‘कॉर्पोरेट सेन्सॉरशिप’ अशीही असू शकते

आदिवासी दिग्दर्शक छत्रपाल निनावेच्या मराठी फिल्मचा केला ‘घात’

टीम बाईमाणूस / २४ मे २०२२

छत्रपाल निनावेच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी अगदी परफेक्ट घडून येत होत्या. ‘घात’ हा छत्रपाल निनावे यांचा पहिलाच सिनेमा. आदिवासी समूहातून अत्यंत कष्टाने त्याने हा चित्रपट तयार केला. पहिल्याच सिनेमाला एनएफडीसी सारख्या राष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळाला. पुढे व्यायवसायिक निर्मिती आणि प्रदर्शनाचे अधिकार प्रख्यात ‘दृष्यम फिल्म्स’ने विकत घेतले आणि नंतर तर रिलायन्स जिओ स्टुडियो’ या बलाढ्य सिनेकंपनीने सिनेमाच विकत घेतला… इतकं सगळं व्यवस्थित घडत असताना अचानक पुढच्या १३ दिवसात कथानक बदलले. कुठे माशी शिंकली माहित नाही परंतू छत्रपालच्या या चित्रपटाचे प्रदर्शनच रोखण्यात आले आहे आणि हे त्याच रिलायन्स जिओ सिनेमा कंपनीने रोखले ज्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता. इतकेच नव्हे तर बर्लिन येथे भरवण्यात येणाऱ्या ‘बर्लिनाल‘ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जानेवारी २०२१ मध्ये निवड होऊनही निर्मात्या कंपनीने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

‘घात’ हा छत्रपाल निनावेचा पहिलाच सिनेमा. त्याचे कथानक महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागात घडते. हा सिनेमा एक थरारपट असल्याचे छत्रपाल सांगतो. मात्र चित्रपटातील आशय राजकीय किंवा सामाजिक पातळीवर कोणत्याही समूहांना किंवा हितसंबंधांना चेतावणारा नाही, असेही तो स्पष्ट करतो. “या सर्व गोष्टी मी आधीपासूनच निर्मात्यांशी बोलून स्पष्ट केल्या होत्या. सिनेमा निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर मी सिनेमा निर्मात्यांच्या सहमतीनेच पुढची प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यांना चित्रपटाची संकल्पना आवडलीही होती. तरीही त्यांनी चित्रपट का अडकवला आहे, हे अनाकलनीय आहे.”

दिग्दर्शक छत्रपाल निनावे

रिलायन्स जिओ स्टुडियोजने अचानक हात वर केले

२०१८ पासून अथक परिश्रमातून छत्रपालने सिनेमाची निर्मिती सुरु केली. आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल तो म्हणतो की, आमची फिल्म बर्लिनाल महोत्सवात निवड झालेली एकमेव भारतीय फिल्म ठरली होती. माझ्यासारख्या नवख्या चित्रपटकर्त्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर लवकरच चित्रपटाला एनएफडीसी कडूनही सन्मानित करण्यात आले. मात्र इतक्यात आम्हाला असे कळवलं गेले की आमचा निर्माता स्टुडिओ असणाऱ्या जिओ स्टुडियोजने रातोरात बर्लिनाल महोत्सवाला चित्रपटाचे प्रदर्शन करण्यास मनाई करणारी नोटीस पाठवली होती. ही धक्कादायक बाब कळल्यावर आम्ही तातडीने स्टुडियोच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु केले. मी त्यांना अनेक ईमेल केले. मी त्यांना म्हणालो चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, मला सांगा काय अडचण आहे. मात्र त्यांनी एकाही प्रयत्नाला दाद दिली नाही आणि प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. कोव्हीड पॅनडेमिकच्या सुरुवातीपासून आजवर त्यांनी कोणताही संवाद साधलेला नाही. त्यांनी चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळण्याचा अर्जही केलेला नाही.”

छत्रपालच्या माहितीनुसार दृश्यम फिल्म्सनं चित्रपट पुढं जिओ स्टुडियोजकडे नेला आणि मी मराठीसह इंग्रजीतही सिनेमाची संहिता त्यांना प्रस्तुत केली होती, त्यानंतर जिओ स्टुडियोज या प्रक्रियेत सहभागी झालं. आता चित्रपटाचे सर्व व्यावसायिक अधिकार जिओ कडे आहेत,” छत्रपाल सांगतात, दृश्यम फिल्म्सला जिओ स्टुडियोजने काही आक्षेप कळवले आहेत, ज्यामध्ये त्यांच्यामते सिनेमात पोलिसांचे दारू पितानाचे दृश्य, जातीवाचक शिव्या, देवीदेवतांची अवमान करणारे प्रसंग आहेत. “मी खात्रीनं सांगतो की या चित्रपटात असे काहीही नाही. ज्या शिव्या आहेत त्याही जातीवाचक नाहीत, मात्र त्यांना म्यूटही करायला मी तयारी दर्शवली. अशी उगाच काहीही कारणे त्यांनी दृश्यम फिल्म्सला कळवली आहेत. मला असे वाटते आक्षेप घेणारी नोटीस काढणाऱ्याने सिनेमा न पाहताच ही नोटीस तयार केली आहे. आम्हाला इतकीच अपेक्षा आहे की जिओ स्टुडियोजने एकतर या सर्व गोष्टी स्पष्ट कराव्यात आणि सिनेमा प्रदर्शित करावा, किंवा त्याचे अधिकार दृश्यम कडे हस्तांतरित करावेत.”

आदिवासी असल्याने अडवणूक?

‘घात’ हा चित्रपट आदिवासी विषयाशी संबंधित आहे. पोलिस अधिकाऱ्याव्यतिरिक्त मुख्य पात्रे आदिवासी आहेत. मी जास्तीत जास्त आदिवासींना कास्ट करण्याचा, चित्रपटाला अधिक अस्सल बनवण्याचा प्रयत्न केला. अर्थात, मी त्यांना केवळ त्यांच्या ओळखीमुळे कास्ट केले नाही; ते चांगले अभिनेते होते. 90% पेक्षा जास्त पात्रे एकतर दलित किंवा आदिवासी आहेत. मी देखील एक आदिवासी आहे, परंतु माझ्यापेक्षा जास्त या चित्रपटाचे कथानक, त्याचे संदर्भ, कलाकार, शूटिंगची ठिकाणे, सेटवर जेवण देणारे लोक त्यावर काम करत होते, जे आदिवासी होते. या सार्यांमुळे चित्रपटाची ओळख आदिवासी आहे. त्यामुळेच त्यांनी अडवणूक केली का? मला माहित नाही मी प्री-प्रॉडक्शन मीटिंगमध्ये मी त्यांना सगळं दाखवलं होतं. लोकांनी माझ्या फेसबुक पोस्टबद्दल गैरसमज करून घेतला, ते म्हणाले, ‘तुम्ही आदिवासी कार्ड वापरत आहात.’ पण मी माझी ओळख दाखवत नाही. जिओ स्टुडिओ आणि दृश्यम फिल्म्सच्या लोकांसह बर्याच लोकांना माझी पार्श्वभूमी देखील माहित नव्हती.

छत्रपाल निनावेची फेसबुक पोस्ट

या संदर्भात फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर मला फारशा अपेक्षा नसतानाही, वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या चित्रपटउद्योगांकडून मला खूप पाठिंबा मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे. पण मला हे सांगायलाच हवे की मला मराठी चित्रपटसृष्टीचा कोणताही पाठिंबा मिळाला नाही. एकही फोन नाही. मी पर्यायांचा शोध घेत आहे. सध्या तरी कोणतीही योजना नाही, परंतु मी काही कायदेशीर पर्यायांचा विचार करीत आहे. पण पुन्हा एकदा अत्यंत व्यावहारिक असणे, जिओसारख्या मोठ्या कंपनीविरुद्ध लढा देणे, ज्याच्याकडे देशातील सर्वोत्तम कायद्यासंबंधीच्या लोकांचा संपर्क आहे, माझ्यासमोर एक मोठे आव्हान असणार आहे, ज्याच्या बँक खात्यात १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम नाही. मी काही धर्मादाय, प्रो-बोनो पर्याय पाहत आहे आहे कारण अन्यथा, माझ्यासाठी ही एक प्रचंड वेळ घेणारी आणि महागडी प्रक्रिया असेल. मला आशा आहे की सोशल आणि प्रिंट मीडियाच्या दबावातून, जिओ स्टुडिओला त्यांची चूक जाणवेल. किंवा कदाचित ते या समस्येकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतील. याला एक कॉपीराइट प्रकरण म्हणून स्वीकारण्यासाठी मी [संचालक] असोसिएशनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन. जरी मला त्यांचा तिरस्कार वाटत असला, तरी मी राजकारण्यांकडे जाण्याचा प्रयत्न करेन. माझा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.

अनुवाद – प्रतीक भामरे

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here