‘चंपराण मटणा’चा घमघमाट पसरला पार ऑस्करपर्यंत….

बिहारचे चंपारण… जसे महात्मा गांधींच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्ध तसेच अलीकडच्या काळात चंपारण मटणामुळेही… याच नावाने एफटीआयच्या एका विद्यार्थ्याने बनवलेला चित्रपट थेट ऑस्करच्या उपांत्यफेरीपर्यंत पोहचला आहे.

  • टीम बाईमाणूस

बिहारचे चंपारण… इतिहासात अनेक विविध कारणांमुळे एक ऐतिहासिक दर्जा प्राप्त झालेले ठिकाण. महात्मा गांधींचा चंपारण सत्याग्रह इथलाच… पहिले महाकाव्य लिहिणाऱ्या महर्षि वाल्मिकींमुळेही चंपारण ओळखले जाते तर सीतेचे दोन पुत्र लव-कुश ज्यांनी याच चंपारणमध्ये आपल्या मातेवर झालेल्या अन्यायाचा बिमोड केला होता… काळ बदलला आणि चंपारण प्रसिद्ध लिट्टी-चोखा या डिशमुळे ओळखले जाऊ लागले आणि आता अगदी अलीकडच्या काळात ‘चंपारण मटण’मुळे आणि याच शिर्षकाखाली तयार झालेल्या चित्रपटामुळेही…

खास बिहारी मसाला आणि विशिष्ट पद्धतीने तयार होणाऱ्या मातीच्या भांड्यातील हे चंपारण मटण आता इतके लोकप्रिय झाले आहे की फक्त चंपारणमध्येच नव्हे तर सबंध भारतात या चंपारण मटणाचे आऊटलेट्स तयार झाले आहेत. चंपारण मटणाची सुरुवात प्रथम इंडो-नेपाळ बॉर्डरवर वसलेल्या घोराशन येथील गावांमध्ये झाली. त्यानंतर या डिशला खऱ्या अर्थानं लौकिक प्राप्त झाला तो बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यात. या जिल्ह्याच्या नावावरूनच या डिशचेही नाव पडले चंपारण. हा मांसाहारी पदार्थ प्रसिद्ध आहे तो त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपारिक मातीचे भांडे आणि पद्धतीमुळे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या मातीच्या भांड्याला भोजपुरी भाषेत अहूना असे बोलल्या जातं. म्हणून याला आहूना मटण देखील म्हटले जाते. मातीच्या भांड्यावर झाकण ठेवून त्यात खास बिहारी मसाला, लसूण, कांदा, मिरची, विशेष असे भाजलेले सरसोचे तेल टाकून झाकण कणीकने घट्ट बंद करून कोळसा अथवा लाकडाच्या कोळशावर शिजवले जाते. त्यानंतर ठरावीक कालावधीनंतर झाकणातून वाफ बाहेर काढण्यात येते. त्यानंतर 10-20 मिनिटे वाफ थंडी होऊन ही डिश तयार होते. विशेष बाब म्हणजे मटण शिजवताना पाण्याचा वापर केला जात नाही.

चंपराण मटण - baimanus

हे झाले चंपारण मटणाबद्दल, पण आपला आजचा विषय आहे याच नावाने असलेल्या सिनेमाविषयी…

‘चंपारण मटन’ ही एक व्यंगात्मक फिल्म आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावून बसलेल्या पतीच्या पत्नीला दिवस गेले आहेत. गरोदरपणात त्याच्या पत्नीला अचानक चंपारण मटण खायची तीव्र इच्छा होते… आता इतक्या गरिबीच्या आणि हालाखीच्या काळात 800 रुपये किलो असलेले मटण कसे आणायचे आणि शिजवायचे हे जवळपास अशक्यच. अत्यंत गरिबीत असतानाही घरात मटण शिजवलं जातयं आणि त्यातच अचानक पाहुणे घरी टपकले तर…? जेव्हा मटणाचा सुगंध शेजारपर्यंत दरवळतो आणि तो स्वाद चाखण्यासाठी शेजारीदेखील घरी पोहचले तर…? असे अनेक प्रश्न घेऊन आर्थिक आणि सामाजिक ओढाताणीवर हा चित्रपट बनला आहे.

आपल्या पत्नीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तिचा पती आठशे रुपये किलो असेलेले मटण कसे विकत घेतो आणि बेरोजगारी असलेल्या सध्याच्या या महागाईच्या काळात एका गरीब कुटुंबाचा संघर्ष कसा या चंपारण मटणाच्याभोवती फिरतो हे या चंपारण मटणाचे कथानक आहे. पुण्याच्या एफटीआयमध्ये शिकणाऱ्या रंजन उमा कृष्णकुमारने चंपारण मटण हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ही 24 मिनिटांची एक शॉर्ट फिल्म असून ऑस्करच्या ‘स्टूडेंट अकेडमी अवॉर्ड’ च्या गटात या सिनेमाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. ‘पंचायत’ या गाजलेल्या सिरीजमध्ये ‘विकास भय्या’ची भूमिका करणारा चंदन रॉय हा या सिनेमाचा मुख्य अभिनेता आहे.

चंपराण मटण - baimanus

ऑस्करच्या ज्या कॅटेगरीत चंपारण मटनची निवड झाली आहे त्यात जगभरातून जवळपास 2400 पेक्षा अधिक शॉर्ट फिल्म दाखल झाल्या होत्या. एफटीआयमधून एकूण 3 फिल्म्स ऑस्करसाठी पाठविण्यात आल्या होत्या ज्यापैकी फक्त चंपारण मटनची निवड झाली. आता या चित्रपटाने उपांत्य फेरीत अंतिम 17 चित्रपटांमध्ये स्थान मिळवले असून ऑक्टोबर महिन्यात याचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्राच्या बारामतीमध्ये या चित्रपटाचे शुटिंग झाले.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here