आता तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले जातीयतेचे लोण

तिरुनेवेली मध्ये जातीवरून झालेल्या भांडणात एका विद्यार्थ्याचा मृत्यू. वेगवेगळ्या जातींची ओळख असणारे मनगटातील बँड्स बनतायत जातीय संघर्षाचे नवीन कारण.

टीम बाईमाणूस / ११ मे २०२२

तामिळनाडूच्या (Tamilnadu) उत्तर आणि दक्षिण प्रांतातील जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या शाळा जातीय दंगलीची केंद्रस्थाने बनत आहेत. शाळा (schools) हे विद्येचे मंदिर मानले जाते. अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणाऱ्या या शाळांमधून आता जातीयवादाच्या समजुती अधिक घट्ट बनत आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत धुमसणाऱ्या जातीय संघर्षाची कहाणी हळूहळू बाहेर येत आहे. कुड्डालोर, शिवगंगा, तिरुनेवेलीच्या सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जातीय कारणांवरून भांडणाच्या घटना समोर आल्या आहेत. या सगळ्या भांडणांना(fight) आणि हिंसाचाराला (violence) कारणं ठरली आहेत विद्यार्थ्यांच्या हातात असलेली रंगीबेरंगी रिस्ट बँड्स. मनगटाभोवती गुंडाळलेले वेगवेगळ्या प्रकारचे हे धागे एवढे प्रभावी आहेत की या धाग्यांच्या रंगावरून होणाऱ्या भांडणात तिरुनेवेली जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील विद्यार्थ्याचा जीव गेला आहे.

विद्यार्थ्यांच्या हातात सर्रास दिसणारे हे वेगवेगळ्या रंगाचे बँड्स वेगवेगळ्या जातींचे प्रतीक आहेत. लाल, पिवळे , हिरवे आणि अजून कितीतरी रंगांचे हे धागे विद्यार्थ्यांच्या जातीय ओळखीचे प्रतीक बनत चालल्याने नवनवीन समस्या उदभवू लागल्यात. विद्यार्थी आपली जात दाखवणारा रिस्टबँड घालून शाळेत येत आहेत, यावरून त्याचा अंदाज येऊ शकतो. आपल्या जातीचे प्रदर्शन करण्याची वृत्ती तामिळनाडूमध्ये नवी नाही. मात्र, आता त्याने उग्र रूप धारण केले आहे. काही शाळांत विद्यार्थ्यांमध्ये मनगटावर विविध रंगाची फीत लावण्याची प्रथा असल्याचे जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील एका शिक्षकानेच मान्य केले आहे. अनेक शाळकरी विद्यार्थी एखाद्या विशेष जातीय युनिटचे सक्रिय सदस्य आहेत. या विद्यार्थ्यांवर जाती आधारित राजकारण करणाऱ्या बड्या राजकीय नेत्यांची त्यांच्यावर छाप आहे.चेन्नईचे शिक्षणतज्ज्ञ गजेंद्र बाबू म्हणाले, काही जातीयवादी संघटना विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. ही प्रथा शाळेतील शैक्षणिक वातावरण दूषित करत आहे.

हातातील बँड्स मुळे विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये घडलेल्या काही प्रमुख घटना :

विद्यार्थ्यांच्या हातात सर्रास दिसणारे हे वेगवेगळ्या रंगाचे बँड्स वेगवेगळ्या जातींचे प्रतीक आहेत.

कुड्डालोरची सरकारी शाळा

काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील कुड्डालोर शहरानजीक वेल्लैकराय व्ही. कट्टपलायममध्ये सरकारी शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांत जातीय भांडणे झाली होती. येथेही हिंसाचार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोन वेगवेगळ्या जातीचे रिस्टबँड घातले होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, जातीय आधारित भांडणात सहभागी होऊ नये, असे आम्ही विद्यार्थ्यांना सांगितले आहे.

शिवगंगाची सरकारी शाळा

शिवगंगा जिल्ह्यात जातीय हिंसाचार झाला. हा हिंसाचार रिस्टबँडमुळे झाला. यात एका समाजाने दुसऱ्या समाजाच्या विद्यार्थ्यांवर जातीय टिप्पणी केली होती. पोलिस घटनास्थळी दाखल होताच हल्लेखोर पसार झाले. हल्ल्यात जखमी ८ वी आणि १० वीच्या दोन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पोलिसांनी १३ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. कारवाईच्या मागणीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. मानवी हक्क कार्यकर्ते काथिर म्हणाले, शाळेतील वातावरण अभिमान वाटावा असे असते. मात्र,विद्यार्थ्यांना जातीय भेदभाव करण्यात लाज वाटली पाहिजे. त्यामुळे शाळांमध्ये विशेष समुपदेशनाची गरज आहे.

तिरुनेलवेलीच्या अंबासमुद्रममध्ये एका विद्यार्थ्याला गमवावा लागला जीव

तिरुनेलवेलीच्या अंबासमुद्रमध्ये पल्लक्कड पोथुक्कुडी सरकारी शाळेमध्ये गेल्या आठवड्यात जातीय संघर्षामुळे १७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या अहवालानुसार, ओबीसी समाजाशी संबंध ठेवणारा विद्यार्थी सेल्वा सूर्याचा दलित िवद्यार्थ्याशी भांडण झाले होते. त्यानेही रिस्टबँड घातला होता. या वादात सूर्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले. या घटनेनंतर तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणाचा तपास करणार्‍या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ओबीसी समाजातील या मुलाचे सोमवारी खेळाच्या तासात एका, दलित समूहातील विद्यार्थ्यासोबत मनगटावर एका विशिष्ट रंगाची पट्टी बांधल्याच्या कारणावरून भांडण झाले होते. शिक्षक आणि इतरांनी त्यांना थांबवण्याआधीच, एकमेकांवर दगडफेक करून जोरदार भांडण झाले असे या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कोणालाही यादरम्यान मोठी दुखापत झाली नाही पण पीडित विद्यार्थ्याने सायंकाळपर्यंत तीव्र डोकेदुखीची तक्रार केली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे काही अंतर्गत जखमा आढळून आल्या. उपचार असूनही शनिवारी त्याचा मृत्यू झाला, अधिकाऱ्यांनी सांगितले.

मारामारीत सहभागी असलेल्या त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर इतर आरोपांव्यतिरिक्त खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी, तिरुनेलवेली जिल्हा शिक्षण विभागाने दोन शिक्षकांना निष्काळजीपणा आणि विद्यार्थ्यांमधील संघर्ष रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल निलंबित केले.
योगायोगाने, तिरुनेलवेली येथे यापूर्वीही शालेय विद्यार्थ्यांमधील अशाच प्रकारचे जातीय संघर्ष घडले आहेत.

2015 मध्ये, जिल्हाधिकारी एम. करुणाकरन यांनी जातीय संघर्षाच्या वाढत्या संख्येच्या पोलिस अहवालानंतर शैक्षणिक संस्थांमध्ये जात ओळखण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रंगीत धाग्यांवर आणि इतर गोष्टींवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते.

ऑगस्ट 2019 मध्ये, तामिळनाडूच्या शालेय शिक्षण संचालकांनी एक परिपत्रक जारी करून अधिका-यांना त्यांची जात ओळखण्यासाठी मनगटात बँड्स बांधण्याच्या विद्यार्थ्यांच्या या प्रथेवर कारवाई करण्यास सांगितले होते. मात्र, तत्कालीन शालेय शिक्षणमंत्र्यांनी अशी कोणतीही प्रथा नसल्याचा दावा करत ही अधिसूचनाच रद्द केली होती.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here