- टीम बाईमाणूस
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानच्या आगामी ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला. दरब फारूकी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि कन्नन अय्यर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहे. या चित्रपटाची तारीख अजून नक्की झाली असून हा चित्रपट ‘ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा टिझर नेमक्या आजच्याच दिवशी प्रदर्शित करण्यामागे एक खास कारण आहे.
आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास फार दैदिप्यमान आहे. भारत देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांनी अपरंपार कष्ट भोगले, शिक्षा सहन केल्या, प्रसंगी प्राणाची आहुतीसुद्धा दिली, तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्याचा सूर्य पाहता आला. तो दिवस होता 27 ऑगस्ट 1942. त्या दिवशी रेडिओ मधून अचानक एक आवाज आला आणि सर्वांचे कान टवकारले गेले.
“धिस इज काँग्रेस रेडिओ कॉलिंग ऑन वेव्हलेंग्थ 42.34 मीटर्स फ्रॉम समव्हेअर इन इंडिया.”
हा आवाज कानी पडताच ब्रिटिश हादरून गेले! ते दिवस होते ‘चले जाव’ चळवळीचे! भारतीयांची स्वातंत्र्याची मागणी जोर पकडत होती. त्यामुळे ब्रिटिशांनी टोकाची दडपशाही सुरू केली होती. दिसेल त्या नेत्याची धरपकड होऊन त्यांना अटक केली जात होती. सर्व महत्वाचे नेते तुरुंगात बंद होते आणि बरेचसे नेते भूमिगत होऊन कार्य करत होते. या अशा निर्णायकी परिस्थितीत आकाशवाणीवर कुणीतरी स्वतःचे केंद्र सुरू करून लोकांना आवाहन करण्याचे काम सुरू केलं होतं. दडपशाहीच्या वातावरणात एवढे मोठे धाडस करण्याची हिंमत कुणाची झाली हे कळत नव्हतं.

कोण होती ही उषा मेहता?
तो आवाज होता उषा मेहता या मुलीचा! आणि हे धाडस करण्यात पुढाकार सुद्धा तिनेच घेतला होता. कोण होती ही उषा मेहता? 25 मार्च 1920 साली गुजरातच्या सुरतेत त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच गांधीवादी विचारधारेला मानणाऱ्या उषाजी ‘सायमन परत जा’ असे अवघ्या आठव्या वर्षीच म्हणाल्या होत्या. गांधीजींच्या शिबिरात राहून त्या बऱ्याच गोष्टी शिकल्या होत्या. चरख्यावरून सूत कातण्यापासून ते ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ पर्यंत त्यांचे वडील इंग्रजांच्या दफ्तरी म्हणजे कोर्टात जज होते. त्यामुळे त्यांना सरळ सरळ स्वातंत्र्य लढ्यात भाग घेता येत नव्हता. 1930 साली जेव्हा त्यांचे वडील इंग्रजांच्या नोकरीतून निवृत्त झाले तेव्हा सगळे कुटुंब घेऊन ते मुंबईत स्थलांतरित झाले. तेव्हापासून मात्र उषा यांना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यास कोणतीच आडकाठी राहिली नाही.
त्यांनी ‘खबरी’ बनण्याच्या कामास सुरुवात केली. महत्त्वाच्या बातम्या पोहोचवणे, ब्रिटिशांनी तुरुंगात डांबलेल्या कार्यकर्त्यांना भेटणे, निरोप पोहचवणे ही कामे त्या आनंदाने करत असत. यातून त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असल्याचे समाधान मिळत असे. हे सगळं करत असताना त्यांनी शिक्षण चालूच ठेवलं. 1939 च्या सुमारास पदवी शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘लॉ’ चा अभ्यासही सुरू केला.
तिथून पुढे पुढे भारतात फारच अस्वस्थता चालू झाली. एक मुख्य कारण असे की, दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांनी भारतीय सैनिकांनाही लढण्यास भरीस पाडले. ह्यामुळे सैन्यात आणि भारतीयांच्यात नाराजीचे वारे जोरातच वाहू लागले. दुसऱ्या महायुध्दाशी भारतीयांचा काहीही संबंध नसताना लढावे लागणारच असे दिसू लागल्याने त्या काळच्या काँग्रेस ने ‘संपूर्ण स्वराज्य चळवळ’ हाती घेतली. तशी इंग्रजांकडे मागणी ही केली.

सिक्रेट रेडिओ स्टेशन
ह्यासाठी ‘चले जाव’ ची मुहूर्तमेढ 9 ऑगस्ट 1942 रोजी रोवली गेली. त्यावेळी आपले शिक्षण थांबवून उषा देखील 15 दिवस भूमिगत झाल्या. त्यांचा काहीही ठावठिकाणा नव्हता. अशातच, इंग्रजांनी ही चळवळ चांगलीच दाबून टाकली. कित्येक जण तुरुंगात गेले. पण उषाजी स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी गुपचूप काही साथीदारांसह एक सिक्रेट रेडिओ स्टेशन चालू केले. नानका मोटवानी, विठ्ठलभाई झवेरी, चंद्रकांत झवेरी, बाबूभाई ठक्कर ह्या सगळ्यांनी त्यांना स्टेशन चालू करण्यात मदत केली. याआकाशवाणी केंद्रावरून महात्मा गांधींचे संदेश पोचवणे, अत्च्युत राव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, पुरुषोत्तम त्रीकमदास ह्याची भाषणे ऐकवणे आणि देशभक्तीपर गाण्यांनी भारतीयांना इंग्रजांविरुद्ध जागे करणे असे मोलाचे काम त्यांनी सुरू केले.
त्या काळात इंग्रजांनी स्थानिक भाषेतील वृत्तपत्रे पूर्ण बंद पडली असताना हे सिक्रेट रेडिओ स्टेशन सगळ्यांसाठी एक नवीन आशेचा किरणच होते. व्यापारी, सुतगिरणी मालक आणि इतर श्रीमंत लोकांकडून या रेडिओ स्टेशनला देणग्या येत राहिल्या. इंग्रजांच्या हाती पडून पकडले जाऊ नये म्हणून उषा आणि त्यांच्या साथीदारांनी पुरेपूर काळजी घेतली होती. सतत एकाच स्थानावरून ते काहीही प्रक्षेपित करत नसत. एकच फ्रिक्वेन्सी सुद्धा वापरत नसत. सगळी सामग्री घेऊन जवळ जवळ रोजच ते स्थलांतर करून संदेश प्रक्षेपित करत असत. जेणेकरून इंग्रजांना त्यांना पकडणे सोप्पे नसेल, पण तरीही त्यांच्यातीलच एका ‘कमजोर कडीने’ धोका दिला. एक तंत्रज्ञाने सगळी खबर इंग्रजांना पोस्त केली.
इंग्रज ह्या स्टेशनच्या शोधात होतेच. त्यांना कधीपासून ह्या सगळ्यांना पकडून शिक्षा द्यायची होतीच आणि ते शक्यही झालेच. रेडिओ स्टेशन चालवणाऱ्या उषाजी आणि त्यांच्या साथीदारांना अटक झाली. इतक्या महत्त्वाच्या, देशहिताच्या कामात, आपल्याच एका साथीदाराने दगा केल्याने त्यांना अतोनात दुःख झाले. पण तरीही ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी तुरुंगात जावे लागणे सुद्धा एक सुवर्ण क्षणच आहे’ असेच त्या म्हणाल्या. तुरुंगात भले त्यांची तब्येत खूपच ढासळली, पण त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान होता.
4 वर्ष तुरुंगवासानंतर त्यांना 1946 ला सोडून देण्यात आले. पण त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना 1947 च्या स्वतंत्रता दिवसाच्या जल्लोषात सामील होता आले नाही. स्वातंत्र्योत्तर काळात उषाजी मेहतांनी आपले उर्वरित शिक्षण पूर्ण केले. खूप पुस्तके लिहिली. त्या शिक्षिकाही होत्या. कालांतराने निवृत्त झाल्या. त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानितही केले. 11 ऑगस्ट 2000 साली त्यांचे निधन झाले. पण तोपर्यंत देशाच्या ढासळत्या राजकारणावर त्यांनी टीका केली. भ्रष्टाचार आणि हिंसाचार बघून त्या व्यथित होत असत. ज्या महत्प्रयासाने स्वातंत्र्य मिळवलं गेलं ते त्यांनी पाहिलं होतं. त्यामागच्या जीवनदानाचे मोल त्या जाणत होत्या.

सारा अली खानच्या टीझरमध्ये काय?
‘ऐ वतन मेरे वतन’ या चित्रपटात सारा अली खान भारताची महिला स्वातंत्र्य सेनानी उषा मेहता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आज प्राइम व्हिडीओच्या युट्यूब अकाऊंटवरून साराच्या ‘ऐ वतन मेरे वतन’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये तुम्ही पाहू शकता की सारा एका रुममध्ये स्वत: ला बंद करून घेते आणि बोलते ‘अंग्रेजों को लग रहा है कि उन्होंने क्विट इंडिया का सिर कुचल दिया है. लेकिन आजाद आवाजें कैद नहीं होती. ये है हिंदुस्तान की आवाज है, हिंदुस्तान में कहीं से, कहीं पे हिंदुस्तान में.’ त्यानंतर अचानक दरवाजावर कोणी तरी जोर जोरात ठोठावतं. हे पाहून सारा घाबरते हे आपण टीझरमध्ये पाहिले असेलच. या टीझरची बॉलिवूडमध्ये एकच चर्चा आहे.साराचा हा आगामी चित्रपट ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
(संदर्भ – इन मराठी)