बाई गं, तुला मुक्त व्हावंच लागेल…!

स्त्रीचं शरीर हे तिचं स्वतःचं आहे. त्यावर फक्त तिचाच अधिकार आहे. त्याचं काय करायचं याचा निर्णय तिनं घ्यायचा आहे. ती याबाबतीत जितकी मुक्तपणे वागेल, तितका तिलाच फायदा होईल. तिनं जर समाजाच्या चूकीच्या धारणा स्वतःवर लादून घेतल्या तर मात्र तिची कधीच सुटका होणार नाही.

  • प्रतिक पुरी

निसर्गानं स्त्री-पुरुषांच्या शरीराची रचना अशी केली आहे की ज्यात पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त फायदा मिळतो. ही पुरुषांना झुकतं माप देणारी शारिरीक रचना निसर्गानं माणसाचं पुनरुत्पादन सुरळीत व योग्य प्रमाणात राहावं यासाठी केली आहे. पण कालांतरानं तो मुख्य उद्देश मागे पडला आणि पुरुषांनी आपल्या सुखासाठी या शारिरीक वर्चस्वाचा फायदा घेत स्त्रियांवर अधिकार गाजवायला सुरूवात केली. त्यांतील सर्वाधिक भीषण प्रकार आहे तो लैंगिक अधिकाराचा. जो निव्वळ बळजबरीचा अधिकार आहे. लैंगिक सुख असो वा दुःख असो यात स्त्रियांनाच जास्त त्रास भोगावा लागतो. पुरुष संभोग करून मोकळे होतात पण स्त्रियांना तसं मोकळं होण्याची सोय नाही. गर्भधारणेचा धोका त्यांच्यावर कायमच उलट्या तलवारीसारखा टांगलेला असतो. दरम्यान पुरुष मात्र अन्य स्त्रीसोबत रत होण्यास मोकळा असतो. संभोगानंतर त्याच्यावर कोणतीही जबाबदारी नसते. कोणताही शारिरीक त्रास त्याला सोसावा लागत नाही. कदाचित त्यामुळेच तो लैंगिक सुखांच्या बाबतीत बेजबाबदार आहे किंवा स्त्रियांना होणारे त्रास त्याच्या लक्षातच येत नाही.

स्त्री ही उपभोग्य आहे ही पुरुषी धारणा फार जुनी आहे. सोबतीलाच स्त्रिच्या नशीबी धार्मिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय कौंटुंबिक अशा सर्व परंपरा चालवण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली. तिच्या कौमार्याचा योनी शुचितेचा संबंध तिच्या चारित्र्याशी तिच्यावर झालेल्या कौंटुंबिक संस्कारांशीही जोडण्यात आला. तिची मानमर्यादा हा पुरुषांनी आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न केला कारण त्यात त्या स्त्रीवर असलेला त्यांचा हक्क शाबूत होत होता. या जास्तीच्या बंधनांमुळे स्त्रियांचं जीवन कमालीचं संकुचित झालं. मुख्य म्हणजे त्यांचं लैंगिक स्वातंत्र्य धोक्यात आलं. कारण त्यांचा स्वतःचा त्यांच्या लैंगिक इच्छांवरचा अधिकार समाजानं पर्यायानं पुरुषांनी अमान्य केला होता. आपल्या लैंगिक इच्छांविषयी तिनं काही बोलू नये, लग्न होईतो आपलं कौमार्य जपावं, लग्नानंतर नवऱ्याशिवाय इतरांपासून आपली लैंगिक गरज भागवू नये, तिनं असं काहीही करू नये ज्यामुळे तिचं शरीर इतरांकडून भोगलं जाईल आणि सर्वांत मुख्य म्हणजे यातील सर्व गोष्टींसाठी फक्त ती आणि तीच जबाबदार ठरवण्यात येईल असा अलिखित नियमच बनवला गेला.

या सर्व गोष्टी आता आपल्याला माहिती आहेत. यापुढे मात्र मी अशा गोष्टी सांगणार आहे ज्या आता स्त्रियांनी समजून घेऊन त्यानुसार वागण्याची गरज आहे. बलात्काराबाबतची मानसिकता बदलण्यासाठी त्याचा उपयोग त्यांनी करावा. आपल्या सध्याच्या काळात याची फार गरज आहे. या कामांत स्त्रियांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे, पुरुषांकडून त्यांनी फार आशा ठेवू नयेत. राजकारणी, समाजाकडून व धर्मरक्षकांकडून तर नाहीच नाही. यातील पहिली गोष्ट म्हणजे बलात्काराची सर्व जबाबदारी ही पुरुषांची आहे, स्त्रीची नाही. तिनं काय कपडे घातले, ती कुठे, कोणत्या वेळी, एकटी का गेली, तिची वागणूक कशी होती, याचा बलात्काराशी काहीही संबंध नाही. सडक्या मनोवृत्तीचे पुरुष कोणत्याही स्त्रीवर तिचं वय रुप रंग वेळ काळ ठिकाण तिचे कपडे तिची वागणूक या कशाचाही विचार न करता पहिली संधी मिळताच तिचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात. दोष पुरुषांचा आहे, स्त्रीचा नाही. त्यामुळे आपल्यावरील लैंगिक अत्याचारांसाठी कोणत्याही स्त्रीनं स्वतःला दोष देऊ नये, जबाबदार मानू नये, त्यासाठी कुढत बसू नये. बलात्कार हा फक्त एक शारिरीक अपघात आहे असं मानून या कडे बघावं. त्यामुळे त्यांचं चारित्र्य डागाळत नाही की त्यांचं स्त्रीत्वं नष्ट होत नाही. त्यांची योग्यता कमी होत नाही की त्यांचं मनुष्यत्व उणावत नाही. त्यामुळे लाज वाटून घेण्याची, अपमानीत होण्याची व त्यापायी स्वतःला समाजापासून तोंड लपवून एकाकी आयुष्य जगण्याची त्यांना काहीही गरज नाही. हे सर्व त्या बलात्कारी पुरुषानं करण्याची गरज आहे, त्या बलात्कारीत स्त्रीनं नाही.

संबंधित वृत्त :

प्रत्येक स्त्रीनं आपल्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविषयी जाहिरपणे विरोधी भूमिका घेण्याची गरज आहे. त्याविषयी ती जितक्या जास्त उघडपणे निर्भिडपणे बोलेल, लढेल तितकं ते तिच्यासाठी चांगलं असेल. समाज काय म्हणतो घरचे काय म्हणतात, मित्रपरिवार नातेवाईक कोण काय म्हणतं यापेक्षा तिनं आपल्या स्वतःचा विचार करावा आणि आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध लढावं. या कामात तिला सहाय्य करणारे अनेक लोक भेटतील याचाही तिनं विश्वास बाळगावा. तसं नाही झालं तरीही तिनं आपली हिम्मत खचू देता कामा नये. कारण हा शेवटी एक असा सामाजिक लढा आहे ज्यात अनेकांना जीवाच्या करारानं लढावं लागणार आहे. स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी स्वतःचं स्त्रीत्व टिकवण्यासाठी तिला हे करावं लागेल. त्याची पहिली पायरी हीच असेल की तिनं बलात्काराला कलंक मानू नये, त्यामुळे आयुष्य संपलं आहे असा विचार करू नये, आपण जगण्यास नालायक आहोत असा समज करून घेऊ नये, त्यामुळे आपण इतरांपेक्षा कमी दर्जाचे झालो आहोत असला विचारही मनात आणू नये. शरिराला झालेला एक अपघात यापेक्षा जास्त महत्त्व त्याला देऊ नये. पण त्याचवेळी स्वतःवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयी कायदेशीर लढाई लढावी. आपल्या मानसन्मानाला हिणवू पाहणाऱ्या प्रत्येकाविरूद्ध तिनं आवाज उठवावा. मी हे वारंवार सांगतोय की या कामांत स्त्रियांनीच पुढाकार घेण्याची गरज जास्त आहे कारण त्या जोवर स्वतःची मदत करणार नाहीत, त्या जोवर मानसिकदृष्ट्या कणखर बनणार नाहीत तोवर अन्य समजूतदार पुरुष त्यांना मदत करू शकणार नाहीत.

आपल्या समाजाची लैंगिक धारणा ही अतिशय बाष्कळ, दांभिक आणि प्रतीगामी स्वरुपाची आहे. त्यामुळे वयात आलेल्या स्त्री-पुरुषांना आपल्या लैंगिक भावनांना आवर घालत एका कुचंबणेतच जगावं लागतं. त्यांतून सुटण्यासाठी मग ते इतर मार्गांचा अवलंब करतात. त्यांत त्यांना सुख कमी आणि दुःख जास्त मिळतं. त्यातही सर्वांधिक नुकसान हे स्त्रियांचंच होतं. लैंगिक स्वातंत्र्याचा विचार आपल्याकडे रुजण्यास अजून बराच वेळ आहे. पण त्यादृष्टीनं वाटचाल करण्याची वेळ आता आली आहे. लैंगिक सुखासाठी लग्नाची अट, लैंगिक सुखावरून इतरांचा फायदा उचलणं, लैंगिकतेचा चारित्र्याशी व पावित्र्याशी संबंध जोडणं, या मूर्खपणाच्या धारणा बदलण्याची आता गरज आहे. एकमेकांच्या संमतीनं लैंगिक सुख घेण्यात काहीही गैर नाही. पण त्याचबरोबर त्यात सावधानताही बाळगणं महत्त्वाचं आहे तसंच गर्भधारणेचा प्रसंग उद्भवलाच तर दोघांनीही त्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी जर पुरुष वेश्यांकडे जात असतील तर स्त्रियांनाही तो अधिकार आहेच. लैंगिकतेचा आणि प्रेमाचा संबंध जोडणंही चूकीचं आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्त्रीपुरुष दोघांनाही आपल्या लैंगिक भूकेसाठी प्रत्यक्ष संभोगाची गरज पडत नाही. हस्तमैथुनाद्वारे ते दोघेही स्वतःची ही भूक शमवू शकतात. त्यानं कोणतीही शारिरीक मानसिक हानी होत नाही. विशेषतः स्त्रियांनी याचा अवलंब करण्याची गरज आहे कारण लैंगिक सुखासाठी त्या पुरुषांवर अवलंबून असतात असा पुरुषांचा आणि स्त्रियांचाही जो समज आहे तो चूकीचा आहे. या समजापायी अनेक मुली धोका पत्करूनही लैंगिक सुख घेतात आणि मग पस्तावतात.

स्त्रीचं शरीर हे तिचं स्वतःचं आहे. त्यावर फक्त तिचाच अधिकार आहे. त्याचं काय करायचं याचा निर्णय तिनं घ्यायचा आहे. त्याचं इतरांकडून शोषण होणार नाही, त्याचा अनुचित लाभ कोणी घेणार नाही याची काळजी तिनंच घ्यायची आहे. ती याबाबतीत जितकी मुक्तपणे वागेल, तितका तिलाच फायदा होईल. तिनं जर समाजाच्या चूकीच्या धारणा स्वतःवर लादून घेतल्या तर मात्र तिची कधीच सुटका होणार नाही. निर्णय घेण्याचं धाडस तिला दाखवावंच लागेल जर ही परिस्थिती तिला बदलायची असेल तर. ती यात एकटी असणार नाही हे मात्र नक्की.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here