूमिका जास्तीत जास्त मोठी आठ ते नऊ मिनिटांची आहे. ‘बालध्रुव’मध्ये ते बालकलाकार म्हणून चक्क मॉबमध्ये उभे होते. 1949 मधल्या ‘मीठभाकर’ने त्यांना ओळख दिली. ‘राम राम पाव्हणं’ने शिक्का मारला, तर 1951च्या ‘पाटलाचा पोर’ने त्यांची चौकट पक्की केली. त्याच वर्षी आलेल्या ‘छत्रपती शिवाजी’मध्ये त्यांनी अनेक छोट्या भूमिका पार पाडल्या होत्या. 1960 ‘शिकलेली बायको’ने त्यांचे बस्तान पक्के केले. 1963 मधील ‘थोरातांची कमळा’ने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या 1964 मधल्या ‘पाठलाग’, ‘सवाल माझा ऐका’, ‘वाघ्या मुरळी’ या सिनेमांनी त्यांचे आयुष्य बदलले. इथेच घात झाला! खरे ‘गणपत पाटील’लोप पावले आणि ‘नाच्या गणपत पाटील’ लोकमानसाच्या नसानसांत भिनला. 1965 मध्ये आलेल्या ‘केला इशारा जाता जाता’ने त्यांना स्टार कलाकारांइतके महत्त्व आले. 1965च्या ‘मल्हारी मार्तंड’ आणि ‘रायगडचा राजबंदी’ने मराठी तमाशापटांत गणपत पाटलांचे स्थान अबाधित केले.
‘बाई मी भोळी’ आणि ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ आणि ‘सांगू मी कशी’, ‘सुरंगा म्हनत्यात मला’, ‘छंद प्रीतिचा’, ‘धन्य ते संताजी धनाजी’पर्यंत सारे ठीक चालले होते. मात्र, 1968च्या ‘एक गाव बारा भानगडी’ने गणपत पाटील थोडेसे सावध झाले. कारण, या सिनेमाने लोकप्रियतेचे नवे विक्रम केले आणि सार्वजनिक जीवनात आपला ‘तमाशा’ होऊ लागलाय, हे पाटलांच्या ध्यानी येऊ लागले. 1969 मधील ‘खंडोबाची आण’ व ‘गणगौळण’मध्ये त्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण, 1970च्या ‘अशी रंगली रात’ आणि ‘गणानं घुंगरू हरवलं’ या सिनेमात त्यांच्या वाटेला मोठे ‘फुटेज’ आले. 1971च्या ‘अशीच एक रात्र’ आणि ‘लाखात अशी देखणी’ने पुन्हा गाडी रुळावरून ढासळू लागली. मात्र, 1971 मध्ये दादांच्या ‘सोंगाड्या’ने त्यांना नाव दिले अन् समाजाने त्यांचे नाव घालवले. यानंतर आलेल्या अनेक सिनेमांत ‘पुढारी’, ‘सून माझी सावित्री’, ‘सुगंधी कट्टा’, ‘जवळ ये लाजू नको’, ‘कलावंतीण’, ‘नेताजी पालकर’, ‘ग्यानबाची मेख’, ‘हळदी कुंकू’, ‘मंत्र्याची सून’, ‘सवत’, ‘पोरी जरा जपून’, ‘तमासगीर’ , ‘दोन बायका फजिती ऐका’, ‘राखणदार’, ‘बोला दाजिबा’, ‘इरसाल कार्टी’, ‘थांब थांब जाऊ नको लांब’, ‘लावण्यवती’, मा. मुख्यमंत्री गणप्या गावडे’ हे चित्रपट मुख्यत्वे गाजले.

गणपत पाटील जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा त्यांच्याशिवाय तमाशापट अशक्य झाला होता. विशेष बाब म्हणजे, तमाशाच्या फडावर नाचणारी कलावंतीण जयश्री गडकर, लीला गांधी, संध्या, उषा चव्हाण, उषा नाईक, रंजना, मधु कांबीकरपासून ते माया जाधव यांच्यापर्यंत कोणीही ‘लीड रोल’मध्ये असले, तरी ‘‘नाच्याचे काम गणपत पाटलांना द्या,” असा त्या अभिनेत्रींचा आणि दिग्दर्शकाचा आग्रह असे. ते तिकडे रमत गेले अन् इकडे त्यांचा संसार जगाच्या टवाळीचा विषय झाला. त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी काय काय ऐकून घेतले असेल, याची कल्पनाही करवत नाही. इतके असूनही पाटलांनी आपल्या चेहर्याला रंग लावून घेणे बंद केले नाही. गणपत पाटलांनी कधी कुणापुढे हात पसरले नाहीत की कुणापुढे कशाची याचना केली नाही. सगळे दुःख, अपमान, व्यथा, तिटकारा ते सोशित गेले. मात्र, अंती त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आयुष्यभर फक्त सदरा, पायजमा अशा एकाच ढगळ्या वेशात वावरलेला हा माणूस आपल्या ‘शापित’ भूमिकेचे ‘सोने’ करून गेला. पण, त्यांच्या वेदना जगापुढे फारशा मांडल्या गेल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या ‘रंग नटेश्वराचे’ पुस्तकामध्ये मात्र विस्तृतपणे या सर्व घटनांचा पट उलगडला आहे. या नटरंगाची आयुष्यभर उपेक्षा झाली होती की काय, म्हणूनच प्रेक्षकांनी त्यांच्यावर निघालेल्या ‘नटरंग’ चित्रपटाला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला. 2013 सालचा ‘विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ त्यांना मरणोत्तर जाहीर झाला होता. तत्पूर्वी 2005चा ‘झी जीवनगौरव पुरस्कार’ हाच काय तो त्यांचा कौतुक सोहळा!
त्यांच्या ‘आत्ता गं बया’ला दाद दिली नसेल, असा मराठी रसिक विरळाच! अंगात मखमली बदाम अन् त्यावर हाफ जाकीट, गळ्यात गुंडाळलेला रंगी बेरंगी रुमाल अन् डोक्यावर बुट्टेदार टोपी, अशा वेशातले गणपत पाटील त्यांच्या ‘नाचा’च्या भूमिकेत समरसून जायचे. या भूमिकेने त्यांना मानही दिला अन् प्रचंड अपमान देखील! आपल्या भूमिकेचे त्यांनी सोने केले, पण त्या भूमिकेनेच त्यांच्या आयुष्याची माती केली. पुढे जाऊन गणपत पाटील ही तृतीयपंथीयांसाठीची संज्ञा झाली. अगदी ‘नटरंग’ सिनेमा येईपर्यंत, ही अवस्था होती. ‘नटरंग’ सिनेमा जानेवारी 2010 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याआधीच म्हणजे, 23 मार्च 2008 रोजी हा खरा प्रतिभावंत अभिनेता आपल्या अनंताच्या प्रवासाला गेला. ‘नटरंग’ आला अन् मराठी सिनेमाचे व गणपत पाटलांचे पांग फेडून गेला. त्यांच्या भूमिकेचे त्यांनी सोने केले, पण त्या भूमिकेने नेहमीच त्यांच्या आयुष्यावर मात केली. अशा सर्वगुणसंपन्न, गुणी पण अभागी अभिनेत्यास मनापासून सलाम!
(सौजन्य – मुंबई तरुण भारत)