- टीम बाईमाणूस
नवरात्र, दुर्गा पूजा, गृहप्रवेश किंवा इतर काही पवित्र धार्मिक बाबींच्यावेळी हिंदू धर्मात मुलींचे पूजन केले जाते. या विधीमध्ये अशा मुलींचा समावेश असतो ज्यांना अद्याप मासिक पाळी सुरू झालेली नाही. ज्या मुलींना पाळी सुरू होते त्यांना आपला समाज अशा धार्मिक गोष्टींसाठी आजही ‘पवित्र’ मानत नाही. भारतात अनेक ठिकाणी ही प्रथा पाळली जाते… मात्र भारताच्या शेजारच्या राष्ट्रात म्हणजे नेपाळमध्ये या प्रथेचे एक अतिशय वेगळे रुप पाहायला मिळते, ज्यामुळे सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्ते चिंतेत आहेत…
‘कुमारी प्रथा’… नेपाळमध्ये शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही एक प्रथा. जगातील एकमेव हिंदू राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये चक्कं लहान मुलींना महाकालीचा अवतार म्हणून पुजले जाते. या मुलींना तिथे ‘कुमारी देवी’ म्हणून संबोधले जाते! सातव्या शतकापासून सुरू असलेली ही प्रथा आजही तितक्याच विश्वासाने तिथे पाळली जाते. 3 वर्षे वयापासून मासिक पाळी सुरू होईपर्यंत ती मुलगी त्या पदावरती राहते, आणि त्यानंतर दुसर्या मुलीची कुमारी देवी म्हणून निवड केली जाते.
नेपाळमध्ये स्वतंत्र राज्यं होती तेव्हाच्या काही प्रथा-परंपरा आजही सुरू आहेत. त्यातीलच एक ‘कुमारी’ प्रथा! साधारण 3 ते 10 या वयोगटातील मुलगी. तिची निवड धर्मगुरू करतात. तिची रहाण्याची सोय ठराविक देऊळवजा आश्रमात केली जाते. धार्मिक गुरूंच्या देखरेखीखाली तिने तिथे रहायचे, कुटुंबियांपासून दूर! साधारणपणे 5 ते 7 वर्षांचा काळ (ती वयात येईपर्यंत) तिचं वास्तव्य तिथेच असतं. गुरूजींच्या परवानगीनुसार कुटुंबिय तिला वर्षाकाठी एखाद्यावेळी भेटू शकतात. तिचं धार्मिक व शालेय शिक्षण तिथे होतं. अधून मधून तिच्या वयाचे सवंगडी तिच्याबरोबर खेळण्यासाठी बाहेरून आणले जातात. तिचं दर्शन वर्षातून एकदाच, ठराविक दिवशी, भव्य स्वरूपात भरवल्या जाणार्या यात्रेत करता येतं. एरवी ती दर्शन देत नाही. जर ती रहात असलेल्या देवळात पर्यटक भेट देत असतील व गुरूजींनी परवानगी दिली तरच काही क्षणांसाठी ती ठराविक ठिकाणी उभी राहून दर्शन देऊ शकते.

कुमारी देवी कशी निवडली जाते?
एखाद्या मुलीला कुमारी देवी म्हणून निवडण्याची ही प्रक्रियासुद्धा खुपच वेगळी आहे. नेपाळमधील शाक्य आणि वज्राचार्य जातीतील मुलींना 3 वर्षे होताच त्यांना त्यांच्या कुटूंबापासून वेगळं केलं जातं. या सगळ्या मुलींना ‘कुमारी’ आणि ‘अविनाशी’ असं संबोधलं जातं. वेगवेगळ्या 32 स्तरावर त्यांची परिक्षा घेतली जाऊन त्यातून एक कुमारी देवी निवडली जाते. यावेळी तिच्यात कुमारी देवी बनण्यासाठी आवश्यक असणारी सर्व लक्षणं असावी लागतात. तिच्या जन्म कुंडलीत असणारे ग्रह-नक्षत्रांची स्थितीही महत्वाची मानली जाते. म्हैस कापणे, राक्षसी मुखवटे घालून नृत्य करणे, असे प्रकार तिच्यासमोर केल्यानंतर जी मुलगी घाबरून रडणार नाही तिलाच कालीचा अवतार मानलं जातं. विविध प्रकारच्या शारीरिक चाचण्यांनंतर कुमारीकेची निवड होते. मान्यतेनुसार, कुमारीका होण्यासाठी हरणीसारखी जांघ आणि सिंहणसारखी छाती असणं गरजेचं आहे.
या कुमारीकेला हिंदू आणि बौद्ध धर्माकडून सारखाच सन्मान दिला जातो. विशेष म्हणजे अशा कुमारिका या पूर्वी काठमांडू, पाटन आणि भक्तपूर अशा तिन्ही राजेशाही साम्राज्यांचं प्रतिनिधित्व करत असत. कुमारिका निवडीची प्रथा ही राजघराण्यांशी संबंध होती. 2008 मध्ये हिंदू साम्राज्य संपुष्टात आलं आणि नेपाळमध्ये लोकशाहीची घोषणा करण्यात आली. पण, तरीही कुमारिका प्रथा अजूनही सुरूच आहे.

निवड झाल्यानंतर या कुमारी देवींना सन्मानाने राजधानीत नेलं जातं. तिच्यासमोर पुजार्यांकडून प्राण्यांचे बळी दिले जातात. कुमारी देवी असेपर्यंत या मुलीला कुमारी घरामध्ये (मंदिरामध्ये) राहूनच आपलं शिक्षण आणि धार्मिक विधी पुर्ण करावे लागतात. सण उत्सवांवेळी वर्षातून फक्त 13 वेळा त्यांना बाहेर आणलं जातं आणि त्यांची नगरातून मिरवणूक काढली जाते. यावेळी शाक्य वंशाच्या लोकांनी तीची पालखी आपल्या खाद्यांवर घेतलेली असते, जेणेकरून तीचे पाय जमिनीला स्पर्श होऊ नयेत. लोक या कुमारी देवीचं दर्शन करणं शुभ मानतात. विशेष म्हणजे हिंदू आणि बौध्द अशा दोन्ही धर्मातून या देवीला तितकाच मान दिला जातो. नेपाळच्या तीन शाही साम्राज्यांची ती प्रतिनिधी असते.
मासिक धर्म सुरू झाल्यानंतर किंवा एखाद्या कारणाने तिच्या शरिरातून रक्त वाहायला लागल्यास तिचं देवीचं स्थान संपुष्टात येऊन नवी कुमारी देवी मंदिरात प्रवेश करण्याआधीच तीला ते मंदिर सोडावं लागतं. तिचा तिथला मुक्काम संपला की ती बाह्य जगात, तिच्या कुटंबियांकडे परत जाऊन, पुढील शिक्षण, लग्न, संसार असं सामान्य माणसांचं जीवन जगू लागते. पदावरून बाजूला झाल्यानंतरही या कुमारी देवींना पवित्र मानलं जातं. तिथे त्यांना पेन्शन आणि राहायला आवास दिले जातात. पण तिथल्या समजूतीनुसार जो पुरूष कुमारी देवीशी लग्न करेल त्याचा मृत्यू लवकर होतो. याच कारणाने तिथल्या बहूतांश कुमारी देवींना आपलं संपूर्ण आयुष्य लग्नाविनाच व्यतित करावं लागतं.
मंदिरातच दिलं जातं शालेय शिक्षण
लहान मुलांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांनी प्रथेला नेहमीच विरोध केला आहे. या मुलांचं लहानपण आपण त्यांच्यापासून हिसकावून घेत आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे. यामुळं मुली समाजाच्या मुख्य धारेपासून दूर फेकल्या जातात आणि त्यांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होतो. दरम्यान, कुमारिकेला शालेय शिक्षण दिलं जावं असा आदेश नेपाळच्या सुप्रीम कोर्टानं 2008 मध्ये दिला होता. त्यानंतर मंदिरातच या मुलींच्या शालेय शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. तिथंच त्या शालेय परीक्षाही देतात.

नेपाळची माजी ‘देवी’ ‘चनीरा बज्राचार्य’
2001 मध्ये पाटण, नेपाळमध्ये जेव्हा 6 वर्षांची ‘जिवंत देवी’ चार दिवस रडत हाेती तेव्हा ताे माेठा अपशकुन मानला गेला आणि तिचे अश्रू मोठ्या राष्ट्रीय आपत्तीचे संकेत मानले गेले. तिच्या रुदनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे जून 2001 मध्ये नेपाळच्या राजपुत्राने त्याचे वडील राजा वीरेंद्र आणि राणी ऐश्वर्या यांच्यासह राजघराण्यातील नऊ सदस्यांची गोळ्या झाडून हत्या केली. राजपुत्र दीपेंद्रने नंतर स्वत:वरही गोळी झाडून घेतली.. या घटनेला दोन दशके उलटून गेली आहेत. राजधानी काठमांडूपासून फार दूर नसलेल्या पाटण या प्राचीन शहरातील एका कार्यालयात देवीच्या रूपात पूजलेली ‘चनीरा बज्राचार्य’ ही मुलगी आता पूर्णपणे सांसारिक व्यवहारात मग्न झालेली स्त्री बनली आहे. तिने नुकतीच एमबीएची पदवी घेतली आणि आता ती एका वित्तीय संस्थेमध्ये कर्ज मागणी अर्जांवर काम करते. चनिराची कहाणी इतकी प्रेरणादायी आहे की, ‘देवी’ची जबाबदारी सांभाळताना तिने अभ्यासासाठी वेळ काढला. आता ती तीच परंपरा पाळणाऱ्या बाकीच्या ‘देवींना’ (मुलींना) शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. म्हणजेच 7 शतकांपासून चालत आलेल्या परंपरेत मोठी सुधारणा घडवून आणण्यात गुंतलेली आहे.
चनीरा यांचा संघर्षही कमी नव्हता. 27 वर्षीय चनीरा म्हणते, ‘लोकांना वाटायचे की मी देवी आहे, मला सर्व काही माहीत आहे…’ आणि देवीला कोण शिकवू शकते. आजही एक खोली तिच्या देवीरूपातील चित्रांनी भरलेली आहे. एका चित्रात ती निर्भयपणे हत्याऱ्या राजपुत्राचे काका ज्ञानेंद्र यांच्याकडे पाहताना दिसते. त्यानंतर तिच्यासमाेर दर्शनासाठी येणाऱ्यांच्या लांबलचक रांगा असत. लोक पाया पडत. पितळेच्या भांड्यांमध्ये रोख रक्कम आणि प्रसाद देत ती त्यांच्या कपाळावर कुंकू लावत असे, त्याला सर्व भाविक आशीर्वाद मानत. ही परंपरा तळेजू देवीशी संबंधित आहे. एका राजाच्या वागण्याने संतापून ती अदृश्य झाली. तिने नंतर सांगितले की ती पुन्हा कधीही तिच्या शरीरात दिसणार नाही, मग तिने उपाय सुचविला की एका किशोरवयीन मुलीची पूजा करावी, ज्याद्वारे ती राजघराण्याशी संबंधित सल्ला देत राहील. 14 व्या शतकातील या घटनेनंतर या भूमिकेसाठी काठमांडूच्या नेवार समुदायातील दोन वर्षांखालील मुलींची निवड करण्यात आली. एका वेळी डझनभर मुलींना देवीची उपाधी दिली जाते, परंतु केवळ तीनच देवीची जीवनशैली पाळतात.

त्यामुळे या परंपरेत सामील झालेल्यांना चिनारा विनंती करते की त्यांनी लिहिणे- वाचणे शिकावे. जसे ती शिकली. त्यामुळे त्यांचा अधिक चांगला विकास होईल. तसेच या प्रथेमुळे लहान मुलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होते असे म्हणणाऱ्या टीकाकारांनाही उत्तर मिळेल. चनिराला विश्वास आहे की, त्यामुळे जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात परतणे सोपे होते. या जगात निरक्षर राहणे फार अवघड आहे.. चनिरा ही या परंपरेची विराेधक नाही. आपले बालपण सामान्य नव्हते, याची तिला जाणीव आहे. ती म्हणते, “ते माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होते. प्रत्येकजण मला भेटायला यायचा. आशीर्वाद घ्यायचा आणि सणांना अनेक भेटवस्तू द्यायचा. तिचा काेणताही अधिकार नाकारला गेला नाही, हे ती ठामपणे सांगते. लोक नेहमी असा विचार करतात की देवी म्हणून मुलींना काेणतेही वैयक्तिक जीवन नाही, त्यांना खेळायला वेळ मिळत नाही, हसण्याची परवानगी नाही, पण प्रत्यक्षात तसे काहीही हाेत नाही. ते फक्त मानणे आहे तरीही देवीची भूमिका सोपी आहे, असे काेणीही समजत नाही.