नागराज मंजुळे : “चित्रपटाचे नवे सौंदर्यशास्त्र निर्माण करणे आवश्यक हाेते’’

70-80च्या दशकापासून कविता, कथा, कांदबरी, चरित्र, आत्मचरित्र आदी साहित्यप्रकारांत दलितवर्गाच्या पिढ्यांपिढ्या दबलेल्या व्यथा-वेदनांचे प्रतिबिंब उमटू लागले. मराठी साहित्याला क्रांतिकारक वळण देणाऱ्या या बदलाने गडद अंधाराने व्यापलेले जग एकाएकी प्रकाशमान झाले. मात्र अलिकडे छापील माध्यमापेक्षा दृश्य माध्यमातूनच दलित वास्तव प्रभावीपणे समाेर यायला लागले आहे. ज्या तीव्रतेने एकेकाळी साहित्यातून दलित वास्तव पुढे आले, त्याच तीव्रतेने नाटक-सिनेमांतूनही दलित वास्तव पुढे येण्यास प्रारंभ झाला. आज नागराज मंजुळे यांचा वाढदिवस… त्यानिमित्ताने दलित वास्तवाचे जे माध्यमांतर झाले त्यावर नागराज यांचा विशेष लेख…

  • नागराज मंजुळे

पारतंत्र्यात असताना पारतंत्र्याची जाणीव हाेण्यापासून ते पाश तोडत स्वातंत्र्यापर्यंतचा भारताचा प्रवास जसा विविध अडचणींतून, क्लेशातून झाला, तसाच जातिभेदाच्या भिंती या बिनबुडाच्या आहेत, हे कळल्यानंतर वेशीवरच्या अस्थिर जगण्यापासून गावात येईपर्यंतचा उपेक्षित, शोषित समाजाचा संघर्ष आजच्या पिढीचे जगणे थाेड्याफार प्रमाणात का हाेईना, सुसह्य करीत आला आहे. शब्दात्मक वा दृश्यात्मक अभिव्यक्तीद्वारे या संघर्षाला तळागाळापर्यंत पाेहोचविणे, स्वत:च्या मनातील भाेगलेल्या दु:खांचे कढ रितेे करणे, हा मानवी समूहाचा निसर्गत: असलेला स्वभाव आहे. मुळात, समाजाची घडणच अशा भिन्न स्तरावरच्या अभिव्यक्तींतून हाेत असते. त्यामुळे जे आपण जगलाे, जे अवतीभवती पाहिले, ते साहित्यातून उमटणे, त्यास चळवळीचे स्वरूप येणे हे साहजिकच आहे.

मी पूर्वी वाचायचाे. म्हणजे, आजही वाचताे. पण या वाचण्याचे संदर्भ काळानुसार बदलले आहेत. जाणत्या वयापासून मी दलित साहित्यातील आत्मकथने वाचत आलाे आहे. त्यात मग दया पवार यांचे ‘बलुतं’ असाे, ‘उचल्या’ असाे, अशी कितीतरी पुस्तके मी वाचली आहेत, अगदी डाेळसपणे वाचली आहेत. दलित कविता मी वाचत आलाे आहे. ‘झाेंबी’ वाचली आहे. ही आत्मकथने, कविता लिहिणाऱ्या लेखक-कवींच्या वाट्याला जे जगणे आ, तेही मला पुरते ठाऊक आहे. मी स्वत: माझ्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या कवितासंग्रहात एका कवितेत म्हणू पाहताे, की मला जर व्यक्त व्हायचेच आहे तर मी कुठल्याही माध्यमातून व्यक्त हाेईन. हातात छिन्नी, हाताेडा घेईन, शिल्प उभारेन वा चित्र काढेन वा लिहीन वा… दृश्य माध्यमाकडे येईन. पण व्यक्त हाेणे, ही माझी गरज आहे.

नागराज मंजुळे - baimanus

मी ज्या वडार समाजामध्ये जन्माला आलाे, वाढलाे, त्या समाजाचे आजवरचे जगणे मी पाहात आलाे. डुक्कर मारणे, खडी फाेडणे असेच उद्याेग हा समाज करत आला. तेही अशा काळात ज्या वेळी, इतर समाजाला सुधारणांचे, आर्थिक स्तर उंचावण्याचे वेध लागले हाेते. माझे वडील अशिक्षित. पण आम्ही शिकावं म्हणून त्यांनी कितीतरी खस्ता खाल्ल्या असतील. असा गरिबीत पिचलेला, शिक्षण नसल्याने सुधारणा हाती न लागलेला समाज माझ्या अवतीभवती हाेता. जातीबाहेर लग्न करणे तर दूरच; पण प्रेम करणेसुद्धा निषिद्ध, इतका हा समाज साखळदंडांमध्ये जखडला गेलेला. मग याच समाजाची वेदना मांडण्यासाठी सक्षम माध्यम निवडणे, हा सर्वस्वी माझा हक्क आहे. जबाबदारीसुद्धा आहे. मला वाटतं, प्रत्येकाला समजून घ्यायला एक गाेष्ट सांगावी लागते. मग माझ्याच अवतीभवती जातिभेदामुळे, जातीव्यवस्थेच्या उतरंडीमुळे अपयशी ठरलेल्या प्रेमकथांमध्ये मला ‘जब्या’ची ‘फॅन्ड्री’मधली प्रेमकथा सापडली. चित्रपटाच्या शेवटी जब्या दगड भिरकावताे, तेव्हा त्यात केवळ प्रेम उद्ध्वस्त झाल्याचा संताप नसताे, तर जातीच्या उतरंडीमुळे आपण प्रतिष्ठा गमावून बसलाे आहाेत, आपण उच्च वर्गासाठी एक फॅन्ड्री (डुक्कर) आहाेत, याची हाेणारी तीव्र जाणीव आणि उद्रेक त्या दगड भिरकावण्यामागे आहे. पांढरपेशा, उतरंड निर्माण करणाऱ्या व ती जपणाऱ्या समाजालाच, जब्याने दिलेली ती शिवी आहे. शिवाय आपल्यामध्ये असे कितीतरी जब्या आहेत, याची जाणीव ‘फॅन्ड्री’मधला जब्या समाजाला करून देताे.

माझ्या निरक्षर, वाचू न शकणाऱ्या वडलांना माझ्या कवितेपेक्षा ‘फॅन्ड्री’ अधिक कळला, कारण आमच्या समाजाचे जगणे चित्रपटात जसेच्या तसे, तेही साेप्या भाषेत मांडले गेले, म्हणून. माझ्या वडलांसारखे कितीतरी लाेक या समाजात आहेत, ज्यांना त्यांच्याच जगण्यातील अवहेलना, उपेक्षा यांची जाणीव देणारे माध्यम त्यांच्या आकलनाच्याच परिघातले हवे आहे. कारण हे लाेक अजूनही शहरीकरणापासून काेसाे दूर आहेत. निरक्षरांचे प्रमाण आपल्याकडे ग्रामीण भागात अधिक आहे. त्यामुळे या माेठ्या संख्येने असलेल्या प्रेक्षकवर्गाला विकासाची, सुधारणांची, अंधश्रद्धामुक्त जीवन जगण्याची निकड कळावी, याकरता छापील माध्यमांची मर्यादा ओलांडणे आवश्यक आहे.

केवळ दलित समाजाचे प्रश्न यापुरताच ‘फॅन्ड्री’ मर्यादित राहात नाही. इतर समाजाला नवबाैद्ध, दलित (जय भीम म्हटले वा बाैद्ध म्हटले, की अजूनही ज्यांना आपण तुच्छ लेखताे.) समाजाच्या आदर्शांचे न झालेले आकलन त्यांना जाणवून देण्याचाही माझा प्रयत्न हाेता. ‘लगान’ चित्रपटातील ‘कचऱ्या’चा हात वाकडा असताे, म्हणून नायक त्याचा स्पिन बाॅलिंगसाठी वापर करताे. पण मग पुढे या ‘कचऱ्या’चे काय हाेते? त्याचं भविष्य काय? ताे अस्पृश्य का? हा कचऱ्या मला आपला वाटू लागला हाेता. त्याचे उपेक्षित असणे, त्याचे माणूस म्हणून नाकारले जाणे, मला माझ्या समाजाची वेदना वाटू लागली. त्यातून मला ‘फॅन्ड्री’ करताना चित्रपटासारख्या माध्यमातून मी नेमकं काय मांडायला हवं, हे सापडलं. माझ्या समाजाची जाणीव या माध्यमातून मांडताना, मला चित्रपटाचे नवे सौंदर्यशास्त्र निर्माण करणे आवश्यक हाेते.

नागराज मंजुळे - baimanus

दलित जाणिवेचे माध्यमांतर त्यामुळे केवळ विषया-आशयापुरतेच मर्यादित नव्हते. त्यातून या जाणिवेच्या व्याप्तीसाठी, विकास करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांच्यापर्यंत पाेहोचणे महत्त्वाचे हाेते. अमेरिकेत एक प्राध्यापक मला भेटले, म्हणाले, ‘काहीही करा, पण आंबेडकरांना इज्जत मिळवून द्या.’ मी हबकलाे. त्यांची कळकळ दिसून येत हाेती. आंबेडकरांना छापील पुस्तकांपेक्षा चित्रपटासारख्या माध्यमांमधून पाेहोचविणे आवश्यक आहे. हा मुद्दा त्यांच्या या बाेलण्यामागे ‘फॅन्ड्री’ पाहिल्यामुळे हाेता.

आपला समाज किती दांभिक आहे, याची कैक उदाहरणे आपण भाेवती पाहताे. गणेशाेत्सव सुरू हाेताे तेव्हा महात्मा फुले गणेश मंडळ, आंबेडकर गणेश मंडळ असे बॅनर्स दिसतात. ज्यांनी कधी देव मानला नाही, त्यांच्या नावाने ही गणेश मंडळे चालतात. ‘फॅन्ड्री’च्या गाण्यावर गणपतीच्या मिरवणुकीत अनेक जण नाचतात! एके ठिकाणी तर बुद्धांच्या रूपात गणपतीची मूर्ती साकारली हाेती. एका देशात बुद्धाच्या वास्तूबाहेर छाेटी गणपतीची मूर्ती हाेती. म्हणजे, आपण किती साेयीस्करपणे या सगळ्या प्रतीकांमागचे वास्तव विसरून जाताे? बुद्धाच्या चेहऱ्यावरही आपण हसू काेरायचा प्रयत्न करताे. आपण या सगळ्यांच्या प्रतिमाच बदलू बघत आहाेत. दलित जाणिवेचे असेही झालेले माध्यमांतर आहे, जे वास्तवाला धरून नाही. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी डाेळसपणे काहीतरी ठाेस केले पाहिजे, असा माझा प्रयत्न आहे.

या आधी ‘मुक्ता’सारखे चित्रपट येऊन गेलेत, प्रेमानंद गज्वींचे ‘घाेटभर पाणी’, अलीकडे गाजलेले ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर माेहल्ला’, ‘सत्यशाेधक’, ‘काेण म्हणतं टक्का दिला’सारखी नाटके येऊन गेलीत. रंगभूमी आणि चित्रपट यातल्या मांडल्या जाणाऱ्या दलित जाणिवेवर आधारित असलेल्या विषयांना पुस्तकांइतकेच मूल्य त्यामुळे आले. ‘फॅन्ड्री’ बघितल्यानंतर मला काही जाणकारांनी या चित्रपटात कादंबरी लपलेली आहे, असे सांगितले हाेते. थाेडक्यात, चित्रपट आता दलित जाणिवांचे सशक्त माध्यम झाले आहे. एकीकडे दलित साहित्य, चळवळ थंडावली आहे. साहित्यात आता फारसे नवे लेखन येत नाही. शिवाय कादंबऱ्यांवर आधारित चित्रपटही आपल्याकडे फारसे चाललेले नाहीत.

संबंधित वृत्त :

कादंबरीच्या यशाला भुलून चित्रपट तयार करताना, अनेक दिग्दर्शकांनी माध्यमाचा प्रभावी वापर करण्यात असमर्थता दाखवली आहे, वा हे माध्यमांतरच अनेकदा प्रेक्षकांना फारसे रुचलेले नाही. ‘बलुतं’ कादंबरीवरील ‘अत्याचार’ हा चित्रपट असाे, वा लांबणीवर पडलेला ‘उचल्या’ कादंबरीवरील चित्रपट असाे; या कलाकृतींना आपल्याकडे बहुसंख्य लाेकांपर्यंत पाेहाेचता आले नाही. मात्र थेट, स्वतंत्रपणे व्यक्त हाेणाऱ्या आशयाला आपल्याकडे माेठ्या प्रमाणात दाद मिळाली. त्यामुळे आज ‘बाॅम्बे 17’सारखी स्वतंत्र कलाकृती असणारी नाटके, ‘फॅन्ड्री’, ‘धग’सारखे चित्रपट उचलून धरले गेले. कारण, त्या स्वतंत्र कलाकृती होत्याच; पण जे भाेग वाट्याला आलेत त्याचा त्या थेट हुंकार हाेत्या.

नागराज मंजुळे - baimanus

मात्र दलित विषयावरील चित्रपट म्हटले की, त्यात त्याच त्याच व्यथा मांडलेल्या असतात, असाही सूर प्रेक्षकांमध्ये आता उमटायला लागला आहे. विषयांच्या मर्यादाही प्रेक्षकाला जाणवायला लागल्या आहेत. हा एकसुरीपणा जर काढायचा असेल तर दलित जाणिवा चित्रपटातून मांडताना त्यांची व्यापकता लक्षात घ्यावी लागेल. दलित हा विषय महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. भगवान बुद्ध वा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांपुरता मर्यादित नाही. आपल्याकडे दलित मानणे, न मानणे इथपासून विचारधारांमध्ये विविधता आहे. ज्या कैकाडी समाजावर आधारित ‘फॅन्ड्री’ चित्रपट मी बनवला हाेता, ताे समाज स्वत:ला दलित मानतच नाही. मात्र इतर समूहांनी या समाजाला वर्षानुवर्षे उपेक्षेची वागणूक दिली आहे. खरं तर इथपासून दलित या शब्दाचा, वास्तवाचा परीघ सुरू हाेताे. त्यात ‘भारतीय दलित’ ही संकल्पना एकजिनसी नाही. बुद्धास मानणारा पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना फारसे न मानणारा पंजाबी दलितवर्ग आपल्याकडे वेगळा आहे. त्यांची श्रद्धा, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. पंजाबी दलित चळवळ ही तेथील चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरुद्ध उभी राहिली. त्यात केरळच्या दलितांची व्यथा आणखीनच वेगळी. केरळमधील दलितांचे धर्मांतर हा प्रश्न एकेकाळी खूप भीषण हाेता.

शिवाय मंदिरामध्ये दलित कलाकाराला वाद्य वाजविण्यास मनाईसारखा प्रकारही काही काळापूर्वी घडला हाेता. तमिळनाडूमध्ये उच्चवर्णीय वस्तीत मान ताठ ठेवून चालल्याने एका दलित मुलाला मारण्याचा प्रयत्न झाला हाेता. उत्तर भारतातील दलितांच्या समस्या याहून वेगळ्या आहेत. तेथील दलितांना जमिनीवरील हक्कांपासून स्वत:च्या जातीत मान्य नसलेल्या व्यवसायांमध्ये उतरण्यापर्यंत संर्घष करावा लागताे आहे. पश्चिम बंगालमध्ये नाम-शुद्र चळवळीला माेठा इतिहास आहे. ‘जतीस्वर’सारख्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती त्यातूनच झाली. याउपर स्त्री ही प्रत्येक पुरुषासाठी एका अर्थाने दलितच असते. मग दलित समाजातील स्त्रीची कथा त्याहून वेगळी, त्याहून भीषण. दलित स्त्रियांची हाेणारी बेकायदा मानवी वाहतूक हा प्रश्न तर बंगाल, आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये आज भेडसावताे आहे. त्या त्या प्रदेशातील प्रादेशिक रंगभूमीवर हे प्रश्न मांडण्याचा नेहमीच प्रयत्न हाेत असताे. दलित समाजाचे प्रश्न जर आज संपल्यात जमा असते, तर नितीन आगेसारख्या दलित मुलाची हत्या झालीच नसती.

थाेडक्यात, दलित जाणिवा मांडताना सातत्याची जशी गरज आहे तशी त्यात विस्तृतताही येणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून एकसुरीपणाची तक्रार प्रेक्षकवर्गाकडून येणार नाही. शिवाय पूर्वसुरींनी काय काय साहित्य वा चित्रपट निर्माण केले आहेत, याचे दडपण न बाळगता चित्रपट निर्माण व्हायला हवेत. आता चित्रपटासारखे दृश्य माध्यमच दलित चळवळीला समर्थपणे तारू शकते. ही या माध्यमाची ताकद लक्षात घेणे गरजेचे आहे. उपेक्षा, जातिभेद या न संपणाऱ्या व्यथा आपल्याकडे जिवंत आहेत ताेवर तरी चळवळीचे स्वरूप बदलून जिवंत राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दलित वास्तवाचे झालेले माध्यमांतर हे पुढल्या पिढ्यांसाठीदेखील आशादायी वातावरण निर्माण करणारे ठरणार आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here