शाहरुख खान हा ‘चायनीज बांबू’सारखा आहे…

चायनीज बांबू नावाचा एक वृक्ष प्रकार आहे. याचं बीज पेरल्यानंतर सुरुवातीची पाच वर्षे जमिनीवर एक अंकुर सुद्धा फुटत नाही. पाचव्या वर्षांनंतर जेव्हा याचं रोपटं जमिनीला भेदून वर येतं तेव्हा ते फक्त 5 आठवड्यामध्ये 90 फुटापेक्षा उंच वाढतं! शाहरुख खानला मिळालेलं यश हे त्या बांबूच्या झाडासारखं आहे.

  • जितेंद्र घाटगे

चार्ल्स उत्क्रांतीवादाबद्दलचे एक प्रसिद्ध विधान आहे.
“It is not the strongest of the species that survives, nor the most intelligent, but the one most responsive to change.”

शाहरुख खान आज 58 वर्षांचा झाला… मागच्या फळीतले जे मोजके अभिनेते आपलं सुपरस्टारपद अजून टिकवून आहेत त्यात शाहरुखचं वर्चस्व निर्विवाद आहे. अभिनयात, सिनेमाच्या निवडीत वयाच्या एका टप्प्यानंतर तो जाणीवपूर्वक वेगळी वाट धुंडाळू लागला तेव्हा त्याचा चाहतावर्ग टोकाचा विभागला गेला. तरीही इतक्या वर्षांच्या चढउतारा नंतर नव्या ट्रेंडला अनुसरून स्वतःत तो जेवढे बदल करतोय ते पाहताना डार्विनचा सिद्धांत हा माणूस प्रत्यक्षात जगत आहे, हे लक्षात येते.

शाहरुखच्या मर्यादीत अभिनय क्षमतेकडे काही जण बोट दाखवतात. मात्र अशा लोकांना सुद्धा तो कुठल्या ना कुठल्या रूपात आवडत असतोच. काहींना तो 90s च्या दशकातला अग्रेसीव्ह मूळ स्वरूपातला आवडतो. मदन चोप्राला सळईत घुसवणारा…थरथरणारे डोळे…ताणलेल्या मानेच्या नसा! बाजीगर, अंजाम, डर, रामजाने, दिवाना… परफेक्ट कधीच नव्हता. पण सळसळता होता. दुसऱ्या प्रकारच्या चाहत्यांना हात मागे ओढून हिरवळीत नाचणारा गुडीगुडी राहुल आवडतो. नंतर च्या चोप्रा-जोहर मध्ये गुरफटलेला…सराईत…पण कृत्रिम. तर तिसऱ्या प्रकारच्या फॅन्स ना स्वदेस, पहेली, चक दे इंडिया मधून वेगळे प्रयोग करणारा नव्या अवतारातला. तरी त्याच्या सर्व अवतारात प्रेक्षकांनी त्याला स्वीकारले. याची कारणे शोधताना, त्याने ज्या वेळी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ती तत्कालीन परिस्थिती समजून घेणे महत्वाचे ठरावे.

शाहरुख खान - baimanus

1991 नंतरचा भारतीय सिनेमा, विशेषतः शाहरुख खान चे त्या दशकातले सर्व सिनेमे आणि आर्थिक उदारीकरण नंतरचा भारत यात एक रूपकात्मक समानता दिसून येते. स्वातंत्र्यानंतर ची 45 वर्षे गतीहीन अर्थव्यवस्थेशी भारत झगडत होता. ‘लायसन्स राज’ मुळे नवीन छोटे उद्योगधंदे उदयास येणे आणि आहे ते तग धरून राहणे अवघड झाले होते. बाजारात येणारे नवीन प्रॉडक्ट्स पाश्चात्य देशांच्या तुलनेत कित्येक दशके मागे असायचे. बॉलीवूड सुद्धा याला अपवाद नव्हते. सिनेमाला उद्योगाचा दर्जा नव्हता, त्यामुळे तिथे पैसा पुरवणारे अवैध स्रोत जास्त असायचे.

1991 साली जागतिक बँकेचे कर्ज फेडता न येण्याच्या आणि अर्थव्यवस्था कोलमडून जाण्याच्या भीतीने सरकारकडून विस्तृतपणे आर्थिक धोरणे नव्याने ठरवण्यात आली. जागतिकीकरणाची आस लागलेल्या भारताने बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी भारताची कवाडे खुली झाली. आखाती युद्धाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या देशामध्ये सॅटेलाईट चॅनेल्स आणि मनोरंजनाच्या इतर माध्यमांची देवाणघेवाण वाढली. फक्त दूरदर्शनची सवय असणारे भारतीय प्रेक्षक CNN, MTV, स्टार टीव्ही, झी टीव्ही पाहण्यास रुळले. 1992 नंतर याच धोरणांमुळे जागतिक सिनेमा भारतात मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होऊ लागला. महानायक अमिताभ बच्चनची जादू ओसरायला लागली होती. त्या दरम्यान 5 वर्षे सिनेसृष्टीतून त्यांनी ब्रेक घेतला होता. लोकप्रिय अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी श्रमिक वर्गाच्या सिनेमात लक्ष केंद्रित केले होते.

आधीच प्रस्थपित असलेले सनी देओल, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ हे एका ठराविक वर्गाला अपील होणारे सिनेमे करत होते. 1992चे च्या राम जन्मभूमी आंदोलनामुळे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरन वाढत चालले होते. एकीकडे जागतिकीकरणाच्या कचाट्यात एका मोठ्या संख्येच्या वर्गाला कोक, मॅकडॉनल्ड्स, केबल टीव्ही चॅनल्स ची चटक लागली होती. मध्यमवर्ग वाढत चालला होता आणि त्यांची पैसे खर्च करण्याची प्रबळ इच्छाही! काय ठेवावे आणि काय फेकावे या संभ्रमात असलेले भारतीय आणि जगभर पसरलेले करोडो NRI यांना शाहरुख खानचे बॉलीवूडमध्ये आगमन हा आशेचा किरण होता.

त्याच्या पदार्पणापासून सिनेमप्रेमींनी त्याला उचलून धरले, यामागे तत्कालीन कारणे जशी जबाबदार होती तशीच शाहरुखच्या मुळाशी असणारा प्रचंड ऊर्जेचा सळसळता स्रोत देखील तितकाच महत्वाचा आहे. बाजीगर, डर, अंजाम मध्ये पैशासाठी, प्रेमासाठी कुठल्याही टोकाला गेलेला अँटीहिरो साकारून सुद्धा प्रेक्षकांच्या सहनुभूतीस पात्र ठरतो. भारतात तेव्हा जी सांस्कृतिक घुसळण चालू होती तेव्हा पाश्चात्य संस्कृती अनेकांना भुरळ घालत होती. ‘अंगात पोलो चा टी शर्ट घालून, गळ्यात ‘cool’ लिहिलेलं लॉकेट असताना कुणी स्वतःला भारतीय म्हणू शकतं काय?’ या प्रश्नाला शाहरुख ने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ पासून ‘हो’ असं स्पष्ट उत्तर द्यायला सुरुवात केली. चोप्रा-जोहर सोबतचे सर्व सिनेमे अश्या पद्धतीने प्रस्तुत करण्यात आले की मध्यमवर्गीय मानसिकतेला स्वतःचं आयुष्य मिठाईबॉक्स च्या वेष्टनात पडद्यावर दिसले. कालांतराने अँटीहिरो भूमिकेपासून दूर राहून भारतीय कौटुंबिक मूल्ये, स्त्रियांबद्दलचा आदर, निधर्मीपना वेळोवेळी त्याच्या सिनेमात अधोरेखित होत राहिला. पाकिस्तान विरोधी पार्श्वभूमी असलेले गदर, हिरो सारखे चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिस वर जोरदार गल्ला कमवत होते. शाहरुख खान मात्र मैं हूँ ना, वीर झारा यातून दोन देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचे प्रयत्न सिनेमातून दाखवत होता.

शाहरुख खान - baimanus

हे संबंध मजबूत व्हावे म्हणून एकेकाळी पाकिस्तानी कलाकारांना उघड पाठिंबा देणाऱ्या शाहरुख हल्ली वाद होईल अशी विधाने करायचे टाळतो. आपले वडील स्वातंत्र्यसेनानी असल्याचा त्याने कुठेच गवगवा केला नाही. काही मतांवर मात्र तो अगदी ठाम आहे. दुसऱ्या धर्मांबद्दल जितका त्याला आदर आहे तितकाच इस्लाम वर त्याचा विश्वास आहे. हा आदर त्याने स्वतःच्या मुलांवर थोपवलेला नाही. त्याची मुलगी छोटी असताना विचारायची की, ‘शाळेत मला सर्व विचारतात कि तू हिंदू कि मुसलमान?’ शाहरुख मात्र मोकळेपणाने सांगायचा की, ‘तुला हवं तर त्यांना बिनधास्त सांग कि तू ख्रिश्चन आहे. मला काहीच फरक पडत नाही.’ आपल्या विरोधात जाणीवपूर्वक पाकिस्तान धार्जिणे असं वातावरण तयार केले आहे हे माहित असून सुद्धा ‘रईस’ मध्ये मुस्लिम गुंडाची भूमिका त्याने बेधडकपणे केली आहे. ‘धंदे से बडा कोई धर्म नही होता’ ही रईसमधल्या अम्मीची शिकवण तो प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा काही प्रमाणात वापरताना दिसतो. भारतीय निर्माते परदेशात सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी US, UK ने प्रामुख्याने लक्ष्य करतात. उलट शाहरुख खान आपले सिनेमे जिथे कुठलेच हिंदी सिनेमे पोचत नाही अशा जॉर्डन, पेलेस्टाईन, इजिप्त, इराक, युक्रेन, उझकेबिस्तान इथे सुद्धा प्रदर्शित करतो.

शाहरुख फक्त NRI किंवा उच्च मध्यमवर्गीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे हा गैरसमज अनेकांच्या मनात आहे. मात्र त्याचे भारतातले मास टेरिटरीतले स्थानसुद्धा पूर्वीइतकेच अबाधित आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल च्या अनेक खेड्यांमध्ये त्याच्या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद बिनतोड आहे. याबाबतीत मागे एका वायरल झालेल्या व्हिडीओ चे उदाहरण देता येईल. नाशिक मधील मालेगाव हे तालुक्याचं ठिकाण. गेल्या वर्षी ‘ए दिल है मुश्कील’ तिथे मोहन टॉकीज ला प्रदर्शित झाला होता. शाहरुख खान त्यात काही मिनिटे पाहुणा कलाकार म्हणून येतो तेव्हा थियेटर प्रेक्षक अक्षरशः पागल होतात. प्रेक्षागृहात फटाके फोडून आतिषबाजी केली जाते. हुल्लडबाजी वाढल्याने शो थांबवून पुन्हा तो सीन प्रेक्षकांना दाखवावा लागतो तेव्हा कुठे प्रेक्षक शांत होतात. पाकिस्तानी कलाकाराच्या सहभागामुळे ह्या सिनेमाला आधीच प्रेक्षकांचा विरोध होता. तरीही तो जुमानता मालेगावसारख्या निमशहरी भागातले प्रेक्षक शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी पागल झाले होते! हा प्रकार चुकीचा वाटत असला तरी अशा अनेक सिंगल स्क्रीन मध्ये अजूनही शाहरुखच्या एंट्रीला फटाके फोडून दिवाळी आणि ईद साजरी केली जाते.

तिकीट खिडकीवर बक्कळ गल्ला जमवणारे सुपरस्टार इतर देखील आहेत. पण शाहरुख खान आज हिट/फ्लॉप, कौतुक/टीका यांच्या पलीकडे पोचला आहे. हल्ली अभिनेत्यांना ‘हिरो’ म्हणून बघण्याची परिमाणे बदलत चालली आहे. कोण कुठली विधाने पब्लिकली जाहीर करतो, कोण किती दानधर्म-देणगी देतो यावरून हिरोंना पूजण्याचे दिवस आले आहे. शाहरुख ने दिलेले सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान फार गहिरे आहे. हिरो बनन्यासाठी मायानगरीत रोज येऊन आदळणाऱ्या शेकडो गरीब-मध्यमवर्गीय लोकांसाठी तो ऊर्जेचा प्रेरणास्रोत आहे. अशा तरुणांना एका यशस्वी हिरोची गरज असते ज्याची कहाणी ऐकून कित्येक वर्षे आपला संघर्ष चालू ठेवतात.

शाहरुख खान - baimanus

चायनीज बांबू नावाचा एक वृक्ष प्रकार आहे. याचं बीज पेरल्यानंतर सुरुवातीची पाच वर्षे जमिनीवर एक अंकुर सुद्धा फुटत नाही. पाचव्या वर्षांनंतर जेव्हा याचं रोपटं जमिनीला भेदून वर येतं तेव्हा ते फक्त 5 आठवड्यामध्ये 90 फुटापेक्षा उंच वाढतं! शाहरुख ला मिळालेलं यश हे त्या बांबूच्या झाडासारखं आहे. योग्य वेळी काही सिनेमे चालले म्हणून लोकांनी त्याला उचलून धरले, एवढं सोपं नाही ते! पुढचं यश तोलून धरता यावे यासाठी नाटक-सिरियल्सच्या काळातली धडपड, अवेळी पचवलेला आईचा मृत्यू, मुंबई जिंकण्याचं स्वतःला दिलेलं वचन या सर्वांनी त्याची मुळे अंकुर फुटण्याआधीच आतमध्ये विस्तृत पसरली होती. अंकुर वर येऊन कधीतरी आभाळाला भिडेल कि नाही याची शाश्वती नसताना अनेक वर्षे संयम ठेऊन मुळे मजबूत करत गेला. एवढ्या उंचावर गेल्यावर डौलात उभे राहण्याचा अभिमान प्रत्येकाला असतो, शाहरुखला याचा गर्व वाटतो हे सांगायला तो बिलकुल कचरत नाही.

करीयरच्या सुरुवातीला ‘राजू बन गया जेंटलमॅन‘ मध्ये त्याने छोट्या शहरातून मुंबईमध्ये मोठी स्वप्न घेऊन येणाऱ्या तरुणाची भूमिका केली होती. नीतिमत्ता ढळू न देता आपल्या तत्वांवर त्याला आपलं ध्येय गाठायचं असतं. अनेक अडथळे पार करून प्रेयसीची सोबत ठेऊन त्याच्या सर्व इच्छा कालांतराने पूर्ण होतात. योगायोग असा की शाहरुखचं पूर्ण करियर त्या फिल्मसोबत समांतर आहे. सिनेसृष्टीत कुठलेही हितसंबंध नसले तरी आपण सुद्धा तरून जाऊ हा विश्वास येणाऱ्या अनेक पिढ्यांना ‘शाहरुख खान’ नावाची जिवंत दंतकथा देत राहील. कित्येक चायनीज बांबू वर्षानुवर्षे स्वतःला जमिनीत पोसत बसले आहे, शाहरुखने मनामनात जागवलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर!

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here