मृत्यूच्या 82 वर्षानंतर 61 कोटीला विकले गेले अमृता शेरगिलचे तैलचित्र!

विख्यात चित्रकार अमृता शेरगिल यांचं ‘द स्टोरी टेलर’ हे तैलचित्र नुकतंच 61.8 कोटी रुपये इतक्या विक्रमी किंमतीला विकलं गेलं. यामुळं लिलावात विकल्या गेलेल्या सर्वांत जास्त किंमतीच्या भारतीय कलाकृतीचा मान या चित्राला मिळाला आहे. या निमित्तानं...

  • टीम बाईमाणूस

खुप वर्षांपूर्वी म्हणजे तब्बल 1937 साली तिने एक चित्र रेखाटलं होतं. या तैलचित्राचं नाव होतं ‘द स्टोरी टेलर’… अलीकडेच नवी दिल्लीत दिग्गज चित्रकारांच्या चित्रांचा लिलाव पार पडला. दिग्गज म्हणजे कोण कोण तर एम. एफ. हुसैन, व्ही. एस. गायतोंडे, जेमिनी रॉय या महान चित्रकारांची जवळपास 70 चित्रं या लिलावामध्ये उपलब्ध होती. याच चित्रकारांमध्ये तिचं तैलचित्रही उपलब्ध होतं… ती देखील तितकीच महान चित्रकार परंतू तिचं आयुष्य अ‌वघ्या 28 वर्षांचं… दिल्लीतल्या या लिलावामध्ये तिच्या तैलचित्राने मोठा विक्रमच प्रस्थापित केला. लिलावात विकल्या गेलेल्या सर्वाधिक किंमतीच्या भारतीय कलाकृतीचा मान तिच्या ‘द स्टोरी टेलर’ या चित्राने पटकावला. सर्वाधिक म्हणजे किती तर तब्बल 61.8 कोटी रुपये…

अमृता शेरगिल - baimanus

त्या महान चित्रकाराचं नाव… अमृता शेरगिल!

सॅफ्रन आर्टनं आयोजित केलेल्या ‘ईव्हनिंग सेल : मॉडर्न आर्ट’ या लिलावात विख्यात भारतीय चित्रकार अमृता शेरगिल यांनी तैलरंगांनी कॅनव्हासवर चितारलेलं ‘द स्टोरी टेलर’ हे चित्र 61.8 कोटी रुपयांना विकलं गेलं. या विक्रमी किंमतीमुळं लिलावात विकल्या गेलेल्या सर्वाधिक किंमतीच्या भारतीय कलाकृतीचा मान या चित्रानं पटकावला आहे. यापूर्वी हा मान सय्यद हैदर रझा यांच्या ‘जेस्टेशन’ या चित्राकडं होता. ‘ऑइल ऑन कॅनव्हास’ असलेली रझा यांची ही कलाकृती काहीच दिवसांपूर्वी मुंबईत पंडोल हाउस इथं झालेल्या लिलावात 51.75 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली होती. ‘द स्टोरी टेलर’ या कलाकृतीचा समावेश अमृता शेरगिल यांच्या सर्वांत महत्त्वपूर्ण कलाकृतींमध्ये केला जातो. आपल्या सर्वोत्तम 12 चित्रांपैकी हे एक असल्याचं अमृता स्वत: मानत असत. त्यांच्या सर्वांत जास्त प्रामाणिक आणि बोलक्या चित्रांपैकी हे एक आहे.

संबंधित वृत्त :

दोन शैलींचा संगम असलेलं ‘द स्टोरी टेलर’

अमृता शेरगिल यांच्या या चित्रात पहाडी आणि पॅरिसच्या चित्रशैलींचा संगम दिसतो. त्याची आणखी एक खासियत अशी, की अमृता यांनी बाहेरच्या वातावरणात काढलेल्या मोजक्या चित्रांपैकी ते एक आहे. घराबाहेर गायींसोबत आरामात वेळ घालवणाऱ्या स्त्रियांची छबी यात दिसते. यातली एक स्त्री पान खाते आहे, एक हातातल्या पंख्याने वारा घेत आहे, तर इतर जणी गप्पा मारत आहेत. अमृता शेरगिल यांच्या चित्रांच्या केंद्रस्थानी स्त्री दिसते. त्यांच्या अवस्थांचं सहज वर्णन त्या चितारत असत. चौकटबद्ध पुरुषी नजरेतून त्यांनी स्त्रीप्रतिमांना बाहेर काढलं, स्वतंत्र केलं. पाचव्या वर्षापासूनच चित्रांकडं वळलेल्या अमृता यांच्या सुरुवातीच्या चित्रांमध्ये हंगेरियन परिकथा मोठ्या आकर्षक पद्धतीनं चितारलेल्या दिसतात.

अल्पायुषी ठरलेल्या ‘अमृता’ची गोष्ट

भारतीय आधुनिक चित्रकलेला नवे वळण देण्याचे पहिले काम प्रामुख्यानं कुणी केलं असेल तर स्त्री चित्रकार अमृता शेरगील यांचे योगदान पायाभूत मानले जाते. युरोप-पॅरिस येथे कलेचं पाश्चात्य शिक्षण घेऊन त्या भारतात हट्टाने परत आल्या. कलाशिक्षणाचे पाश्चात्य तंत्र पचवून भारतात ‘भित्तीचित्रे’ विविध लघुचित्रशैली यांचा योग्य अभ्यास करून स्वतःची नवी शैली त्यांनी निर्माण केली. स्त्रीस्वातंत्र्यांचा उच्चार न करता स्त्रिवादी भूमिका जगलेल्या अमृता शेर-गील यांनी भारतीय चित्रशैलीला एकनवी दिशा देण्याचे मुख्य काम केलं.

आई हेंगेरियन कलासक्त, संगीतातील उत्कृष्ठ पियानोवादक आन्तोआनेत गौतेस्माज आणि वडिल उमरावसिंग संस्कृत परशियन भाषेचे अभ्यासक, प्राकृतिक विज्ञान, खगोलशास्त्र छायाचित्रकार इत्यादी विषयांचे व्यासंग असलेले व्यक्तीमत्व. अमृता यांचा जन्म तसा बुडापेस्टचा. सुरुवातीचे 8 वर्ष हंगेरीत व नंतरचे 8 वर्ष भारतात. चित्रकलेची लहानपणापासून आवड असल्याने या क्षेत्राकडे त्या आकर्षित झाल्या. एका पुस्तकात त्यांच स्वतःच वाक्य आहे, त्या म्हणतात, ‘मी चित्रकार होण्यासाठी जन्माला आले आहे. दुसऱ्या कशासाठी नाही, याची मला विलक्षण खात्री वाटायची.’ त्यांच्या बंडखोरीच्या खूणा लहाणपनापासून दिसल्यात. सिमल्याच्या ‘जिझस अ‍ॅण्ड मेरी’ कॉन्व्हेंटमध्ये शिकत असतांना आपण निरिक्षरवादी आहोत, असे त्यांनी उघडपणे सांगितल्यामुळे त्या शाळेतून त्यांची हकालपट्टी झाली होती. त्यांचा मामा एरवीन हा चित्रकार होता. त्यानेच आपल्या भाचीचे कलागुण ओळखले आणि खरं कलेचं मार्गदर्शन त्यांच्याकडूनच त्यांना मिळालं. अमृता शेर-गील यांचे कलेचं शिक्षण पॅरिस येथील ग्राशामिक आणि एकॉल दे बिझार्त या कलाशाळेत झाले.

अमृता शेरगिल - baimanus

मुळातच स्वतंत्र व काहीशा स्वैरवृत्तीच्या असल्याने त्यांना पॅरिसमधील मुक्त व स्वतंत्र स्त्रीजीवन असलेले वातावरण अधिकच भावले. पॅरिसच्या शिक्षणानंतर भारतात त्या आल्या. कलेच्या विकासासाठी त्यांचे भारतात येणे महत्त्वाचे होते. भारतात जाण्यासाठी त्यांचे गुरु लुसिया सिमॉ यांचेही प्रोत्साहन होते. आणि खऱ्या अर्थाने भारतात आल्यावरच त्यांची कलादृष्टी बदलली. भारतातील वास्तव अतिशय संवेदनशिलतेने टिपून भारतीय अजिंठा चित्रशैली, लघुचित्रशैलीच्या संस्कारातून एका वेगळ्या वळणावर आणून ठेवले. युरोपमध्ये शिक्षण झाल्याने भारतीय वातावरण तेजस्वी सूर्यप्रकाश, कष्टकरी माणसं, सोशीन, सहनशील, जीवनाबद्दलची उदासिनता असलेल्या ग्रामिण स्त्रिया अशा अनेक गोष्टी त्यांनी नव्या व ताज्या दृष्टीकोनातून पाहिल्यात आणि त्यातूनच त्यांची स्वतंत्र चित्रशैली घडायला सुरुवात झाली. भारतात त्यावेळी टिकेचा भडीमारही त्यांच्यावर झाला. अमृता शेरगील यांनीही भारतीय चित्रकारांवर भरपूर टिका केली. मात्र कलेचा ध्यास त्यांनी कधीच सोडला नाही. आपल्या चित्रकला साधनेत व्यक्तीगत भावभावनांचा अडसरही कधी त्यांना आला नाही.

आजच्या काळात अमृता असती, तर ती आताच्या सत्ताधाऱ्यांना नक्कीच झेपली नसती. अमृताचे त्या काळात असलेल्या परिस्थितीवर बिनधास्त बोलणे असो अथवा समलिंगी संबंधावर बोलणे असो किंवा समकालीन चित्रकेलवर टीका करणं असो. सगळं अगदी बिनधास्त होतं. कशालाही न घाबरता ती मुक्तपणे चित्र काढत होती आणि आपली मतं ठामपणे मांडत होती.

अमृता शेरगिल - baimanus

यापूर्वी तिचं चित्र तब्बल 37 कोटींना विकलं गेलं…

अमृता शेरगिल यांचं काम अनन्यसाधारण आहे आणि दोन वर्षांपूर्वी त्या जगभरात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अमृता शेरगिल यांचं “In the Ladies’ Enclosure” हे चित्र तब्बल 37.8 कोटी रुपयांना विकलं गेलं आहे. हे चित्र सर्वाधिक महागड्या विकल्या गेलेल्या भारतीय कलाकृतींच्या यादीत दुसऱ्या स्थानी जाऊन पोचलं आहे. Saffronart या नावाजलेल्या लिलाव कंपनीने नुकतंच काही प्रमुख भारतीय चित्रांचा लिलाव केला होता, त्यात अमृता शेरगिल यांच्या या प्रसिद्ध चित्राचाही समावेश होता. या चित्रात अमृता एक पूर्ण चित्रकथाच सांगताना दिसतात. एका बाजूला एक स्त्री नववधूची वेणी घालत आहे, तर दुसऱ्या बाजूला किशोरवयीन मुलगी जास्वंदाच्या फुलांचं निरीक्षण करत आहे. या तीन मुख्य पात्रांखेरीज इतर दोन स्त्रिया, सोबत एक कुत्रा आणि एका कोपऱ्यात गप्पा मारण्यात गर्क असलेल्या स्त्रियाही चित्रात दिसत आहेत. हे चित्र अमृता शेरगिल यांनी त्यांच्या गोरखपूर येथील घरी असताना चितारलं होतं. या चित्रात ठासून भरलेल्या आशयामुळे हे चित्र खास ठरतं. या चित्राचं दुसरं महत्त्व म्हणजे हे चित्र त्या काळातलं आहे जेव्हा अमृता शेरगिल आंतराराष्ट्रीय बाजार पेठेत नुकतंच पदार्पण करत होत्या.

अमृता शेरगिल - baimanus

5 डिसेंबर 1941 ला लाहोर येथे त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्या आपल्या दुसऱ्या एकलप्रदर्शनाची तयारी करीत होत्या. त्यांच्या मृत्यनंतर डिसेंबर 1941 मध्येच लाहोरच्या पंजाब लिटररी लिंगमध्ये अमृता यांचे चित्रांचे प्रदर्शन झाले. अशा या वादळी व्यक्तिमत्वाचा फक्त 28 वर्षांचा काळ होता. स्त्रीवादी चित्रकारांना आधुनिक भारतीय कलाइतिहासात त्यांनीच स्थान प्राप्त करून दिले. ही आधुनिक भारतीय चित्रकलेतील पहिली स्त्री.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here