‘रंगबाज’चा दीपू आणि कॉम्रेड चंद्रशेखर प्रसाद

‘रंगबाज’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजमधील विद्यार्थी नेता ‘दीपू’ आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता चंद्रशेखर प्रसाद यांच्यात काय आहे साम्य…? कोणी घातल्या चंद्रशेखरला गोळ्या…? बाहूबली खासदार मोहम्मद शहाबुद्दीन याचा या हत्येशी काय होता संबंध…?

  • महेशकुमार मुंजाळे

वास्तव आणि काल्पनिक अशा दोन्ही घटनांचे मिश्रण असलेल्या ‘रंगबाज’ या वेब सिरीजचा तिसरा सिझन Zee 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालाय. बिहारचे तत्कालिन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या राजवटीतील बाहुबली खासदार मोहम्मद शहाबुद्दीन याच्या आयुष्यावर आधारित ही वेब सिरीज असल्याची चर्चा आहे. ‘मुक्काबाज‘ चित्रपटात बॉक्सरची भूमिका साकारून लोकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण करणारा विनितकुमार सिंह याने बिहारचा खासदार आणि बाहुबली नेता शाह हारुन अली बेग ही मुख्य भूमिका साकारली आहे.

मात्र आपण ‘रंगबाज’ वेब सिरीजबद्दल इथे बोलणार नसून कथानकात असलेल्या ‘दिपू’ या पात्राबद्दल बोलणार आहोत. दिपू हा बाहुबली नेता शाह हारुन अली बेग उर्फ साहेब याचा बालपणीचा खास मित्र. अतिशय स्कॉलर आणि डाव्या विचारसरणीचा दिपू उच्च शिक्षणासाठी जिल्हा सोडून जेएनयूसारख्या विद्यापीठात दिल्लीला जातो. तिथे त्याला परदेशी विद्यापीठाची फेलोशिप मिळत असूनही जिल्हयातील बाहुबलीपासून त्रस्त झालेल्या शोषित,वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी दिपू पुन्हा गावात येतो, तो थेट आपल्या बालपणीच्या मित्राच्या विरोधी भूमिका घेऊन. दिपू डाव्या पक्षाच्यावतीने थेट साहेबच्या विरोधात निवडणुकीला उभा राहतो आणि प्रचारादरम्यानच साहेबचे गुंड दिपूला गोळ्या घालून ठार करतात.

दिपूचा हा वेब सिरीजमधील प्लॉट थेट चंद्रशेखर प्रसाद या विद्यार्थी नेत्याची आठवण करून देतो.

Chandrashekhar Prasad

चंद्रशेखर प्रसाद नावाचा विद्यार्थी नेता माहित आहे का?

सामंतवाद से आजादी, भूकमरी से आजादी, फासीवाद से आजादी’ या नाऱ्यांसह हातात डफ घेतलेला जेएनयुचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आपल्याला माहित आहे. त्या आधीच्या काही वर्षांत गेलो तर हैद्राबादचा रोहित वेमुला आपणास माहित असेल पण आपणास त्याच जेएनयुमधला तसाच तरुण, तडफदार आणि निधड्या छातीचा चंद्रशेखर प्रसाद नावाचा विद्यार्थी नेता माहित आहे का? गंगाजल, शूल, अपहरण, गँग्स ऑफ वासेपूर हे असे बिहारच्या सामाजिक परस्थितीवर बनलेले सिनेमे आपल्याला काल्पनिक, अतिशयोक्ती असणारे भासत असतील तर आपण कदाचित चंद्रशेखर प्रसाद आणि शहाबुद्दीन ही नावे अजून ऐकलीच नसतील.

बिहार म्हणजे गुंडाराज, हत्यारबंद गुंडांसह मतदान बूथ कॅप्चर करणं, विरोधात उभ्या राहणाऱ्या नेत्याला धमकावणं किंवा नाहीच ऐकलं तर थेट भर दिवसा गोळ्या घालून मारून टाकणं जिथे अगदी सामान्य होतं त्या बिहारच्या सिवान जिल्ह्यात 20 सप्टेंबर 1964 रोजी एक मुलगा जन्माला आला. अवघ्या आठ वर्षाचा असताना बापाचं छत्र तो हरवून बसला. आईने तिच्या मेहनत आणि संस्कारांवर त्या चिमुकल्याला उभं केलं. सैनिकी स्कूल मध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याची NDA साठी निवड झाली. परंतु दोन वर्षात तेथून तो बाहेर पडला आणि डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांमध्ये काम करू लागला. त्याच्या प्रतिभेच्या जोरावर तो ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा तो उपाध्यक्ष झाला. त्यानंतर तो जेएनयु म्हणजेच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाला आणि ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन (AISA), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मधील तो एक लोकप्रिय नेता म्हणून उभा राहू लागला. दोनदा जेएनयुच्या स्टुडंट युनियनचा अध्यक्ष राहिल्यानंतर त्याने स्वतःच्या जिल्ह्यातून सिवानमधून राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न चालू केले.

नुक्कड सभेत गोळ्या घातल्या

बिहारच्या गुन्हेगारीवर आणि लालूप्रसाद यादव सरकारच्या भ्रष्ट कारभारावर प्रशासन आणि पत्रकार ब्र सुद्धा उच्चारायला धजत नव्हते अशा परिस्थितीत चंद्रशेखरने 2 एप्रिल 1997 रोजी ‘बंद’ जाहीर केला होता. या आवाहनाला लोकांचा प्रतिसाद मिळावा, त्यांच्या मनातली भीती दूर व्हावी म्हणून तो वेगवेगळ्या नुक्कड सभा घेत होता. 31 मार्च रोजी सिवानच्या जेपी चौकात सायंकाळी 4 वाजता चंदू आणि त्याचे मित्र नुक्कड सभा घेत होते. चंदूच्या निडर डोळ्यांनी आणि ओघवत्या शैलीने रस्त्याने चालणाऱ्या लोकांनाही थांबायला भाग पाडलं होतं. ज्या सामान्य जनतेला आजवर आवाज नव्हता तो आवाज आज मिळू पहात होता. नव्या बदलाची ही नांदी होती. परंतु जे व्हायचं तेच झालं बंदुकधारी गुंडांनी येऊन चंद्रशेखर व त्याचा मित्र श्याम नारायण दोघांवर गोळ्यांच्या फैरी झाडल्या. या बेछूट गोळीबारात तिथेच उभा असलेला एक ठेलेवाला सुद्धा मरण पावला. खरंतर हा चंद्रशेखरचा मृत्यू नव्हता, मृत्यू होता प्रशासनाचा, अभिव्यक्तीचा, लोकशाहीचा.

हम अगर कही जायेंगे तो हमारे कांधोपर उन दबी हुई आवाजोकी शक्ती होगी. जिसको डीफेंड करने की बात हम सडकों पर करते है, और इसीलिये अगर व्यक्तिगत महत्वाकांक्षा होगी तो भगतसिंग जैसे शहीद होने की महत्त्वाकांक्षा होगी, ना की जेएनयु के इलेक्शन में जितने या हारने की!” अशा शब्दांत आपलं स्वप्न सांगणारा चंद्रशेखर खऱ्या अर्थाने आपल्या शब्दांना जागला. परंतु त्या गुन्हेगारांचं पुढे काय झालं?

मोहम्मद शहाबुद्दीन

जेएनयूत आंदोलन

चंदूच्या हत्येची बातमी जशी जेएनयुमध्ये पोहचली तसा विद्यार्थ्यांचा लोंढा दिल्लीत असणाऱ्या ‘बिहार निवास’मध्ये न्याय मागायला धावला. तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या मेहुण्याने साधू यादवने अगदी अहिंसक मार्गाने आपलं म्हणणं मांडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर बंदुक ताणण्याचे आदेश पोलिसांना दिले. वातावरण अजूनच चिघळलं.
ज्या गुंडांनी चंदू, त्याचा मित्रा आणि त्या ठेलेवाल्याची हत्या केली त्यांना उपस्थित साक्षीदारांनी ओळखलं होतं. ते लोक शहाबुद्दीनचे गुंड होते. त्यामुळे शहाबुद्दिन आणि साधू यादव यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी जोर धरू लागली. दिल्लीच्या रस्त्यांनी केवळ निर्भया प्रकरणात आंदोलकांची गर्दी पाहिली नाहीये, ना ही ‘जेएनयु’च्या विद्यार्थ्यांनी केवळ मोदी सरकारला सळो की पळो केलंय. सत्तेचा मद उतरवण्यासाठी 1997 सालीसुद्धा एवढंच वातावरण तापलं होतं. एवढीच गर्दी होती. याच पद्धतीने अहिंसक विद्यार्थी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला होता. महिला आंदोलकांना पुरुष पोलिसांनी मारहाण केली होती. पाण्याचे फवारे मारून आंदोलन पांगवले होते.

‘मेरा बेटा मरा नहीं है, आप मेरे लाखो बेटे हो!

इकडे वयाच्या अर्ध्यातच पतीला आणि आता तरुण मुलाला गमावून बसलेली एकटी पडलेली चंद्रशेखरची आई कौसल्या देवी आसवं गाळत घरात बसून राहील असं वाटलं होतं. पण ती कॉम्रेड चंदूची आईच, तिचंच तर बाळकडू चंद्रशेखरच्या अंगात होतं. तिनेही न्यायासाठी आपल्या शब्दांना शस्त्र केलं. देशभरातून लाखो विद्यार्थी गोळा झाले होते. कौशल्या देवींच्या नेतृत्वात न्यायाची लढाई चालू होती. ‘मेरा बेटा मरा नहीं है, आप मेरे लाखो बेटे हो!’ असं म्हणत चंदूचा लढा तसाच चालू ठेवण्यासाठी त्या मशाली पेटत्या ठेवत होत्या.

तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी कौशल्यादेवींना ‘एक लाख’ रुपयांचा चेक मदतनिधी म्हणून पाठवला होता. त्यास माघारी पाठवत त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्या म्हणतात

माझ्या मुलाच्या प्राणांच्या बदल्यात अशी काही किंमत स्विकारणं मी माझा अपमान समजते. तुमचे चेले या आधी सुद्धा येऊन गेले आहेत. त्यांनाही मी हेच सुनावलं आहे की तुमच्याजवळ असणारा चारा घोटाळ्यातला, जमीन घोटाळ्यातला जो काही भ्रष्ट पैसा आहे तो तुमच्याजवळच ठेवा. ही माझ्या मुलाची किंमत असू शकत नाही. मी या पत्रासोबत त्या लोकांनाही माझा निषेध कळवते आहे ज्यांनी माझ्यासोबत या प्रकारची घृणास्पद थट्टा करण्याचा प्रयत्न केलाय.

ChandraShekhar Mother

बाहुबली खासदार मोहम्मद शहाबुद्दीनवर संशयाची सुई

ओमकारा सारख्या चित्रपटात आपण ‘बाहुबली’ म्हणजे कोण आणि त्याचे गुंडाराज पाहिलयं. तीच परिस्थिती बिहार मध्ये होती. चंद्रशेखरचे मारेकरी ज्या मोहम्मद शहाबुद्दीनचे चेले होते असं म्हटलं जातं त्या शहाबुद्दीनबद्दल ऐकल्यास हे सर्व चित्रपट फिके वाटू लागतील. लालू प्रसाद यादव यांच्या जनता दलातून दोन वेळा आमदार आणि चार वेळा खासदार राहिलेल्या या व्यक्तीच्या नावावर तब्बल 75 गुन्ह्यांची नोंद आहे. यातील 10 गुन्ह्यांसाठी त्याला शिक्षा सुनावली गेलीय आणि 45 केस तर अजून न्यायप्रविष्टच आहेत. मार्क्सवादी-लेनिनवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते छोटेलाल गुप्ता यांचीसुद्धा हत्या या शहाबुद्दीनने केली होती. 2003 साली या गुन्ह्यात त्यास शिक्षा झाली होती. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलातून सिवान मतदार संघाचा उमेदवार पुन्हा एकदा शहाबुद्दीन हाच होता. सिवान जेलमध्येच असणारा शहाबुद्दीन आजारपणाचं नाटक करून दवाखान्यात दाखल व्हायचा. तिथल्या स्पेशल हॉलमध्ये तो त्याची छोटेखानी सभा आणि बैठका घ्यायचा. या अशा पद्धतीने जेलमधून निवडणूक लढवूनसुद्धा त्याचाच बहुमताने विजय झाला होता.

चंदाबाबू नावाच्या व्यक्तीची सिवानच्या मोक्याच्या जागी असणारी इमारत बळकावण्यासाठी त्याने धाकदपटशाहीचा वापर केला होता. चंदाबाबूंना आपल्या बद्दल भीती असावी म्हणून त्याने त्यांच्या मुलांचे अपहरण केले होते. याच दरम्यान झटापट झाली आणि त्याने दोन मुलांना ऍसिड ओतून मारून टाकले. तिसरा मुलगा तेथून पळाला पण त्याचा अजूनही तपास लागला नाही. त्यासही शोधून मारले असावे असा चंदा बाबूंचा आरोप आहे. अशा या क्रूरकर्मा शहाबुद्दीनच्या गुंडांनी चंद्रशेखर प्रसाद यांची हत्या केल्याने जेएनयुच्या विद्यार्थ्यांनी आणि आई कौशल्या देवीने शहाबुद्दीनची खासदारकी रद्द करावी, त्यावर खटला चालवून फाशी द्यावी विद्यार्थ्यांवर बंदुका ताणण्याचे आदेश देणाऱ्या साधू यादवला अटक करावी अशी विनंती पंतप्रधान गुजराल यांना केली होती. त्यास गुजराल ‘अननॅचरल’ म्हणाले आणि विनंती अर्जास केराची टोपली दाखवली.

गुन्हेगार अजूनही मोकाटच

राजकीय हत्या असूनही यास सामान्य खुनाच्या प्रकाराप्रमाणे हाताळलं गेलं आणि 1997 साली झालेल्या घटनेवर सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने 26 फेब्रुवारी 2012 रोजी 3 जणांना या हत्येचे गुन्हेगार ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 23 मार्च 2012 रोजी चौथ्या एका आरोपीलाही याच केसमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आणि पाचवा न्यायालयीन प्रक्रिया चालू असतानाच वारला. या चौघांनी उच्च न्यायालयात दाद मागितली परंतु 2019 साली पटना उच्च न्यायालयाने त्यांची जन्मठेप कायम ठेवली. बंदूक चालवणाऱ्या हातांना शिक्षा मिळाली खरी परंतु मेंदूचे काय? मुख्य सूत्रधार म्हणून ज्या शहाबुद्दीनचे नाव होते त्याच्या विरुद्ध ठोस पुरावे नसल्याचे कारण देत सीबीआयने चार्जशीटमध्ये नाव सुद्धा दाखल करून घेतले नाही.

VeenitKumar Singh Playing a Role of Shahabuddin Mohmmad

1997 सालच्या घटनेची 2019 मध्ये म्हणजेच तब्बल 22 वर्षांनी कागदोपत्री न्यायप्रक्रिया पूर्ण झाली परंतु मुख्य सूत्रधार आणि त्याचे पाठीराखे तसेच मोकाट राहिले.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here