युवकांना केंद्रस्थानी ठेऊन जागतिक आदिवासी दिवसाचे सेलिब्रेशन

आदिवासी पारंपरिक पद्धत आणि संयुक्त राष्ट्राने दिलेल्या 2023 च्या जागतिक आदिवासी दिवसाच्या थीमनुसार भामरागड पट्टी इलाका गोटूल समितीच्या वतीने कोठी ग्रामपंचायत येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  • सुरज लता प्रकाश

नैसर्गिक संसाधन, हिरवीगार जंगले, अतिदुर्मिळ वन्यजीव प्राणी, बारामही दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि गोंड-माडिया आदिवासी संस्कृतीने नटलेल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कोठी गावात अतिशय आनंदाचे आणि जल्लोषचे वातावरण होतं. कारण या वर्षीच्या जागतिक आदिवासी दिवसाचे आयोजन भामरागड पट्टी इलाका गोटूल समितीच्या वतीने गट ग्रामपंचायत कोठी येथे करण्याचे ठरविण्यात आले होते. संपूर्ण पंचक्रोशीत जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतची निवड करण्यात आली त्यामुळे गावकऱ्यांमध्ये कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी उत्साहाचे वातावरण होते. तर कोठी गट ग्रामपंचायतच्या सरपंच भाग्यश्री लेखामी यांच्या नेतृत्वात गायता कन्ना हेडो, भूमिया साधू हेडो, पेरमा मालू मट्टामी यांच्या सोबत गावाकऱ्यांनी मिळून संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन तयार केले. गावाकऱ्यांच्या या उत्सहात सहभागी होण्यासाठी प्रथमच तालुक्याचे सर्व प्रशासकीय अधिकारी येणार होते.

यंदाच्या कार्यक्रमाची पारंपरिक पूजा, खेळ, गायन-नृत्य, पत्रलेखन-वाचन आणि प्रमुख पाहुण्यांचे मनोगत अशी रूपरेषा ठेवण्यात आली होती. तर नियोजित वेळेप्रमाणे सर्वप्रथम गावता, भूमिया आणि पेरमा यांनी जंगलात जाऊन गावदेवतांची पूजा केली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले. प्रमुख पाहुणे येताच सतरंगी ध्वजला वंदन करून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यंदाच्या जागतिक आदिवासी दिवसाच्या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती ती अहेरी विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे, भामरागडचे तहसीलदार प्रकाश पुप्पालवार, गटविकास अधिकारी स्वप्नील मकदूम, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रेशमा चव्हाण, पशुधन अधिकारी हर्षल रेवतकर, नितीन दुधे, सागर सुरजागडे, कोठी पोलीस मदत केंद्राचे PSI गणेश झिंजूर्डे, संजय झराड, सागर माने, विनायक सप्ते यांची.

गोंड-माडिया आदिवासी संस्कृतीचा मुख्य आकर्षण म्हणजेच रेला नृत्य आणि पाटांग पिटो (गायन). तर रेला नृत्य आणि गायनाच्या माध्यमातून प्रमुख पाहुण्यांचे स्टेज वर स्वागत करण्यात आले. त्यानंतर नुकतेच माडिया भाषेत भाषांतरित करण्यात आलेल्या संविधान प्रस्ताविका वाचून प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी फुल-पुष्प गुच्छ न देता पारंपरिक तीर-कामठा देऊन अधिकाऱ्यांचा आदिवासी पद्धतीने सत्कार करण्यात आला.

स्वतःचा विकास म्हणजेच समाजाचा विकास

कार्यक्रमाला उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी समस्त गावाकऱ्यांना जागतिक आदिवासी दिवसाच्या आपल्या मनोगतमधून शुभेच्छा दिल्या. अहेरी विभागाचे नुकतेच रुजू झालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी भाकरे यांनी शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती या विषयावर मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की आपली संस्कृती आणि आपल्या परंपरा जपण्यासाठी प्रत्येक नागरिक हा निरोगी असणं गरजेचं आहे. सध्याचा आदिवासी युवक हा व्यसनाकडे जास्त वळत असल्याचे दिसून येते पण आदिवासी युवकांना जर त्यांची संस्कृती, परंपरा टिकवायची असेल तर त्यांना निरोगी असणं महत्वाचं आहे. त्यामुळे व्यसननांना बळी न पडता निरोगी आयुष्य जगण्याचा ध्यास आजच्या दिवशी घ्या आणि आपली संस्कृती-परंपरा जपण्याचा प्रयत्न करा. आदिवासी प्रकल्प अधिकारी रेशमा चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित नागरिकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत असतांना प्रकल्पच्या माध्यमातून आता पर्यंत MBBS आणि इतर शिक्षणासाठी बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांचे उदाहरण देत जास्तीत जास्त विद्यार्थांनी प्रकल्पाचा योजनाचा उपयोग घ्यावा असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, यावर्षी स्थानिक भामरागड विभागातील 7 विद्यार्थी हे MBBS डॉक्टर म्हणून लवकरच आपल्या तालुक्यात रुजू होणार आहेत.

यावरून प्रत्येक विद्यार्थांनी प्रेरणा घेऊन दरवर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर युवकांनी खेळ, कला या स्पर्धामध्ये सुद्धा भाग घेऊन आपल्या कला-गुणांना वाव द्यावा आणि आदिवासिंच्या संस्कृतीला त्यामधून जगासोमोर घेऊन यावे असे मत व्यक्त केले. कोठी पोलीस मदत केंद्राचे PSI गणेश झिंझुर्डे यांनी त्यांच्या मनोगतातून गेल्या 3 वर्षांच्या या भागातील अनुभव व्यक्त केले. आदिवासी परंपरा, त्यामधून समोर येणारी स्त्री-पुरुष समानता, गोटूल संस्कृती, खानपान इत्यादी विषयी त्यांना आलेले अनुभव सांगितले. ते म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने जर स्वतःच्या विकासाचा विचार केला आणि त्याप्रमाणे कार्य केलं तर संपूर्ण समाज विकसित होऊ शकतो. कारण आपण सर्व एक एक करतच हा समाज आणि देश बनलेला आहे. विकास म्हणजे मोठं मोठं इमारती, तंत्रज्ञान, गाड्या हेच नसतं तर माणसाचे आरोग्य, शिक्षण आणि त्याच्या मूलभूत गरजा शाश्वत राहणं त्याची पूर्ती होणे हे विकासाची पहिली पायाभरणी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांने शिक्षण घेतलच पाहिजेत. निरोगी आयुष्य जगलचं पाहिजेत. व्यसन हे माणसाच्या प्रगतीचे गतिरोधक आहे. त्यामुळे जर समाजातील प्रत्येक माणूस व्यसनापासून मुक्त होईल तर निश्चितच आपल्या समाजाची प्रगती होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही.

जागतिक आदिवासी दिवस - baimanus

विंग्स ऑफ युथ & प्रोजेक्ट धरित्री

या वर्षीचा जागतिक आदिवासी दिवसाची थीम होती Indegeneous Youth As Agent of Change for self determination. तर या थीमच्या अनुषंगाने सरपंच भाग्यश्री लेखामी यांनी कोठी गट-ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 9 गावातील युवकांची भाग्यश्रीताई लेखामी युवा संघटनाची स्थापना केली. आदिवासी युवकांनी एकत्र येऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आपली संस्कृती परंपरा टिकवण्याचे कार्य करण्याच्या उद्देशाने या संघटनेत भाग घेतला. दारू आणि तंबाखूच्या व्यसनापासून मुक्ती आणि खेळ-कला-नृत्य, पारंपरिक शेती, वनसंवर्धन अश्या गोष्टींमध्ये स्वतःला रुजवत आदिवासी युवक स्वतःच प्रगती आणि विकासाचे पाईक म्हणून समोर येतील हे या संघटनेचे उद्दिष्ट आणि ध्येय असणार असे मत आपल्या भाषणातून भाग्यश्री लेखामी यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली विभागात जंगलतोड प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम निसर्ग संतुलन बिघडण्यात होत आहे आणि त्यामुळे अवकाळी पाऊस, पूर अश्या नैसर्गिक आपत्तीला आदिवासी लोकांना सामोरे जावं लागतं आहे. या भागात बहुतांश लोकांचा उपजीविकेचा साधन हे वनउपज आणि भात शेती आहे, परंतू वातावरण बदलमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे स्थानिकांच्या उपजीविकेच्या साधनावर भयंकर परिणाम होत आहे. विशेषतः महिलांना या परिस्थितीचा जास्त सामना करावा लागतो. त्यामुळे वातावरण बदल या विषयावर काम करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच बाईमाणूस आणि असर social impact advisor यांनी संयुक्त विद्यमानाने सुरु केलेल्या प्रोजेक्ट धरित्री उपक्रमाची माहिती सरपंच भाग्यश्री लेखामी यांनी आपल्या भाषणातून दिली. जल, जंगल, जमीन टिकेल तरच निसर्ग पूजक आदिवासी टिकेल. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून या प्रोजेक्ट अंतर्गत वातावरण बदल लक्षात घेऊन त्या अनुषंगाने एकत्र काम करायला पाहिजेत आणि वनसंवर्धन, जलसंवर्धन, वन्यजीव संवर्धन करण्याकरिता पुढाकार घ्यायला पाहिजेत असे आवाहन समस्त गावकरी आणि उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे प्रशासकीय अधिकारी यांना केले.

यानंतर दोन स्पर्धा विद्यार्थी आणि समस्त गावकरी यांच्या करिता आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये शालेय विध्यार्थ्यांकारिता पत्रलेखन आणि गावाकऱ्यांकारिता तीर-कामठ/गुलेर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोठी गावातील शासकीय आश्रम शाळेच्या 8वी ते 10वी वर्गाच्या विध्यार्थांनी पत्रलेखन स्पर्धेत भाग घेतला होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी पत्राच्या माध्यमातून प्रकल्प अधिकारी, मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार इत्यादी लोकांना त्यांच्या समस्या आणि मनातील इच्छा व्यक्त केल्या. यामध्ये एकूण 58 विद्यार्थांनी भाग घेतला होता. तर यामधून सर्वकृष्ट तीन पत्रांची निवड करण्यात आली. ज्यामध्ये प्रथम क्रमांक अजय लालू लेकामी वर्ग 9 (गुंडूरवाही), द्वितीय क्रमांक संदीप राजू आलामी वर्ग 10वा (पोयरकोठी), तृतीय क्रमांक लक्ष्मी मुन्शी दुर्वा वर्ग 8वा (मिरगुंलवांचा) यांनी पटकवीला. त्याचबरोबर गावाकऱ्यांकारिता घेण्यात आलेल्या तीर-कामठ/गुलेर स्पर्धेत गावातील युवकांनी उत्कृष्ट नेमबाजीचे प्रदर्शन करत स्पर्धेला प्रतिसाद दिला. यामध्ये प्रथम क्रमांक राजू मुहुंदा (तुमरकोडी), द्वितीय सत्तू गोटा (कोठा), तृतीय मैनू मट्टमी (मुरूमभूशी) यांनी पटकविला. विजेतांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक देण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता सर्व गावाकरी एकत्र येऊन पारंपरिक माडिया आदिवासी गाण्यांच्या तालावर ठेका धरत रेला नृत्य करत करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिन्नू महाका यांनी केले तर प्रस्ताविका सुखराम मडावी यांनी केले. तसेच कोठी ग्रामसभाच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here