- राहुल निर्मला प्रभु
70-80 च्या दशकात मुंबईमध्ये असणारी गुन्हेगारी, गुन्हेगारी विश्वाचे धागेदोरे, वेगवेगळे गुंड, त्यांच्या टोळ्या आणि टोळीयुद्ध यावर आधारित ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘बंबई मेरी जान’ ही वेब सीरीज प्रदर्शित झाली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या ‘डी’ कंपनीचा कसा जन्म झाला आणि तो अखेर दुबईला कसा पळून गेला यावर ही मालिका भाष्य करते. दारा (दाऊद) दुबईला पळून जातो आणि त्याची छोटी बहीण हबीबा (हसिना पारकर) कशी दाऊदच्या सिंहासनावर बसून मुंबईच्या अंडरवर्ल्डची सुत्रे आपल्या हाती घेते यावर ‘बंबई मेरी जान’ या मालिकेचा शेवट करण्यात आला आहे. आजच्या या लेखात आपण याच हसिना पारकरबद्दल जाणून घेणार आहोत.
मुंबई अंडरवर्ल्डमध्ये एक अलिखित नियम होता. तो म्हणजे, दोन नंबरच्या या जीवघेण्या धंद्यात काहीही झालं तरी एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांना मध्ये आणायचं नाही. विरोधी गँगबरोबरच हा नियम पोलिसांनादेखील तितकाच लागू होता. मात्र, 90च्या दशकात पोलिसांना हाताशी धरत दाऊदने ‘बी.आर.ए.’ गँगचा म्होरक्या रमा नाईक आणि दोन नंबर मानला जाणारा बाबू रेशीम यांना संपवलं. आपले दोन महत्त्वाचे साथीदार गमावल्याच्या धक्क्यातून अरुण गवळी सावरत नाही, तोच दाऊदनं गवळीचा सख्खा भाऊ पापा गवळीची हत्या घडवून आणल्यानं गवळी पुरता बिथरला. दाऊदचा काटा काढावा, या हेतूनं गवळीनं थेट दाऊदच्या घरावरच नजर टाकली. सुडाने पेटलेल्या गवळीनं वर्षानुवर्षं चालत आलेला अंडरवर्ल्डचा अलिखित नियम मोडला अन् दाऊदच्या मेव्हण्याची हत्या घडवून आणली. अरुण गवळीच्या या एका चुकीनं एका मुस्लिम घरातल्या हसिना पारकर उर्फ हसिनाआपाला अंडरवर्ल्डची सगळ्यात मोठी ‘माफिया’ बनवलं. नवऱ्याच्या हत्येनंतर बिथरलेली हसिना बघता बघता मुंबईवर अधिराज्य गाजवणाऱ्या अंडरवर्ल्डची ‘लेडी डॉन’ बनली…
बघता बघता हसिना अंडरवर्ल्डची ‘लेडी डॉन’ बनली…

आतापर्यंत केवळ आणि केवळ पुरुषांचीच मक्तेदारी असलेल्या अंडरवर्ल्डमध्ये एका महिलेची ‘गँगस्टर’ म्हणून पहिल्यांदाच सरकारी दप्तरात नोंद झाली, ते वर्ष होतं 2007-08. सुरुवातीला दाऊदची सख्खी बहीण अशी ओळख असलेल्या आणि त्यानंतर अल्पावधीतच अंडरवर्ल्डवर वर्चस्व स्थापित करणाऱ्या हसिना पारकर उर्फ हसिनाआपाच्या विरोधात पुरावे होते, साक्षीदारही होते. तरीही पोलिस हेडक्वार्टरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इमारतीत कब्जा करून राहणाऱ्या हसिना पारकरवर साधा एफ.आय.आर. नोंदवायला मुंबई पोलिसांना 20 वर्षे लागली. हसिनाआपाचं नेटवर्क इतक्या ताकदीचं होतं की, अनेकदा जाहीर कार्यक्रमात हजेरी लावणारी आपा पोलिस दप्तरी मात्र कित्येक महिने फरारच होती. अखेर एक दिवस हसिना पारकरला अटक झाली, तशी लगेच ती जामीन मिळवून बाहेरही आली. ही तिच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची अटक होती. दाऊदच्या मुंबईतल्या सगळ्या धंद्यांवर या हसिनाआपाचं एकहाती नियंत्रण होतं. हजारो कोटी रुपयांचे प्रॉपर्टीचे व्यवहार ती करत होती.
तोंडात कायम पानाचा तोबरा आणि दिमतीला विश्वासू माणसं..
खरं तर हसिना पारकरचं अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय होणं स्वतः दाऊद इब्राहिमलाही कधीच मान्य नव्हतं. किंबहुना, काळ्या धंद्यात त्याच्या चार बहिणींपैकी कोणालाही जागा नव्हती. त्यात हसिना ही दाऊदची अतिशय लाडकी बहीण होती. म्हणूनच दाऊदनं काळ्या धंद्याशी कसलाही संबंध नसलेल्या आणि चित्रपटात ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या इस्माईल पारकरशी मोठ्या धूमधडाक्यात हसिनाचं लग्न लावून दिलं होतं. त्या वेळी हसिना ही केवळ 17 वर्षांची होती. हसिनासोबत झालेल्या लग्नानंतर इस्माईल पारकर हा केवळ दाऊदचाच नाही, तर सगळ्या ‘डी’ कंपनीचा लाडका जावई झाला होता. हसिनाच्या संसारात सगळं काही सुरळीत सुरू असताना सुडानं पेटलेल्या गवळीने दाऊदला मोठा धक्का देण्यासाठी इस्माईल पारकरची त्याच्याच हॉटेलमध्ये घुसून हत्या केली. या हत्येनंतर हसिनाचं जगच बदललं. लाडक्या बहिणीच्या नवऱ्याच्या हत्येनंतर ‘डी’ कंपनीत चांगलीच खळबळ माजली.
परंतु, इस्माईल पारकरच्या हत्येचा संशयित शैलेश हळदणकर याला जे. जे. हॉस्पिटलमध्ये घुसून गोळ्या घातल्या गेल्या, तेव्हाच दाऊदच्या उरात भडकलेली सुडाची आग निवली. हळदणकरला संपवण्यासाठी सुनील सावंत उर्फ सावत्यानं उत्तर प्रदेशचा कुख्यात गँगस्टर ब्रजेश सिंह आणि त्याचे दोन खास शार्पशूटर बच्चा पांडे व सुभाष सिंह ठाकूरला सुपारी दिली. अंडरवर्ल्डच्या इतिहासात पहिल्यांदाच एके 47 सारखं हत्यारही या घटनेत वापरलं गेलं. कोणाला संशय येऊ नये म्हणून या हल्ल्यात भिवंडीचे त्या वेळचे नगराध्यक्ष जयंत सूर्यराव यांची गाडी वापरण्यात आली. दाऊद गँगने या हल्ल्यात तीन पोलिसांचाही बळी घेतला होता. गवळीनंतर आता ‘डी’ गँगनेही अंडरवर्ल्डचा नियम मोडला होता. या हत्याकांडानंतरच मुंबई पोलिस आणि अंडवरर्ल्डमधील रक्तरंजित संघर्षाला सुरुवात झाली… इकडे हळदणकरच्या हत्येनंतर तरी हसिना शांत होईल, असा सगळ्यांचा अंदाज होता, मात्र घडलं नेमकं उलटंच. सुरुवातीपासूनच अतिशय महत्त्वाकांक्षी असणारी आणि आपल्या जे हवं ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी ठेवणारी, हसिना स्वभावानं अतिशय तापट होती. कोणावरही दहशत बसावी अशी करारी नजर, तोंडात कायम पानाचा तोबरा आणि दिमतीला अनेक विश्वासू माणसं, असा तिचा थाट होता.

नवऱ्याच्या हत्येचा बदला घेतल्यानंतर हसिना नागपाड्यातल्या ‘गार्डन हॉल अपार्टमेंट’मध्ये राहू लागली. याच काळात तिची नजर मुंबईतल्या वाढत्या रिअल इस्टेटच्या धंद्यावर पडली. धंद्यातली आपली दहशत वाढवण्यासाठी हसिनानं इमारतींवर कब्जा करायचा सपाटाच सुरू केला. हसिनाच्या एका इशाऱ्यावर तिला वाटेल तिथली इमारत काही तासांतच रिकामी केली जाऊ लागली. दाऊदच्या अनेक बेनामी प्रॉपर्टीजवर लक्ष ठेवायचं कामही हसिनानं शिरावर घेतलं. अवैध धंद्याला सुरक्षा पुरवण्याच्या नावावर ती खंडणी वसूल करू लागली. हसिनाचे दिवसेंदिवस वाढणारे उद्योग आता दाऊदलाही खटकायला लागले. मात्र, हसिना आता कोणाच्याही नियंत्रणात राहिलेली नव्हती. हसिना ही मुंबईतली एकमेव लेडी गँगस्टर होती की, तिच्या एरियामध्ये एखादी नवी वीट जरी रचायची असेल तरी तिच्या परवानगीशिवाय ते शक्य नव्हतं. त्या वेळी एस.आर.ए. ची किंवा कसल्याही इमारतीची परवानगी घेण्यासाठी अनेक बडे बिल्डर हसिनाआपाकडे तिष्ठत असायचे. दाऊदप्रमाणेच हसिना आपाचाही दरबार भरायचा, ज्यात अनेक प्रकरणं निकाली काढली जायची. पण केवळ एस.आर.ए. प्रकल्पच नव्हे, तर हवाला रॅकेट, बिल्डरांकडून सुरक्षेच्या नावाखाली खंडणी वसुली, केबल धंद्यावर नियंत्रण आणि त्याचे आपसातील वाद मिटवण्यापासून ते बॉलीवूडमध्ये पैसा गुंतवण्यापर्यंतचे सगळे धंदे हसिनाआपा बिनधास्तपणे करू लागली होती.
हसिनाआपाला दिवानी आणि पगली म्हणायचे…
निवृत्त पोलिस अधिकारी सुहास गोखले हसिनाआपा बद्दल सांगतात की, “हसिना ही दाऊदची बहिण शोभत होती. ती दाऊदप्रमाणेच क्रुर, कारस्थानी आणि महत्वाकांक्षी होती. नागपाड्यातील आपल्या घरातून मुंबईत होणाऱ्या हालचालींवर ती एकाच जागी बसुन लक्ष टेवाची, पण जेव्हा बाहेर पडायची तेव्हा दहशत माजवायची. तिच्या मागे तिला कुणी ‘ दिवानी ‘ म्हणो वा ‘ पगली ‘ म्हणो पण तिच्या विरोधात एखादा साक्षीदार किंवा पुरावा गोळा करताना पोलिसांच्या अक्षरश: नाकीनऊ यायचे. त्यावेळी कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या रिअल इस्टेटच्या धंद्यात हसिनाची अशी काही दहशत होती की बांद्र्यापासून, कुर्ला, सांताक्रुज ते दक्षिण मुंबईतील खासगी तर सोडाच पण सरकारी इमारतही तिच्या मर्जीशिवाय उभी राहु शकत नव्हती. “
हसिनाआपाचा ‘दिवानी राऊंड’ किंवा ‘पगली राऊंड’ हा तेव्हा मुंबईत चवीनं चघळला जाणारा विषय होता. दाऊदच्या प्रॉपर्टीजवर नजर ठेवण्यासाठी हसिना एका उघड्या जिप्सीमध्ये समोर बसून हत्यारबंद हस्तकांसोबत या सगळ्या प्रॉपर्टीजला भेट द्यायची. एखाद्या चित्रपटात शोभेल असाच तो गाड्यांचा मोठा ताफा भल्याभल्यांच्या मनात धडकी भरवायचा. हा ताफा जेव्हा पोलिस चौक्यांसमोरून दहशत माजवत जायचा, तेव्हा हसिना तिथे ड्युटीवर हजर पोलीस अधिकाऱ्यांकडे प्रचंड खुन्नसनं पाहायची. 93च्या दंगलीनंतर तर हसिना पोलिस अधिकाऱ्यांबरोबरच, अनेक बड्या अधिकाऱ्यांशी ‘अरे-तुरे’ची भाषा बोलायची. एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलेल्या किश्श्यानुसार सप्टेंबर-1993 मध्ये, एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पोलीस दलात मोठ्या पदावर असणारा एक अधिकारी नागपाड्यात आला होता.

स्थानिक पोलीस स्टेशनला गेल्यावर दाऊदची बहीण हसिना याच भागात राहत असल्याचं त्यांना कळलं. तेव्हा त्याने हसिनाच्या घरी जायचं ठरवलं, तसंच आपण कोण आहोत, याची माहितीही तिच्यापर्यंत पोचवण्याची आधी व्यवस्था केली. काही वेळातच पोलिसांचा ताफा हसिनाच्या घरी पोचला. जेव्हा, हा अधिकारी तिच्या घरात गेला, तेव्हा हसिना सोफ्यावर एका तक्क्याला टेकून आरामात लोळत पडली होती. अधिकारी घरात दाखल झाला, तसं नेहमीच्या माजात तिनं थेट ‘क्या रे, काय को आया तू इधर, मेरे से क्या काम है तेरा? देख हम शांतीसे बैठे है, तो तुम बैठने दो, हमे शांती से अगर ज्यादा अकड दिखाई तो, ये मेहंगा पडेगा तेरेकू…’ समज देण्यासाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्याला बसायलाही वेळ न देता हसिनानं दिलेली समज पाहून पोलिस अधिकारी पुरता हडबडला. विशेष म्हणजे, एवढ्या फौजफाट्यासह पोलिस घरात घुसूनही हसीना आपल्या शाही दिवाणावरून साधी उठूनही बसली नाही. एकीकडे पोलिसांशी तुसडेपणाने वागणारी आपा मोहल्ल्यात राहणाऱ्या लोकांना खूप जवळची वाटायची.
पाच हजार कोटींच्या संपत्तीची मालकीण
नागपाड्यातल्या प्रत्येक घरात आणि रस्त्यावरच्या टपरीवरही आपाच्या चांगुलपणाचे अनेक किस्से अजूनही रंगवून सांगितले जातात. नागपाड्यातल्या सासू- सुना, भावा-भावांच्या भांडणापासून, प्रेमप्रकरणांपासून ते व्यापाऱ्यांचा वाद अशी सगळी प्रकरण हसिनाच्या दरबारात निकालासाठी निघायची. हसिनाच्या नुसत्या नजरेच्या इशाऱ्यावर दिलेला निकाल हा दरबारात आलेल्या प्रत्येकाला मान्य असायचा. एका आकडेवाडीनुसार 2014 मध्ये हसिनाची एकूण संपत्ती पाच हजार कोटींच्या घरात होती. या सगळ्या धंद्यात उजवा हात मानला जाणारा सलीम पटेल (जो पूर्वी हसिनाचा नवरा इस्माइल पारकरचा ड्रायव्हर होता) तर डावा हात समजला जाणारा हसिनाचा मोठा मुलगा दानिश या दोघांची तिला साथ होती. पुढे दानिशचा एका अपघातात मृत्यू झाला, पण मनाने निष्ठूर बनलेल्या हसिनाला दानिशच्या जाण्याने विशेष फरक पडला नाही. रिअल इस्टेटच्या अनेक प्रकरणात हसिनाच्या केवळ इशाऱ्यावर दानिश आणि सलीम पटेल यांनी अनेकांचा काटा काढल्याच्या घटना त्या काळात घडल्या. वस्तुत: त्यावेळचे क्राईम रिपोर्टर जे डे यांनी हसीनाच्या काळ्या धंद्याबद्दल उघडपणे लिहायला, बोलायला सुरूवात केली होती. मात्र, काही दिवसातच जे डे यांची पवईत दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जे डे यांच्या हत्येसंदर्भातअनेक थिअरी मांडल्या गेल्या. परंतु जाणकारांच्या म्हणण्यानुसार जे डे यांना हसिनाच्या विरोधात अनेक सब्बळ पुरावे मिळाले होते, आणि यावर ते एक मोठा रिपोर्ट लवकरच प्रकाशित करणार होते. जे डे यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त झाला होता. हसिनाच्या विरोधात तपास करणाऱ्या अनेक बड्या अधिकाऱ्यांना हायकोर्टानं धारेवर धरत स्पष्टीकरण मागितले.

मुंबई अंडरवर्ल्डवर सलग 24 वर्ष राज्य केले
अर्थात, एवढी दहशत माजवूनही हसिना कधीही कायद्याच्या कचाट्यात सापडली नाही. मुंबई पोलिसांबरोबरच जगभरातील सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आपल्यावर आहे, हे हसिनाला चांगलंच माहीत होतं. त्यामुळे ती दाऊदशी कधी थेट संपर्क करत नव्हती. मात्र दाऊद आणि हसिना पारकरमध्ये असणाऱ्या डी कंपनीच्या माणसांचं नेटवर्क कायम दोघांना संपर्कात ठेवत असे. 2007 मध्ये तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आला, पण अंडरवल्डच्या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पासपोर्ट जप्त होण्याआधीच हसिना दाऊदला भेटण्यासाठी अनेकदा परदेशात जाऊन आली होती. दहशतीच्या जोरावर व्यवस्थेला बोटांवर नाचवणाऱ्या हसिनाआपाला आयुष्याच्या शेवटी मायग्रेनसारख्या आजरानं ग्रासलं. यामुळे अंथरूणाला खिळलेल्या हसिनाचं धंद्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं. मांडवलीसाठी होणारे दरबार, लोकांची वर्दळ, भेटीगाठी कमी व्हायला लागल्या. या सगळ्यामुळे मनातूनही खचू लागली. ही संधी साधून मुंबई पोलिसांनी तिच्याभोवती आपलं जाळं टाकायला सुरूवात केली होती. याच काळात आपल्या लाडक्या बहिणीच्या प्रेमापोटी दाऊदनं, त्याच्या जवळच्या हस्तकांना हसिना पारकरच्या संरक्षणासाठी तिच्या आजूबाजूलाच राहण्याचे आदेश दिले. 2014 मध्ये 7 जुलै हा दिवस हसिनाआपाचा शेवटचा रमजानचा रोजा ठरला आणि कित्येक महिने अंथरूणाला खिळूनच असणाऱ्या हसिनाचा हार्टअटॅकने मृत्यु झाला. मुंबई अंडरवर्ल्डवर सलग 24 वर्ष राज्य करणारी हसिना पारकर उर्फ आपा कायमची काळाच्या पडद्याआड गेली…