- टीम बाईमाणूस
बॉलिवूडमध्ये आजवर सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाला नुकतीच 29 वर्षं पूर्ण झाली आहेत. 90 च्या दशकात म्युझिकल हिट्सचा ट्रेंड आला असतानाच सूरज बडजात्या हा फॅमिली ड्रामा प्रकारातील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. सलमान खान, माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, अनुपम खेर, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, यांनी चित्रपटात साकारलेल्या भूमिका विसरणं केवळ अशक्य असल्याचं प्रेक्षक सांगतात. या चित्रपटानं तेव्हा पाच फिल्मफेअर पुरस्कारही मिळवले होते. सुरुवातीला लग्नाची व्हिडीओ कॅसेट म्हणून हिणवल्या गेलेल्या या चित्रपटानं नंतर बॉक्स ऑफिसवर भरभरुन यश मिळवलं.
किंबहुना आजही टिव्हीवर हा चित्रपट लागला की अनेकजण ठाण मांडून बसतात. मल्टीस्टारर ‘हम आपके हैं कौन’मध्ये प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, त्यातही नावाजली गेली ती म्हणजे सलमान खान आणि माधुरी दीक्षितची ऑनस्क्रीन केमिस्ट्री. सलमान आणि माधुरीने साकारलेल्या ‘प्रेम’ आणि ‘निशा’च्या भूमिका त्या दिवसांमध्ये प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत झाले होते. त्याशिवाय प्रत्येक मुलीला प्रियकर हवा तर तो ‘प्रेम’सारखा असंच वाटू लागलं होतं.
‘प्ले लिस्ट’मध्ये आजही हा गाण्यांचा अल्बम
प्रेम, मैत्री, कुटुंब, संस्कार आणि तडजोड या सर्व गोष्टींची प्रमाणशीर मांडणी करत हा चित्रपट सादर करण्यात आला होता. त्यातच ‘दिदी तेरा देवर दिवाना..’, ‘मौसम का जादू..’, ‘पहला पहला प्यार है..’ अशी जवळपास 14 गाणी या चित्रपटाला चार चाँद लावून गेली होती. मुख्य म्हणजे आजही या चित्रपटातील गाणी अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होउन 29 वर्षे उलटली असली तरीही त्याची जादू आजही कायम आहे असंच म्हणावं लागेल. काही चाहत्यांनी तर हा चित्रपट पाहण्याचा विक्रमच केला आहे. त्यातील संवाद, गाणी, सलमानचा अनोखा अंदाज आणि निशाचा खोडकर अंदाज या सर्व गोष्टी आजही तितक्याच नव्या आणि आपल्याशा वाटतात.

भारतीय समाज मुळातच फार उत्सवप्रिय आहे. त्यात लग्नसोहळा म्हटलं की लोकांच्या उत्साहाला उधाण येतं. भारतीय समाजाची हीच नस सूरज बडजात्यांनी ओळखली आणि सोहळे नव्याने साजरे करण्याच्या पद्धतींची ओळख करून दिली. कोणताही खलनायक नसलेल्या, मारामारी, हिंसाचारापासून दुर असलेल्या या चित्रपटाने या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले, अनेक विक्रम मोडले. फॅमिली ड्रामाच्या पलीकडे या चित्रपटात फारसं काहीच नव्हतं. पण भारतीय चित्रपटाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा हम आपके है कौनच्या उल्लेखाशिवाय तो अपूर्ण असेल.
चंगळवादाचा हा चित्रपट सर्वार्थाने प्रतीक
‘हम आपके है कौन?’ या चित्रपटाने हिंदी चित्रपटांचा फॉर्म्युलाच केवळ बदलला नाही, तर अवघे भारतीय जनमानसही त्याने कवेत घेतले. श्रीमंतीचे उथळ प्रदर्शन, ‘संस्कृती’च्या नावाखाली थिल्लर गोष्टींचा अतिरेक, दाखवेगिरीचा प्रचंड सोस आणि सामाजिकतेला सोडचिठ्ठी ही सगळी या चित्रपटाचीच देन आहे. याचदरम्यान भारतीय समाजात आणि त्याच्या मानसिकतेत जे बदल घडले, त्याची सुरुवात या चित्रपटाने करून दिली. आजच्या वाढत्या चंगळवादाचा हा चित्रपट सर्वार्थाने प्रतीक आहे. फॅन्सी ड्रेस, विविध गुणदर्शन आणि मनोरंजक उत्सव असा शाही थाटमाट लग्नात करण्याच्या या उत्क्रांतीचं जनकत्व ‘हम आपके है कौन?’ या चित्रपटाकडे जातं. 29 वर्षांपूर्वी या चित्रपटानं मध्यमवर्गीयांना गुदगुल्या करीत उंची जीवनशैलीची आगळी दुनिया दाखवली आणि त्याने मध्यमवर्गीय जीवन आमूलाग्र बदलून गेलं.
हिंसक वा उत्तान चित्रपटांच्या पाश्र्वभूमीवर हे पारंपरिक मूल्यं व संस्कारांचं क्षोभनाटय़ (मेलोड्रामा) भारतीय मनाला भुरळ पाडणारं होतं. परंपरेला कुठलेही प्रश्न न विचारणारा नव्यांचा आज्ञाधारकपणा भारतीय मनाला भावतो. सिनेमात मध्यंतरापर्यंत अर्धवस्त्रांत हिंडणारी स्त्री लग्न होताच डोक्यावर पदर व अंगभरून साडी नेसली की ती सोज्वळतेचं प्रतीक बनते. भंपक आधुनिकतेचा अभिकल्प, निर्माण व विकास या अपूर्व कामगिरीचा साक्षात्कार म्हणजे लोकप्रिय हिंदी चित्रपट! ‘लोकप्रिय हिंदी चित्रपट हे अतार्किक वाटत असले तरी ते पूर्णपणे असत्य नसतात,’ या मानसशास्त्रज्ञ सुधीर कक्कर यांच्या विश्लेषणाची त्यातून प्रचीती येते. ‘हआहैकौ’च्या सुमारासच चित्रपटांतील प्रमुख पात्रांचा सामाजिक परीघ आक्रसण्यास सुरुवात झाली. यापूर्वीच्या चित्रपटांतील राजू, विजय अशा नायकांचे आजूबाजूच्या लोकांशी व समाजाशी जिवंत संबंध असत. ते नायक सभोवतालची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत. ‘हआहैकौ’मधील ‘प्रेम’च्या जमान्यात समाज, गरिबी, महागाई, भूक असल्या किरकोळ सामाजिक प्रश्नांना पार हाकलून दिलं गेलं. ‘उगाच डोक्याला त्रास नको!’ हा वसा मध्यम व उच्च वर्गानी मनोभावे स्वीकारून त्याचा पुढे प्रसार केला.

‘लटका खोकला’ आणि ‘जुते दो पैसे लो’
हा चित्रपट म्हणजे एक स्वप्ननगरी आहे. तिथे कैलाशनाथ (आलोकनाथ) प्रा. चौधरी (अनुपम खेर) सौ. चौधरी (रिमा लागू) ही लोकं, त्यांची मुलं, त्यांचे नातेवाईक ही मुख्य पात्रं आहेत. ही लोकं पोटापाण्यासाठी काय करतात, कधी पैसा कमावतात, वगैरे प्रश्न आपल्याला पडत असतात. पण असे चित्रपट पाहताना हे प्रश्न पडू द्यायचे नसतात. राजेश (मोहनीश बहल) आणि पूजा (रेणुका शहाणे) यांचं लग्न जमवण्याच्या निमित्ताने ही दोन कुटुंब भेटतात. त्यांचं लग्न ठरतं आणि पुढे एक ‘लग्नाची कॅसेट’ बघायला मिळते. साखरपुडा ते बाळंतपण असे सगळे कार्यक्रम आपल्याला या चित्रपटात पहायला मिळतात. या लग्नाच्या कॅसेटने त्या काळात तिकीटबारीवर मजबूत पैसा कमावला. ‘नदिया के पार’ या चित्रपटालाच फोडणी घालून तयार केलेल्या या चित्रपटाने पण पैशाच्या पलीकडे जाऊन या चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान मिळवलं आहे.
कोणत्याही लग्नात नवरा आणि नवरी हे अत्यंत दुर्लक्षित असतात. त्यांना असं वाटत असतं की हे सगळं आपल्यासाठी होतंय. मात्र प्रत्यक्षात इतर लोक आपला भलताच स्वार्थ साधून घेतात. प्रेम (सलमान खान) आणि निशा (माधुरी दीक्षित) यांना या लग्नाचा सगळ्यात मोठा फायदा होतो. पहिल्या भेटीपासून त्यांचा खट्याळपणा सुरू होतो. निशाला भेटल्यावर प्रेम तिला इम्प्रेस करण्याची एकही संधी तो सोडत नाही. ‘चॉकलेट, लाईम ज्यूस, आईसक्रीम टॉफी’च्या जगात वावरणारी निशासुद्धा त्याच्या प्रेमाला वेळोवेळी प्रतिसाद देत असते.

चित्रपटाच्या काही खास गोष्टी
- ‘हम आपके हैं कौन’ चित्रपट 1994 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट राजश्री प्रॉडक्शनच्या 1982 मध्ये रिलीज झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘नदिया के पार’चं मॉडर्न व्हर्जन आहे.
- लेखक आणि दिग्दर्शक सूरज बडजात्या यांना हा चित्रपट लिहीण्यासाठी 2 वर्ष लागले होते. सुरूवातीचे 5 महिने त्यांनी ‘मैने प्यार किया’चं लेखन केलं. त्यानंतर त्यांनी ‘हम आप के है कौन’च्या स्क्रिप्टवर काम केलं.
- हम आप के हैं कौन हा पहिला हिंदी चित्रपट होता ज्याने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली होती.
- प्रेमच्या भूमिकेसाठी आमिर खानला निर्मात्यांची पहिली पसंती होती. पण आमिरला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नाही आणि त्याने नकार दिला. त्यानंतर हा रोल सलमान खानला ऑफर करण्यात आला. त्यावेळी सलमानचं करिअरच्या वाईट काळात होता. त्यामुळे त्याने लगेच चित्रपटासाठी होकार दिला.
- हम आपके हैं कौन चित्रपट अल्ट्रा स्टिपिओ ऑप्टिकल साऊंडमध्ये रिलीज करण्यात आला होता. ऑडिओ व्हिज्युअल्सच्या चांगल्या अनुभवासाठी असं करण्यात आलं होतं. ज्या थिएटरर्समध्ये ही सिस्टीम नव्हती तिथं चित्रपट रिलीज केला गेला नव्हता.
- ‘जुते दो पैसे दो’ गाण्याचा म्युझिक पार्ट राजश्री प्रॉडक्शनच्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटातलं गाणं ‘कबूतर जा’ आणि ‘आजा शाम होने आई’पासून घेतला होता.
- हम आप के हैं कौन च्या शूटिंगदरम्यान अनुमप खेर यांना फेशियल पॅरालिसीस झाला होता. हे कळू नये यासाठी त्यांनी चित्रपटात शोलेच्या शराबीवाचा सीन शूट केला होता.
- माधुरी दीक्षितने चित्रपटात निशाची भूमिका करण्यासाठी 3 कोटी रुपये घेतले होते. हे सलमानच्या फीपेक्षाही जास्त होते.
- चित्रपटाला पूर्ण होण्यासाठी जवळपास 4 वर्षे लागली. चित्रपटाची शूटिंग ऊटीमध्ये झाली होती.
- आलोकनाथ यांच्या भूमिकेसाठी आधी राजेश खन्ना यांना विचारण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी त्यासाठी नकार दिला होता.
- हम आपके है कौन मध्ये म्हटलं तर मुख्य भूमिका होती ती ‘टफी’ची. या टफीला चित्रपटाच्या शुटिंगनंतर माधुरीने दत्तक घेतलं. त्यानंतर 2000 साली टफी हे जग सोडून गेला.
- चित्रपटातील दीदी तेरा देवर दिवाना ही गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. त्यावेळचे लग्न समारंभ या गाण्याशिवाय पूर्णच होत नसत. परंतु, हे गाणं उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्या ‘सारे नबियन’ या गाण्यापासून प्रेरित होतं.
- सूरज बडजात्या यांचे वडील आणि राजश्री प्रॉडक्शनचे संस्थापक ताराचंद बडजात्या यांना ‘धिकताना-धिकताना’ हे गाणं इतकं आवडलं होतं की, त्यांनी चित्रपटाचं शीर्षक म्हणून हेच नाव सुचवलं होतं.
- प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसैन यांनी हा चित्रपटर तब्बल 85 वेळा बघितल्याच्या बातम्या त्यावेळी वृत्तपत्रांमधून झळकत होत्या. या चित्रपटानंतर एम एफ हुसैन माधुरीचे जबरदस्त फॅन झाले.