- समीर गायकवाड
लावणीसम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांच्या बाबतीत एक किस्सा आहे… मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत तेंव्हा घाबरलेल्या बालिकावधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन त्या घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत. एकदा पंढरपूरच्या मंदिरात लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना ‘दहावी अदा कोणती?’ असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले व ‘ही दहावी अदा’ असे करून दाखवले …
आजच्या काळात लावणी कलावंतांवर चित्रपटांचा मोठा प्रभाव असल्याने चित्रपटातील गीते आणि लावण्या लोकप्रिय होत आहेत परंतु पारंपरिक लावणी दिवसें-दिवस काळाच्या पडद्याआड जात आहे असे चित्र पाहावयास मिळते. काही दशकांपूर्वी यमुनाबाई वाईकर, सत्यभामाबाई पंढरपूरकर, ज्ञानोबा उत्पात आदी मान्यवरांनी पारंपरिक लावणीचा वारसा जपून ठेवला होता. पंढरपूरी बाजाचे गायन, अदाकारीची लावणी ज्ञानोबा उत्पात आणि सत्यभाबाईंनी लोकप्रिय केली होती. ‘अबोल का होता धरिता सखया मजवरी, ‘झाले तुम्हावरी दंग सखया, ‘तुम्ही माझे सावकार’, ‘बांगडी पिचल बाई’, ‘शहर बडोरे सांडून आले’, ‘वर्स झाली बारा पाहुनिया चंद्रवदन’ अशा अनेक पारंपरिक लावण्यांचा खजिना सत्यभामाबाईंकडे होता.

लावणीचे मुख्यत: तीन प्रकार आहेत. नृत्यप्रधान लावणी, गानप्रधान लावणी आणि अदाकारीप्रधान लावणी. प्रारंभकाळात लावणी गेय स्वरूपात ज्ञात होती. नृत्यप्रधान लावणी हे अगदी अलीकडच्या काळातील रूप होय. जुन्नरी, हौद्याची, बालेघाटी, छकुड, पंढरपुरीबाजाची अशी लावणीची विविध रूपे होत. जुन्नरी आणि हौद्याची लावणी प्रामुख्याने ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते. बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीतील लावणी होय. पंढरपूरी बाजाच्या म्हणजे बैठकीच्या लावणीला सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ‘छकुड’ म्हणजे द्रुतलयीतील, उडत्या चालीची लावणी असे लावणीचे नानाविध प्रकार आहेत.
काही लावण्या या विशिष्ठ सादरीकरणामुळे तिच्याशी संबंधित कलावंताशी जोडल्या गेल्यात. जसे की ‘तुम्ही माझे सावकार’ ही विलंबित लयीतील लावणी यमुनाबाई वाईकरांच्या दिलखुलास अदाकारीने त्यांच्याच नावावर झाली आहे. ‘पंचकल्याणी घोडा अबलख’ ही नृत्यप्रधान लावणी अथवा ‘पंच बाई मुसाफिर अलबेला’ ही नृत्यप्रधान लावणी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, मधु कांबीकर, राजश्री नगरकर, छाया खुटेगावकर यांनी खूपच लोकप्रिय केली होती. ‘पाहुनिया चंद्रवदन मला साहेना मदन’ ही अदाकारीची लावणी गुलाबबाई संगमनेरकर यांनी लोकप्रिय केली आहे. जनमानसावर अनेक दशकापासून आपल्या आवाजाचे गारुड घालणारया सुलोचना चव्हाण यांच्या गायकीला आजही तोड नाही अन त्यांनी गायलेल्या लावण्या आजही अमृताहून गोड आहेत. आजही तमाशात आधी गण सादर होतो मग येते ती गौळण. त्यानंतर असतात सवालजवाब. काही तमाशात रंगबाजीदेखील असते. शेवटी येते ते वगनाट्य. यातल्या वगात लावण्या असतात ज्या त्यातल्या कथेनुरुप असतात. या सर्व लावणीच्या इतिहासात आजही ठळकपणे समोर येणारया नावात सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे.

सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. त्यांची नेमकी जन्मतारीख इतिहासाला ज्ञात नाही. त्यांनी लावणीसाठी वा गायकीसाठी लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. वयाच्या 10व्या वर्षीच त्यांच्यातल्या संगीत कलेची जाणीव झाली. त्यांनी बालवयातच एकट्याचे लावणी सादरीकरण केले. त्यानंतरच्या काळात गोदावरीबाई पुणेकर यांच्या नेतृत्वाखालील लावणी गटात त्या सामील झाल्या. म्हणजे गोदावरीबाई या एका अर्थाने त्यांच्या प्रथम शिक्षिका व सहकारी ठराव्यात. तेथे त्या नृत्य, गवळणी, गझल या गोष्टीशी वकुबाने परिचित झाल्या. गझल काय असते ती कशी म्हणावी आदी बारकावे त्यांना इथे कळाले. लावणीच्या गायनात त्यांचे गुरु म्हणून नारायणराव उत्पात, ज्ञानोबा उत्पात, दादोबा वैरागकर, मच्छिंद्र उत्पात, विठोबा ऐतवाडकर आणि रामभाऊ उत्पात यांचा उल्लेख होतो.
गोदावरीबाई पुणेकर यांच्या गटात चार वर्षे काम केल्यावर त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि त्या घरी परत गेल्या. घरी परतलेल्या सत्यभामाचा नवीन प्रतिभाशाली आणि नवे रूप बघून त्यांच्या कुटुंबियांची मने बदलली. त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न झाले. त्यांच्यावरती कामाची सक्ती होऊ लागली. त्यामुळे सत्यभामाबाई पुन्हा पुणेकर मंडळींमध्ये परतल्या. परतल्यानंतर पेशवे काळात अनेक शाहिरी लावण्या त्या शिकल्या. हा काळ अठराव्या शतकाच्या उत्तररार्धाचा होता. त्यानंतर त्यांनी जे संगीत आणि अदाकारीचे सादरीकरण सुरु केले ते पुन्हा मागे वळून पहिलेच नाही. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी लग्न केले आणि स्वतःची संगीत बारी काढली.
सुरुवातीच्या काळात स्वतःच्या घराच्या दिवाणखान्यातच त्या लावणी सादर करू लागल्या. त्यातही बैठकीच्या लावण्या जास्त असत. पण पुढे या बैठकीच्या लावण्यांचा त्यांच्यावर शिक्का बसला. अनेक सामाजिक बंधने, स्त्रीत्वाच्या मर्यादा आणि तत्कालीन नैतिकतेचे संदर्भ पाहता सत्यभामाबाईंनी ज्या नेटाने आणि जोमाने आपली लावणीची सेवा अबाधित अखंड ठेवली त्याला तोड नाही. त्यांचे आयुष्य एका जिद्दी स्त्रीच्या कलासक्तीचे तेजस्वी प्रतिक आहे.

जवळपास पाच दशके सत्याभामाबाईंनी रंगमंचाची आणि लावणीची सेवा केली. ती देखील अविरतपणे, जोमाने आणि स्वतःच्या शैलीने! यशवंतराव प्रतिष्ठान, पुणे येथे 2 मे 1992 रोजी त्यांनी शेवटचे सादरीकरण केले यावरून त्यांच्यातल्या लावणीप्रेमाची आस कळून येते. त्यावेळी त्यांचे वय 75 च्या पुढे असावे! लावणी हाच त्यांचा श्वास होता. आपल्या कलेला त्यांनी कधीही बाजारी स्वरूप येऊ दिले नाही ही बाब येथे अधोरेखित शेवटच्या कामगिरी असतो. लावणीला त्यांनी आयुष्य समर्पित केल्याने त्याना महाराष्ट्र सरकार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह असंख्य पुरस्कार मिळाले, शेवटच्या काळात त्या तरुण मुलीना पारंपारिक लावणी प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात निष्णात प्रशिक्षकाच्या भूमिकेत होत्या. आपल्या कलेसाठी जगलेल्या या खरया लावण्यवतीचे 9 सप्टेबर 1994 रोजी निधन झाले.
आपल्या समाजात आणि राजकारणात स्त्रियांना समान संधी देण्याचे निर्णय झालेले असले तरी प्रत्यक्षात स्त्रियांच्या हाती सत्ताकारणाच्या चाव्या फार मोठय़ा प्रमाणात आलेल्या नाहीत. स्त्रियांना आजही मंदिर प्रवेश नाकारला जातो किंवा त्यांनी दारूबंदीसाठी आवाज उठवला तर त्यांना गावगुंडांच्या आणि पोलिसांच्या रोषाला बळी पडावे लागते. त्यामुळे स्त्रीशक्तीचा जागर आजही आवश्यक आहे. हा जागर लोककलांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे होऊ शकतो, मग प्रश्न स्त्रीभ्रूण हत्येचा असो, ग्रामस्वच्छतेचा असो, एड्सविरोधी जनजागृतीचा असो अथवा आदिवासी मातांच्या व बालकांच्या कुपोषणाचा असो, लोककलांसारखे समर्थन माध्यम वरील विविध प्रश्नांवर जनजागरण घडवू शकते, लोकसाहित्य व लोककलांचा संबंध सृजनशक्तीशी असतो. अंगाईगीतांपासून, जात्यावरच्या ओव्यांपासून लावणीपर्यंत लोकसाहित्याचे विविध लोकगीत प्रकार हे स्त्रियांच्या मुखी असतात. त्यामुळे लावणी ही केवळ शृंगारापुरती न राहता प्रबोधनासाठीही वापरता येते. या लोकसाहित्यातील लावणी, तमाशा हे घटक स्त्रियांना वर्ज्य असताना या कलांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, यमुनाबाई वाईकर, सत्यभामाबाई पंढरपूरकर, रोशन सातारकर यांनी केले. त्यातही लावणीच्या सर्वांगीण संवर्धनासाठी सत्यभामाबाईंनी आपले आयुष्य वेचले त्यामुळे त्यांचे कर्तृत्व निश्चितच मोठे आहे.
आजही अनेकांच्या प्रेरणास्थान असलेल्या सत्यभामाबाई ह्या लावणीच्या मंदिरातील दिपमाळ होत्या असे म्हणणे वावगे ठरणार नाही. असे अनेक ज्येष्ठश्रेष्ठ प्रतिभावंत कालानुरूप विस्मृतीच्या पडद्याआड जातात, पण येणारया प्रत्येक नव्या पिढीला वैभवशाली कलेने आणि संघर्षमय जीवनाने एक काळ गाजवलेल्या या अस्सल बावनकशी कलावंताची ओळख करून देणे हे आपले दायित्व आहे. त्यासाठी हा लेखन प्रपंच…