गायीच्या गळ्यात पहिली घंटा बांधणारी लेखिका; गोरक्षणकेंद्री राजकीय अपप्रचाराची धाडसी चिकित्सा

खरेखुरे ज्ञान आणि विश्वासार्ह माहिती जनतेपर्यंत कोणत्याही मार्गाने पोहोचूच नये, यासाठी गेल्या काही वर्षांपासून फार मोठे कारस्थान केंद्रातील सत्ताधारी पक्ष आणि संबंधित संस्था-संघटनांकडून देश स्तरावर राबवले जात आहे, हे उघडच आहे. अशात संवेदनशील पत्रकार श्रुती गणपत्ये यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘हु विल बेल दी काउ’ हे इंग्लिश पुस्तक गायीच्या अवतीभवती रचण्यात आलेले संस्कृतिकारण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण उलगडून सांगतेच, त्याचबरोबर एक समाज आणि देश म्हणून ढोंग आणि सोंगही उघड करते...

  • शेखर देशमुख

केवळ विकासकामांचा भपका आपल्याला सत्ता मिळवून देऊ शकत नाही, हे ओळखून विकासकामांचा भपका हा निव्वळ मुखवटा म्हणून उपयोगात आणायचा, आपले खरे उद्दिष्ट आक्रमक सांस्कृतिक राजकारण करून सत्तेचा सोपान चढण्याचे आहे, हे पक्के ठाऊक असल्यानेच बहुदा, गेल्या नऊ वर्षांत सामान्य मतदारांना वश करण्यासाठी देशात मोदी सरकारच्या वतीने जादूचे प्रयोग सुरु आहेत. अर्थातच जादुगाराची मुख्य भूमिका पंतप्रधान मोदी पार पाडत आहेत. रोज नवा वेश-नवा भेस, नव्या घोषणा, नवे नारे. यामुळे देशात बारा महिने, तेरा काळ उत्सवी जश्न सुरु राहतो. ही जश्नबाजी प्रत्येक राज्यातल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या पहिल्या धावेचे निमित्त करून सुरु राहते तशीच ती पंतप्रधानांच्या बांदिपूर व्याघ्र प्रकल्पातल्या भाकड भटकंतीच्यानिमित्तानेही सुरु राहते.

अर्थातच एका बाजूला जश्नबाजी सुरु असताना सांस्कृतिक राजकारणाचा अजेंडा राबवणेही सत्ताधारी वर्गाकडून तितकेच आक्रमकपणे सुरु आहे. इथे वेगळ्या प्रकारचा उन्माद आजचा समाज अनुभवत असल्याचे दिसत आहे. केवळ आक्रमक नव्हे, तर बहुतप्रसंगी हिंसक सांस्कृतिक राजकारण पुढे रेटणारे तथाकथित देशभक्त आणि या हिंसक देशभक्तीत आपली भक्ती मिसळणारे समाजातले डॉक्टर, इंजिनिअर, शेअर ब्रोकर, प्राध्यापक, शिक्षक, कलावंत-खेळाडू, बिल्डर, व्यापारी एकाच पातळीवर येऊन कळत नकळत, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या विघातक राजकारणाला चालना देताना दिसत आहेत. या सांस्कृतिक राजकारणाचा एक पैलू हिंदू धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या गोधनाचे रक्षण आणि संवर्धन करणे, त्यासाठी कधी कायद्यावर बोट ठेवून तर कायद्याची चौकट मोडून शत्रूसमान परधर्मीयांपासून गोवंशाची सोडवणूक करणे पर्यायाने गोवंश बाळगणार्‍यांना, गोमांस खाणार्‍यांना अद्दल घडविणे हा राहिला आहे.

गोधन हा भासवला जातो तसा केवळ धार्मिक, सांस्कृतिक वा भावनिक मुद्दा खचितच नाही. या मुद्द्याशी थेटपणे राजकारण, अर्थकारण, कारखानदारी, विशिष्ट समाजसमूहांची रोजंदारी, आयात-निर्यात, विविधढंगी खाद्यसंस्कृती असे अनेक पैलू जोडले गेलेले आहेत. किंबहुना प्रसंगी ते धार्मिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांहूनही अधिक महत्त्वाचे नि गुंतागुतीचे आहेत. मात्र सत्ताधार्‍यांच्या वतीने सुरु असलेले जादूचे प्रयोग पाहून बेधुंद झाल्यामुळेच कदाचित सामान्य माणसांना या गुंतागुंतीचे आकलन होत नाही आणि पवित्र गायीच्या नावाखाली सत्ताधार्‍यांनी रचलेल्या ढोंगाचीही कल्पना येत नाही.

या पार्श्वभूमीवर मराठी आणि इंग्रजी माध्यमातल्या समाजभान राखून असलेल्या संवेदनशील पत्रकार श्रुती गणपत्ये यांचे नुकतेच प्रकाशित ‘हु विल बेल दी काउ’ हे नोशनप्रेस डॉट कॉम या स्वयंप्रकाशनास प्रोत्साहन देणार्‍या संस्थेतर्फे प्रकाशित इंग्लिश भाषेतील संशोधनपर पुस्तक हिंदुत्ववादी अजेंडा रेटणार्‍या सत्ताधार्‍यांनी गेल्या काही दशकांपासून रचलेले ढोंग उघड करतेच, परंतु आनंदाने अज्ञानात बुडालेल्या समस्त तथाकथित देशभक्तांना (अर्थातच ते या पुस्तकाच्या वाटेला गेले तरच) भानावर आणण्याचीही क्षमता राखते आणि गोवंशाचे संरक्षण करण्याच्या नावाखाली सुरु असलेल्या शासनपुरस्कृत हिंसेचे रचनाशास्त्रही नेमकेपणाने उघड करते.

गाय हा प्राणी या देशातला अतिसंवेदनशील विषय बनला असताना, मुख्य म्हणजे या विषयावरून हत्या आणि दंगलींची मालिका सुरु असताना त्यावर वस्तुनिष्ठपणे संशोधन करणे आणि त्यातून दिसलेले-पाहिलेले वास्तव वाचकांपुढे आणणे म्हणजे आजच्या घडीला वाघाच्या तोंडात हात घालण्याइतके धाडसाचे काम आहे. पत्रकार, लेखिका या नात्याने श्रुती गणपत्ये या धाडसात कुठेही कमी पडलेल्या नाहीत, हे अर्पणपत्रिकेच्यापासूनच (लेखिकेने प्रस्तुत पुस्तक धर्मांध झुंडीचे बळी ठरलेल्यांना आणि द्वेषमूलक गुन्ह्याचे बळी ठरलेल्यांना अर्पण करून आपला इरादा स्पष्ट केलेला आहे) आपल्या मनावर ठसत जाते.

‘हेट इंडस्ट्री’वर प्रकाशझोत

आयुष्यात समोर शत्रू नसेल तर आयुष्य जणू बरबाद आहे, माणूस म्हणून जगणे निरर्थक आहे, समाजाला देशाला काही अस्तित्वच नाही ही धारणा निःसंशय विघातक मनोवृत्तीकडे निर्देश करते. दुर्देवाने हीच धारणा बाळगत गेले शतकभर देशात धर्मांध संस्था-संघटनांचे राजकारण (पुस्तकातल्या नोंदीनुसार बकरी ईद आदी मुस्लीम सणवाराच्या दिवशी उत्तर भारतात जातीय दंगली भडकण्यास 1881 पासून सुरुवात झालेली आहे. या दंगली 1890, 1900, 1910 च्या दशकांत सातत्याने घडलेल्या आहेत) सुरु आहे. स्वातंत्र्यानंतर तर हे राजकारण अधिकाधिक आक्रमक होत गेले आणि त्यातून हिंदू धर्मात पवित्र स्थान असलेल्या गायीभोवती खरे-खोटे कथानक रचून या देशाचा लोकशाहीवादी, सेक्युलर ढाचा भुसभुशीत करण्याचे वारंवार प्रयत्न झाले.

हे प्रयत्न आता केवळ संस्था-संघटनांच्या नव्हे, तर शासन-प्रशासनाच्या बाजूनेही जोरकसपणे होत आहेत. गोरक्षकांच्या टोळ्यांना संविधानिक संरक्षण मिळाल्याने गोरक्षणाच्या नावाखाली झुंडबळीच्या घटना आता नित्याचीच बाब होऊन बसली आहे. देशभक्तीत लीन असलेल्या सामान्य जनतेसाठी अपप्रचार हेच सत्य होऊन बसले आहे. या सगळ्याचा प्रभाव इतका जबरी की कितीतरी देशभक्त कार्यकर्ते मीडिया-सोशल मीडियाच्या साक्षीने गुणकारी औषध म्हणून गायीचे शेण खातानाचे, गायीच्या शेणाने स्नान करीत असल्याचे, गोमूत्राचे प्राशन करीत असल्याचे आणि इतरांनीही ते बिनदिक्कत करावे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवावी असे सल्ले देत असल्याचे दिसले आहे. अपप्रचार आणि वास्तव नि सत्यातला फरक स्पष्ट करणारे श्रुती गणपत्ये यांचे पुस्तक म्हणूनच खूप लक्षवेधी आहे.

मिथकांना टाचणी

गोमांस भक्षण करणे हिंदू धर्मात निषिद्ध आहे, हिंदू धर्म हा मुख्यतः शाकाहारींचा धर्म आहे, भारत हा शाकाहारींचा देश आहे, मांसाहार ही इथली संस्कृती नाही, गोमांसाचे सेवन करणारे मुख्यतः मुस्लीमधर्मीय लोक आहेत, हेच मुस्लीमधर्मीय लोक गोधनाची तस्करी करत आले आहेत, मातेसमान असलेल्या गायीचे मांस भक्षण करून मुस्लिमांना आमच्या धर्माला आव्हान द्यायचे आहे, हा देश आणि धर्म बाटवायचा आहे, गोवंशाची कत्तल करणारे देशातले सगळे कत्तलखाने अनधिकृत आहेत, कत्तलखान्यांचे मालक आणि त्यात काम करणारे सगळेच मुस्लीमधर्मीय आहेत… अशा काही पॉप्युलर मिथकांचा माग काढत लेखिका श्रुती गणपत्ये यांनी या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. त्यासाठी त्यांनी, हिंदू धर्मातले, धर्मशास्त्रातले आर्यकाळापासूनचे (गोमांसाला यज्ञयाग आदी प्रसंगी ब्राम्हण वर्गाच्या लेखी असलेले महत्त्व मनुस्मृति, महाभारतात गोमांस भक्षणासंबंधात आलेले उल्लेख आदी) गायीचे स्थान, गोरक्षणाचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातला इतिहास उलगडला आहेच.

परंतु याच्या जोडीला माहितीच्या अधिकाराचा कायदा वापरून 90हून अधिक अर्ज, गो संवर्धन, रक्षण, पालनपोषण, कत्तलीशी संबंधित गुन्हे, गोरक्षणाच्या नावाच्याखाली झालेल्या हत्या आदींशी निगडित शासकीय आकडेवारी-अहवाल, गोप्रदेश अशी ख्याती असलेला आणि गोरक्षणावर तणावाचे केंद्र ठरलेल्या पश्चिमी उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यातल्या गोरक्षकांच्या, सामान्य नागरिकांच्या, अधिकार्‍यांच्या, गोरक्षणात पुढाकार घेणार्‍या संस्था-संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या प्रत्यक्ष थेट मुलाखती, गोरक्षणाच्या नावाखाली होणारी हेळसांड, चाललेले गैरप्रकार, भ्रष्टाचार, लिखित साहित्य, चित्रपटादी कलांतून होत आलेला गोरक्षणाबाबतचा प्रचार, गोरक्षणासंबंधांतली पं. नेहरू. महात्मा गांधी आदींची ठाम भूमिका, गोमांसभक्षक असल्याची अफवा पसरवून नेहरूंविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी चालविलेला विखारी स्वरुपाचा अपप्रचार, बैल, म्हैस आदी गोवंशीय जनवारांशी जोडलेले अर्थकारण, निरुपयोगी गोधन सांभाळताना शेतकर्‍यांची होणारी कोंडी, म्हशीच्या मासांची होणारी निर्यात, गोवंशाची मिथके खोडून काढणारी पशूगणना, शाकाहारी-मांसाहारी यातले वास्तव दर्शवणारी आकडेवारी, गोमांस उपलब्ध होण्याशी न होण्याशी तळागाळातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जनतेच्या भूकबळीशी असलेला थेट संबंध, भारताची खाद्यसंस्कृती, या संस्कृतीचे हिंदुत्ववादी संस्था-संघटना आणि सरकारांनी लावलेले अर्थ, या खाद्यसंस्कृतीत गोमांसाचे असलेले स्थान, अन्नसवयींचा राष्ट्रवादाशी, जाती-धर्माशी असलेला संबंध, खाद्यान्नाशी जोडलेले राजकारण अशा चहुअंगांनी विषयाची मांडणी केलेली आहे.

विसंगतींवर बोट

फुकाचे गर्व आणि अभिमान बाजूला ठेवून ज्यास हा विषय वस्तुनिष्ठपणे समजून घ्यायचा आहे, त्यासाठी ही मांडणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यातून पुढे येणार्‍या अनेक विसंगती उदाहणार्थः आर्यकाळात उच्चवर्णीय ब्राम्हणास भोजनास गोमांस देण्याची असलेली परंपरा, जैन आणि बौद्ध धर्माचा प्रभाव खोडून काढण्याच्या चढाओढीत हिंदूधर्माचे करण्यात आलेले शाकाहारीकरण, आधुनिक काळात गोमांस विक्री-व्यवसायात मुस्लिमांसोबत हिंदूंसह इतर धर्मीयांचा असलेला सहभाग, गोमांस निर्यातीत जगात भारताचा असलेला चौथा क्रमांक (एकूण 11.8 टक्के सहभाग), त्यातही म्हशीच्या मटण निर्यातीत (23, 460.38 कोटी रुपये) नोंदलेली आघाडी, वर्तमानात मांसाहार करणार्‍या भारतीयांची 70 टक्के आकडेवारी इत्यादी तपशील राष्ट्रवादाचा ज्वर चढलेल्यांना ताळ्यावर आणणारे आहेत. गोधनाच्या हेळसांडीचा विषय मांडताना एका प्रकरणात, ‘धीस इज द रिअ‍ॅलिटी इन इंडिया दॅट दी होली गौ माता बिकम्स अनटचेबल आफ्टर शी डाइज. नो सपोर्टर ऑफ दी काउ प्रोटेक्शन मुव्हमेंट वुड वाँट टु क्लिन इट.’ हे गोरक्षणाच्या मतलबी राजकारणाच्या अनुषंगाने आलेले लेखिकेचे विधान तर समस्त संस्कृतिरक्षकांना उघडे पाडणारे असे आहे.

नवे समाजभान देणारे कथन

अधिकारांचे केंद्रीकरण झालेल्या काळात म्हणजे, कोविड संसर्गाच्या काळात लेखिका श्रुती गणपत्ये यांनी या पुस्तकासाठी शोध-संशोधन केले आहे. साहजिकच विश्वासार्ह माहिती गोळा करताना अडेलतट्टू नोकरशाहीने उभे केलेले कितीतरी अडथळे त्यांना पार करावे लागले आहेत. माहिती देण्यापेक्षा माहिती दडवण्याकडे आणि पारदर्शकतेपेक्षा अपारदर्शक कार्यशैली असलेल्या शासनसत्तेच्या काळात संशोधनपर पुस्तक लिहिणे किती आव्हानात्मक असू शकते, हेदेखील पुस्तक वाचताना वाचकांच्या नजरेस आल्यावाचून राहात नाही. इतकेच नव्हे, तर पुस्तकाच्या अखेरीस असलेली 14 पानांची संदर्भ सूची लेखिकेने संशोधनपर लेखनासाठी घेतलेल्या मेहनतीची पुरेपूर साक्ष देत राहते. ते पाहता, मुख्य धारेतला प्रिंट आणि टेलिव्हिजन मीडिया सत्ताधार्‍यांना खुश करण्यासाठी विदुषकी चाळे करण्यात मग्न असताना, संधोधनाच्या अंगाने लिहिल्या गेलेल्या प्रस्तुत पुस्तकाचे संदर्भ आणि संग्राह्य मूल्य खूप मोठे आहे, हे इथे आवर्जून नमूद करायला हवे आहे. किंबहुना, विचार गहाण ठेवलेल्या यंत्रमानवांची फौज निर्माण करण्याच्या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची बिनदिक्कतपणे पुनर्मांडणी होत असताना उत्तम, विचारी नि जबाबदार नागरिक होण्यासाठी उपयुक्त ठरेल, इतके मोठे या पुस्तकाचे महत्त्व आहे, असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर प्रत्यक्षातली गायीची प्रतिमा न वापरता योजलेली कॉम्प्युटराइज्ड इमेज समाजाच्या मुर्दाडपणाचे, यांत्रिकीकरणाचे आणि गायीच्या होत असलेल्या ऑब्जेक्टिफिकेशन अर्थात वस्तुकरणाचेच एक प्रतीक आहे. गायीच्या पायाशी दोरखंड आणि त्या दोरखंडाला बांधलेली घंटा पडलेली आहे. हीच पायाशी पडलेली घंटा गायीच्या गळ्यात कोण बांधणार अर्थात, गायीच्या नावाने गेली कित्येक दशके चाललेले हिंसक राजकारण कोण उघड करणार, अशा आशयाचा प्रश्न पुस्तकाच्या शीर्षकाद्वारे लेखिकेने विचारला आहे. खरे पाहता, हे पुस्तक लिहिण्याचे धाडस करून गायीच्या गळ्यात पहिली घंटा श्रुती गणपत्ये यांनीच बांधलेली आहे. प्रश्न, हे भान आणि त्यासाठी लागणारे धाडस आजच्या ‘सुसंस्कृत नि सभ्य’ लोकांत उरले आहे का, हाच असणार आहे.

पुस्तकाचे नाव- हु विल बेल दी काउ
प्रकाशनसहाय्य-नोशन प्रेस डॉट कॉम
लेखिका- श्रुती गणपत्ये
मूल्य-399
पुस्तकासाठी संपर्कः shruti.sg@gmail.co
m

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here