जगण्यासाठी मृतांचं जग जवळ करणारी शीतल चव्हाण…

तिशीतली महाराष्ट्र कन्या शीतल चव्हाण चक्क पोस्टमॉर्टेम करून उदरनिर्वाह करते..! तिची कहाणी अंगावर काटा उभे करते पण डोळ्यात पाणी येऊ देत नाही कारण शीतलने तिच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ दिले नाही. तिच्या डोळ्यात आहे ती फक्त उमेद..!

  • उत्तम कांबळे

पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये राहणारी शीतल रामलाल चव्हाण. जगण्यासाठी तिनं मृतांचं जग जवळ केलंय. पण आता आपलं हे जग बदलायला हवं, असं तिला तीव्रतेनं वाटू लागलंय. कसं आणि कोण बदलणार तिचं हे जग? शीतल रामलाल चव्हाण हे तिचं संपूर्ण नांव. आपलं कुटुंब कुठून आलं भाकरीच्या शोधात हे कुणालाही सांगता येत नाही. वाल्मीकी समाजातलं हे कुटुंब कितीतरी वर्षांपासून भोरमध्ये स्थिरावलंय. शीतलचा आजोबा सफाई कामगार होता. डॉक्टरांच्या सहवासात राहून पोस्टमॉर्टम (पीएम) करायला तो शिकला. त्याचा मुलगा रामलाल. तो भोरमध्ये मजूरी करायचा. वडिलांमुळं त्यालाही पीएम करता यायचं पण हे काही पूर्णवेळ काम नव्हतं. कधी बोलावणं आलं तर जायचं, अन्यथा बिगारी काम शोधायचं. त्याला पहिली मुलगी झाली ती शीतल. ती बापाची लाडकी. बापाच्या कामात मदत करायची. बाप म्हातारा झाला.

आजारी पडू लागला, तेंव्हा ती पोस्टमॉर्टमसाठी जाऊ लागली. पहिल्यांदा पीएम केलं तेंव्हा ती असावी 12-13 वर्षांची. सहावी-सातवीत गळून पडलेली. पाण्यात बुडून फुगलेली डेड बॉडी आली होती. पीएम करायचं होतं. बॉडी वरपासून खालपर्यंत फाडून पुन्हा शिवायची होती. वडीलांनी धीर दिला. मेलेल्या माणसाचा त्रास नसतो होत, असं सांगितलं. शीतल उभी राहिली हातात छन्नी-हातोडा आणि ब्लेड घेऊन. एक कोवळा जीव प्रेत फाडू लागला. शिवू लागला… वडील अधिकच अशक्त होऊ लागले. तेंव्हा तर शीतल सात्यत्यानं त्यांच्याबरोबर जाऊ लागली आणि बघता-बघता डेड बॉडीच्या जगात स्थिरावली. कारण तिला जगायचं होतं. कुटुंब जगवायचं होतं आणि त्यासाठी तिला उपलब्ध झालं मयतांचं जग…

शीतल चव्हाण - baimanus

शीतल म्हणाली, “वारंवार प्रेतं बघून आणि ती फाडून नजर मरुन जाते. भीती संपून जाते. कामाचं काहीच वाटत नाही. भूत-पिशाच्च वगैरे काही नसतात. आत्मा असला तर तो मरणाबरोबरच निघून जात असावा. मला तरी कुठं तसं काही दिसलेलं नाही. एक खरं आहे की प्रेताची दुर्गंधी सहन करणं खूप कठीण असतं. काही वेळा त्यात किडे-आळ्या होतात. दुर्गंधी रंधारंधात घुसते आणि पुढं चार दिवस डोक सुन्न होऊन जातं. अन्नापाण्यावरची वासना उडून जाते. मग पुन्हा रुटीनवर येतं. पुन्हा पीएम करण्यासाठी कॉल येतो. खंडाळा, शिरवळ, वेल्हे, वरंदळ आदी अनेक ठिकाणी स्पॉट पीएमसाठी बोलावलं जातं.

पीएम करण्यासाठी बहुतेक सरकारी दवाखान्यांसमोर कुणीतरी कफल्लक, व्यसनी किंवा असाच कुणीतरी माणूस असतो. बहुतेक ठिकाणी राजस्थानमधून आलेले काही जण असतात. पीएम करण्यापूर्वी ते हातभट्टी भरपूर रिचवतात. जणूकाही नशेतच डेड बॉडी फाडायला लागतात, जोडायला लागतात. दुर्गंधीचं त्यांना काहीच वाटत नाही. कारण त्यावर मात करणारी दारु त्यांनी रिचवलेली असते. पीएम करणारा म्हणून कोणी पूर्णवेळ नोकरीत नसतो. कारण हे कामही ग्रामीण भागात रोज नसतं. दवाखान्यातला कुणी तरी स्वीपर किंवा बाहेरचा कुणीतरी कठोर दिलवाला अशी कामं करत असतो. शीतलंचही तसंच झालंय. वडीलांच्या निधनानंतर तिला स्वीपरची नोकरी मिळाली. सात-आठ हजार रुपयांत दवाखाना स्वच्छ ठेवायचा, तिथलं स्वच्छतागृह साफ करायचं काम असतं. शिवाय वर्दी आली, की पीएम साठी जायचं. वर्दी कुठूनही आणि कधीही येऊ शकते. आपलं काम झटपट आणि चांगलं व्हावं म्हणून तिनं स्वत:च स्वत:च्या पैशातून घिसाड्याकडून एक धारदार हातोडा आणि छिन्नी विकत घेतलीय. सरकारी खात्यात हत्याराला धार कमी असते आणि कागद अगदी धारदार असतात. कधी टेंडर मंजूर झालं तर हत्यारावर धारीचं पाणी पडतं.

शीतल चव्हाण - baimanus

मुलांच्या जगातल्या विलक्षण अनुभवांनी शितलचं 28 वर्षांचं आयुष्य सरुन गेलंय. “कुणीतरी मातेनं आपलं दोन-तीन दिवसाचं अर्भक दिलं होत फेकून… त्याचं पीएम झालं. कुणी तरी एक बाईला जाळून फेकली होती. तिचं पीएम झालं. कुणी तरी कुणाचा खून करुन प्रेत पुरुन टाकलं होतं. किती तरी दिवसांनी जंगली जनावरांनी ते प्रेत उरकून काढलं. त्याचे तुकडे झाले. त्याचंही पीएम झालं. एकाला कुणीतरी गोळ्या घातल्या होत्या. डेड बॉडी कुजलेली… गोळ्या सापडत नव्हत्या… डेड बॉडीला आंघोळ घालून लोहचुंबकाच्या मदतीनं गोळ्या काढण्यात आल्या. मांढरदेवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी झाली आणि मृतांचा ढीगच लागला. रात्रंदिवस पीएम करुन डेड बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात दिल्या. चेलाडी फाट्याजवळ कुणातरी धिप्पाड माणसाचा खून झाला होता. कवटी काही केल्यानं फुटत नव्हती. कवटी फोडणं आणि सडलेलं, कुजलेलं, जळलेलं, तुटलेलं देह फाडणं खूप आव्हानात्मक असतं.” बोलता बोलता शीतलंन किती प्रेतांच्या आणि मरणाच्या कथा सांगितल्या हे तिलाही कळलं नसावं.

अनेकदा खूप मोठं काम येतं आणि ते एकटीच्या क्षमतेपलीकडं जातं. रोहन हा शीतला भाऊ मदतीसाठी जाऊ लागला. गुड्डीही जाऊ लागली. गुड्डीचं एक वैशिष्ट्य आहे, पीएमच्या वेळी कुणीतरी तिच्या आजूबाजूला उभं असावं लागतं. तशी ती घाबरट आहे. माणूस सुंदर आहे, पवित्र आहे पण त्याची आकडलेली बॉडी आणि पीएम करतेवेळी दिसणारी बॉडी पाहणं केवळ आणि केवळ कठीण असतं. शेरदिल माणूसच तसं करु शकतो. शीतल, तिचा भाऊ, तिची बहीण यांनी असं काळीज कमावलंय किंवा जगण्यासाठी ते त्यांना कमवावं लागलंय. पीएम झाल्यानंतर कुणीतरी नातेवाईक पैसे देतात, पण बरेचजण देतही नाहीत. ते दु:खात असतात. शीतलंन आत्तापर्यंत कुणाकडं स्वत:हून पैसे मागितलेले नाहीत. बऱ्याच वेळा बॉडी, शिवून त्यावर पांढरं कापड टाकून, ती पॅक करुन अंत्यसंस्कारायोग्य किंवा पाहण्यायोग्य करावी लागते. ते कामही शीतल करते. कपडे वगैरे वसतू स्वत:च विकत आणते. त्याचे पैसे कुणी देतात किंवा देतही नाहीत. प्रसंगच असा असतो, की दु:खापुढं बाकी कोणतीच गोष्ट टिकत नाही. स्पॉटवर पीएम करायचं असतं, तेंव्हा तर दिवसभर अन्न-पाणीही मिळत नाही.

गुड्डीने एक-दोन अल्बम दाखवले. एरवी आपण एखाद्या कुटुंबात जातो, तेंव्हा सभासमारंभाची, सौंदर्याची आणि कुणी कुणाच्या गळ्यात गळा घातलेली छायाचित्रं बघायला मिळतात, आणि इथं…? छिन्न-विछिन्न झालेलं देह, कवटी फुटून बाहेर आलेला मेंदू वगैरे वगैरे…! छायाचित्र बघताना चक्कर आल्याशिवाय राहत नाही. प्रत्यक्षात शीतल हे काम कसं करत असेल, याचा अंदाज यायला लागतो.

शीतल चव्हाण - baimanus

आपण किती पीएम केली याचा आकडा शीतलला सांगता येत नाही, पण आता कामात काहीतरी बदल यावा… साफसफाईचं काम मिळावं… शिपायाचं काम मिळावं… कुणीतरी आपला गांभीर्यानं विचार करुन आपल्यावर उपकार करावेत, असं तिला वाटातंय. लग्नाचा विचारही तिच्या मनात तरळून जातोय. प्रेतं फाडून तिचा एक केमिकल लोचा झालाय. दु:ख पचवण्याची दांडगी सवय लागल्यानं तिला रडताच येत नाही. काहीही घडलं तरी तिला रडू फुटत नाही. बाप मेला तरी हिचे डोळे ओले झाले नाहीत. रडायला येत नाही, याची खंतही तिला आहे. शिवाय सारं कुटुंब तिच्या खांद्यावर आहे. दोन बहिणी दहावी-बारावीत आहेत. त्या दोघीही कधी ना कधी प्रतांना जाऊन धडकल्या आहेत, पण त्यांना शिकून डॉक्टर-इंजिनीअर वगैरे व्हायचं आहे. घरात प्रत्येकाचं कोणतं ना कोणतं स्वप्न आहे. त्याला पंख देण्याची जबाबदारी शीतलची आहे. कदाचित या स्वप्नांमुळंच ती रडण्यापासून मुक्त झाली असेल. स्वप्नपूर्तीच्या साऱ्याच वाटा बंद झाल्या असल्यानंही ती प्रेत फाडून शिवत असेल.

पीएम करणारी देशातली ती बहुतेक पहिलीच महिला असावी आणि आता तिला या जगातून दुस-या जगात जायचं आहे. कसं जाणार? महाशक्तीमान असणा-या समाजानं आणि शासनानं मनावर घेतलं तर तिला कुठंही शिपाई म्हणून नेमता येतं. आहे त्या पदावरुन इतर ठिकाणी बदली करता येते. भावडांच्या शिक्षणाचा खर्च उचलता येतो. बीपीएलसाठीच्या योजनांमध्ये वीतभर घर तिला देता येतं. आयुष्यभर पीएम करत राहणं…. मृतांवर हत्यार चालवत राहणं हे काही सोप काम नाही. खूप त्याग केलेला असतो. खूप संवेदनाही मारलेल्या असतात. प्रसंगी स्वत:चं रुपांतरही मृतात केलेलं असतं. शीतलच्या मनात समाजसेवेच्या इच्छा खूप मोठ्या आहेत आणि हेही खरंच की, तिच्या कामाचं कौतुक करुन तिला बढती देण्याचीही गरज आहे. तिच्या खांद्यावर नुसतीच शाल टाकून तिचं जग काही बदलणार नाही. ज्यांना कुणाला तिचं कौतुक करायचं असेल, शाब्बासकी द्यायची असेल, तिच्या स्वप्नांना पंख द्यायचे असतील तर हा तिचा पत्ता : शीतल रामलाल चव्हाण, घर नंबर 569, नागोबा आळी, भोर ता. भोर ‍जि. पुणे मोबाईल नंबर : 7038875310. शीतलनं जगण्यासाठी मृतांचं जग जवळ केलंय हे खरं आहे पण जीवंत माणसांच्या जगात आत्मसन्मानानं जगण्याचा तिचा हक्क नाकारुन कसा चालेल?

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here