कचऱ्याच्या डोंगरासमोर प्री-वेडिंग शूट करणारं तैवानमधील जोडपं

कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाविरुद्ध अनेक सामाजिक कार्यकर्ते, वैयक्तिक स्तरावर सर्वसामान्य नागरिकही प्रयत्न करताहेत. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे तैवानमधील एका जोडप्यानं नुकतंच प्री वेडिंग शूट केलं.

  • टीम बाईमाणूस

युद्ध आणि अशांततेला सध्या कोणतंही कारण लागत नाही, असं म्हटलं जातं, इतक्या या गोष्टी आता सार्वत्रिक झाल्या आहेत. सध्या जगभरात चाललेले वादाचे, संघर्षाचे आणि युद्धांचे प्रसंग पाहता या गोष्टीला पुष्टीच मिळते. जागतिक शांततेच्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे, त्या दिशेनेच आपली पावलं पडली पाहिजेत, असं अख्खं जग म्हणत असलं तरी प्रत्यक्षात मात्र त्याच्या विपरीतच परिस्थिती दिसून येते.

येणाऱ्या काळात आता मुख्यत्वे दोन गोष्टींवरून युद्धं होतील असं म्हटलं जातं. त्यातलं पहिलं पाणी आणि दुसरं कचरा. या दोन्ही गोष्टींवरून संघर्ष कधीच सुरू झाला आहे. कचऱ्याच्या बाबत तर त्या त्या देशांत अंतर्गतही मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू झाला आहे. प्रत्येक शहरा-शहरात, खेड्यातही कचऱ्यावरून संघर्ष सुरू झाले आहेत. रोज प्रचंड प्रमाणात तयार होणारा हा कचरा टाकायचा तरी कुठे आणि त्याची विल्हेवाट लावायची तरी कशी, हा मोठाच यक्षप्रश्न सर्वांपुढे उभा राहिला आहे. माणसा-माणसांमध्ये त्यामुळे कटुता निर्माण होते आहे. कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे आणि आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे आणखी एक विचित्र कोंडी निर्माण झाली आहे.

प्री-वेडिंग शूट - baimanus

कचऱ्याच्या प्रदूषनाविरुद्ध अनेक सामाजिक कार्यकर्ते, इतकंच नव्हेतर, अगदी वैयक्तिक स्तरावर सर्वसामान्य नागरिकही प्रयत्न करताहेत. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे तैवानमधील एका जोडप्यानं नुकतंच प्री वेडिंग शूट केलं. आजकाल लग्न, प्री-वेडिंग शूटसारख्या कार्यक्रमांसाठी प्रत्येक जोडपं एखादं हटके, निसर्गरम्य ठिकाण निवडतात. पण, तैवानमधील या जोडप्यानं आपल्या प्री वेडिंग शूटसाठी मुद्दाम स्थळ निवडलं ते कचऱ्याचा भलामोठा डोंगर. या कचऱ्याच्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, तिथे फोटो आणि व्हिडीओ शूट केलं; कारण काय? तर या कचऱ्याच्या समस्येबाबत लोकांमध्ये जागरूकता यावी!

या जोडप्याचं नाव आहे आयरिस सुएह आणि इयान सिलोऊ. दोघंही पर्यावरणप्रेमी आहेत. तैवानमधील नॅन्टो काऊंटी येथे कचऱ्याचा भला मोठा डोंगर आहे. हा डोंगर दिवसेंदिवस वाढतोच आहे. अर्थात वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळ्या ठिकाणी कचऱ्याचे असेच मोठमोठे डोंगर आहेत. तैवान हा देश त्याला अपवाद नाही. संपूर्ण जगभरात कुठेही गेलं तरी मुख्यत्वे शहराबाहेर कचऱ्याचे असेच मोठमोठे ढीग जागोजागी दिसून येतात.

आयरिस आणि इयान यांना जानेवारी 2024 मध्ये लग्न करायचं आहे; पण, आपल्या लग्नाला जे पाहुणे येतील, त्यांना कचऱ्याची भीषणता, गंभीरता कळावी आणि त्याबाबत त्यांनीही गंभीर असावं म्हणून या दोघांनी आपल्या प्री वेडिंग शूटसाठी असा अनोखा प्लॅन रचला. आपल्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांनाही त्यांनी आवाहन केलं आहे, “तुम्ही आमच्या लग्नाला जरूर या, त्यासाठी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण; पण, कृपा करून कधीच, कुठेही, कसलंही प्रदूषण करू नका. अन्नाची नासाडी तर चुकूनही करू नका. एकीकडे कोट्यवधी लोकांना खायला अन्नाचा कण नाही, भुकेपोटी ते तडफडून मरताहेत, अशावेळी अन्न वाया घालवणं म्हणजे तो एक प्रकारचा ‘गुन्हा’च आहे. शिवाय अन्नाच्या नासाडीमुळे प्रदूषणही खूप मोठ्या प्रमाणावर होतं.”

संबंधित वृत्त :

लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना त्यांनी आणखी एक अनोखं आवाहन केलं आहे, “कृपया लग्नाला येताना सोबत एक डबा जरूर घेऊन या. तुम्ही लग्नाला अवश्य या, न आम्हाला शुभाशीर्वाद द्या, तुमची उपस्थिती आणि तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी खूप म्हणजे खूपच मोलाचे आहेत, लग्नानंतर आम्ही जी मेजवानी देऊ त्याचाही तुम्ही आस्वाद घ्या; पण, समजा या मेजवानीत तुमचं काही अन्न, खाद्यपदार्थ उरलेच, तर कृपया तुमच्या सोबत आणलेल्या डब्यातून ते घरी घेऊन जा. ते वाया घालवू नका!” गोष्ट अतिशय छोटी आहे; पण, यामुळे अनेक गोष्टी साध्य होतील. अन्न वाया जाणार नाही. अन्नाचं प्रदूषण होणार नाही. हे अन्न कोणा भुकेल्याच्या पोटात जाईल. तो तुम्हाला दुवा देईल आणि अन्नाचं महत्त्वही अधोरेखित होईल!

छोट्या गोष्टीच मोठा बदल घडवतात!

आयरिस सुएह आणि इयान सिलोऊ यांची ही कृती केवळ तैवानमध्येच नाही, तर संपूर्ण जगात क्षणार्धात व्हायरल झाली. अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. जगभरातल्या माध्यमांनीही या दोघांना आणि त्यांच्या या अनोख्या कल्पनेला भरभरून प्रसिद्धी, दाद दिली. पण, आयरिस आणि इयान या दोघांचंही म्हणणं आहे, “आम्ही काही फार मोठी गोष्ट केलेली नाही, यामुळे लगेच जग बदलेल, अशाही भ्रमात आम्ही नाही. पण, अशा छोट्या छोट्या गोष्टीच मोठा बदल घडवतात, घडवतील यावर आमचा विश्वास आहे. आम्ही फक्त तेवढंच करतोय!”

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here