- Home
- ग्राऊंड रिपोर्ट
- ‘’मलेरियाने माझा मुलगा अन् नवरा बी मेला’’... गडचिरोलीमध्ये तापमान बदलाचा आणि डासांचा काय आहे संबंध?
‘’मलेरियाने माझा मुलगा अन् नवरा बी मेला’’... गडचिरोलीमध्ये तापमान बदलाचा आणि डासांचा काय आहे संबंध?
तापमान वाढलं की मलेरियाच्या डासांचे आयुष्य वाढतं, पाऊस जास्त झाल्यावर या डासांची पैदास वाढते. पाऊस कमी झाला की घरात अनेक भांड्यामध्ये पाणी साठवून ठेवले जाते, त्यातूनही डासांची उत्पत्ती वाढते. तापमान बदल हे डासांच्या उत्पत्तीस पोषक ठरत आहेत. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मलेरिया-डेंग्यूचे रुग्ण गडचिरोली भागात सापडतात. त्यामागचं नेमकं कारण काय? ‘मलेरियामुक्त गडचिरोली’साठी सरकारने स्थापन केलेला स्पेशल टास्क फोर्स नेमकं काय करणार? जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘बाईमाणूस’चा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट…
Author: संजना खंडारे, गडचिरोली
Published: 2025-06-05

- संजना खंडारे, गडचिरोली
"ब्रेन मलेरियाने माझा मुलगा अन् नवरा बी मेला, दोघे बी पोलीस होते. मुलगा जंगलात पेट्रोलिंग करायचा त्यातच त्याला ताप आला. हफ्ता भर त्याचा ताप गेलाच नाही. सरकारी दवाखान्यात जाऊन रक्त-लघवी चेक केली तर मलेरिया निगेटिव्ह दाखवलं. पोरानं घरीच गोळ्या घेऊन आराम केला. किती दिवस घरी राहू म्हणून ड्युटी वर गेला तर तिथेच चक्कर येऊन पडला. त्याला आलापल्लीला नेलं दवाखान्यात तर तो बेडवरनं खाली पडला. त्याला चंद्रपूरला नेल्यावर डॉक्टरनं सांगितलं, ब्रेन मलेरिया झाला अन् तो बेड वरून पडल्यामुळे कोमात गेला. लय पैशांची जुळवाजुळव करून कर्ज घेऊन वाचवायचा प्रयत्न केला पण, मलेरियामुळं नाय राह्यला जिवंत."
पार्वती जगन्नाथ मडावी यांची ही कहाणी… पार्वती महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा अहेरी भागात राहते. ‘माडिया’ या आदिवासी समुदायातून येणाऱ्या पार्वतीचे पती जगन्नाथ मडावी आणि मुलगा महेश मडावी या दोघांचाही मृत्यू ब्रेन मलेरियामुळे (Cerebral malaria) झाला. पार्वती यांचे पती आणि मुलगा दोघेही पोलीस होते. जगन्नाथ मडावी यांचा मृत्यू 2018 मध्ये ब्रेन...