भारतीयांच्या निसर्गप्रेमाची ऑस्करला साद!

लघु विषयावरील माहितीपट ('बेस्ट डॉक्युमेंटरी ऑन शॉर्ट सब्जेक्ट') कॅटेगरीमध्ये भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. कार्तिकी गोन्सालवेस यांनी दिग्दर्शित केलेली आणि गुनीत मोंगा यांच्या निर्मितीसंस्थेचा हा माहितीपट नेटफ्लिक्सवर बघायला मिळेल

  • टीम बाईमाणूस

95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीयांनी दोन ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केल्या गेलेल्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी ऑन शॉर्ट सब्जेक्ट’ या कॅटेगरीमधला ऑस्कर पुरस्कार देण्यात आला असून. सर्वोत्कृष्ट गाण्यासाठीचा पुरस्कार RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला मिळाला आहे. संपूर्णतः भारतात निर्मिल्या गेलेल्या कलाकृतींना मिळालेले हे पहिलेच ऑस्कर पुरस्कार असून या दोन्ही पुरस्कारांमुळे भारतीयांच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला गेला आहे हे नक्की.

आज सकाळीच कार्तिकी गोन्साल्वेस यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि गुनीत मोंगा यांनी निर्मिती केलेल्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याची बातमी भारतात झळकली. संपूर्णतः ‘मेड इन इंडिया’ म्हणजेच स्वदेशी असणाऱ्या एखाद्या कलाकृतीला मिळालेला हा पहिलाच ऑस्कर पुरस्कार असल्याचे गुनीत मोंगा यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करून सांगितले. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही या कॅटेगरीत पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय फिल्म ठरली. या आधी भारताला दोनदा – द हाऊस दॅट आनंदा बिल्ट आणि अॅन एनकाऊंटर विथ फेसेस या दोन डॉक्युमेंट्रीजसाठी अनुक्रमे 1969 आणि 1979 ला नामांकनं मिळाली होती पण पुरस्कार मात्र मिळालेला नव्हता.

कार्तिकी गोन्साल्वेस आणि गुनीत मोंगा

काय आहे ‘द एलिफंट व्हिस्परर्स?’

ही डॉक्युमेंट्री मदुमलाई अभयारण्यातल्या रघू आणि अम्मू नावाच्या अनाथ हत्तीच्या पिल्लांची कहाणी सांगते. बोम्मन आणि बेल्ली हे आदिवासी कुटुंब त्याची काळजी घेतं. मानव-प्राणी यांचं भावविश्व हळूवारपणे या डॉक्युमेंट्रीत उलगडून दाखवलं आहे. गुनीत मोंगा यांनी ट्वीट करून आनंद व्यक्त केलाय. दोन महिलांनी हे करुन दाखवलंय, असंही त्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.

याआधीदेखील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय माहितीपटांना सन्मानित करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये कान्स, व्हेनिस आणि इतर प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचा समावेश होतो. मात्र असे असूनसुद्धा भारतीय माहितीपंटांना ऑस्कर मात्र मिळाला नव्हता. त्यामुळेच या ऑस्कर पुरस्काराचे महत्व वेगळे आहे.

कार्तिकी गोन्साल्वेस यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि गुनीत मोंगा यांच्या सिख्या एंटरटेनमेंट या संस्थेची निर्मिती असलेला हा माहितीपट तामिळनाडूच्या मदुमलाई अभयारण्यातील एक अनाथ हत्तीचे पिल्लू आणि एका आदिवासी कुटुंबातील नात्याचे अतिशय सुरेख प्रदर्शन करतो. तामिळनाडूत राहणारी कट्टूनायकन ही आदिवासी जमात आणि जंगलात अनाथ झालेल्या हत्तीच्या पिल्लांची कहाणी हा माहितीपट सांगतो. बोम्मन आणि बेल्ली हे दोघे जंगलात अनाथ झालेल्या, जखमी झालेल्या हत्तीच्या पिल्लांची काळजी घेत असतात.

रघु आणि अम्मू नावाची दोन हत्तीची पिल्ले या कुटुंबात कसे एकरूप होतात आणि बोम्मन, बेल्लीच्या आयुष्याचा कसा अविभाज्य भाग बनतात याचे सुंदर चित्रण यामध्ये करण्यात आलेले आहे. 40 मिनिटांचा हा माहितीपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध असून प्रत्येकाने तो पाहून माणसाचे निसर्गासोबतचे नाते समजून घ्यायलाच हवे. कार्तिकी गोन्साल्वेस यांनी तब्बल 450 तासांचे फुटेज शूट केले होते आणि त्यातून हा 40 मिनिटांचा माहितीपट बनविण्यात आलेला आहे. भारतातील आदिवासी कशापद्धतीने निसर्ग आणि वन्यप्राण्यांसोबत एक सुंदर सहजीवन व्यतीत करतात हे जगाला अभिमानाने सांगणारा हा माहितीपट असल्याचे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे.

प्रेम, करुणा आणि सर्वसामावेशकतेचे यापेक्षा सुंदर आणि विस्तृत चित्रण इतर माहितीपटांमध्ये अभावानेच आढळते. आजकालच्या जगात ही सगळी मूल्ये का महत्वाची आहेत आणि एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठी संवेदनशीलता किती महत्वाची आहे हेच हा माहितीपट बघणाऱ्याला पटवून देतो. निसर्गाशी एकरूप होणे आणि माणसासोबत या जमिनीवर राहणाऱ्या इतर प्राण्यांचा आदर करणेदेखील महत्वाचे असल्याचे हा माहितीपट पाहिल्यावर जाणवते. हा माहितीपट मनावर एक अमीट ठसा उमटवून जातो हे मात्र नक्की.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here