आठवणीतले सागर सरहदी : करोगे याद तो हर बात याद आएगी…

नूरी, बाजार, कभी कभी, सिलसिला, चांदनी, दिवाना, कहो ना प्यार है यासारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सागर सरहदी यांचा आज स्मृतिदिन. सर्वसाधारण चित्रपटशौकीन आणि चित्रपटाचा जाणकार अशा दोघांत फरफटलेला समर्पित कलावंत म्हणजे सागर सरहदी. जगण्याच्या खटपटींतही डाव्या प्रगतिशील विचारांचा आदर्श सरहदींत खोलवर मुरलेला. प्रस्थापित होण्याच्या धडपडीत स्वतःला राखण्याचीही अस्वस्थताच पहिल्या चित्रपटाच्या निर्भेळ यशानंतरही त्यांना व्यावसायिक स्थैर्य काही देऊ शकली नाही.

  • अजित अभंग

नुकतेच गंभीर सिनेमे पाहायला सुरुवात केल्याचा तो काळ होता. 2007 च्या ‘मामी फिल्म फेस्टिव्हल’मध्ये “पुढची फिल्म सागर सरहदी यांची आहे, ती पाहूया” असं चित्रपटांच्या एका जाणकार मित्रानं सांगितलं. माझा चेहरा वाचून त्यानं माहिती दिली, “स्मिता पाटीलचा ‘बाजार’ त्यांचाच आहे.” “मी पाहिलेला नाही” म्हणालो. त्यावर “अमिताभचा ‘कभी कभी’ त्यांनी लिहिलाय” म्हणाला. चेहरा उजळला… ‘चौसर’ पाहायला बसलो, पण पकड काही घेतली नाही. जुनी, लाऊड ट्रीटमेंट वाटली म्हणून बहुधा; मित्र ‘बाजार’साठी आणि मी ‘कभी कभी’साठी बायस होतो म्हणूनही बहुधा…

पुढे ‘कभी कभी’, ‘सिलसिला’ लिहिणाऱ्या, ‘बाजार’ बनवणाऱ्या सरहदींनी श्रीदेवीचा ‘चांदनी’, शाहरुखचा ‘दीवाना’ आणि हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांचेही संवादही लिहिले आहेत हे कळलं तेव्हा मायानगरीनं त्यांची केलेली वंचना गडद होत गेली.

सर्वसाधारण चित्रपटशौकीन आणि चित्रपटाचा जाणकार अशा दोघांत फरफटलेला समर्पित कलावंत म्हणजे सागर सरहदी. हिंदी चित्रपटसृष्टीत फाळणीनंतर भारतात आलेल्या निर्वासितांचा वरचष्मा निर्विवाद आहे. आयुष्याबाबत टोकाची अनिश्चितता… पाळंमुळं उपटून फेकल्यानंतरही जिवंत राहिल्यानं हरायला शिल्लक काही उरलेलं नाही अशी मन:स्थिती आणि परिस्थिती… मात्र संपन्न प्रदेश, भाषा संस्कृतीचं संचित गाठीशी. याच संचितावर स्वातंत्र्योत्तर भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळ्या सर्जनाचा जोरकस शिरकाव झाला. जगण्याच्या मानगुटीवर रोजमर्राच्या मरणप्राय जगण्याचा संबंध घेऊन वावरत कुठं तरी स्थिरावायला जागा मिळेलच या आशेनं अनंत यातनांचा केलेला प्रवास… तशी जागा मिळण्याची शक्यता असलेल्या संदीफटीत स्वतःला आगंतुकपणे कोंबून, आधी कुटुंबकबिला जिवंत ठेवण्याचं आणि नंतर गतसन्मान मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून सिद्ध करण्याची विजिगीषु वृती त्या प्रत्येकात होती. निर्वासितांचे भोग भोगलेल्या चित्रपटसृष्टीतील कलंदरांच्या यादीची उजळणी करण्याची इथे आवश्यकता नाही. मात्र अशा कलंदरांतलं एक नाव ‘सागर सरहदी’ यांचंही आहे हे मात्र सांगावंसं वाटतं. जगण्याच्या खटपटींतही डाव्या प्रगतिशील विचारांचा आदर्श सरहदींत खोलवर मुरलेला. प्रस्थापित होण्याच्या धडपडीत स्वतःला राखण्याचीही अस्वस्थताच पहिल्या चित्रपटाच्या निर्भेळ यशानंतरही त्यांना व्यावसायिक स्थैर्य काही देऊ शकली नाही.

सागर सरहदी

1931ला जन्मलेल्या सरहदींची मुळं पाकिस्तानच्या अबोटाबादमधल्या टुमदार ‘बफा’ गावची… संपन्न घरातली… बारा- तेरा वर्षांचे असताना ‘भाग जाओ वरना मारे जाओगे’ असा निरोप मिळाला. वाताहत झाली. फाळणीच्या वावटळीत उन्मळून पडलेलं अख्खं कुटुंब भेलकांडत आपल्या भूमीपासून हजारो मैलांवर येऊन पडलं, आगंतुक भूमीत रुजण्यासाठी मनात पोरकंपण कायमचं घेऊन. अबोटाबादहून आधी काश्मीर, मग दिल्लीच्या निर्वासितांच्या छावणीत आणि शेवटी मुंबईला सायन कोळीवाड्यात. आयुष्याचे हे चढउतार झेलत “गंगासागर तलवार”चा मुंबईत ‘सागर सरहदी’ झाला. इंग्रजीत जगभरातलं सर्वोत्तम साहित्य वाचायला मिळतं, म्हणून इंग्रजी वाङ्मयातून पदवी घेतली. परिस्थितीनं पुढचं शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही. विद्यार्थिदशेतच डाव्या विचारांकडे आकर्षित झाले. मार्क्सचा स्वीकार केला. लिहू लागले आणि प्रगतिशील लेखक संघांशी (प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन) जोडले गेले. नाटकांच्या आवडीतून ‘इप्टा’च्या वर्तुळात प्रवेश झाला. जाँ निसार अख्तर, सरदार जाफरी, साहिर लुधियानवी, इस्मत चुगताई, कैफी आझमींसारख्या दिग्गजांचा सहवास मिळू लागला. नाट्यलेखन, दिग्दर्शन यात हातातोंडाशी गाठ पडेना. चित्रपटांसाठी लिखाण सुरू केलं, त्या उमेदवारीत बासू भट्टाचार्य दिग्दर्शित 1971 सालचा संजीव कुमार, तनुजा अभिनीत ‘अनुभव’ हा एकच चित्रपट सांगता येतो.

चित्रपटांतही हवं तसं काम मिळत नव्हतं. रंगभूमीवरही फारसं यश हाती येत नव्हतं. मात्र एके दिवशी त्यांचं ‘मिर्झा साहिबा’ नाटक पाहायला यश चोप्रा आले. नाटक आवडलं. “माझ्या चित्रपटांसाठी लिहितोस का?” म्हणून विचारणा केली. “दीवार’चं खणखणीत यश चोप्रांच्या नावावर होतं. त्यामुळे आघाडीच्या निर्माता-दिग्दर्शकासोबतच काम करण्याची नामी संधी सरहदींनी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. 1976ला सागर सरहदींच्या कथा, पटकथा आणि संवादांनी नटलेला अमिताभ बच्चन, शशी कपूर, ऋषी कपूर, राखी अभिनीत ‘कभी कभी’ प्रदर्शित झाला. पटकथेचा फिल्मफेअर मिळाला. नव्या दमाचा ‘रोमँटिक’ चित्रपटाचा लेखक म्हणून चित्रपट निर्माते दार ठोठावू लागले. तरीही अस्वस्थता थांबेना. आलबेल आयुष्य मांडणं-जगणं ही प्रवृत्ती आपली नाही. यातूनच स्वतःला हवा तसा चित्रपट बनवायचा हा निर्धार पक्का होता. व्यावसायिक दृष्टिकोन आणि प्रवृत्तीत गल्लत करू नये या जगन्मान्य तत्त्वाला बेदरकारपणे झिडकारण्याची हिंमत डाव्या विचारांच्या कलावंतात होती. त्यामुळे सरहदींनाही माणसाला त्याच्या मुळापासून समूळ उपटून, होत्याचं नव्हतं करणाऱ्या सामाजिक, आर्थिक व धार्मिक व्यवस्थेची मुळं शोधायची बेचैनी या मोठ्या यशानंतरही उसंत घेऊ देत नव्हती. त्यांनी ‘बाजार’ची निर्मिती करायचं ठरवलं.

आज सिनेमॅटिक लिबर्टीची आतबट्ट्याची संकल्पना घेऊन सोयीस्कर राष्ट्रवादाचे अजेंडे चित्रपटांतून राबविले जात आहेत. काही चित्रपटकर्मींत तर अहमहमिका लागलेली दिसत आहे. सिनेमॅटिक वा क्रिएटिव्ह लिबर्टी चित्रपटाच्या सादरीकरणाशी असलेल्या प्रामाणिकपणाची पडताळणी करते. कलावंताचं स्वातंत्र्य हे कलावंताच्या विचारप्रवृत्ती, व्यवहारनिरपेक्षतेशी आणि प्रामाणिकपणाशी निगडित असते. कलावंताला जीवनमूल्यांची आणि झालं तर नीतिमूल्यांचीही चाड असावी लागते. या पार्श्वभूमीवर सिनेमॅटिक लिबर्टीचं एक प्रामाणिक उदाहरण म्हणून सरहदींच्या बहुचर्चित ‘बाजार’च्या निर्मिती प्रक्रियेकडे पाहता येईल. आपल्या मुलखापासून परागंदा व्हायला कारणीभूत ठरलेल्या धार्मिक समूहाच्या व्यथावेदना सरहदींना बाजारमध्ये मांडाव्याशा वाटल्या. ‘कभी कभी’चं निर्भेळ यश वाट्याला आलं. मात्र आत उकळत असलेली निर्वसनाच्या दुःखाची काहिली, जीवनवादी रोमॅन्टिसिझमचा प्रेक्षणीय फोलपणा टोकदार होतच होता. त्यांना हैदराबादच्या एका गरीब मुलीच्या श्रीमंत अरबाशी लग्नाच्या घटनेची बातमी कळली. त्यावर चित्रपट बनवायचं ठरवलं. तत्कालीन चित्रपट व्यवसायाचा सूर अशा चित्रपटाला अजिबात अनुकूल नव्हता. त्यातही खाल्लेल्या अमाप खस्तांनंतर नुकत्याच मिळालेल्या यशानं चित्रपटसृष्टीत रुजण्याची नुकतीच सुरुवात झालेली होती. तरी हा अव्यवसायिकदृष्ट्या आत्मघातकी ठरू शकणारा निर्णय सरहदींनी घेतला. इतपत ठीकही होतं, पण पुढे यश चोप्रा “बाजार’ची निर्मिती करू इच्छित असताना त्यांना सरहदींनी स्वच्छ नकार कळवला. त्यांना त्यांची गोष्ट त्यांच्या पद्धतीनंच सांगायची होती. निर्मात्याच्या हस्तक्षेपामुळे ते स्वातंत्र्य हिरावून जाण्याची शक्यता होती.

अमिताभ बच्चनचा आक्रमक नायक टिपेवर असण्याच्या काळात “बाजार’ आला. सरहदींच्या ‘आर्ट फिल्म’नं सिल्व्हर ज्युबिली साजरी करून भारतीय सिनेमाच्या इतिहासात अढळ स्थानही मिळवलं. त्यातले स्मिता पाटील वगळता त्या काळात बहुतांश प्रमुख कलाकार नवखे होते. त्यात नसिरुद्दीन शहांनी पहिल्यांदा मुंबापुरीत पाऊल ठेवले होते, सुप्रिया पाठकचा नायिका म्हणून हा पहिला चित्रपट होता. स्मिता पाटील, नसिरुद्दीन शहांबरोबरच चित्रपटांशी संबंधित अनेक कलावंतांनी उधारीवर काम करून चित्रपट पूर्ण केला. रिलीज झाल्यावर सागर सरहदींनी सगळ्यांचं मानधन चुकतं केलं.

‘दुनिया में आदमी इन्सान बन जाए… तो बहोत बडी बात है’

मुळापासून उपटून सीमेपल्याड फेकल्या गेलेल्या सागर सरहदींच्या मनात, यासाठी जबाबदार ठरवल्या जाणाऱ्या धर्म, माणसांविषयी अजिबात कटूता नाही. किंबहुना त्यांचं “बाजार’चं कथानकच मुस्लिम पार्श्वभूमीवर घडणारं, मुस्लिम महिलांच्या वेदना केंद्रस्थानी असलेलं. त्यात अभिनयापासून निर्मितीशी संबंधित सर्वच घटकांत बहुसंख्य मुस्लिम कलावंतच दिसतात. आज जातीय-धार्मिक उन्माद सहेतुक टिपेवर नेला जाण्याच्या काळात ही दाहकता आजीवन भोगणाऱ्या सरहदींच्या मनात, सर्जनात, निर्मितींत मानवतेसाठी पसायदान पाझरतं. ‘बाजार’ सारख्या महत्त्वपूर्ण घटनांची पार्श्वभूमी ‘चौसर’लाही होती. बरेच मोठे प्रोडक्शन हाऊसेस प्रायोगिक, कलात्मक चित्रपटांची निर्मिती सीएसआर अॅक्टिव्हिटी म्हणून करीत होते. तरीही चौसरचं निर्मितीमूल्य अत्यंत स्वस्त दिसत होतं. कदाचित सरहदींनी चौसरसाठीही निर्माते झिडकारले असावेत का? स्त्रीशोषणावर आधारित ‘चौसर’चा आमच्यावर प्रभाव पडला नाही. जुन्या हाताळणीमुळे चौसर फारसा लक्षातही राहिला नाही. मात्र एक रुखरुख वाटते ती सरहदींची पारखी नजर त्या वेळी न जाणवल्याची. आज नवाजुद्दीनच्या प्रेमात नसलेली व्यक्ती विरळच. मात्र जेव्हा नवाजुद्दीन कुणीच नव्हता त्या काळात सरहदींनी नवाजुद्दीनला चौसरचा नायक केलं होतं!

नवाजुद्दीन, अमृताला पहिला ब्रेक देणारा दिग्दर्शक

बाजारसाठी सरहदींनी रंगभूमीवरच्याच कलावंतांची निवड केली होती. तोच कटाक्ष त्यांनी ‘चौसर’साठीही बाळगला. चौसरचा नायक होता नवाजुद्दीन सिद्दिकी तर नायिका अमृता सुभाष होती. चौसरची निर्मिती 2001-02ची. त्याआधी नवाजुद्दीन ‘सरफरोश’मधील अवघ्या काही सेकंदांच्या अनामिकाच्या भूमिकेत दिसला होता, तर अमृताला ओळख मिळवून देणारा ‘श्वास’ 2004चा; तिच्या रुपेरी पडद्यावरील प्रवेशाचे साल देखील तेच. जर तरच्या कसोट्या निष्फळ असतात. पण चौसर त्याचं वेळी रिलीज होऊन चांगली-वाईट चर्चा झाली असती तर? हा विचार हटकून मनात येतोच.

‘कभी-कभी’नंतर, रवी टंडन यांचा ‘जिंदगी’, राज सिप्पी यांचा ‘इन्कार’, जितेंद्र, राजकुमार अभिनीत ‘कर्मयोगी’, पुन्हा यश चोप्रांचाच ‘सिलसिला’, लोरी, फासले, चांदनी, दीवाना, रंग, कहो ना प्यार है अशा अनेक ‘सुपरहिट’ चित्रपटांत लेखक, पटकथा लेखक, संवादलेखक अशा खणखणीत भूमिका निभावल्या, तर बाजार आणि चौसर हे दोन चित्रपट त्यांच्यातल्या अस्वस्थ सागर सरहदींचे. तरीदेखील चित्रपटांच्या रंजक किस्से कहाण्यांतून सरहदी हे ‘पुरोगामी’ नाव कधीच हद्दपार झालंय. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे साधारण चित्रपट शौकीन आणि एक चित्रपटाचे जाणकार अशा दोन्ही टोकांतही सागर सरहदी नावाच्या कलावंताच्या वाट्याला मायानगरीतही निर्वासिताचंच जगणं आलं आहे. मात्र सरहदी यांच्या मनात कोणतीच कटुता नाही की विषाद नाही. आज ‘नागरिकत्व क्रांती’च्या देखण्या नावाखाली राजकीय हितसंबंधांनी बरबटलेले नागरीयुद्ध लादलं जाण्याच्या या काळात, आपल्या मुलखातून परागंदा व्हावं लागलेला हा ‘यायावर’च विद्वेषापेक्षा माणसातल्या माणूसपणाचा शोध घेत मुशाफिरी करताना दिसतो. सिनेमा क्षेत्रातला हा रिफ्युजी आजही तीच कलंदर वृती घेऊन सामाजिक जाणिवांचा सार्थक सिनेमा तयार करण्याची स्वप्नं पाहतोय.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here