पेडगावचा वैभव निघाला लंडनला!

मजुरी करणाऱ्या आई वडिलांच्या पोटी जन्मलेल्या वैभव विमल गणेश सोनोने याने शिक्षणासाठी इंग्लंड गाठले आहे. त्याला दीड कोटींची स्कॉलरशिप मिळाली असून. महाराष्ट्रातील उच्चशिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचा प्रवास प्रेरणादायी आहे . याच निमित्ताने बाईमाणूसने घेतलेली त्याची विशेष मुलाखत

  • संजना खंडारे

ज्याला आईवडिलांनी अमाप कष्ट करून शिकवले, ज्याने आईचे गळ्यातील मंगळसूत्र पायातील जोडवे विकून खाणावळीचे पैसे भरले, पुस्तक चोरल्याची शिक्षा म्हणून ज्याच्याकडे शिक्षकांनी ग्रंथालयाची चावीच सुपूर्द केली, पुस्तकातून जो स्वतःची मतं मांडायला शिकला, फर्ग्युसन कॉलेजला एडमिशन घ्यायला जाण्यासाठी ज्याच्या घरी 2000 रुपये ही नव्हते, तोच वाशिम जिल्ह्यातील पेडगावच्या विमल आणि गणेश सोनोने या दाम्पत्याचा मुलगा आता ब्रिटनला शिक्षणासाठी जातोय. त्याला तेथील विद्यापीठाकडून तब्बल दीड कोटी रुपयांच्या स्कॉलरशिप मंजूर झाल्यात. वैभव विमल गणेश सोनोने असे या तरुणाचं नाव आहे.

प्रश्न : तुझं प्राथमिक माध्यमिक शिक्षण कुठे आणि कश्या परिस्थितीत झालं?

उत्तर: मी तसा मूळचा पेडगावचा आहे. रिसोड तालुक्यात माझं गाव आहे. आम्ही आधी नाशिकला राहायचो. आमच्या गावातून मोठ्या प्रमाणात लोक कामधंद्यासाठी स्थलांतर करायचे तसेच आमचे कुटुंब देखील नाशिकला आले. असा माझा तिथे पाहिलीत प्रवेश झालेला पण वडिलांचा 2001 मध्ये अपघात झाल्यावर आम्ही पुन्हा गावी परत आलो. गावातल्या जिल्हा परिषद शाळेत 4थी पर्यंत शिकलो. गावच्याजवळच माध्यमिक शाळा आहे. गावातील सगळी पोरं सहसा तेथेच शिकायला जातात.. पण त्या शाळेत जायला पावसाळ्यात बऱ्याच अडचणी निर्माण व्हयच्या सहसा पावसाळ्यात शाळा बंदच असे कारण गावाच्या आणि त्या शाळेला जायच्या रस्त्यात एक नदी लागायची. आमच्या परिसरात सखाराम महाराज संस्थान आहे, लोणी येथे. आमच्या घरापासून जवळपास 45 ते 50 किमी लांब तर तिथल्या हॉस्टेल मध्ये बाबांनी माझं ॲडमिशन केलं. तिथे मी दहावी पर्यंत शिकलो. अकरावीला अशी इच्छा होती की वाशीम ला जाऊन चांगल्या कॉलेज मध्ये शिकावं तिकडे जाऊन आरे कॉलेज ला जाऊन चौकशी देखील केली पण तेकडे राहण्याची व्यवस्था काही जमली नाही. घरची परिस्तिथी काही अशी नव्हती की मला रूम करून तेथे राहता आलं असत. मग मी माघारी फिरलो परत लोणीला 2 वर्ष काढले. 11वी ला सायन्स घेतलं.

2-3 महिन्यात माझ्या शिक्षकांना जाणवलं की सायन्स फील्ड मध्ये याला काही इंटरेस्ट नाही. मुळात मला पण नव्हताच, पण घरच्यांचं म्हणणं असेल किंवा आजूबाजूचे असतील डॉक्टर इंजिनीअर हो असं सांगणारे दुसरं घेऊन काही फायदा नाही होणार. मी पण जरा 2-3 महिन्यांनंतर हिम्मत करून सरांना बोललो, ‘हे काही आपल्याला जमून नाही राहिलं बा’ सरांनी लगेच आर्टस् मध्ये प्रवेश करून दिला. कारण, त्यांनाही कळालं होत हा काही सायन्सचा स्टुडन्ट नाही. 12वी पास होई पर्यंत घरच्यांना माहितही नव्हतं की मी आर्टस् मध्ये शिकतोय म्हणून. घरी मी इतिहास समाजशास्त्र ची पुस्तक घेऊन यायचो तेव्हा बाबा बोलायचे अरे आम्ही तर तुला इंग्रजीची पुस्तक घेऊन दिली ही कोणती आहेत तेव्हा मी म्हणायचो की मला कलेक्टर व्हायचंय हा त्याचा अभ्यास करतोय. असा काही तरी बहाणा बनवायचो.

12वीत चांगले मार्क्स मिळाले, अर्थशास्त्रात 94 मार्क होते वाशिम मध्ये मी पहिला आलतो. तेव्हा घरच्यांना कळलं. मग तेव्हा सोप्यात सोपा मार्ग कोणता तर डी. एड करा डी. एड केल्यावर लवकर नोकरी लागते. पण आमचे जोशी सर म्हणाले बेटा डी.एड वगैरे काही नको करू तुझ्यात खूप क्षमता आहे चांगल्या कॉलेज ला ग्रॅज्युएशन पुर्ण कर. तेव्हा आपल्याकडे काही मोबाईल नाही इंटरनेट नावाची गोष्ट माहीत नाही तेव्हा सरांनीच सगळं शोधल. मुंबईच एल्फिन्स्टन कॉलेज, पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज, औरंगाबादच मिलिंद कॉलेज असे बरेच. तेव्हा मी फर्ग्युसनला जायचं ठरवलं त्याची ही तेव्हाची परिस्तिथी कधीच न विसरता येणारी आहे.

टीम तरुणाई सोबत कश्या प्रकारे जोडल्या गेले?

उत्तर : झालं असं की मी NSS मध्ये होतो. अभिषेक आकोटकर आणि वैभव नीमगीरे हे माझे मित्र देखील सोबत होते. NSS चा वर्षाच्या शेवटी जल्लोष म्हणून एक कार्यक्रम असतो. तेव्हा आम्ही डॉ. रवी कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांना आमंत्रित केलं. तेव्हा त्यांची मुलाखत मी घेतली होती. त्यात त्यांनी तरुणाई शिबिराचा उल्लेख केला होता. तेव्हा आम्ही म्हणलो त्यांना की आम्ही येऊ. मी वैभव आणि अभिषेक आम्ही तिघे गेलो आणि 2015 लाआम्ही ते शिबिर co-ordinate केलं. आणि ज्या पद्धतीने आम्ही ते co-ordinate केलं ते बाबांना (डॉ. रवी कोल्हे) खूप आवडलं आणि यानंतर ही तू co-ordinate कर असं ते म्हणाले.

मग आम्ही हळु हळु सोशल मीडिया पेज ओपन केलं. बाबांचा ईमेल आयडी काढला. बाबांना खरं तर प्रसिद्धी वगैरे काही आवडत नव्हती पण आम्ही विचार केला की अधिकधिक युवकांपर्यंत पोहोचायचं असेल तर आजच्या जगाचा मूलमंत्र सोशल मीडियाच आहे. मग फेसबुक पेज वगैरे ओपन केलं आणि तरुणाईची सुरुवात झाली. त्यानंतर आम्ही शिबिरामध्ये नवनवीन गोष्टी ऍड केल्या जसे की गटचर्चा, बुद्धीला चालना मिळाली पाहिजे, बाहेरच्या व्यक्तींना आमंत्रित करणे, स्वयंशिस्त, वेळापत्रक नियोजन, आणि अजून बऱ्याच ऍक्टिव्हिटी ॲड केल्या.

प्रश्न: तुझ्या इथपर्यंतच्या वाटचालीत तुला घरच्यांनी कश्याप्रकारे साथ दिली?

उत्तर: घरच्यांशिवाय तर मी हे यश मिळवूच शकलो नसतो त्यांची मोलाची साथ मला माझ्या वाटचालीत लाभली. म्हणजे, बाबांचा अपघात झाला त्या नंतर ते 2 वर्ष ते काहीच काम करू शकले नाही. पण त्या नंतरही ते सकाळी दुपारी गोळ्या घ्यायचे, दगडं उचलायचे काम करायचे. कारण दुसरा पर्याय नव्हता. आईपण काम करायची. त्यानंतर जेव्हा पुण्याला जायचं तेव्हा कळालं उद्या फर्ग्युसन कॉलेज ची लास्ट डेट आहे 2 पर्यंत फॉर्म सबमिट नाही केला तर प्रवेश मिळणार नाही. घाईघाईनं घरी आलो 6 ला आईला म्हणलं 8 वाजता निघायचं बा पुण्याला जायचं ये. आई म्हणे थांब पप्पांना येऊ दे सांगते त्यांना, तेव्हा पुण्याला जाण्यासाठी घरात 2 हजार देखील नव्हते.

तेव्हा पाऊस चालू होता खूप, बाबा भरपावसात मित्रांकडे गेले. आज जायचं पोराले 2 हजार रुपये पाहिजे. त्यांच्याकडे ही नव्हते. पण आमच्या इकडे एका दुकानात फकिरा अंभोरे म्हणून एक व्यक्ती होते. आम्ही त्यांना फकिरा बापू म्हणायचो त्यांचं वय तेव्हा 70 वर्ष जवळपास आज 80 वर्ष असेल तर तेव्हा बापूंना कळलं की याच्या पोराला शिकायला जायचं हाय तर तेव्हा फकिरा बापू पावसातच काठी टेकवत टेकवत छत्री घेऊन घरी गेले त्यांच्या घरून 2 हजार रुपये आणले आणि आमच्या घरी आणून दिले. त्या पावसात मग ऑटो ची व्यवस्था केली आमच्या गावात तेव्हा अपघात झाला होता त्यांना हे त्याच ऑटो मध्ये टाकलं होत पूर्ण रक्ताने भरलेल्या त्याच ऑटोत आम्ही पोते टाकून त्यावर बसलो कारण गावात दुसरा ऑटो त्यावेळी नव्हता. हा एक प्रसंग.

त्यानंतरचा दुसरा प्रसंग असा की, पुण्याला गेलो तेव्हा हॉस्टेल ला नंबर लागेपर्यंत मावस भावाकडे राहायचो ते पण चार पाच जण रूम करून राहायचे. मी ना त्यांना रूमचे भाडे द्यायचो ना जेवणाचा खर्च कारण आपल्याजवळ नव्हतेच पैसे. एक दिवस असं झालं की एक दिवस त्यांच्याकडून नकळत चावी सोबत घेऊन गेले. थोड्यावेळानंतर आईचा कॉल आला बोलता बोलता आई म्हणे जेवलास का? तेव्हा माझ्या तोंडून निघालं की नाही ‘आज ते रूम ची चावी नाही ये तर टेरेस वर थांबलोये.’ तेव्हा आईला खूप वाईट वाटलं तिने तेव्हा लगेच तीच मंगळसूत्र पायातले जोडवे शेतातच बाबांना काढून दिले. बाबा तेथून 8 किमी पैदल गेले तिथं ते विकलं आणि रिसोडला जाऊन पोस्टाने मला पैसे पाठवले. त्या पैशातून मग मी कॉलेज मध्ये मेस लावली. असे बरेच प्रसंग आले जेव्हा त्यांनी स्वतःचा विचार न करता माझ्या शिक्षणाला पैसा पुरवला. मला बऱ्याचदा गावातून, नातेवाईकांचे, मित्रांचे फोन यायचे. की, शिक्षण करता करता पार्ट टाईम जॉब कर घरच्यांना पैसे पाठव तुझ्या घरच्यांकडून काय काम होत नाही. तेव्हा मग काही दिवसानंतर मी विचारलं होत बाबांना की मी जॉब करतो म्हणून, पण बाबा म्हणाले की बेटा, आपल्या चार पिढ्या दरिद्रित आणि चार पिढ्या उपासमारीत गेल्या अजून चार वर्ष आपण पोटोला चिमटा काढून जगलो तर आपण उपाशी नाही राहणार. पण तू जर आता शिक्षणाकडे दुर्लक्ष करून जॉब करशील तर आपल्या पुढच्या 10 पिढ्या पण अश्याच गरिबीत जातील. तेव्हा वाईट वाटायचं पण त्यांच्या सांगण्याप्रमाणे शिक्षणावरच लक्षकेंद्रित केलं.

प्रश्न: एकलव्यसोबत तुझा कसा संपर्क आला?

उत्तर: एकलव्यशी तसं फार जुनं नातं आहे. राजू दादा जेव्हा TISS ला होता तेव्हा मी फर्ग्युसनला होतो. तेव्हा ट्रान्सफॉर्मेशन महाराष्ट्रही देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांनी काढलेली फेलोशिप होती. त्यात एकलव्यची ‘एक गाव एक वाचनालय’ ही संकल्पना होती. ती संकल्पना मला खूप भावली होती कारण वाचनालय म्हणजे माझा जीव की प्राण. राजूदादांच्या या संकल्पने मुले ही राजूदादांशी जोडल्या गेलो. आणि मी माझ्या गावामध्ये एकलव्याच्या एकलव्य लायब्ररी सुरु केली. मैत्री तशी आमची फार जुनी म्हणजे 2014 पासून ची ओळख होती. पण तेव्हा इतकी जास्त काही एकलाव्याशी किंवा राजूदादांशी संबंध यायचा नाही पण जेव्हा 2018 ला एकलव्य ऑफिशियल रित्या चालू झालं तेव्हा मी एकलव्य च्या स्टुडन्टचा APU साठी मेंटॉर झालो. कारण APU बद्दल पूर्ण माहिती मला होती. APU चे सगळे प्रोफेसर देखील ओळखीचे होते. त्या मुळे कोणत्या विद्यार्थ्यांना जर तेथे काही अडचण आली तर माझी चांगली ओळख होती. विद्यार्थ्यांना मुलाखत आणि लेखी परीक्षेसाठी गाईड करायला लागलो.

नंतर 2021 जून मध्ये राजूदादांचा कॉल आला. सकाळी 6 ला दादांचा कॉल आला आणि म्हणे की वैभव माझं सिलेक्शन झालं चेवनिंगसाठी मी जातोय UK ला तू पण तयारी कर तुला काही मदत लागली तर मी करेल. मी तेव्हा थोड्याफार प्रमाणात अभ्यास सुरु ही केला होता पण इतकं काही मनापासून नाही. सप्टेंबर मध्ये जेव्हा स्नेहल घरी गेली आणि आमच्या लग्नाचा विषय तिने घरी काढला तेव्हा जरा त्या गोंधळात मला काही तेवढी तयारी करता आली नाही. मग 2022 मध्ये राजू दादांचा परत कॉल आला. आणि तेव्हा तो बोलला की “आता तू एकटा नाही तर तुम्ही दोघेही पुढच्या वर्षी कोणत्याही परिस्तिथीत तुम्ही दोघे मला लंडन मध्ये पाहिजे. तुम्हाला काय करायचं ते करा तुम्हाला काय मदत पाहिजे ते सांगा मी करतो. पण तुम्ही मला लंडन ला पाहिजे म्हणजे पाहिजे.” आणि मला वाटतं की राजूदादानी जो विश्वास ठेवला आमचं जे यश आहे ते आमच्यापेक्षा ही जास्त त्याच्या विश्वासाचं यश आहे. राजूदादांनी विश्वास दाखवला आणि त्या विषासाला खरं उतरण्याचा प्रयत्न आम्ही दोघांनी केला. अनेक मेंटॉर भेटत गेले. मी एकलव्य सोबत UG प्रोग्रॅम चा मेंटॉर होतो. आता ज्या एकलव्य ने मला दिशा दाखवली तसंच अनेक मुलांना ग्लोबल स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी भविष्यात माझ्या कडून कशी मदत होईल हे सगळं आहे डोक्यात.

प्रश्न: APU मधील तुझ्या काही आठवणी किंवा प्रसंग जे अविस्मरणीय आहे ते सांग?

उत्तर: APU ची तर एक अशी आठवण आहे की ज्यामुळे मी स्वतः खूप शिकलो. झालं असं की प्रो. वंदना स्वामीयांचा क्लास होता आम्ही वर्गात जेंडर शिकत होतो. आणि त्या वेळी जेंडर वर खूप मुलं बोलायचे आणि तेव्हा 2016 मध्ये एलिट मुलं असायची आणि ग्रासरूट लेवल मधून एखादा दुसरा विद्यार्थी असायचा. त्या क्लास मध्ये तेव्हा मी बोललो के तुम्ही महिलांच्या प्रश्नावर एवढं बोलता तर महिलांचं जगणं आपण एक दिवस जगून पाहू. तेव्हा मग मी मॅडमला “क्रॉस ड्रेससिंग” ची कल्पना सुचवली. की बाबा मुलांनी मुलींचे कपडे घालावे आणि मुलींनी मुलांचे. आणि नेक्स्ट लेक्चर ला क्रॉस ड्रेससिंग मध्येच यायचं. मॅडमने लगेच होकार दिला. मुलींसाठी ते जरा सोपं होत. त्या शर्ट पॅन्ट घालून आल्या पण पोरांसाठी ते जरा अवघड झालं. कारण बरीच लोक बोलबच्चन खूप करतात की महिलांचं जगणं असं महिलांचं जगणं तस. माझं म्हणणं असं होत की बा मले ते जगायचं. बाई म्हणून मला एक दिवस जगायचं. म्हणून मी साडी घालायचं ठरवलं. मग मी बऱ्याच जणांशी बोललो माझ्या पार्टनरशी बोललो तर ते म्हणे की टी शर्ट घाल आणि साडी घाल. मग मी म्हणलं की नाही बा मी टी शर्ट का घालू मी ब्लाउज घालेल ब्रा घालेल. महिला जसं जगतात मला तसंच जगायचं. एका मैत्रिणीकडून साडी घेतली आता साडी घालायची कशी तर यू ट्यूब वर 2-3 वेळा साडी कशी घालायची याचे व्हिडियोज बघितले.

आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी 7.30 ला साडी घालूनच खाली आलो कॅन्टीन मध्ये नाश्ता केला कॉलेज च्या बस मध्ये चढलो. आणि हे सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक होत. बाकीचे मुलांनी बॅग मध्ये आणलं होत. तेवढ्या लेक्चर मध्ये कपडे घालायचे आणि नंतर चांगले करायचे. असं त्यांचं ठरलेलं. पण मी एकटा पूर्ण दिवस भर साडीत होतो. आणि तो जो माझा दिवस होता त्या दिवसाने मला खूप काही शिकवलं. पोरांनी बरीच कंमेंटकेल्या पण वर्गात माझं लक्षच नव्हतं. इकॉलॉजि च्या क्लास मध्ये तर अजिबातच लक्ष नव्हतं. म्हणजे मला वाटायचं मागून माझी पाठ दिसतीये का? माझं पॉट दिसतंय का? ब्रा ची स्ट्रीप दिसतीये का? पदर वेवस्थित आहे का? ब्लॉउज मापाचं नव्हतं तर ब्लॉउज वर जातंय का? म्हणजे दिवस भर माझ्या डोक्यात हेच विचार होते दुसरं काही विचार करायला वेळच नव्हता. काय शिकवले कशाशी काही घेणंदेणं नव्हतं. बरेच प्रॉफेसर लिफ्ट मध्ये भेटायचे तर आज काही नाटक आहे का तुझं? म्हणजे बघा नाटकात पुरुषांनी असं केलेलं चालत. पण नॉर्मल आयुष्यात का नाही? APU तील त्या प्रसंगाने मला तिथे खूप प्रसिद्धी मिळाली. सगळे प्रोफेसर ओळखायला लागले. स्नेहलने ही ती गोष्ट खूप appreciate केली. त्यामुळे स्नेहलसोबतच माझं नातं अधिक घट्ट झालं. आता स्नेहलला लक्षात राहत नाही पण मला माहितीये की तिची पाळी येण्याची तारीख काय आहे. आणि आता मग तिची चिडचिड सुरु होणार तिला कस बोलायचं कस संभाळायचं हे मी 5 दिवसाआधी पासूनच करायला लागतो. तिने शिव्या जरी दिल्या तरी आपण काहीच बोलायचं नाही. कारण पाळी बाबतीत तरी पुरुषांना अनुभव नाही घेता येत पण महिला म्हणून एक दिवस जर मी जगलो त्यातून मी बरच शिकलो.

प्रश्न: वाचनाचं तुमच्या जीवनात किती महत्व आहे?

उत्तर: वाचन हे माणसाला समृद्ध करत. आणि वाचनानेच मी समृद्ध झालो आणि पुढे ही होतच राहील. तुम्ही जे पण वाचाल ते आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात कामी येतं म्हणजे येतच. तुम्ही जे पण कॅरेक्टर वाचाल ना मग काही वाचा तुम्ही फिकशन वाचा नॉन फिकशन वाचा काही ही वाचा.

वाचनासंधर्बातील माझ्या आठवणीत राहिलेली आठवण म्हणजे मी जेव्हा आठवीत होतो तेव्हा लायब्ररी मधून सुरेश भट यांचं उशह काल होता काळ रात्र झाली. ही पुस्तक मला प्रचंड आवडलं होत. ते मी लायब्ररी मधून घेऊन आलो. आणि त्यातील कविता गझल मला लिहून घ्याव्या होत्या आणि ते झालं की आपण हे पुस्तक परत लिब्ररी मध्ये ठेवून देऊ असा विचार केला. पण ते पुस्तक मला इतकं आवडलं की मी ते लायब्ररी मध्ये परत दिलंच नाही. दोन हफ्त्यानंतर झालं असं की आमच्या हॉस्टेल मध्ये चोरी झाली आणि मग सगळ्यांच्या पेट्या चेक झाल्या त्यात माझ्या पेटीमध्ये हे पुस्तक सापडलं. मग आमच्या सरांनी मला आमच्या संस्थान च्या महाराजांकडे नेलं. त्यांनी मला विचारलं तुला पुस्तक वाचायला आवडतात का? मी म्हणलं खूप आवडतात. ते सर म्हणले याला आता जाऊ द्या उद्या घेऊन या माझ्याकडे. मग परत दुसऱ्या दिवशी सर मला घेऊन गेले तेव्हा त्यांनी मला लायब्ररीची चावी दिली. आणि म्हणे ही लायब्ररी आणि तू काय करायच ते कर. मला तर खजिनाच मिळाला होता. तेव्हा 8वी ते 11वी मी जवळपास 4000 ते 4500 पुस्तकं वाचली. आणि त्यानंतर ही भरपूर वाचन केलं. आजही करतोय. मला जर कधी काहीच नसलं तर मी लव्ह स्टोरीज वाचतो पण काही ना काही वाचतो. वाचल्याशिवाय पर्यायच नाही. कारण वाचनामुळे मला मी पुस्तकात जितके पात्र वाचले ते सगळी पात्र मला आयुष्य जगायला मदत करतात, विचार करायला भाग पाडतात, माणूस म्हणून खऱ्या अर्थाने जगायला शिकवतात.

माझ्या वडिलांनी मला बाबासाहेब वाचायला आणून दिले. बाबासाहेबांनी जे दिलं ते वाचायला दिलं. बाबासाहेबांवर कोणी काय लिहिलंही मी फार कमी वाचलं. ऑथेंटिक साहित्य वाचा काहीही वाचा पण ऑथेंटिक वाचा जेणेकरून त्या लोकांचा दृष्टिकोन तुम्हाला कळतात आणि तुमची मतं बनतात दुसऱ्याची मतं तुमच्यावर लादल्या जात नाहीत. आंबेडकरांवर कोणी लिहिलं ये आणि आपण जर ते वाचलं ना तर त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून आपण विचार करायला लागतो.

म्हणजे लहानपणी आम्ही साहेबराव एरेकर जे प्रभोधनकार म्हणून ओळखले जायचे की जे प्रभोधनाच्या नावाखाली समाजात द्वेष पसरावयाचे. त्यातून आम्ही ब्राम्हण विरोधी बनत गेलो. मराठा विरोधी बनत गेलो, गांधी विरोधी बनत गेलो, पण जेव्हा खरंच आंबेडकर वाचायला घेतला तेव्हा गांधी खरा समजला. आंबेडकर वाचतांना पंजाबराव देशमुख समजले. मग गांधी वाचायला घेतले. गांधी वाचतांना नेहरू समजले. नेहरू वाचतांना आंबेडकर समजले. त्यामुळं ऑथेंटिक वाचन खूप गरजेचं आहे.

प्रश्न: इंग्रजी भाषेचा न्यूनगंड होता का?

उत्तर: पुण्यामध्ये माझी मानलेली बहीण होती नलिनी पाटील तिने इंग्रजीला मनावर घे असा अट्टहास च केला. आपलं असं होत की नॉर्मल येते ठीक झालं. पण तिने माझ्याशी बोलणंच बंद केलं. ती 2 दिवस जेवली नाही. की दादा तू जो पर्यंत इंग्रजी शिकण्याचं मनावर घेत नाही इंग्रजीचा अभ्यास करत नाही तो पर्यंत बोलणार नाही कारण APU मध्ये जाण्यासाठी तुला इंग्रजी आवश्यक आहे. ती असं करायची की रोनोज मराठी वर्तमानपत्र घेऊन यायची त्यातली एक बातमी मला द्याची आणि ही इंग्रजी मध्ये करून दे मग मी ती बातमी इंग्रजी मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचो आणि ती ते चेक करायची. असं नलिनी पाटील, प्रतिमा पाड्गाने असेल या मुलींनी माझ्याकडून खूप मेहनत करून घेली.

APU मध्ये गेल्यावर तर भाषेचा खूप न्यूनगंड होता. सगळे इंग्रजी मध्ये बोलायचे. पण माझं असं होत की इंग्रजी समजते पण नीट बोलता येत नाही. पण आपल्याला जी भाषा येते त्या भाषेत आपलं मत मांडायचं. मी उभा राहून मॅडमला म्हणायचो की मी हिंदीत बोलू का? तर मी हिंदीत बोलायचो. मॅडम ही इतक्या चांगल्या होत्या की ज्या मुलांना हिंदी समजायचं नाही त्यांना मी जे बोललो ते इंग्रजी मध्ये ट्रान्सलेट करून सांगायच्या.

त्यांनी जर म्हणलं असत की नो नो U cant speak in hindi तर माझे विचार तेथेच थांबले असते. पण त्यांनी समजून घेतलं.

प्रश्न: ज्या फेलोशिप तुला मिळाल्या त्याची तयारी तू कशी केली?

उत्तर: एकलव्य च्या ग्लोबल स्कॉलर प्रोग्रॅम च्या माध्यमातून मी तयारी केली. त्यांनी जे जे सांगितलं ते वेळेच्या आधी पूर्ण केलं. माझा मित्र जो आहे अभिषेक त्याच वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. इंग्रजीची साठी माझ्यावर खूप मेहनत घेतली. सेन्टेन्स कस फ्रेमिंग करायच वगैरे. तयारी तशी अवघड नाही गेली कारण इन्व्होर्मेन्ट चा 5 वर्षांचा ग्राउंड अनुभव सोबत होता. ज्या गावात वीज नाही ज्या गावात पाणी नाही रास्ता नाही नेटवर्क अश्या गावात राहिल्यामुळे त्या आदिवासींचं जगणं मी स्वतः जगलो होतो. धामणपणीतल्या त्या गावातल्या लोकांनी सुरवातीला मला किडनी चोर म्हणून देखील मारलं होत. पण तरी मी तेथेच राहिलो. तेव्हा मला संस्था म्हणली होत की तू परत ये तुला अभ्यासासाठी दुसरं गाव देतो पण मी म्हणालं की नाही मी इथेच राहतो. कारण त्या गावाला तेव्हा काळं पाणी म्हणल्या जायचं. त्या नंतर ही माझ्यावर दोनदा अटॅक झाले. कारण जसं जसं मी लोकांशी बोलत गेलो त्यांना सुशिक्षित करत गेलो तस काही गावातील मंडळींचा पैसे खान बंद झाला. आता त्या गावाची परिस्तिथी अशी आहे के त्या गावातून 90% स्थलांतर थांबलय. त्या गावात वर्ष भर पिण्यासाठी पाणी आहे. आता या गावातील अशिक्षित महिला कलेक्टरला शिकवतात की आम्ही बघा कशी प्रगती केली. हा सगळं अनुभव सोबतीला होता म्हणून तयारी करायला अवघड नाही गेलं. ज्या अवघड वाटायच्या त्या एकलव्य आणि अभिषेक मूळ सोप्या झाल्या.

प्रश्न: तुझ्या या यशामध्ये तुझ्या मित्रांची आणि तुझ्या बायकोची साथ तुला कशी मिळाली?

उत्तर: मित्र म्हणजे अभिषेक आकोटकर आणि वैभव निमगिरे ही दोन जण फर्ग्युसन मध्ये जे मित्र मिळाले ज्याला खरी मैत्री म्हणता येईल. निस्वार्थ मित्र म्हणता येईल. ज्यांनी प्रत्येक वळणावर मला मदत केली. नलिनी पाटील जिने मला इंग्रजी शिकायला भाग पडलं नाही तर आज मी चेवनिंग साठी चा निबंध लिहू शकलो नसतो. APU मध्ये निशा कोल्हे, व्याख्या नौटियाल, अंकित, जस्मीन, अभिषेक पुनेठा यांच्याकडून शिकायला मिळालं. आणि पुढच्या वाटचालीसाठी मदत झाली.

माझ्या पार्टनरची देखील अनमोल साथ मला लाभली. गेली आठ वर्ष ती माझ्या सोबत आहे. फर्ग्युसनला असतांना NSS मध्ये असतांना आमची ओळख झाली. आणि आमचं बोलणं वगैरे चालू होत ऑक्टोबर मध्ये मी तिला सरळ प्रश्न विचारला की लग्न करशील का माझ्याशी? तिला ही बाकीच्या गोष्टीत इंटरेस्ट नव्हता तेव्हा तिने मला एकच प्रश्न केला की तु कास्ट मध्ये आहेस का? तिला तेव्हा जातीव्यवस्था काही माहिती नव्हती तिला फक्त एवढंच माहिती होत की काही लोक कास्ट मध्ये असतात काही कास्ट मध्ये नसतात. आणि तिच्या घरातून असं होत की आपण कास्ट मध्ये असलेल्या व्यक्तींपासून दूर राहावं. मी तिला म्हणलं हो मी कास्ट मध्ये आहे. त्यानंतर ही आम्ही बोलत गेलो. तिने 15 दिवसानंतर तिच्या आईला सांगितलं की मला एक मुलगा आवडतो. तिची आई मग लगेच दुसरी दिवशी भेटीला आली. कॉलेज च्या बाहेर आम्ही भेटलो. तिच्या आईने बऱ्याच वेळ भाषण दिलं स्नेहल रडत होती. लोक पाहत होते. तिच्या आईने सांगितलं जर घरी माहिती पडलं तर हीच शिक्षण बंद होईल वगैरे वगैरे ऐकल्यानंतर मी स्नेहलला सोपा प्रश्न विचारला तुझ्या आईचा नकार आहे तरी तू माझ्यासोबत राहशील का? तेव्हा स्नेहल रडत रडत हो म्हणली. खरं बघायला गेलो तर तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं मी शून्य होतो तरी स्नेहल ने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाने मला अजून जोमाने शिकण्यासाठी बळ दिलं. मग मी त्याच्या आईशी बोललो मी काही स्नेहल सोबत आज लग्न करणार नाही. जो पर्यंत आम्ही आमच्या पायावर उभं राहत नाही तो पर्यंत आम्ही काही लग्नाचा विचार करणार नाही.

स्नेहल आणि मी ठरवलं होत की जे काही शब्द आपण घरच्यांना देऊ किंवा एकमेकांना देऊ ते वेळेच्या आधी पूर्ण करू. आणि आम्ही ते केलं ही. तसं आमच्या लग्नासाठी विरोध खूप होता पण त्यावेळी स्नेहल माझ्यापेक्षा खंबीर होती. प्रत्येक वळणावर तिने समजून घेतलं आहे. स्नेहल ने मला खूप मोकळीक दिली. आज आमचं लग्न होऊन एक वर्ष झालं तरी देखील आम्ही लॉन्ग डिस्टन्स मध्ये आहोत ती माझ्या कामाच्या ठिकाणापासून 250 किमी लांब आहे. लग्नानंतर भान जरा वाढतात तसं त्रास ही वाढतो पण भावनेत न वाहत स्नेहल खंबीर राहण्याचा प्रयत्न करते. आणि आमच्या दोघांचं ही असं ठरलेलं आहे की भविष्यात आम्हाला ग्रास रूट लाच काम कार्यच शहराचं काही कौतुक नाही ये. मी जेव्हा ठरवलं की गावात राह्यचं तेव्हा जर स्नेहल म्हणली असती की नाही बा मला शहरात राह्यचं तर प्रेमाखातर मला ही जावं लागलं असत. पण स्नेहलची पण मत अशीच आहेत की आपण ग्रामीण भागात राहून वंचित घटकांसाठी काम करायच.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here