कांवड यात्रा : मुस्लिम मालक असलेल्या ‘ओन्ली व्हेज’ हॉटेललाही योगी सरकारने लावले टाळे

यूपीमध्ये कावड यात्रा सुरू झाली आहे. त्यापूर्वी योगी सरकारने यात्रेच्या मार्गावर असलेली मांसाहारी दुकाने बंद राहतील, असे आदेश दिले होते. मात्र यावेळी युपीच्या अनेक जिल्ह्यात मुस्लिमांची शाकाहारी हॉटेल्सही बंद करण्यात आली आहेत.

  • टीम बाईमाणूस

गेल्या वर्षी तालिब हुसेन 12 दिवस लॉकअपमध्ये होता. उत्तर प्रदेशातील संभल येथील रेस्टॉरंट मालक असलेल्या तालिब हुसेनला हिंदू देवतांच्या चित्रांसह वर्तमानपत्रात गुंडाळलेले चिकन विकल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. या वर्षी पुन्हा एकदा हिंदूंच्या पवित्र श्रावण महिन्यात हुसेनला त्याच्या हॉटेलचे शटर खाली करण्यास भाग पाडले गेले आहे. संभलमधील आक्रमक यूपी पोलिसांनी हुसेन आणि मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या इतर सुमारे 40 रेस्टॉरंटना दोन पावसाळ्यात शहरातून कांवड यात्रेकरू जात असताना दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र याबाबत कोणताही लेखी आदेश नाही की सूचना कोठून आल्या याची माहितीही पोलिसांना नाही.

“कावड यात्रेला सुरुवात होण्याच्या काही दिवस अगोदरपासूनच मी माझ्या हॉटेलमध्ये फक्त शाकाहारी अन्न विकायला सुरुवात केली होती,” हुसैन म्हणाला. ज्या मार्गावर माझं हॉटेल आहे त्याच मार्गावरून शिवभक्त कावड घेऊन जातात. त्यामुळे मुन्सिफ रोडवरील माझ्या मेहक रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी पदार्थांचे फोटो असलेले नवीन फ्लेक्स बॅनर लावले, पण पोलिसांनी मला अद्याप रेस्टॉरंट चालवण्याची परवानगी दिली नाही.”

कांवड यात्रा - baimanus

यूपीमध्ये 4 जुलैपासून कावड यात्रा सुरू झाली आहे. त्यापूर्वी योगी सरकारने यात्रेच्या मार्गावर असलेली मांसाहारी दुकाने बंद राहतील, असे आदेश दिले होते. यात्रेचा मार्ग म्हणजे गंगेचे पाणी घेऊन हरिद्वारहून कावडी ज्या मार्गाने जातात, तो मार्ग. योगी सरकार सत्तेत आल्यानंतर कावड यात्रेदरम्यान प्रत्येक वेळी मांस विक्रीची दुकाने आणि मांसाहारी हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश येतात. मात्र यावेळी युपीच्या अनेक जिल्ह्यात मुस्लिमांची शाकाहारी हॉटेल्सही बंद करण्यात आली आहेत.

अफसर अली म्हणतात, ‘हॉटेल बंद झाल्याने आम्हाला कोणतीही अडचण नाही, पण रोजंदारीवर काम करणारे कामगार मात्र चिंतेत आहेत. या हॉटेलमधील संपूर्ण कर्मचारी हिंदू आहेत. आमच्याकडे 50 कामगार आहेत. ते सर्व हिंदू आहेत. हवे तर CCTV तपासा, आम्ही जेवणात कांदा-लसूणही टाकत नाही, कुणाचा धर्म कसा भ्रष्ट करणार. आमचा ढाबा बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एक-दोन दिवसांत हॉटेल्स सुरू होतील, असे प्रशासन सांगत आहे, पण कधीपर्यंत हे माहिती नाही. मी कोणाची फसवणूक करत नाही. जे अन्न तयार करतात ते हिंदू आहेत, जे त्यांना खाऊ घालतात तेही हिंदू आहेत. मी फक्त मालक आहे. बिल देताना लोक कधी कधी नाव विचारतात, पण त्यांना काही त्रास होत नाही.

कांवड यात्रा - baimanus

दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत- वास्तविक अख्ख्या उत्तर भारतातच, हजारो तरुण साधारण जुलै महिन्यात ‘कांवड यात्रे’मध्ये सहभागी होतात. ही यात्रा श्रावण पौर्णिमेच्या आधी पूर्ण करायची असते. साहजिकच कांवड यात्रेकरूंची- म्हणजे खांद्यावरल्या कावडीत गंगाजल घेऊन हरिद्वार किंवा अन्य पवित्र ठिकाणी जाणाऱ्या ‘कांवडियां’ची गर्दी दिसू लागते!, गेल्या काही वर्षांत तर या कांवडयात्रेचा प्रतिसाद खूपच वाढत असल्याने काही लोकांमध्ये चिंतायुक्त भीतीचेही वातावरण दिसते.

या सगळ्यांच्या पाठीमागे कोणीतरी मुझफ्फरनगरमधील बाबाअसल्याचे बोलले जात आहे. हा बाबा या अशा ‘फूड जिहाद’ विरोधात मोहीम चालवत आहेत. मुझफ्फरनगरपासून 15 किमी अंतरावर या बाबाचा आश्रम आहे. यशवीर हे त्या बाबाचे नाव… त्याने त्याच्या भागातील मुस्लिम मालक असलेल्या हॉटेलची यादीच एका मोठ्या फलकावर लावून ठेवली आहे.

संबंधित वृत्त :

कांवड यात्रा - baimanus

हिंदू धर्म आणि देवतांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मुस्लिम व्हेज हॉटेल्स चालवत आहेत. त्या हॉटेल्सचे कर्मचारीही मुस्लिम आहेत. त्यांना फूड जिहाद करायचा आहे. जिहादचे अनेक प्रकार आहेत. हा देखील जिहादचाच एक भाग आहे, असा हा यशवीर म्हणतो. लोक हिंदू हॉटेल समजतात, पण त्यांच्या जेवणात थुंकी आणि मूत्र मिसळले जाते. भाज्या आणि डाळींमध्ये तडका देण्यासाठी चरबी वापरतात. भाज्यांमध्ये गोमांस टाकले जाते. हिंदूंचा धर्म भ्रष्ट करणे हा त्यांचा उद्देश आहे. तुम्ही हॉटेल चालवा पण हिंदूंच्या नावाने, देवदेवतांच्या नावाने चालवू नका, असे आमचे म्हणणे आहे. तुमचा धर्म आणि नावाने चालवा, असं सांगून यशवीर बाबाने ही मुस्लिम मालकांची शाकाहारी हॉटेल्सदेखील बंद करण्यात पुढाकार घेतला आहे.

यशवीर सांगतो, ‘आम्ही प्रशासनाला सांगितले होते की, कावड यात्रा सुरू असेपर्यंत हे हॉटेल्स बंद राहणार नाहीत. मुस्लिमांना त्यांचे हॉटेल्स पुढे चालवायचे असतील तर त्यांना हॉटेलची नावे हिंदू देवतांच्या नावावर ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. हिंदू देवतांच्या नावाने हॉटेल्स चालवणाऱ्या मुस्लिमांनी हॉटेल्स उघडली किंवा प्रशासनाने ती सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर आंदोलन सुरू करू,’ असा इशारा यशवीरने दिला आहे.

युपी पोलीस, प्रशासन आणि असल्या बाबांमुळे गेल्या महिन्याभरापासून युपीतले अनेक मुस्लिम हॉटेल मालक, कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बंद झालेल्या रेस्टॉरंटमधील कर्मचार्‍यांपैकी एक मोहम्मद आसिफ म्हणाला, “जर ते (हिंदू) श्रावणात मांस खात नसतील तर त्याचा अर्थ असा नाही की आम्हाला अशा पद्धतीने त्रास द्यायचा. जर एखाद्या धर्माच्या श्रद्धेचा मुद्दा असेल तर आपण दुसऱ्या व्यक्तीचा व्यवसाय थांबवू शकत नाही.

कांवड यात्रा - baimanus

आस्तिकांचे हे प्रयत्न कोणतेही कायदे मोडत नाहीत, कोणत्याही तत्त्वांचे उल्लंघन करत नाहीत – खरेतर, धार्मिक नैतिकतेच्या आणि अगदी सभ्यतेच्या कक्षेत असतात, तोपर्यंत ते प्रशंसनीयच ठरतात. पण जेव्हा शासन आणि प्रशासन मोठ्या जनतेवर धार्मिकपणाच्या नावाखाली निर्बंध लादतात – जेव्हा उपजीविकेच्या आणि अभिव्यक्तीच्या मूलभूत हक्कांवरच या निर्बंधांमुळे गदा येते, तेव्हा मात्र प्रश्न सुरू होतात. कांवडिया तरुण भाविक आहेत म्हणून बाकीच्या लोकांनीसुद्धा यात्रेच्या दिवसांत काय खावे आणि काय खाऊ नये, हे पोलीस कसे काय ठरवू शकतात? राज्यघटनेने लोकांवर काही प्रसंगी निर्बंध घालण्याचेही अधिकार प्रशासनाला दिलेले असतात हे खरे, पण म्हणून काय ते अधिकार असे वापरायचे ? घटनात्मक अधिकारांना जी पायाभूत चौकटीची मर्यादा असायला हवी ती न पाळता अधिकार वापरल्यास बहुसंख्याकवादी झुंडशाहीचीच अंमलबजावणी अधिकाऱ्यांमार्फत चालू होते.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here