आपले राष्ट्रचिन्ह आणि त्यावरील सिंह मुद्रा अथवा सिंह शीर्ष…

राष्ट्रचिन्ह स्वीकारताना जी भूमिका या देशाचा कारभार प्रजासत्ताकाच्या दिशेने सुरू करणाऱ्यांनी मांडली होती, त्याच्याशी काहीसे विपरीत असे हे राष्ट्र चिन्हाचे शिल्प झाले आहे, हे नम्रपणे नोंदवले पाहिजे.

  • अरुण खोरे

आज सकाळी वृत्तपत्रे पाहताना नवीन संसद भवनावर उभारण्यासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी नवी दिल्लीत संपन्न झाले, ही बातमी बघितली पण मी अचंबित झालो ते या राष्ट्रीय चिन्हातील सिंहाचा वासलेला जबडा बघून! खरे म्हणजे, तो फोटो पाहून थोडी भीती वाटली!
मग मी माझ्या घरातील वीस रुपयाची नोट, पाच रुपयांचे नाणे हेही पाहिले आणि आज वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले ष्ट्रीय मानचिन्ह शिल्पासह उभे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या नाण्यांवरील शिल्प हे दोन्ही मी पाहू लागलो. दोन्हीमध्ये कमालीचा फरक असल्याचे लक्षात आले.

मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वाराणसी येथील अधिवेशनाला पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून १९७७ च्या नोव्हेंबरमध्ये ते कव्हर करायला गेलो होतो. त्यादरम्यान आम्हाला सारनाथ स्तंभ पाहायला मिळाला. आपल्या राष्ट्रचिन्हावर या सारनाथ स्तंभावरील सिंह शीर्ष शीर्ष स्वीकारण्यात आलेले आहेत. आणि त्याच्याखाली जे ब्रीदवाक्य आहे, ‘सत्यमेव जयते’, तेही आपण या राष्ट्र चिन्हाचा भाग म्हणून त्यात समाविष्ट केले आहे.

भारताचे नवे संसद भवन उभारले जाते आहे आणि या वर्षाखेरीपर्यंत ते पूर्ण होईल. कदाचित संसदेचे हिवाळी अधिवेशन तेथेच भरण्याची शक्यता आजच्या बातम्यामधून व्यक्त करण्यात आली आहे.

आज विविध वृत्तपत्रातील बातम्यांमधून या राष्ट्रीय मानचिन्हाचे जे फोटो पाहायला मिळाले, त्यामुळे केंद्र सरकारने स्वतःच्या अखत्यारीत या चिन्हातील सिंहशिर्षामध्ये बदल केलेला स्पष्टपणे जाणवतो.

भारताच्या संविधान सभेने मंजूर केल्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून आपण सारनाथ स्तंभावरील हे सिंह शीर्ष राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारले आहे.

यासंबंधी माहिती देणारी एक पुस्तिका केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाअंतर्गत असलेल्या प्रकाशन विभागाने १९६७ मध्ये प्रसिद्ध केली होती. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाचे संचालक असलेले सी. शिवराममूर्ती यांनी या राष्ट्रचिन्हाबाबतची पूर्वपीठिका आणि त्याबाबतची अनुषंगिक माहितीही त्यात दिली आहे.
या जेमतेम १६ पानी पुस्तकाची अर्पण पत्रिका वाचल्यानंतर या राष्ट्रचिन्हाचा संदर्भ अधिक नेमका उमगतो.

ही अर्पण पत्रिका अशी आहे :
महात्मा गांधीजवाहरलाल नेहरू यांना वाटत असलेली अध्यात्माविषयीची ओढ आणि त्यांच्या अंतकरणात असलेले अखिल मानव जातीविषयीचे प्रेम यांच्यामुळे सदाचरणाची व जागतिक शांततेची कल्पना व्यक्त करणाऱ्या भारताच्या या उदात्त राष्ट्र चिन्हाची निवड झाली. त्यांच्या पवित्र स्मृतीला ही पुस्तिका आदरपूर्वक अर्पण करीत आहे.”

सम्राट अशोकाने हे जे अनेक ठिकाणी स्तंभ उभे केले, त्यातीलच सारनाथ येथील हा अत्यंत महत्त्वाचा असा स्तंभ मानला जातो. त्याचे विशेष कारण असे आहे की, गौतम बुद्धांनी पहिला उपदेश या ठिकाणी केला होता. ‘धम्मचक्र प्रवर्तन’, म्हणूनही सारनाथच्या स्तंभाचा इतिहासात उल्लेख आहे.

आज मात्र हे सगळे संदर्भ वजा करण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी शंका नव्या संसद भवनावर उभारण्यात येत असलेल्या या राष्ट्र चिन्हाच्या नव्या शिल्पामुळे मनात निर्माण झाली. अर्थात आपण सामान्य लोक आहोत. एक अतिप्रचंड, अति विशाल असे काम दिल्लीमध्ये सुरू आहे आणि त्या कामाचे जणू प्रतीक म्हणूनच या राष्ट्र चिन्हातील सिंह शीर्षे ही अधिक आक्रमकपणे दिसली पाहिजेत, अशी भूमिकाही त्यामागे असू शकते. तथापि, राष्ट्रचिन्ह स्वीकारताना जी भूमिका या देशाचा कारभार प्रजासत्ताकाच्या दिशेने सुरू करणाऱ्यांनी मांडली होती, त्याच्याशी काहीसे विपरीत असे हे राष्ट्र चिन्हाचे शिल्प झाले आहे, हे नम्रपणे नोंदवले पाहिजे.
विरोधी पक्ष, सुजाण नागरिक आणि अन्य विविध विवेकी घटक या संदर्भात आपली भूमिका मांडत राहतीलच.
मुळात सिंह गर्जना करतानाचा चेहरा दिसतो आहे, तोच मुळात अतिशय आक्रमक आणि हिंसक वाटतो. या देशाला बुद्ध, अशोक, महावीर, ज्ञानदेव, तुकाराम,जिजामाता – शिवराय, कबीर, नरसी मेहता, मीराबाई, गुरु नानक, रविदास, राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले, सावित्रीबाई यांच्यापासून ते स्वातंत्र्य चळवळीतील गांधीजी, नेहरु, डाॅ. आंबेडकर अशी एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा संवाद, समंजसपणा, सलोखा, बंधुभाव याची शिकवण देते.म्हणूनच आपल्या संविधान निर्मात्यांनी आणि त्यानुसार कारभार करणाऱ्या आरंभीच्या राज्यकर्त्यांनी सारनाथ स्तंभावरील या सिंह शिर्षाची राष्ट्रचिन्ह म्हणून निवड केली होती. या राष्ट्र चिन्हातून त्या सिंहाचे गुणविशेष व्यक्त करायचे नाहीत, तर या देशाच्या जनमानसाच्या आत्म्यात असलेला जो मानवतेचा, शांततेचा हुंकार आहे, सहिष्णुतेचा विचार आहे, राष्ट्र म्हणून जो अभिमान आहे त्या सर्वांचे प्रतीक म्हणून हे राष्ट्रचिन्ह आहे. माझ्या या लेखामध्ये मी केंद्र सरकारच्या १९६७ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तिकेतील
राष्ट्र चिन्हाचे जे रेखाटन आहे, तीही येथे देतो आहे.


आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, शांतनिकेतनमधील विख्यात चित्रकार नंदलाल बोस यांच्या विद्यार्थी असलेल्या कलावंताने त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्र चिन्हाचे रेखाटन तयार केले होते. ज्यांच्याकडे अधिकार आहे, सत्ता आहे त्यांना आपण आपले हे मत आणि आपली भावना समजेल अशी अपेक्षा नक्कीच व्यक्त करू शकतो.
एक बाब अधोरेखित केलीच पाहिजे आणि ते म्हणजे संविधान निर्मात्यांनी आणि या देशाच्या आरंभीच्या राज्यकर्त्यांनी जे राष्ट्रचिन्ह स्वीकारले होते ते आणि आता संसद भवनाच्या आज भव्य अति भव्य वास्तूवर उभारले जाणारे हे राष्ट्र चिन्हाचे शिल्प यात नक्कीच फरक आहे!

फरक एकाच गोष्टीचा नाही – आणि तो म्हणजे ‘सत्यमेव जयते’, हे ब्रीदवाक्य अजून तरी बदललेले नाही! या ब्रीदासाठी तरी आपण थोडे बोलायला हवे. दिल्लीतल्या कारभाऱ्यांना सांगायला हवे.

चला सर्वजण म्हणू या –
सत्यमेव जयते!
सत्यमेव जयते!!
सत्यमेव जयते !!!

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here