जिल्हा परिषद शाळा ते IISER पर्यंतचा प्रवास …

शिक्षणाची कास धरून एक आदिवासी मुलगा मेहनत, जिद्द, आणि चिकाटी च्या जोरावर भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) मध्ये पोहोचला.

  • संजना खंडारे

“इतकी मेहनत करायची आहे की मेहनतीने पण म्हणलं पाहिजे की बा हा पोरगा तर मेहनीतीची Definition बदलतोय” हे बोल आहेत यवतमाळ जिल्ह्यातील लासीणा खेडेगावातील 17 वर्षाच्या आदिवासी पोराचे. उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न यश च होत पण घरच्या परिस्थितीमुळे ते शक्य होईल की नाही याची खात्री त्याला नव्हती. या स्वप्नाला दिशा मिळाली ती एकलव्य च्या कार्यशाळेमुळे आणि त्यानंतर या 12वी पास पोराला सापडली त्याची वाट. त्या वाटेवरून चालण्यासाठी दिवस रात्र एक करून केलेला अभ्यास फळाला आला आणि यश ला शेवटी यश मिळालं. भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) मध्ये दुर्गा रवी टेकाम यांचा मुलगा यश रवी टेकाम या मुलाची निवड झाली. एका आदिवासी कोलाम समुदायाच्या पोराचा लासीणा जिल्हा परिषद शाळा ते “IISER” पर्यंतचा प्रवास या मुलाखतीद्वारे मांडण्यात आलाय.

प्रश्न: लासीना सारख्या छोट्याश्या खेड्यातून IISER पर्यंत पोहचण्याचा प्रवास कधी आणि कसा सुरु झाला?

उत्तर: मी मूळचा यवतमाळ जिल्यातील लासीणा या खेडेगावातील. माझे प्राथमिक शिक्षण (पहिली ते सातवी) हे लासीणा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. आणि आठवी ते दहावी चे शिक्षण हे संत शिरोमणी गोरोबा माध्यमिक विद्यालयात झालं. कोरोनामुळे दहावीचे पेपरच होणार नाही ही बातमी कानावर पडली. मग काय नववीच्या मार्कवरून दहावीचे मार्क दिले. तसं माझा इंटरेस्ट BSC Agriculture मध्ये होता आणि म्हणलं बा आपली 12वी एकदा चांगली निघाली की हेच करायचं. मी 12वी ला आश्रम शाळेत असतांना एकलव्य च्या क्रॅश कोर्स मध्ये मला विचारण्यात आलं की तुला काय करायचं आहे. मी म्हणलं एक तर Agriculture नाही तर रिसर्च मध्ये. मग एकदा एकलव्य च्या क्रॅश कोर्स मध्ये झूम मीट वर IISER पुणे च्या प्रोफेसर च लेक्चर झालं. त्यांनी तेव्हा जे आपण थेअरी वाचतो ते प्रॅक्टिकल मध्ये आम्हाला करून दाखवलं. मग वाटलं हे काही तरी वेगळं आणि भन्नाट आहे आपण यामध्येच पुढचं शिक्षण continue करायला हवं.

यश रवी टेकाम - baimanus

आता रस्ता तर भेटला होता फक्त त्यावर चालण्यासाठी अभ्यास करायचा होता. मग काय दिवस भर क्रॅश कोर्स चे लेक्चर, ऍक्टिव्हिटी, दर हफ्त्याला एक टेस्ट असायची ती द्यायची, दिलेल्या assignment पूर्ण करायच्या आणि रात्री 2-2, 3-3 पर्यंत अभ्यास करायचा. एकलव्य चे आम्हाला जे मेंटॉर होते ते पण आमच्यासोबत अभ्यास करायचे. मग असं वाटायचं की सर पण करतायेत तर आपण करायला काय हरकत. तेथे जे सांगतील तो अभ्यास तर आम्ही करायचो पण तिथे मी माझे पुस्तकं पण घेऊन गेलो होतो तर तो ही अभ्यास करायचो. आम्ही दोघे तिघे मित्र यू ट्यूब वरचे लेक्चर पण करायचो. असं झालं की झोपयला वेळ कमी पडायचा. आम्ही सकाळी 4 ला 5 ला झोपायचो मग उठायला उशीर झाला की फक्त हात पाय धुवून फक्त वर्क शॉप मधले लेक्चर करायचे. असं ही झालेलं की 5-5 दिवस मी बिना अंघोळीच राहिलोय. त्या 2 महिन्यात घरी पण जास्त फोन नाही केला. जेव्हा Intereance Exam ची डेट जवळ जवळ यायला लागली तेव्हा २ दिवस झाले की टेस्ट द्यायचो. त्या मुळे चांगला सराव झाला.

19 मे ला एकलव्य क्रॅश कोर्स मधून घरी आलो. काही दिवसानंतर मग CUET झाली. APU ची पण interance दिली. तेव्हा interance द्यायला नागपूर ला जायचे होते तेव्हा बस च्या भाड्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. बाबांनी उसने पैसे आणले आणि मला नागपूर ला जाऊ दिलं.

19 जुले ला पुण्यामध्ये एकलव्य च्या सर्व विद्यार्थ्यांचे meet up होते.त्याच्या दोन दिवसाआधीच मला IISER कडून mail आला. माझ्या आईला विश्वास होता आणि ती मला सतत म्हणायची की तुझं एक तर IISER किंवा APU दोन्हींमधून एकामध्ये तरी निवड होणार. आई वडिलांना आनंद झाला. माझ्या आत्याला खूप अप्रूप वाटलं. दोन दिवस जेवण घश्याखाली उतरलं नाही इतका आनंद मला ही झाला होता.

थोड्यादिवसानंतर मी एकलव्य ऑफिस ला गेलो. प्रशांत दादांना संगितलं की याची सेमिस्टर फी 13 हजार आहे. माझ्याकडून इतकी भरणं होणार नाही माझ्याकडे तर सीट reserve करण्यासाठी 1000 रुपये पण नाहीत. तेव्हा दादांनी माझे पैसे भरले आणि म्हणे जेव्हाही पैशाची अडचण असली तेव्हा कॉल कर पण IISER सोडू नको. नंतर काही दिवसानंतर APU चा ही result आला आणि आश्चर्याचा धक्का बसला की तेथे ही सिलेक्ट झाल्तो. पण मग मी IISER ला जाण्याचाच निर्णय घेतला.

यश रवी टेकाम - baimanus

प्रश्न: एकलव्य सोबत तुझा कसा संपर्क आला?

उत्तर: वैष्णवी आश्रम शाळा लासीना या ठिकाणी मी 11वी 12वी केली. झालं असं की डिसेंबर मध्ये आश्रम शाळेत एकलव्यची एकदिवसीय कार्यशाळा झाली. 12वी नंतर कश्या कुठे संधी उपलब्ध आहेत? कोणत्या इन्सिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यायला पाहिजे? हे सर्व त्या वनडे वर्क शॉप मध्ये आम्हाला सांगण्यात आलं. तेव्हा त्यांनी आमची एक परीक्षा देखील घेतली होती. आणि सांगितलं यात जर तुम्ही पास झाला तर आमच्या दोन महिन्याच्या क्रॅश कोर्स मध्ये सहभागी होता येईल. मग काय दिली ती परीक्षा. त्या नंतर मग परत तोच माझा रुटीन आश्रम शाळेत लेक्चर व्हायचे नाही म्हणून मी यू ट्यूब वरचे लेक्चर करायचो आणि अभ्यास करायचो. मग बोर्डाची 12वी ची परीक्षा झाली. आणि काही दिवसांनी आश्रम शाळेतून कॉल आला. की तू जी परीक्षा दिली होती त्याद्वारे तू एकलव्य च्या क्रॅश कोर्स साठी सिलेक्ट झाला. 2 महिन्यासाठी चिसगड ला जाण्यासाठी उद्याच निघावं लागेल. मी गेलो मग क्रॅश कोर्ससाठी तेथे गेल्या नंतर काही दिवस मोकळेपणाने बोलण्याची सवयच झाली नाही. सुरवातीला प्रश्न पण विचारायला भीती वाटायची. पण तेथे ज मेंटॉर होते ते फार बोलायला मोकळे होते. सकाळ पासून लेक्चर असायचे गणित, इंग्रजी, जनरल नॉलेज, त्यानंतर 4 वाजता रोज ऍक्टिव्हिटी रोज असायची त्या मधून मग कॉन्फिडन्स वाढला. सगळ्यांशी बोलायला लागलो. प्रश्न विचारायला लागलो. राजू दादा, प्रशांत दादा, आणि एकलव्य च्या क्रॅश कोर्स मध्ये मला मिळालेले मेंटॉर यांचामला IISER पर्यंत पोहचण्यासाठी खूप सपोर्ट मिळाला.

प्रश्न : तुझ्यासमोर कोणाचा आदर्श ठेवून तू उच्चशिक्षणाकडे वळलास?

उत्तर: बाबासाहेब आणि महात्मा फुलेंचा आदर्श तर डोळ्यासमोर आहेच. पण त्या ही पेक्षा परिस्थितीने जाणीव करून दिली. माझ्या घरची परिस्थिती तशी हळदीची होती तिनेच शिक्षणाचा खरा अर्थ, महत्व समजावून दिले. आमच्या लासीना गावात कीमान 4 ते 5 हजार लोकं असतील त्यात आमचे आदिवासी लोकांचे मोजून 35 ते 40 घरं. आणि या 40 घरांमधील मी माझा भाऊ आणि अजून माझा एक मित्र सोडला तर अजून कोणताही मुलगा दहावी नंतर शिकला नाही. तशी त्याला कारणं ही बरेच आहेत. वडील दारू पीत असल्यामुळे बरयाच मुलांवर घर संभाळण्याची जबाबदारी आली. आज ते मुलं शेतात असो नाही तर बांधकाम कामात मजूर म्हणून काम करतात. काही मुलं लहान वयात व्यसनाच्या आहारी गेली. आणि ज्या ठिकाणी मुलांची अशी गत तिथं मुलींचं शेवटी काय होईल ?

यश रवी टेकाम - baimanus

आमच्या इकडं आजही बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात. 15-16 वर्षांच्या पोरींचे लग्न लावून दिले जातात. आजही आमच्या समाजात काही लोकं अंधश्रद्धेत इतके बुडाले की, कोणाला ताप जरी आला तरी डॉक्टर कडे न नेता भोंदूबाबाकडे नेलं जातं मग ते पोरग आजाराने मेलं तरी चालेल पण दवाखान्यात काही नेत नाही इतक्या थराला अंधश्रद्धा पोहोचलेली आहे. गावातील लोकं आजही अरे हे ‘को’ जातीचे म्हणून हिणवतात. (को म्हणजे कोलाम समुदायचे) ही अशी सगळी परिस्तिथी आजुबाजुला आहे. मग वाटायचं की बा आपण पण जर शिक्षण सोडलं एक तर व्यसनी बनू नाही तर मग बाकीच्या पोरांसारखंच मजुरी करू. आणि ही परिस्थिती जशी आज आहे ती उद्या ही पर्वा ही आणि वर्षानुवर्षे अशीच राहील. आणि आपल्याला आपलं भविष्य हे चांगलं बघायचं असेल तर आता मेहनत करावी लागेल आणि त्यासाठी शिक्षणाला सोडून चालणार नाही. म्हणून काही ही झालं तरी शिक्षण सोडलं नाही.

प्रश्न: तुझ्या या प्रवासात आईवडिलांचा कसा पाठिंबा मिळाला?

उत्तर: माझे आईवडील शेतमजूर आहेत. त्यामुळे शेतीमध्ये कधी पूरक उत्पन्न मिळते नाही तर कधी घरखर्च ही भागात नाही. माझे प्राथमिक शिक्षण (पहिली ते सातवी) हे लासीणा येथील जिल्हा परिषद शाळेत झालं. 2015 मध्ये आमच्या शेतातून काहीच उत्पन्न मिळाले नाही. त्या वेळेस घरातील स्थिती अशी होती की दोन वेळेच्या भाकरीची सोय तरी कशी होईल हा प्रश्न आमच्यासमोर होता. पण त्याचा आमच्या शिक्षणावर परिणाम पडू नये म्हणून माझ्या बाबांनी जोडधंदा म्हणून चिकन शॉप उघडली. सुरवातीला मी देखील त्या दुकानावर काम करायचो वडिलांना तेवढाच हातभार मिळेल असं वाटायचं. आणि तेव्हाच कळलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कारण शेतीमध्ये कधी पूरक उत्पन्न व्हायचं तर कधी काहीच नाही.

पण, आई वडील नेहमी एकाच वाक्य बोलायचे “घरात एक वेळा खायला नसलं तरी चालल पोरांनो पण शिक्षण कधी सोडायचं नाही.” मी नववीत असतांना कोरोना ची लाट आली. आणि मग काय शाळा बंद दहावीचे पेपर पण झाले नाही. मी एकलव्य च्या क्रॅश कोर्स साठी दोन महिने चिसगढ ला होतो तेव्हा आई वडिलांना फोने करायला वेळ ही मिळायचा नाही. तेव्हा ही त्यांनी कधी एका शब्दाने मला काही विचारलं नाही. आसपासचे लोकं म्हणायचे की “एकट्या बापाकडून किती काम होणार तुमचं शिक्षण इतकं महत्वाचं आहे का की तुमच्या शिक्षणासाठी तो जीवाचं रान करतोय.” पण आई वडील नेहमी म्हणायचे आता पर्यंत कष्टच केले अजून थोडे दिवस तुझ्या शिक्षणासाठी केले तर काय बिघडणार? तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे.

प्रश्न: कोरोनाकाळात पडलेला शिक्षणाचा गॅप तू कसा भरून काढला?

उत्तर: मी नववीत असतांना कोरोना मुळे शाळाबंद. मग काय शेतात जाऊन काम करायचे. पण जसं दहावी आली तसे आमचे ऑनलाईन लेक्चर चालू झाले. त्यात एवढं काही समजायचं नाही. शाळेतले आमचे मास्तर महिन्यातून एक दोनदा प्रत्येक मुलाच्या घरी जाऊन अभ्यासाबाबत विचारपूस करायचे. तर तेवढं राह्यचं की बाबा मास्तर घरी येईल तर काय अभ्यास केला सांगावं लागेल. नाहीतर मायबाप म्हणतील पोट्ट तर दिवस भर मोबाइल घेऊन बसतंये अभ्यास नाही तर काय करतं मंग. दहावीचे पेपर जवळ यायला लागले तशी भीती वाढू लागली की बा ऑनलाईन लेक्चर झाले एवढं काही समजलं नाही. पण दहावीला मार्क तर चांगले पाहिजे म्हणून शेवट दोन महिने ट्युशन लावली. चांगली अभ्यासाला सुरवात केली. पण नंतर दहावीचे पेपरच होणार नाही ही बातमी कानावर पडली. मग काय नववीच्या मार्कवरून दहावीचे मार्क दिले.

त्यानंतर गावातच असलेल्या आश्रम शाळेत अकरावी ला ऍडमिशन घेतलं. सायन्स घेतल्यामुळे इंग्रजी काही एवढं कळायचं नाही. पण सायन्स आवडीचं होत त्या मूळ आपली गाडी तेवढी धकत तरी होती. काही सण आला की आश्रम शाळेतील पोरं घरी जायची पंधरा पंधरा दिवस काही यायचे नाही. मग काय दोन चार पोरांसाठी लेक्चर पण व्हयचे नाही असच कित्तेक महिने चालू राहील. मग असं वाटायला लागलं की बा असं तर काही आपलं होणार नाही. मग यू ट्यूब वर चांगले दोन तीन चॅनेल्स शोधले आणि अभ्यास स्वतःच करायला चालू केलं. त्या चॅनेल्स वरूनच शिकायला सुरवात केली.

प्रश्न: IISER मधील तुझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भविष्यात तुला काय करायचं आहे?

उत्तर: मला माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर सगळ्यात आधी शिक्षणासाठीच काम करायचं आहे आणि याची सुरवात मला माझ्या गावापासुन करायची आहे. आज माझे मित्र मला म्हणतात यश आम्ही ही शिक्षण सोडलं नसत तर कुठे तरी बाहेरगावी शिकायला गेलो असतो. मी त्यांना सांगतो की बा अजून ही वेळ गेली नाही पुन्हा शिक्षणाकडे वळू शकता. मला माझ्या समाजातील अंधश्रद्धा कशी दूर होईल यावर काम करायचं आहे. आदिवासी मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आहे

यश सारखेच 300 पेक्षा जास्त आदिवासी विद्यार्थी आज देशातील नामांकित शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेत आहेत. उद्या हे तरुण आदिवासी समाजाचं नेतृत्व विविध क्षेत्रात करणार यात शंकाच नाही.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here