- टीम बाईमाणूस
शाहरुखचा जवान सध्या सगळीकडे गाजतोय. जवानने आजवर बॉक्स ऑफीसवर तुफान कामगिरी केलीय. जवानने जगभरातुन 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. तर भारतात जवानने 400 कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेतली. शाहरुखच्या जवानमध्ये प्रत्येक कलाकाराची भुमिका लक्षात राहीली. जवानमध्ये आत्महत्या केलेल्या एका अभिनेत्याची भुमिका सुद्धा लक्षात राहते. शेतकऱ्याची भूमिका करणारा हा अभिनेता जेव्हा प्रेक्षकांना पडद्यावर दिसला तेव्हा आपोआप सगळ्यांच्या तोंडून एकच नाव निघाले… अरे हा तर आपला नत्था… पिपली लाईव्हवाला…

हा अभिनेता कोण? त्याचा बॉलिवूडमध्ये प्रवेश कसा झाला? तर या अभिनेत्याचे नाव आहे ओंकारदास माणिकपुरी… अभिनेता किरण माने यांची या ओंकारदासवरची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. आपल्या पोस्टमध्ये किरण माने लिहितात की, ‘जवान’ मध्ये एका दलित शेतकर्याला छितपुट कर्जाच्या वसुलीसाठी त्याच्या बायको, मुलीसमोर आणि गांवासमोर नग्न करून मारहाण केली जाते. ट्रॅक्टर ओढून नेला जातो. तरीही तो रडणार्या बायकोवर खेकसतो, “तोंड बंद ठेव. पोरीची परीक्षा आहे ना?”… रडणार्या मुलीला शांत करत, “काही विशेष नाही गं त्यात. माझीच चूक होती. तू जा. पेपर दे नीट.” असं म्हणत काॅलेजला पाठवतो… आणि स्वत:ला गळफास लावून घेतो.
यानंतर पिच्चरमध्ये शाहरूख आपल्याला भानावर आणतो. देशातल्या शेतकर्यांचं वास्तव सांगतो. नंतर पिच्चरभर तो अनेक रूपांत जलवा दाखवतो. विजय सेतूपती आग ओकतो. नयनतारा लख्खपणे चमकते. दिपीका पदुकोन सुखावून जाते. अनेक अनेक कलाकार येऊन जातात. तरीही एवढ्या मोठ्या तगड्या, चकचकीत स्टारकास्टमध्ये या सिनमधला हा साधासुधा शेतकरी, त्याचा केविलवाणा तरीही स्वाभिमानी चेहरा प्रेक्षकांच्या मनामेंदूवर कोरला जातो… नीट लक्षात रहातो. एवढा प्रभावी अभिनय या अभिनेत्यानं केलाय.
नाटक मंडलीत नाच्याचे काम करायचा
ओंकारदास माणिकपुरी असं या अभिनेत्याचं नांव. छत्तीसगढमधल्या एका छोट्या खेड्यातल्या गरीब शेतकर्याचा पोरगा. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यानं गांवाकडच्या ‘नाटक मंडली’त काम करायला सुरूवात केली. ‘नाच्या’ म्हणून. उघड्या मैदानात होणार्या नाटकाला प्रेक्षक जमवण्यासाठी गाणी म्हणायची, जोक सांगायचे, मिमिक्री करायची, हे त्याचं काम. एक दिवस तो प्रख्यात नाट्य दिग्दर्शक हबीब तन्वीर यांच्या नजरेस पडला. तिथून पुढं त्यानं मागं वळून नाय पाहिलं भावांनो. उत्तरेकडच्या अभिजात नाटकांमध्ये त्याचं नांव आज लै मानानं घेतलं जातं. यापूर्वी तो आमीर खानच्या ‘पीपली लाईव्ह’ सिनेमातबी आपल्याला दिसला होता.

आपल्याकडे गांवखेड्यांत तमाशातली वगनाट्यं, लोकनाट्यं, कलापथकं यात काम करणारे असे लै लै लै भन्नाट अभिनेते आहेत. ज्यांना योग्य दिग्दर्शकानं मार्गदर्शन केलं, एक संधी मिळाली तर ते त्याचं सोनं करतील. इरफान खान, नवाज, संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी या उत्तरेकडच्या गांवातल्या पोरांनी जत्रेतल्या नाटकांपास्नं सुरूवात करून हे सिद्ध केलंय.
ग्रामीण मातीतनं वर आलेल्या ओंकारदासला यापुढेही अशा अनेक संधी मिळोत. थिएटरचा पाया असलेले, अभिनयाला अतिशय गांभीर्यानं घेणारे असे पॅशनेट नट भारतीय सिनेमा समृद्ध करणार आहेत… गांवखेड्यातल्या प्रतिभावानांना प्रेरणा देणार आहेत. सलाम ओंकारदास… कडकडीत सलाम !
पीपली लाईव्हमध्ये नत्थाची भूमिका कशी मिळाली याचीही एक विलक्षण कहाणी आहे. 1999 च्या आसपास कुष्ठरोगींच्या विषयावर ओंकारदास एका नाटकाच्या ग्रुपमध्ये सहभागी होता. हे अभियान बीबीसी लंडनतर्फे सुरू होते. या पथनाट्याचे जवळपास दोनशे प्रयोग झाले होते. एका नाटकासाठी ज्येष्ठ अभिनेता हबीब तन्वीर प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. त्यांना ओंकारदासची भूमिका आवडली आणि हबीब तन्वीर यांनी त्याला त्यांच्या पथकात सामावून घेतले. तिथून मग अमीर खानच्या पीपली लाईव्हसाठी त्याला ऑडिशनमध्ये संधी मिळाली आणि पुढे नत्थाची भूमिका देखील…